Friendship Day Special : लग्न झाल्यावर मैत्री असणे तुम्हाला चुकीचे वाटते? मग 'हे' नक्की वाचा

प्रणाली देशमुख
Sunday, 4 August 2019

जन्म हा एका थेंबासारखा असतो, आयुष्य एका ओळीसारखं असतं, प्रेम एका त्रिकोणासारखं असतं, पण मैत्री असते ती वर्तुळासारखी ज्याला कधीच शेवट नसतो.

‘एक लडका और एक लडकी अच्छे दोस्त कभी नहीं बन सकते’ आठवला का हा डायलॉग ? पण, का नाही होऊ शकत? दोघांची मनं स्वच्छ असली, स्त्री-पुरुष चौकट काढून टाकली, तर त्यांचीही मैत्री निखळच ना? पण, आजूबाजूच्या नजरा त्यांच्याकडे संशय आणि वेगळ्या चष्म्यातून बघतात. 

कदाचित काही लोक मैत्रीचा अवमान करत मैत्रीच्या नावाखाली दुसरं नातंही रुजवत असतील. पण, म्हणून काय तोच शिक्का सर्व स्त्री-पुरुषांवर मारायला हवा का? 

दोन सख्या मैत्रिणींमध्येही कधीतरी एकमेकींची प्रगती, नाव, रूप बघून जेलसी निर्माण होते. मग अशावेळी आपण असं म्हणतो का, की दोन महिला कधीच सुखदुःखाच्या साथीदार बनू शकत नाही. शक्‍यता दोन्ही बाबतीत सारखीच. पण भीती, बदनामीचे लेबल ‘तो’ आणि ‘ती’च्या मैत्रीलाच का?

मैत्रीत वय, जात, धर्म, नातं या सगळ्या गोष्टी नगण्य. तुम्ही एकाच वयाचे म्हणून बेस्ट फ्रेंड हा ‘टॅग’ चुकीचा. तुम्ही ‘क्‍लासमेट’ आहात म्हणून तुमच्यात मैत्री हा समज फारच अर्धवट. मैत्रीसाठी वयाचं बंधन कधीच नसतं. मला जर विचारलं की, तुझी बेस्ट फ्रेंड कोण तर तीर कमानीतून निघावा, इतकी बेछूट मी सांगेन ‘माझी आजी’. कारण, तिच्याशी बोलताना मन हलकं होतं. ती माझ्या भावना सहज समजू शकते. तिला न सांगताही माझ्या मनाचा तळ गाठता येतो. म्हणून, ती माझी दिलोजानवाली मैत्रीण. हा निसर्गही आपला मित्रच. किती किती भरभरून देतो ना तो आपल्याला.

महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडून कोणताच ‘रिटर्न’ तो घेत नसतो. तुमचं नवराबायकोचं नातं ‘इगो’ बाजूला ठेवून, जर मैत्रीत बदललं तर काही प्रमाणात हिंसा, घटस्फोटांचं प्रमाण कमी होईल. नातं कुठलंही असू द्या, त्याला मैत्रीरूपी सोनेरी किनार लावली की जीवन सहजसोपं, सुखकर होतं. विश्वास नाही बसत? तर करून बघा.

‘तो’ आणि ‘ती’ चाळिशी पार केलेले. दोघेही एकाच ऑफिसात चार वर्षांपासून सोबत काम करताहेत. कधी रात्री उशीर झाला, तर तो घरापर्यंतही सोडतो. गरज पडल्यास बिनदिक्कत एकमेकांना मदत करतात. आज जरा ऑफिसच्या कामाबद्दल चर्चा करायची म्हणून एका ‘कॅफेटेरिया’त बसलेले. त्यांच्याच बाजूच्या टेबलवर घराशेजारचं जोडपं बसलेलं. तिने लगेच हाय करून ओळख दाखवली. पण, त्यांच्या नजरेत जणू संशय दाटलेला. लग्न झालेली बाई आणि परपुरुषासोबत कॉफी घेतेय. त्यांच्यातल्या निखळ मैत्रीला संशयाच्या धुक्‍यातून बघत ते जोडपं बाहेर पडलं..

लग्न झाल्यावर मित्र असणं चुकीचंच, असं का वाटतं काही ‘सो कॉल्ड’ लोकांना? एक स्त्री आणि पुरुष यांच्यातल्या मैत्रीला संशयी नजरेनं का बघितलं जातं? नवऱ्याच्या लग्नाआधीच्या मैत्रिणी बायकोला चालतात. पण, हा माझ्या बायकोचा मित्र आहे, असे किती नवरे मान्य करतात?

मैत्री निखळ, निरपेक्ष असली तर स्त्री-पुरुष हा भेद गौणच. पुरुषाने स्त्रीला तिच्यातली स्त्री म्हणून न पाहता फक्त मैत्रीण या नजरेतून बघितलं तर ती मैत्री मिसाल बनू शकते. जीवनात काही हळवे क्षण येतात. ते जिवलग किंवा नातलग यापैकी कुठेही व्यक्त करता येत नाही. ते क्षण आपण मित्र किंवा मैत्रिणीशी सहज शेअर करून शकतो. 

अलीकडे आपण स्त्रीपुरुष समानतेवर सतत वाचतो, भाष्य करतो. मग विचार करा ती त्याची आई असते, बहीण असते, पत्नी असते, तर एक मैत्रीण म्हणून बघताना इतका दूषित भाव का? 

‘एक लडका और लडकी अच्छे दोस्त हो सकते हैं,’ असं अगदी मनापासून वाटतं. फक्त दोस्ती म्हणजे काय, हे कळलं की मर्यादा, विश्वास, आपुलकी, जिव्हाळा आपोआपच रुजतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Friendship Day Special Mokale Vya