Gantavya
Gantavyasakal

गंतव्य

अनादि, अनोळखी काळात अन्नशोधार्थ प्रवास आरंभलेले इथवर आले होते. बहुतेक सगळे अडाणी आणि अहंमन्य होते.
Published on

अनादि, अनोळखी काळात अन्नशोधार्थ प्रवास आरंभलेले इथवर आले होते. बहुतेक सगळे अडाणी आणि अहंमन्य होते. आता खानपानाचे वैपुल्य असूनही त्यांच्या भुका भागत नव्हत्या. अनेक कालखंड व्यापून सुरू राहिलेल्या या प्रवासात ऋतूंच्या नेमाने चालू ठेवलेल्या लढाया अन् युद्धे हीच काय ती मिळकत होती. परस्परांशी वारंवार लढून विध्वंसाच्या अनेकविध रूपांची मोहिनी त्यांनी कमावली होती. मात्र साधे स्वतःस अमर करणे मात्र त्यांना साधले नव्हते.

‘मलाच सारं कळतं,’ या सार्वकालिक इमानी भ्रमाच्या सोबतीने सगळे जात होते. सूर्यास्तास, प्रवासी अशी ओळख सांगून ते मुक्कामापुरती जागा आणि झोपेपुरतं जेवण मिळवीत असत. आता तसं सगळं विपुल होतं तरी घेतलेल्या वस्तू वा सेवेचा मोबदला मोजावाच लागत असे. मात्र दिल्या-घेतल्याचा हिशेब कधीच जुळत नसे. म्हणजे मुक्कामाची सोय करण्याकरता ठेवणीतला जिन्नस दिला आणि अन्नाकरता दुर्मीळ ऐवजाचा तुकडा टाकला तरी निजताना असमाधान हमखास उशाशी गुणगुणत राही. घेतल्या गोष्टीत तृप्ती नसे. प्रत्येकाची अतृप्ती निराळी असे.

असा तहानलेला प्रवास करत असताना पूर्वी ऐकलेल्या गोष्टी ते एकमेकांना सांगत असत. काहींना तर गतकाळात जाऊन लपून राहावे वाटे. कारण तिथे गोष्टी असत. गोष्टीतली पात्रे अट्टाहास करत नसत. त्यामुळे गोष्टीतल्या या पात्रांची वा प्रसंगांची सरमिसळ करणे, पात्रांना स्वतःचे दुःख देऊन स्वतःचे रडे रडून घेणे अशी मौज करता येई. प्रवास रंजक झाल्याचाही भास होत राही. याउलट, अनेक जण भविष्याच्या काल्पनिक कहाण्या रचून त्यातल्या दिवास्वप्नात रमून राहणारे तर काही जण भविष्य भयाने खचून जाणारेही होते.

पळापळाने धावणारा काळ गोठवण्याचा आपल्या परीनं उरस्फोड प्रयत्न करणं हे प्रत्येक जगणाऱ्याच्या मनावरचं गारुड होतं. ही शिक्षा जन्मजात मिळालेली असे. काहींना मात्र भूतभविष्य टाळून, वर्तमान प्रवासात गोष्टी सापडत.

कधी, जे घडत असे त्यात, तर कधी जे दिसत असे त्यात. घडणारे सारेच दिसत नसे आणि दिसणारे अनेकदा नीरस असे. पण नवे सापडावे असा ध्यास धरलेले फार थोडे शोधत राहत. त्यांना सापडलेल्या सगळ्याच क्षणांची गोष्ट होत नसे. काही वेळा उमाळ्यानं उगवलेले प्रदीप्त क्षण गोष्टीत गुंफताना मालवून जात. जुनी गोष्ट सांगत राहणे किंवा नवी गोष्ट रचण्या, घडवण्याचा प्रयत्न करणे, या दोन प्रकारांत हे बरे आणि ते वाईट अशी वर्गवारी करणे वेडगळपणाचे होते. तरीही हेवेदावे होत राहत. हेटाळणी आणि कुचेष्टा यांचेही रान माजलेले असे.

एकदा एका मुक्कामी मोठा आवाज होऊन गोंधळ उडाला. दूर कुठेतरी काहीतरी घडलं पडलं होतं. झोप उडालेले सारेच विस्तवाभोवती बसले. ज्याने त्याने आपापली बुद्धी परजली, अनुभव पेलला अन जणू द्वंद्वास उभे राहिल्याप्रमाणे ते एकमेकांवर ठिणग्यांप्रमाणे बरसू लागले. ज्याला त्याला सत्य सांगायचे होते आणि ते मलाच गवसले आहे ही खात्रीही त्या हरेकापाशी होती. किंबहुना, मला जे गवसले आहे तेच सत्य आहे असे प्रत्येकाच्या मनात निनादत होते. बाहेरून आलेला, दूर झालेला मोठा आवाज एव्हाना काळाने रात्रीभोजनात गिळला होता. विस्तव धगधगून त्या काळभोजनाचे अनेकमुखी रवंथ ऐकत अर्थ पचवत होता.

‘‘हा सृष्टीच्या जन्मक्षणी झालेला प्रस्फोटक धमार’’ असे म्हणत एकाने धर्मविचार मांडला. तर ‘‘हा अंतिम क्षणाचा भयकारी नगारा’’ असे म्हणत दुसऱ्याने त्याविरुद्ध एल्गार केला. सतत प्रसरण पावणारे अवकाश आपल्यापुरते करकचवत प्रवासी रक्त जाळत राहिले. अथांग अंधाऱ्या पोकळीत तुटणारा तारा दाखवून झगडले. लढले, काही मेले. दमले, निजले. उरलेले सगळेच पुढे निघाले.

अनेक पावसाळ्यांच्या अपरिमित वर्षावाने खंगून अरुंदलेल्या आणि हिरव्या रंगाची खाणच बनलेल्या कंच दऱ्यांकडे शिखरावरून पाहताना आवई उठली, की कदाचित आत्ता उल्का पडली. निःशब्द आसमंतात दूर धुळीचे लोट उठले आणि वाढत्या आकारामुळे डोळ्यात भरले. घडल्या दिसल्या क्षणाचे सारे साक्षीदार मग प्रसवू लागले. कुणी बेताल दावे केले, कुणी अगम्य तर्क मांडले. एकाने तर त्यास ईश्वराचे पाऊल म्हटले अन् धावत निघालाच तिकडे. एकच गहजब झाला. ईश्वरी इच्छेच्या आकलनाचे रण माजले.

मग पूर्वग्रहांच्या मर्यादांचे पितळ उघडे पडले. जे दिसले त्याचे आकलन करण्यासाठी पूर्वसंचिताखेरीज उपाय नसल्याने तसेच कल्पनेलाही अनुभवाचे कुंपण असल्याने, जे प्रथमच अनुभवले त्याचा अर्थ लावणे सगळ्यांनाच कठीण जात होते. तरीही इवले मेंदू श्रमत झीजत तंडत राहिले. घडल्या गोष्टीचे अनेक अपभ्रंश इतिहास म्हणून जमा होत राहिले. पुन्हा एकदा बरेच जण दमले मेले, संपले, मातीत मिसळले.

पुढे जाणारे काही प्रवासी लिहिणारे तर काही कथा सांगणारेही होते. काही गाणारे, नाचणारे होते. दगडात चित्र कोरणारे काही होते तर काही व्रात्य श्वापदांस बंदी बनवणारे होते. बरेचसे नुसतेच क्रूर आणि कपटी होते. उदारतेचे सोंग वठवून लुबाडणारेही कित्येक होते. या साऱ्यांचे वंश होते, वर्ण होते, पिढ्या होत्या आणि नावे होती. नावासाठी मरणारे मेल्यावर नाव कमावीत असत. एकुणात हरेक मुक्कामी मोठी जत्रा भरत असे. ज्याला त्याला हव्या त्या नव्या भ्रमाचे पूजन सोहळे करण्याचे स्वातंत्र्य असे.

प्रवास अखंड चालू होता आणि काळ निश्चित गतीने धावत होता. प्रवासी जथ्थ्यानं जात होते. एकमेकांशी गुजगोष्टी, हेवेदावे करत होते. मग काही पावसाळ्यांनंतर, धर्माचा कौल लाभलेली दिशा पकडून प्रवासी मुक्कामी पोहोचले असता अक्रीत घडले. कुण्या एका नादिष्टाने अज्ञातावर घाला घालून लुटलेल्या, न ऐकलेल्या, पाहिलेल्या कथा सांगण्याचे अगम्य कसब असलेली चित्रयंत्रे विकणे सुरू केले. चित्रे रंगीत आणि हवीहवीशी वाटणारी होती. यंत्र हुशार अन् तत्पर होते. चित्रयंत्रे विकत घेऊन न पाहिलेल्या ठिकाणी जाऊन आल्याचे भास भोगण्यात सारेच हरवून गेले. नव्या यंत्रवाक्याचे अर्थ अथांग होते आणि रंग अगणित! यंत्राकडे प्रवासात पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे निराळेच उत्तर होते. यंत्राने प्रवाशांनी उरी जपत, शिरी धरून आणलेली सारी सत्ये लुळी खुळी ठरवून पळवून नेली. त्यामुळे दिग्मूढ झालेल्या प्रवाशांनी स्वविचार क्षमता कलम करून, यंत्राच्या दास्यत्वाचे स्वतःवर रोपण केले. यंत्रविचार धर्माचरणासम पवित्र मानून यांत्रिकतेने आज्ञा स्वीकारणे पत्करले.

दिवस इतके बदलले, की काळाच्या या तुकड्यावर विशिष्ट नावाचे गोंदण उठले आणि त्याची छाया गडद होत जाताना दैन्य सरले, धनधान्याचे हारे लागले. प्रगतीचे वारे वाहिले. भूगोल बदलवणारे निर्माण साकार झाले. हंसपंख लावून उडणाऱ्या गुलछबू आकांक्षांचे ढग आभाळभर पसरत राहिले. निळ्या आभाळापलीकडे नभ विस्तारत जात होते, तेव्हा बहुतांश प्रवासी अंगभूत गुणवत्तेचे कुपोषण करीत बसून होते. आता सगळ्यांकडे सगळे होते. आठवणींचा जळत राहणारा पोतही सारखाच होता आणि भविष्याबद्दलची कुरतडणारी भीतीही एकसमान होती. आता दिवस असूनही प्रवासी पुढे सरकेनात. प्रवास करणे एवढेच नियत कार्य असूनही स्थैर्यातून आलेले निर्बुद्ध सुख भोगत पडून राहिले, सुस्तावले, फैलावले. आता ते वावदूक अस्वस्थतेची खरूज खाजवत चटोर बोलगाणी लिहीत, गात होते. बेलगाम खात होते, वाट्टेल ते पीत होते.

भोगले जात असलेले काहीच टिकाऊ नाही हे ठाऊक असूनही पुनःपुनः त्याच त्या प्रसंगांची चित्रे पाहत होते. अशा भ्रमिष्ट बहुसंख्याना कधी ईश्वराच्या, कधी धर्माच्या, कधी राष्ट्राच्या, कधी जातीच्या, कधी अस्मितेच्या, कधी वर्णाच्या तर कधी कुळाच्या दुहाईच्या सापळ्यात खेळवत ठेवून निरंकुश सत्ता भोगणारे मोजके परंतु चतुर दिव्यबुद्धी प्रवासाची दिशा ठरवत होते. नवनवी युद्धे पुकारून प्रवासाला हेतू पुरवीत होते. बहुसंख्य भ्रमिष्ट मूर्खांना कल्याणाचा कार्यक्रम राबवण्याच्या स्वप्नात गुंगवून ठेवत होते.

इतके कमी पडले म्हणूनच की काय, आता तर त्या विश्वात्मक सृष्टिकर्त्याशी आरपारचे शेवटचे युद्ध करून परग्रहांसह त्रिलोक पादाक्रांत करण्यास हे दिव्यबुद्धी सिद्ध होत होते. लढाया पूर्वीच सुरू झाल्या होत्या. आता अंतिम युद्ध सन्मुख साकार होणार होते. सृष्टीचे आंदण हे केवळ नष्ट करण्यासाठीच मिळाले आहे याबाबतची खात्री त्यांच्या कृतीतून व्यक्त होऊ लागली होती. इथल्या अपूर्ण प्रवासाची परिपूर्ती परग्रहावर पाऊल ठेवूनच होईल याची एव्हाना ग्वाही दिली जात होती. इथे आरंभलेले विध्वंसक नष्टचर्य अनंत अवकाश ग्रासणार होते.

इथवर कथा सांगून दमलेल्या कथेकऱ्याने सभोवताली मेंढरं घेऊन स्थितप्रज्ञ वृक्षागत ऐकत बसलेल्या म्हाताऱ्याकडे पाहत, स्वतःशी बोलत प्रश्न केला, “ म्हणजे आजवरच्या माझ्या श्वासांना, पावलांना काही अर्थच नाही की काय? इतरांनी दिलेले हेतू नि निवडलेल्या दिशांना खुरडत चालत राहणे हेच माझे भागधेय की काय? माझ्या कथेचा शेवट शोधण्याची माझी आस निष्फळच ठरणार काय? माझ्या प्रवासाला गंतव्य गवसणारच नाही काय?’’

यानंतर ऐकणाऱ्यांच्या निःश्वासासवे वारा वाहिला. वाऱ्यानं ल्यायलेल्या अनामिक गंधाने थिजून म्बॅं ऽऽऽऽ करत मेंढरं हंबरली आणि पान पडलं तरी तडकेल अशा शांततेला तडा गेला. ‘‘गुज ऐकन्यात सांजावलं की वो’’ म्हणत म्हातारबाबानं पटकुर झटकलं. जमिनीला रेटा देऊन तो घाईनं उठला. कपाळावर हात धरत त्यानं क्षितिज न्याहाळलं आणि मेंढरं चुचकारत तो निघाला. धास्तावलेल्या मेंढरासवे कथेकऱ्यानं पावलं उचलली, तेव्हा प्रवासी जथ्था दिसेनासा झाला होता. क्षितिजावर लांडग्यांच्या छाया गडद हलत होत्या.

शुभ्र रेशमी दाढी कुरवाळीत, हातातली दणकट घुंगुरकाठी आपटीत, मुक्यानं मुक्कामी निघालेल्या म्हाताऱ्याचं कणखर पाऊल भुई धरून पुढे पडत होतं. कथेकरी मागोमाग चालत जीवाचे कान करून शेवटाची प्रतीक्षा करत होता. अखेर म्हातारबा म्हणाला, ‘‘लांडगी धावत्यात म्हून मेंढर धरून ऱ्हात्यात, सुर्व्य लपल्यावं चांद चांदनी वस्तीला येत्यात. डोळं दिपत्यात म्हनून निजत्यात. मनातलं गावंल म्हून चालन्यात मजा न्हाई तर गावलेलं उरी धरन्यात झिंग हाय. शेवट आला की आपाप कथा संपत्यात. उगा तरसून आशा खोटी पाडू नाय. पराधीन आस्ला तरी ज्येचा त्येचा परवास येगळा आस्तो आन त्यो करूनच जानायचा आस्तो. आता सोतापरीस या मुक्या मेंढराचं गुज ऐकू. त्यास्नी कोपीत घालू आनि भाकरी खाऊन चांदव्याला गाऱ्हानं घालू. चांदनी पडली तर कौल तुमचा. ’’

नंतर मुक्कामाकडे सारे चालत राहिले. कोसळत्या अंधारात त्यांचे मूक गंतव्य काळ निश्चित गतीने गिळत राहिला.

(लेखक हे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक-पटकथाकार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com