आयुष्यात हवी मैत्रीची ऊब

Friendship
Friendship

नुकतीच मुख्याध्यापिका म्हणून रुजू झालेल्या माझ्या ऑफिसबाहेरची मुलींची गर्दी पाहून मला आश्‍चर्यच वाटलं. आज असं काय होतं, की माझ्या छोट्या विद्यार्थिनी मला भेटायला आल्या होत्या. मी बाहेर आले. त्या लाजाळू मुलींमधली एक धिटुकली पुढे आली आणि म्हणाली, ‘मोठ्या मॅडम आज ‘फ्रेंडशिप डे’ म्हणून तुम्हाला फ्रेंडशिप बॅंड बांधायला आलोय.’ मला गंमत वाटली. मी भोळसटपणाचा आव आणत म्हटलं, ‘फ्रेंडशिप डे म्हणजे गं? मला तर ठाऊकच नाही.’ तिला आश्‍चर्य वाटलं, पण ती म्हणाली, ‘म्हणजे हा बॅंड तुम्हाला बांधला, की तुम्ही आमच्या बेस्ट फ्रेंड होणार. मग तुम्ही आमच्याशी आणि आम्ही तुमच्याशी खूप सिक्रेट शेअर करणार.’ तिच्या निरागस बोलण्याचं मला मनोमन हसू आलं. वाटलं, ‘मैत्री’ लहान मुलांसाठी असो, की मोठ्यांसाठी तिचा गाभा आपुलकीचाच असतो’

फार वर्षांपूर्वी कदाचित १९३० मध्ये आपल्या मित्रांबरोबर एक दिवस साजरा करावा, कार्ड द्यावं असा प्रघात सुरू केला तो एका ‘जोएस’ नावाच्या व्यापाऱ्याने. काही असंही सांगतात, की १९५८ मध्ये डॉ. आर्टिमियोंनी एका डिनरच्या दिवशी असा ‘फ्रेंडशिप डे’ करण्याचा विचार मांडला आणि परंपरेने तो युरोप, आशिया सर्वत्र वेगाने लोकप्रिय झाला. रंग, जाती, धर्म या भेदभावांना बाजूला सारून मैत्रीची भावना जिवंत ठेवण्याला जास्त प्राधान्य मिळालं, हा यातला मौलिक भाग. आपल्याकडं फ्रेंडशिप डेकडे फार प्रेमानं पाहिलं जात नाही. नाती ही सांभाळायची असतात. त्यांचे उत्सव करायचे नसतात. पण, तरीही ‘फ्रेंडशिप डे’ लोकप्रिय झालाय, कारण जुनं ते सोनं असलं तरी नवं ते हवंच असतं ना?

तरुण मुलांमध्ये तर हा खूप आवडता दिवस आहे. या वयातली ‘मैत्रीची भावना’ ही बरीचशी प्रेम आणि सोबत, सुरक्षितता आणि आधार या अपेक्षांशी जोडलेली असते. लहानपणी आपल्या आवडीनिवडींशी जुळवून घेणारे, आपलं ऐकणारे असे मित्र जोडले जातात. तिशी-पस्तीशीमध्ये समान विचार, अपेक्षा, अडचणी असणारे वेळप्रसंगी आपल्या भावना शेअर करता येतील, अशांशी मैत्री होते. जशी बालपणी मैत्री खूप हवीहवीशी वाटते. तशीच उतारवयातही ती फार आवश्‍यक असते. कारण आयुष्यातल्या एकटेपणाला ती अनमोल सोबत असते.

‘मित्र हवेतच,’ कारण या मैत्रीत आणि इतर नात्यात एक फरक आहे, तो म्हणजे मैत्रीत असतं मोकळेपण ती कुठल्या बंधनांमध्ये बंदिस्त नसते. भावना आणि विचार मुक्तपणे मांडता येतात. विसरण्यापेक्षा माफ करणं अधिक असतं. मित्र-मैत्रिणींमध्ये काय पाहता यापेक्षा काय अनुभवता आणि एखादी गोष्ट सोडून देण्यापेक्षा मैत्रीचा बंध हातात घट्ट कसा धरून ठेवता हे गरजेचं असतं. त्यात असतो एक हक्क, चेष्टा-मस्ती करण्याचा, त्रास देण्याचा, फजिती करण्याचा, कुठल्याही नावाने हाक मारण्याचा, सगळ्या वस्तू, कपडे वापरण्याचा आणि वेळप्रसंगी मित्रासाठी जिवाला जीव देण्याचा.

सगळी कामं बाजूला ठेवून मित्रासाठी वेळ देणं, जेव्हा त्याला किंवा तिला गरज असेल तेव्हा त्यांच्यासाठी आपलं तिथं असणं हीच खरी मैत्रीची व्याख्या आहे. हे एक असं नातं आहे जे जबरदस्तीनं लादलेलं नसतं. ते निवडलेलंही नसतं. जगात सत्ता, संपत्ती, सुख सारं असलं तरी तुम्हाला किती मित्र-मैत्रिणी त्यांच्या मनात मैत्रीचं स्थान देतात, यावर तुमचं ऐश्‍वर्य ठरतं. मैत्रीच्या या धाग्यांची वीण जर निगुतीनं, प्रेमानं, आपुलकीनं विणली तर त्याच्या रेशमी, तलम वस्त्राने मिळालेली मैत्रीची ऊब आयुष्यातल्या अनेक आव्हानांना सामोरं जाण्याचं बळ देते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com