मैत्री ‘कल्ला-कारांची’

श्रेया बुगडे
Thursday, 8 August 2019

आम्ही इतके वर्षे ‘चला हवा येऊ द्या’सारखा कॉमेडी शो करीत आहोत. तो एवढी वर्षे चालू राहण्यामागचे कारण लिखाण, कलाकार, क्वालिटी परफॉर्मन्स तर आहेच, पण याहूनही विशेष आहे ते म्हणजे आमची सर्वांची मैत्री! बरेच शो हे चांगला प्रतिसाद असतानाही केवळ कलाकारांचे एकमेकांशी पटत नसल्यामुळे बंद झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

आम्ही इतके वर्षे ‘चला हवा येऊ द्या’सारखा कॉमेडी शो करीत आहोत. तो एवढी वर्षे चालू राहण्यामागचे कारण लिखाण, कलाकार, क्वालिटी परफॉर्मन्स तर आहेच, पण याहूनही विशेष आहे ते म्हणजे आमची सर्वांची मैत्री! बरेच शो हे चांगला प्रतिसाद असतानाही केवळ कलाकारांचे एकमेकांशी पटत नसल्यामुळे बंद झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. 

या मैत्रीमागे आमच्या सर्वांचा स्पष्टोक्तेपणा आहे. आम्हाला एकमेकांचे पटले नाही तर आम्ही ते स्पष्टपणे बोलतो, अगदी भांडतोही, पण यामुळे कुणीच कुणाच्या मागे बोलत नाही. जे काही आहे ते सरळ तोंडावर बोलतात. आम्हाला टीमची ताकद काय असते, हे माहीत आहे. बरेचदा शो चालू असताना काहीतरी विसरणे होते, अशा वेळी प्रेक्षकांच्या समोर आमच्यापैकी कुठल्याच कलाकाराला उघडे न पाडता आम्ही सांभाळून घेत असतो. कॉमेडी शो असल्याने आमचे सेटवरचे वातावरणही हलके-फुलके असते. वातावरण हलके ठेवले तरच आमच्याकडून चांगली कॉमेडी होऊ शकते, असा आमचा विश्‍वास आहे. माझ्यासोबत असणाऱ्या सर्वच कलाकारांनी मला आधीपासूनच सांभाळून घेतले आहे. त्यामुळे मी आता चांगला परफॉर्मन्स करू लागली आहे. 

आमच्या मैत्रीची खरी कसोटी लागली ती, ‘चला हवा येऊ द्या़’च्या विश्‍वदौऱ्यावर! विश्‍वदौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यावर आम्ही थायलंडला होतो. शोच्या आधी तेव्हा भारत दादा (भारत गणेशपुरे) खूप आजारी पडला. तो इतका आजारी पडला की, त्याला ॲडमीट करावे लागले. ती रात्र आम्ही कधीच विसरू शकणार नाही. तेव्हा आमच्या लक्षात आले, आम्ही खूप जास्त कामाचा ताण घेऊन काम करत आहोत.  सेटवर कुशलशी माझे खूप जमते.

आम्ही अगदी व्यावहारिक गोष्टींपासून घरगुती गोष्टींपर्यंत सगळ्या चर्चा करतो. कुशल आणि मी आम्ही दोघेही वात्रट असल्याने दोघांनाही मस्ती करायला खूप आवडते. पण आम्ही नेहमी एकमेकांचा सल्ला घेत असतो. आम्ही नेहमी म्हणतो, आम्ही दोघे ‘मित्र-मैत्रिणी’ नसून ‘मित्र-मित्र’ आहोत.

आमच्या दोघांचे बॉंडिंग खूप वेगळे आहे.  माझ्या खऱ्या आयुष्यात माझा नवरा माझा बेस्ट फ्रेंड आहे. मी हायपर आहे, तर तो शांत आहे. त्यामुळे वेळप्रसंगी तो मला सांभाळून घेत असतो. नवरा तुमचा बेस्ट फ्रेंड असेल तर बऱ्याच गोष्टी सोप्प्या होऊन जातात. 
(शब्दांकन - सुवर्णा येनपुरे-कामठे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Friendship Day Special Actor Life