अ-अमिताभचा... : तू मसीहा मोहब्बत...!

जी.बी.देशमुख
Sunday, 17 January 2021

महानायक अमिताभ बच्चन यांची अनेक दशकांची कारकीर्द कुणालाही प्रेरणादायी अशी आहे. याच झगमगत्या कारकीर्दीचा वेध...

भागीदारी प्रकाश मेहरांबरोबरची  - २

अमिताभच्या अफाट क्षमतेचा अंदाज आलेल्या प्रकाश मेहरांनी १९७६ या वर्षात अमिताभ - विनोदखन्ना या जोडीला घेऊन ‘हेरा-फेरी’ आणला. मनोरंजनाचा  मसाला ठासून भरलेला ‘हेरा-फेरी’  तसा इतिहास रचू पाहणारा वगैरे सिनेमा नव्हताच. निखळ मनोरंजनाच्या हेतूने काढलेला हा चित्रपट अमिताभच्या उपस्थितीमुळं खास ठरला होता. नाच, गाणी, विनोदासोबतच ठासून भरलेल्या दारूगोळ्याचा स्फोट व्हावा अशी अमिताभची संवादफेक या चित्रपटात बघायला मिळाली होती.  

‘बरसो पुराना ये याराना इक पल मे क्यो टूटा
यार मेरे तू ऐसे रूठा जैसे मेरा रब रूठा.’ 

दोन मित्रांची दोस्ती संपुष्टात आल्यावर झालेल्या दुःखात भर घातली ती किशोर कुमार आणि गीतकार अंजाननं. मित्र तुटल्याचं दुःख, पश्चात्ताप, आणि दारूचा अंमल हे सगळं एकत्रितरित्या व्यक्त करणारा पांढऱ्या रंगाच्या कपड्यावर मोठ्या चेक्सच्या डिझाईनचं जाकीट घातलेला अमिताभ. अशी अनेक रूपं आहेत, त्याची की ज्यामुळं चाळीस वर्षानंतरही त्याच्या साधारण वाटणाऱ्या चित्रपटाचंही आकर्षण कमी होत नाही.  त्यानंतर लगेच १९७८ मध्ये प्रकाश मेहरा यांनी ‘मुकद्दर का सिकंदर’आणला. काळीज हेलावून टाकणारं दुःख घेऊन यातली पात्र जगत असतात. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

अमिताभ लहानपणापासून राखीच्या प्रेमाची आस धरून जगतो, जोहरा बनलेली रेखा अमिताभच्या प्रेमात झुरते आणि मृत्यूला कवटाळते, गुंड बनलेला अमजदखान रेखाच्या प्रेमात फुकटच मरतो. चित्रपटाच्या सुरुवातीलाच ‘जिंदगी तो बेवफा है, एक दिन ठुकराएगी’ असं जगण्याचं तत्त्वज्ञान सांगणारं गाणं म्हणत अमिताभ मुंबईच्या रस्त्यावरून तेव्हाच्या आधुनिक मोटरसायकलवर रपेट मारताना दिसतो, त्याचवेळी या सिकंदरनं प्रेक्षकांचं भावविश्व पादाक्रांत केलेलं असतं. 

ही जोडी ‘ बेमिसाल ’...

नंतर एका सभागृहातील कार्यक्रमात ‘तेरे बिना भी क्या जिना’ अशी प्रेमाची आस त्याच्या प्रेमापासून  अनभिज्ञ असलेल्या राखीकडं व्यक्त करतो तेव्हा तो प्रेक्षकांच्या  हृदयात खोलवर उतरलेला असतो आणि “तू मसीहा मुहब्बत के मारो का है” अशी दर्दभरी तान त्याच्या गळ्यातून मुजरेवाल्या बाईच्या कोठ्यावर जेव्हा जोहराबाई (रेखा) साठी उठते तेव्हा आपल्या काळजातही त्यांच्या दुःखामुळं घरं पडलेली असतात.  रेखासाठी त्यानं दिलेली “एक अहसान कर अपने मेहमान पर, दे दुवाये तुझे उम्र भर के लिये...” ही जगावेगळी दुवा मन अस्वस्थ करून सोडते. अमिताभच रूप आता त्या पडद्यावर मावेनासं झालेलं नसतं.  ही किमया होती प्रकाश मेहरांच्या दिग्दर्शनाची. त्यांच्यातल्या गीतकाराची आणि अर्थातच अमिताभची.  त्यापूर्वी नाजूक, चॉकलेटी हिरोंचे मुळूमुळू रडणारे, उसासे टाकणारे प्रेमभंग पाहण्याची सवय हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकांना झाली होती. आडदांड गावगुंड आणि सभ्य पेहेरावातील स्मगलर दोघांनाही एकाच पद्धतीनं दणकून बुकलणाऱ्या दमदार सिकंदरचा  अनोखा अंदाज दाखवून अमिताभनं पिढीच्या पिढी आपल्या खिशात घातली. फकीर बनलेल्या कादरखाननं “सुख को ठोकर मार, दुःख को अपना ले, उस पर कहकहे लगा, तकदीर तेरे कदमो मे होगी, तू मुकद्दर का बादशाह होगा” हा अमिताभला दिलेला जीवनाचा मंत्र करोडो दु:खी जनांना भावला होता. तीन तासात गरिबी, श्रीमंती, दोस्ती, प्रेमभंग, दिलेरी, गुंडागर्दी, सर्वधर्मसमभाव पाहून  झाल्यावर देखील अमिताभच्या निधनाच्या दृश्यावर अश्रू ढाळण्यासाठी प्रेक्षक सज्ज असतो. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वीस रिळं आणि सव्वा तीन तासाच्या चित्रपटातील दोन मिनिटंसुद्धा विना अमिताभ नसणारे चित्रपट बनविण्याचं अजब कसब प्रकाश मेहरांना साधलं होत. गरीब माणूस, श्रीमंत होऊ शकतो, दुबळा माणूस आडदांड गुंडांना लोळवू शकतो आणि हृदयात अगणित दुःख मुरलेलं असलं तरी मनुष्य दीनदुबळ्यांच्या मदतीला येऊ शकतो असे स्वप्नवत संदेश देऊ पाहणाऱ्या प्रकाश मेहरांना व्यक्त होण्यासाठी अमिताभसारखं सशक्त माध्यमं मिळालम आणि त्यांनी प्रेक्षकांना प्रत्येक चित्रपटागणिक प्रचंड आनंद दिला. 

‘मुकद्दर का सिकंदर’मधील एका विनोदी दृश्यात अमिताभ म्हणतो, ‘सिकंदर जब कमाल करता है, तो कमाल करता है.’ हे तथ्य प्रेक्षकांना अमिताभच्या बाबतीत पटलेलं असत. 

(क्रमशः)

जी.बी.देशमुख
gbdeshmukh21@rediffmail.com


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: G B Deshmukh write article about amitabh bachchan