धागा घट्ट मैत्रीचा...

अभिनेत्री दीप्ती केतकर आणि निर्मात्या सुवर्णा मंत्री.
दीप्ती केतकर, सुवर्णा मंत्री
दीप्ती केतकर, सुवर्णा मंत्रीsakal

मनोरंजन सृष्टीतले बरेच कलाकार एकमेकांचे खास मित्र-मैत्रिणी असतात. पण काही कलाकार असेही आहेत ज्यांची मालिकेच्या निमित्तानं भेटलेल्या निर्मात्यांशी मैत्री झाली. अशीच एक जोडी म्हणजे अभिनेत्री दीप्ती केतकर आणि निर्मात्या सुवर्णा मंत्री. त्यांची पहिली भेट दहा वर्षांपूर्वी ‘मला सासू हवी’च्या सेटवर झाली. तेव्हा सुवर्णा या मालिकेच्या शेड्युलर म्हणून काही काळासाठी आल्या होत्या. तेव्हा त्यांनी दीप्तीला कामात प्रोत्साहन दिल्यामुळं त्यांची मैत्री अधिकाधिक घट्ट होत गेली. त्यानंतर थेट आता ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ या मालिकेच्या निमित्तानं दोघींना एकत्र काम करण्याचा योग आला. सुवर्णा या मालिकेच्या निर्मात्या होत्या.

दीप्तीनं सांगितलं, ‘‘सुवर्णाकडून मला सकारात्मकता मिळते. कोणी तिला एखादी गोष्ट सांगिल्यावर त्यावर तिचं नकारात्मक उत्तर कधीही नसतं. ती प्रत्येकाशी चांगलंच वागते. तिला कुठलीही गोष्ट खूप छान मॅनेज करता येते. पडद्यावर किंवा पडद्यामागं काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला काही समस्या असल्यास त्या जाणून घेत सोडवण्याचा ती प्रयत्न करते आणि त्यात यशस्वीही होते. ‘मला सासू हवी’ या मालिकेच्या वेळी मी ‘एका पेक्षा एक’ या शोमध्येही स्पर्धक म्हणून सहभागी होते. यामुळं माझी लोकप्रियता अधिक वाढली आणि म्हणून मालिकेतही बऱ्याच सीन्समध्ये मी हवी असायचे. त्यावेळी तिनं माझं शेड्युल उत्तम आखल्यामुळं मी दोन्हीमध्ये एकावेळी काम करू शकले. गेली अनेक वर्षं ती या क्षेत्रात कार्यरत आहे. ज्याप्रकारे ती तिचं घर आणि करियर हे दोन्ही सांभाळते, ते शिकण्यासारखं आहे. अशा अनेक बाबतीत मी तिच्याकडं आदर्श म्हणून बघते. आम्हा दोघींच्या व्यग्र वेळापत्रकामुळं आमचं वरचेवर बोलणं होत नाही, पण आम्ही कायम एकमेकींबरोबर असू याची जाणीव आम्हा दोघींनाही आहे.’’

सुवर्णा म्हणाल्या, ‘‘दीप्ती अत्यंत लाघवी आहे; पण तितकीच ती सडेतोडही आहे. एखादी गोष्ट नाही पटली, तर तिथल्या तिथं ती बोलून मोकळी होते. आमचं ट्युनिंग इतकं छान आहे की अनेकदा मी एखादं वाक्य बोलले की माझं पुढचं म्हणणं ती पूर्ण करते. तिला माझ्याबद्दल फार प्रेम आहे. ‘मला सासू हवी’नंतर बरेच वर्षं एकत्र काम करण्याचा योग आला नाहीस तो ‘येऊ कशी कशी मी नांदायला’मुळं आला. दरम्यानच्या काळात आमच्यातली मैत्री तितकीच घट्ट होती. आता दीड वर्ष पुन्हा एकत्र काम करून ती अजूनच घट्ट झाली आहे. अभिनेत्री म्हणून तर ती उजवीच आहे, कामाच्या बाबतीत फार मेहनती आहे. तिची प्रत्येक भूमिका तिनं आधी साकारलेल्या भूमिकेपेक्षा वेगळी असते. मला तिचं ‘अवघाची हा संसार’ आणि ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ या मालिकेतलं काम अतिशय आवडलं. पर्सनली आणि प्रोफेशनली आम्हा दोघींनाही एकमेकींबद्दल आदर आहे आणि आम्हाला एकमेकाींबद्दल वाटणारं हे प्रेम आणि आदर यात कधीही बदल होणार नाही.’’

‘पावनखिंड’ या तुफान गाजलेल्या चित्रपटात लक्षवेधी भूमिका साकारत दीप्ती आपल्या भेटीला आली होती. त्यापाठोपाठ आता ती ‘शेर शिवराज’ या बहुप्रतीक्षित चित्रपटात आपल्याला दिपाई बांदल यांच्या भूमिकेत दिसेल. ती म्हणाली, ‘‘दिपाईंना प्रति आऊसाहेब म्हणत, इतक्या त्या थोर होत्या. त्या लढवय्या होत्या. त्यांचं बोलणं, चालणं, बसणं अत्यंत रुबाबदार होतं. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर त्या लढाईलाही गेल्या होत्या. ही भूमिका साकारण्यासाठी मी खूप मेहनत घेतली, सराव करून तलवार चालवायला शिकले. मी या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी खूप उत्सुक आहे. ‘शेर शिवराज’ प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com