प्रतिभा

एखादा नट प्रतिभाशाली आहे, असे आपण म्हणतो तेव्हा त्या विधानाचा भावार्थ आपल्याला समजतो; पण ‘नटापाशी ‘प्रतिभा’ म्हणजे नक्की काय आहे’ हे सांगणे अवघड जाते.
Ganesha Devi writes genius actor we understand meaning of that statement
Ganesha Devi writes genius actor we understand meaning of that statement
Summary

एखादा नट प्रतिभाशाली आहे, असे आपण म्हणतो तेव्हा त्या विधानाचा भावार्थ आपल्याला समजतो; पण ‘नटापाशी ‘प्रतिभा’ म्हणजे नक्की काय आहे’ हे सांगणे अवघड जाते.

एखादा नट प्रतिभाशाली आहे, असे आपण म्हणतो तेव्हा त्या विधानाचा भावार्थ आपल्याला समजतो; पण ‘नटापाशी ‘प्रतिभा’ म्हणजे नक्की काय आहे’ हे सांगणे अवघड जाते. ‘प्रतिभा’ या शब्दासारखे इतर अनेक शब्द आहेत, त्या शब्दांचे नक्की अर्थ सांगता येत नाहीत.

प्रतिभा हा शब्द आणि त्यात अनुस्यूत असणारी संकल्पना संस्कृत साहित्यविश्वातली. त्या शब्दाचा संस्कृतमध्ये नक्की अर्थ काय आहे, ते पाहायचे असल्यास त्याचे इंग्रजी समानार्थी शब्द तपासणे उपयोगी पडेल. ते आहेत, ‘genius’, ‘ingenuity’, ‘light’, ‘intelligence’, ‘splendour’ आणि ‘talent’. पण यातला कोणताच इंग्रजी शब्द ‘प्रतिभा’साठी अगदी तंतोतंत अर्थ देत नाही. म्हणजे ‘sparrow’ म्हणजे चिमणी किंवा ‘crow’ म्हणजे कावळा असे ठामपणे सांगता येते, तसे प्रतिभा म्हणजे ‘ingenuity’ किंवा ‘talent’ म्हणता येत नाही.

एखादा कवी प्रतिभावान आहे किंवा एखादा नट प्रतिभाशाली आहे, असे आपण म्हणतो तेव्हा त्या विधानाचा भावार्थ आपल्याला समजतो; पण ‘तो श्रीमंत आहे’ या विधानात जसे स्पष्टपणे ‘त्याच्याकडे पुष्कळ संपत्ती आहे’ हा अर्थबोध होतो, तसा अर्थबोध ‘त्या नटापाशी ‘प्रतिभा’ म्हणजे नक्की काय आहे’ हे सांगणे अवघड जाते.

‘प्रतिभा’ या शब्दासारखे इतर अनेक शब्द आहेत, जे संकल्पनात्मक असतात आणि त्या बहुतेक शब्दांचे नक्की अर्थ सांगता येत नाहीत. ते शोधण्यासाठी ज्या ‘अर्थ-विश्वात’ - सीमँटिक-युनिव्हर्से-मध्ये त्या विकसित झाल्या त्या अर्थ-विश्वाच्या संदर्भातच तशा संकल्पनांचे अर्थ लावता येतात. म्हणून मराठीतील प्रतिभा शब्दाच्या अर्थ-विश्लेषणासाठी संस्कृत साहित्यात ‘प्रतिभा’ शब्दाचा मागोवा घेणे आवश्यक बनते.

संस्कृतमध्ये ‘प्रतिमा’ आणि ‘प्रतिभा’ हे दोन घनिष्ट संबंध असलेले शब्द आहेत. बऱ्याच वेळा त्यांचा इंग्रजीमध्ये अनुवाद करताना, अनुक्रमे इमेज आणि इमॅजिनेशन असा अनुवाद केला जातो. अर्थात, प्रतिमा पाहण्याची किंवा कल्पण्याची प्रक्रिया म्हणजे प्रतिभा अथवा इमॅजिनेशन असा तर्क बांधलेला असतो. प्रतिमा, जी चित्ररूप असते, ती पाहण्यासाठी प्रकाशाची गरज असते आणि म्हणून त्या पाहण्याच्या प्रक्रियेला ‘प्रकाशित करणे’ अथवा ‘स्वतः प्रकाशित असणे’ असे संदर्भ निर्माण होतात. त्यावरून आपण ‘प्रतिभा’ म्हणजे कोणत्या तरी प्रकारचे ‘कल्पनाशक्तीचे तेज’ असावे, हे स्वीकारतो.

हा ‘प्रतिभे’चा अर्थ संदर्भ सुमारे हजार वर्षापूर्वी कुंतकाने लिहिलेल्या वक्रोक्ती-जीवित या काव्यशास्त्रावरील ग्रंथातील एका वर्णनपर सिद्धांतातून निर्माण झाला. सुमारे दहाव्या-अकराव्या शतकात लिहिलेल्या या ग्रंथात ‘दीपक’ या विषयाखाली, कुंतक शब्दाच्या सहाय्याने विचार अथवा साहित्यकृती उजळण्याची चर्चा करत असताना त्याने ‘चित्त उजळणारी कृती’ असा शब्द प्रयोग केला आहे. तोच विचार त्यानंतर दोन शतकांनी ज्ञानदेवांच्या शब्दात आपल्याला मराठीत आलेला आढळतो.

रसिकाच्या चित्तावर प्रकाशझोत टाकणारा म्हणजे प्रतिभावंत हा सैद्धांतिक पाया कुंतकाच्या काव्यशास्त्रात दहाव्या शतकात आला असला, तरी त्या आधीही भाषाशास्त्राच्या तो सुमारे चौथ्या शतकात थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आला होता. भर्तृहरीच्या वाक्यपदीय या ग्रंथात अर्थबोध प्रक्रियेचे वर्णन करताना, भर्तृहरीने उदाहरण म्हणून शब्द ही वस्तू व ती एखाद्या नदीच्या प्रवाहावर धरली तर तिचे त्या प्रवाहात उमटणारे प्रतिबिंब (प्रतिमा) म्हणजे अर्थ अशी मांडणी केली होती. त्याच्या आधारे, शब्द आधीच अस्तित्वात असणाऱ्या अर्थावर प्रकाश टाकण्याची किमया करू शकतात, हे गृहीत मान्य झाले होते. शब्द, जे स्वतः अर्थ नसतात; पण आधीच चित्तात सुप्त अवस्थेत अस्तित्वात असणाऱ्या अर्थांना प्रकाशित करतात, त्यांना ‘प्रतिमा’ रूप देतात; म्हणून ते स्वतः ‘प्रतिभा’ असतात आणि शब्द वापरणारा कवी प्रतिभावान असतो, हे गृहीत भर्तृहरीच्या काळापासून होतेच. त्याला कुंटकाने स्पष्ट मांडणीची जोड देऊन अधिक स्थिर बनवले.

भर्तृहरीच्या चर्चेत आलेले ‘वस्तू, नदीचा प्रवाह, त्यातली प्रतिमा आणि तिचे कारण असणारा शब्द’ हे उदाहरण अपघाती स्वरूपाने आले नव्हते. त्याच्या पार्श्वभूमीवर त्याआधी किमान सात-आठ शतके चाललेला एक तत्त्वज्ञानातला मोठा वाद होता. तो त्या काळी -म्हणजे ख्रिस्तपूर्व तीन-चार शतके प्राचीन ग्रीस आणि प्राचीन भारत या दोनही संस्कृतीतील विचारवंतांना महत्त्वाचा वाटत होता. तो असा : दरेक वस्तूला चिकटलेली तिची सावली ही त्या वास्तूच्या

वास्तवाचा अविभाज्य हिस्सा असते काय? सावली वास्तव की वस्तू वास्तव? की दोन्ही मिळून होणारे संपूर्ण वास्तव? त्या काळात ग्रीसमधली बहुतेक सारी शास्त्रे या प्रश्नाभोवती रचले गेले आणि तत्वज्ञानात सॉक्रेटिस आणि प्लेटो यांनी या प्रश्नाला कमालीचे महत्त्व दिले.

भारतीय तत्त्वज्ञानातही वास्तवाच्या संपूर्ण व्याख्येची जडणघडण होत असताना ‘सावलीचे काय करायचे?’ या प्रश्नावरूनच वेगवेगळी ‘दर्शने’ रचली गेली. आपल्याकडे त्यावरचा दार्शनिक भाग म्हणून ‘ज्या प्रकाशात छाया असूच शकणार नाही’ अशा प्रकाशाची कल्पना केली गेली. तो प्रकाश, संपूर्णतः मृत्यूविनाच असतो -जो तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मांमृतं गमय’ या दोन इच्छा-विधानांच्या एकत्र वाचनातून स्पष्ट होऊ शकेल. यावरून, असे शब्द जे वर्णन-वस्तू (म्हणजे साहित्य विषयाचे) मृत्यू पलीकडचे -म्हणजे शाश्वत- रूप प्रकाशित करू शकतात ते साहित्य असा सिद्धांत -उपनिषद, भर्तृहरी आणि कुंतक असा दीर्घ पल्ल्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रवास करत स्थिर झाला. त्यातून ‘प्रतिभावंत’ -जो साहित्यिक साहित्याद्वारा शाश्वत साहित्य रसिकांशी दर्शन करवू शकतो- हा अर्थ-संदर्भ जन्मला. त्यालाही आता हजार वर्षे होऊन गेली आहेत.

मराठी भाषेने संस्कृत भाषेचा पल्ला सोडून पुढे पुष्कळ मोठी मजल मारली आहे. खरंतर, एवढ्या दीर्घ काळात प्रतिभेला मराठीत प्रतिशब्द निर्माण व्हायला काही हरकत नव्हती; पण मराठीसाठी वापरण्यात येणारी बरीच वर्णनात्मक आणि मूल्यात्मक साहित्य-सामग्री अजूनही संस्कृतमध्येच रुतून बसलेली आहे. ती नव्याने तयार करण्याचे काम कवी लेखक नाटककार गेली शे-दीडशे वर्षे जोमाने करताहेत. आता समीक्षेने, झपाट्याने पाय उचलण्याची गरज आहे. प्रतिभावान लेखक म्हणजे वास्तवाचे संपूर्ण दर्शन करणारा असेल, तर त्याला आपण प्रतिभावान न म्हणता ‘तगडा लेखक’, ‘जबरदस्त वास्तववादी’, ‘वाचकाला चितपट करणारा’ असे शब्द वापरू शकू -म्हणजे हेच शब्द वापरावेत असा आग्रह नाही, पण यासारखे आपल्या सध्याच्या वास्तवातील शब्द. अर्थात, ज्या समाजात हाथरसच्या घटनेने ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’सारखे जबरदस्त, सरकारला चितपट करणारे प्रखर वास्तववादी आंदोलन उभे राहू शकत नाही किंवा ज्यांना शेकडो शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू पावले त्याच्याशी काही देणे-घेणे लागते असे वाटत नाही, त्या जुनेरी-संवेदनेच्या वाचक-समाजकडून ती अपेक्षा कशी ठेवावी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com