गांधारशैलीची अमूल्य भेट

गांधारकला म्हणजे सम्राट कनिष्क आणि त्यानंतरचे कुशाण वंशाचे सम्राट यांची अधिकृत दरबारी कला होय. वर्तमानकाळातल्या अफगाणिस्थानची राजधानी काबूल म्हणजेच महाभारतकालीन गांधार!
Gautam Buddha
Gautam Buddhasakal

- प्रतिभा वाघ, plwagh55@gmail.com

गांधारकला म्हणजे सम्राट कनिष्क आणि त्यानंतरचे कुशाण वंशाचे सम्राट यांची अधिकृत दरबारी कला होय. वर्तमानकाळातल्या अफगाणिस्थानची राजधानी काबूल म्हणजेच महाभारतकालीन गांधार! कौरवांची माता गांधारी ही या गांधार देशाची राजकन्या होती. इसवीसनपूर्व पहिलं ते पाचवं शतक हा काळ प्राचीन भारतातल्या गांधार देशातल्या कलेच्या भरभराटीचा काळ होता.

अनेक राजवंशांनी या प्रदेशावर सत्ता गाजवली. या काळात ग्रीक कलाकार, रोमन व्यापारी यांच्याशी संबंध आल्यामुळे, त्यांच्या कलेचा प्रभाव आपल्या कलेवर पडला. त्यामुळं वास्तुकलेत संमिश्र वास्तुशैली उदयास आली. मूर्तिकलेत ग्रीक बौद्धशैली निर्माण झाली. भारतीय लक्षणं आणि प्रमाणबद्ध, डौलदार शरीर ही ग्रीक कलेची वैशिष्ट्यं या दोहोंतून मनोहारी बुद्धमूर्ती निर्माण झाल्या. भारतीय लक्षणं म्हणजे पारंपरिक मुद्रा, पोशाख, हावभाव देवत्वनिर्देशक चिन्हं होत.

स्वतःची मूर्ती घडवण्यास गौतम बुद्धांचा तीव्र विरोध होता. हिनयान पंथ आणि महायान पंथ हे दोन पंथ बौद्धधर्मात निर्माण झाले. हिनयानपंथीय हे रिकामं सिंहासन, बोधिवृक्ष, धम्मचक्र, कमळ, बुद्धांची पदचिन्हं या प्रतीकांद्वारे गौतम बुद्धांचं अस्तित्व दर्शवत असत. सांचीचा स्तूप, भारहुतचा स्तूप इथं याच प्रतीकांद्वारे बुद्ध दिसतात.

बुद्धांच्या परिनिर्वाणानंतर ग्रीकांच्या अपोलो देवतेच्या सुंदर रूपानं भारतीय मूर्तिकारांना भुरळ घातली आणि महायानपंथीयांनी बुद्धांचा मूर्तिरूपात कलात्मक आविष्कार करण्यास उत्तेजन दिलं. बुद्धांचे जीवनविचार, खरं जीवन या संकल्पनांची कलात्मक निर्मिती होऊ लागली. हे सारं घडलं इसवीसनपूर्व चौथ्या दशकात सिकंदराच्या विजयानंतर.

सिंहासनाधिष्ठित अर्धोन्मीलित नयनांनी ध्यानस्थ अवस्थेत बसलेली विलोभनीय बुद्धमूर्ती ही गांधारशैलीनं दिलेली अमूल्य भेट म्हणावी लागेल. तक्षशिला, पुष्कलावती इथली मंदिरं, मठ यांच्या अवशेषांवरून गांधार वास्तुकलेची कल्पना येते. अनेक मजल्यांचे उंच स्तूप या काळात उभारले गेले.

यात ग्रीक पद्धतीच्या अर्ध्या स्तंभाची रचना इथं दिसते. या अवशेषांत कॉरिन्थिअन प्रकारची स्तंभशीर्षं सापडली आहेत. ग्रीक, इराणी आणि रोमन कलांचा प्रभाव या वास्तुकलेवर आढळतो.

गांधारकलेच्या वैशिष्ट्यांचा विचार करता गांधारात चित्रकलेचे नमुने उपलब्ध झाले नाहीत. इतर दुय्यम कला म्हणजे सुवर्णालंकार, थाळ्या, पेले, सोन्याचे ताईत, रत्नजडित रक्षाकरंडक या आहेत.

गांधारकलेत शिल्पावशेष फार मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. शिल्पांचे विषय भारतीय व प्रामुख्यानं बुद्धांच्या जातककथा, जीवनातले प्रसंग, बुद्ध व बोधिसत्त्व यांच्या मूर्ती हे आहेत.

प्रवाही आणि लयदार झुबक्यांच्या द्वारे केलेलं केसांचं शिल्पांकन, अंगावर घेतलेलं वस्त्र, त्याच्या त्रिमितयुक्त चुण्या यांद्वारे या मूर्तींवर असलेला ग्रीक-रोमन कलेचा प्रभाव स्पष्ट जाणवतो. मानवी स्वरूपातल्या या मूर्तींना देवत्व आणण्यासाठी तृतीय नेत्र किंवा दोन भुवयांमधलं उर्णा हे चिन्ह, कानाची खाली लोंबणारी पाळी, डोक्याच्या मागं प्रभावलय, तळहात-तळपाय यांवरील चक्र, त्रिशूल ही सामुद्रिक लक्षणं, हाताच्या पारंपरिक मुद्रा या भारतीय लक्षणांबरोबर ‘उष्णिशा’ ही अपोलो या ग्रीक देवाच्या मूर्तीत आढळणारी गाठ डोक्यावर बांधलेली आढळते.

बुद्धांचं दर्शन या शैलीत योग्याच्या स्वरूपात घडवण्यात आलेलं आहे, तर बोधिसत्त्वांच्या मूर्तीवर राजबिंडा पोशाख व अलंकार आणि विशेष म्हणजे, भरदार मिश्या कोरलेल्या दिसतात; ज्या भारतीय शिल्पांत आढळत नाहीत. बोधिसत्त्व म्हणजे ज्या व्यक्तीच्या अंगी ‘बोधी’ - म्हणजे पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेण्याची पात्रता- असते अशी व्यक्ती. गौतम हे बुद्ध होण्यापूर्वी बोधिसत्त्वच होते.

गांधार शिल्पांत अनेक नवीन माध्यमं वापरली गेली आहेत. सुभाजा (शिस्ट) दगड प्रामुख्यानं वापरण्यात आलेला आहे. हा निळसर करड्या रंगाचा आणि काहीसा मऊ असतो. त्याशिवाय चुनखडीचा दगड (लाईम स्टोन), टेराकोटा (भाजलेली माती) आणि स्टक्को प्लॅस्टरचा उपयोग, साचा बनवून अनेक प्रती काढण्यासाठी नंतरच्या काळात झाला.

त्यामुळं बुद्धशीर्षाचे अनेक विलोभनीय नमुने पाहायला मिळतात. हे चेहरे यौवनपूर्ण, मोहक असून मुखावरचे भाव गंभीर आहेत. भुवया, अर्धोन्मीलित डोळे, ओठ, तसंच कपाळावरच्या केसांच्या बटा अतिशय रेखीव आहेत. कानाची लांब पाळी, ‘तिसरा डोळा’ सूचित करणारं दोन भुवयांमधलं उर्णा हे चिन्ह ही देवत्व सुचवणारी चिन्हं आहेत.

आदर्शवादी चेहरा, लयबद्ध केसांची प्रवाही रचना आणि वर उल्लेखिलेले चेहऱ्याचे तपशील हे ग्रीक-रोमन कलेचा प्रभाव दर्शवतात. गांधारशैलीविषयी लिहिताना, उत्तरमध्य अफगाणिस्थानातल्या बामियान इथल्या प्रचंड बुद्धमूर्तींचा उल्लेख अत्यावश्यक. इथं अतिमानवी स्वरूपातल्या दोन बुद्धमूर्ती होत्या. तालिबान्यांनी २००१ मध्ये स्फोटांद्वारे या मूर्तींचा विध्वंस घडवून आणला.

शाक्यमुनींची पूर्वेकडची मूर्ती १२० फूट उंचीची होती, तर पश्‍चिमेकडच्या कोनाड्यातली १७५ फूट उंचीची बुद्धमूर्ती ही गांधारशैलीतल्या बुद्धमूर्तीची अतिप्रचंड प्रतिकृती वाटत असे. मात्र, या दोन्ही मूर्ती घडवण्याचं तंत्र खूप भिन्न आहे. संपूर्ण दगडात शरीर व डोकं यांचा खडबडीत आकार कोरून व मातीत गवताचे तुकडे मिसळून ते मिश्रण घोटून घोटून चेहऱ्याचे अवयव, तसंच वस्त्रं घडवण्यात आलं. वस्त्राच्या चुण्या दाखवण्यासाठी मूर्तीच्या दोन्ही बाजूंना भिंतीत लाकडी खुंट्या ठोकून त्यांना दोरखड बांधण्यात आलं आणि मातीच्या मिश्रणानं लिंपून वस्त्राच्या घड्या दाखवल्या गेल्या.

त्यानंतर ते सुकू देण्यात आलं व नंतर गुळगुळीत करून त्यावर सोन्याचा वर्ख इतक्या सुंदर पद्धतीनं लावण्यात आला की चिनी प्रवासी ह्यूएनत्संग यानं ‘धातूच्या मूर्ती’ असा या मूर्तींचा उल्लेख, आपल्या भारतभेटीच्या नोंदीमध्ये, केला आहे.

राजाच्या वेशातली, ओठावर मिश्या असलेली, प्रौढ चेहऱ्याची बोधिसत्त्वाची उभी मूर्ती अमेरिकेतल्या बोस्टन कलासंग्रहालयात आहे.

‘गौतम बुद्धांचं महानिर्वाण’ हे लॉरिया तांगाई इथलं उत्थित शिल्प त्याच्या वास्तववादी शिल्पांकनामुळं लक्षात राहावं असं. मानवी स्वरूपातल्या बुद्धमूर्ती ही गांधारशैलीची भारतीय कलेला मिळालेली देणगी आहे असं या सर्व शिल्पाकृती पाहिल्यावर लक्षात येतं.

(लेखिका ह्या चित्रकर्त्री, लोककला-अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com