गती जरा मंद करूया...

सुखदा चौधरी
Saturday, 5 October 2019

वर्ष 1986 ची गोष्ट. कार्लो पेत्रिनी नावाचा माणूस खूप रागावलेला होता. रोम या शहरात मॅक्‍डोनाल्डसचे स्टोअर सुरू होणार होते, आणि ही गोष्ट त्याला अजिबात पटली नव्हती. त्याने याविरुद्ध प्रदर्शन सुरू केले. पेत्रिनीच्या या विरोध प्रदर्शनाने त्या काळात अनेक लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. लोकांना कळेचना की हा माणूस नेमका विरोध कोणत्या गोष्टीचा करतोय. पेत्रिनीचा हा विरोध केवळ "फास्टफूड'ला नसून त्यानिमित्ताने सुरू झालेल्या "फास्ट संस्कृती'ला होता. या विरोधाने त्याला एका मोठ्या चळवळीचा उद्‌गाता बनवले. ती चळवळ म्हणजे "आंतरराष्ट्रीय स्लो फूड मूव्हमेंट'.

वर्ष 1986 ची गोष्ट. कार्लो पेत्रिनी नावाचा माणूस खूप रागावलेला होता. रोम या शहरात मॅक्‍डोनाल्डसचे स्टोअर सुरू होणार होते, आणि ही गोष्ट त्याला अजिबात पटली नव्हती. त्याने याविरुद्ध प्रदर्शन सुरू केले. पेत्रिनीच्या या विरोध प्रदर्शनाने त्या काळात अनेक लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. लोकांना कळेचना की हा माणूस नेमका विरोध कोणत्या गोष्टीचा करतोय. पेत्रिनीचा हा विरोध केवळ "फास्टफूड'ला नसून त्यानिमित्ताने सुरू झालेल्या "फास्ट संस्कृती'ला होता. या विरोधाने त्याला एका मोठ्या चळवळीचा उद्‌गाता बनवले. ती चळवळ म्हणजे "आंतरराष्ट्रीय स्लो फूड मूव्हमेंट'. आता तुम्हालादेखील प्रश्न पडला असेल की मी नेमके कशाबद्दल बोलते आहे. तुमची उत्सुकता जास्त ताणून न धरता या चळवळीबद्दल सांगायला पाहिजे. आज आपण वेगवान जगात राहतो; मात्र याच वेगवान विश्वात अनेक ठिकाणी गती मंदावण्याच्या चळवळी अनेक क्षेत्रांमध्ये जाणीवपूर्वक सुरू करण्यात आलेल्या आहेत. स्लो फूड हा तर त्यातील केवळ एक भाग आहे. जगभरात सुरू असलेल्या गती मंदावण्याच्या चळवळीचे उद्दिष्ट हे लोकांना जुन्या, हळुवारपणे, मंद गतीने बदलणाऱ्या जीवनशैलीकडे परत फिरविणे हे आहे; जेणेकरून आपण उपयोगात आणतो त्या प्रत्येक गोष्टीचेच व्यावसायीकरण आणि प्रमाणीकरण होऊ नये. आपल्या जीवनशैलीचा वेग थोडा कमी करण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक उचललेले हे एक पाऊल आहे. कदाचित नागपूरमधील लोकांपेक्षा मुंबईला राहणारे लोक या संकल्पनेला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतील. मोठ्या शहरांच्या वेगवान जगात राहणारे हे लोक सोमवार ते शुक्रवारच्या व्यस्त वेळापत्रकात असे गुंतलेले असतात की त्यांना इतर कोणत्याही गोष्टीसाठी वेळ मिळत नाही. हे वेगवान जीवन कधी कधी शिक्षेसारखे वाटत असले तरीदेखील शहरात राहताना आपण पाहिलेली स्वप्ने, आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी या पद्धतीनेच जगणे आवश्‍यक होऊन जाते. मग स्लो संस्कृती किंवा मंद संस्कृती म्हणजे नक्की काय?
स्लो संस्कृती म्हणजे आपला दिवस तासांच्या परिमाणाने न मोजता, मिनिट्‌स आणि सेकंदांच्या हिशोबाने मोजून एक एक क्षण परिपूर्णतेने जगणे. आपली कामे जलदगतीने पूर्ण करण्याऐवजी कामे उत्तम पद्धतीने करण्याकडे कल असणे म्हणजे ही संस्कृती. यात एक विशिष्ट प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जो एक विशिष्ट कालावधी लागतो त्याचा सन्मान केला जातो, जेणेकरून या प्रक्रियेचा प्रत्येक भाग योग्य रीतीने पूर्ण व्हावा. यात संख्या (क्वान्टिटी) पेक्षा दर्जा (क्वालिटी) वर अधिक भर दिला जातो. फूड किंवा अन्नच नव्हे तर पालकत्व, फॅशन, संगीत, सिनेमा इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये ही संस्कृती आत्मसात केली जाऊ शकते. याबद्दल आपण विचार केला तर लक्षात येईल की एक अतिशय छोटीशी कल्पना आहे; मात्र या कल्पनेला समजून घेऊन प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक वर्षे लागतात. जसजसे आपण तरुण होत जातो, मोठे होत जातो, तसतसे कामे करण्याच्या आपल्या स्वतःच्या पद्धती आपण निर्माण करत असतो. प्रत्येक काम हे स्मार्ट पद्धतीने करता यावे, याकडे आपला कल असतो; मात्र हे करत असताना काही पद्धती, काही गोष्टी, काही व्यक्ती या जशा होत्या त्या स्थितीत त्यांचा स्वीकार करणे आपल्याला शक्‍य होत नाही. स्लो संस्कृती म्हणजे मुळात आहे त्या स्थितीत पद्धती आणि व्यक्तींचा स्वीकार करणे होय. यात मानवी नात्यांचा, भावनांचा सन्मान केला जातो, आपल्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींचा, वस्तूंचा स्वीकार केला की आपोआप आपले जीवन खूप वैभवशाली बनते.
स्वास्थ्य आणि वयोमानाच्या क्षेत्रात स्लो संस्कृतीचा अर्थ म्हणजे वय लपवणारी सौंदर्य प्रसाधने आणि औषधे न घेता आपण म्हातारे होत आहोत या गोष्टीचा मुक्तपणे स्वीकार करणे होय. म्हणजेच वयोमानाचा स्वीकार करून आनंदाने म्हातारे होणे. स्लो संस्कृतीचा अधिकाधिक प्रभावी उपयोग अन्न बनवण्याच्या क्षेत्रात केला जाऊ शकतो. या क्षेत्रात स्लो संस्कृती म्हणजे आपण बनवतो त्या व्यंजनातील प्रत्येक पदार्थाचा, घटकाचा, स्वयंपाकाच्या पद्धतीचा सन्मान करणे. अन्न बनवण्याची आपली पारंपरिक पद्धत उपयोगात आणणे, अन्न बनवण्यासाठी आवश्‍यक सगळे पदार्थ हे ताजे आणि उत्तम दर्जाचे असणे, ते शेतात सेंद्रिय पद्धतीने कोणतेही रासायनिक कीटकनाशक न वापरता पिकवलेले असणे आणि शेवटी अगदी हवा तेवढा वेळ देऊन योग्य पद्धतीने स्वयंपाक करणे म्हणजे स्लो संस्कृती आत्मसात करणे होय. जे लोक मांसाहार करतात त्यांच्यासाठी ज्या प्राण्यांना मारायचे आहे त्यांची वाढ ही कोणत्याही रासायनिक प्रक्रियेशिवाय म्हणजेच हार्मोन्सशिवाय अगदी नैसर्गिक पद्धतीने झालेली असणे आणि प्राण्यांना हलाल करताना योग्य त्या पद्धतीचा वापर केलेला असणे महत्त्वाचे आहे. एकूणच अन्न या क्षेत्रात स्थानिक व्यंजनाना प्राधान्य देणे आणि ज्या चटकदार पदार्थांनी आपल्या पर्यावरणाला आणि तब्येतीला धोका पोहोचेल, अशा पदार्थांना अजिबात थारा न देणे म्हणजे स्लो संस्कृती आत्मसात करणे होय.
फॅशन हे आणखी एक क्षेत्र आहे ज्यात स्लो संस्कृतीचा अंगीकार करण्यास पुष्कळ वाव आहे. फॅशनच्या क्षेत्रात स्लो संस्कृती म्हणजे फॅशनमध्ये वेगाने होणाऱ्या बदलांना नकार देणे होय. एक पोशाख लोकप्रिय झाला की झटक्‍यात त्याचे हजारो प्रकार पुढे येतात आणि केवळ महिनाभरात दुसरी कुठली तरी फॅशन येऊन ते सर्व प्रकार जुने होतात. फास्ट फॅशनसाठी तयार होणारे हे कपडे बहुतेक वेळा चांगल्या दर्जाचे नसतात. पुढे उपयोगात न आल्यामुळे ते वाया जातात आणि त्यामुळे साहजिकच मोठ्या प्रमाणावर संसाधनांचादेखील नाश होतो. स्लो संस्कृती आत्मसात केल्यास लोक कलात्मकतेने बनवलेल्या, उत्तम दर्जाचे साहित्य वापरून विणलेल्या कपड्यांना प्राधान्य देतील. यामुळे फास्ट फॅशनमुळे होणारे कपड्यांचे अमर्यादित उत्पादन थांबेल. संसाधने वाया जाणार नाहीत. त्यामुळे पुढे साहजिकच किमतीदेखील आटोक्‍यात येतील. स्लो संस्कृतीमुळे फॅशन बदलण्याचा आपला वेगही कमी होईल.
ही स्लो संस्कृती आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंना योग्य ती किंमत, योग्य तो सन्मान देणे शिकवेल. यामुळे आपली पृथ्वी, आपली नैसर्गिक साधनसंपत्ती, मानवी नातेसंबंध, या सर्वांचे जतन करणे शक्‍य होईल आणि या सगळ्या गोष्टी आपण टिकवल्या पाहिजेत; जेणेकरून आपली पिढी आणि येणाऱ्या पिढ्यांनादेखील या वैभवशाली पृथ्वीवर सुखी आणि आनंदी जीवन जगता येईल. मी स्लो व्हायचे ठरवले आहे, आणि तुम्ही?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gati jara mand karuya