Maratha Mandir
Maratha Mandirsakal

अमृतमहोत्सवी मराठा मंदिर

दिवंगत बाबासाहेब गावडे यांनी १९४५ मध्ये मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी ‘मराठा मंदिर’ ही संस्था स्थापन करून त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कला, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य आणि सामाजिक जडणघडणीत आपले योगदान दिले.

- गायत्री श्रीगोंदेकर

दिवंगत बाबासाहेब गावडे यांनी १९४५ मध्ये मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी ‘मराठा मंदिर’ ही संस्था स्थापन करून त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कला, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य आणि सामाजिक जडणघडणीत आपले योगदान दिले. मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक विश्वाचा इतिहास ‘मराठा मंदिर’शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मराठा मंदिर संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सांगता होत आहे, त्यानिमित्त...

पाच ऑगस्ट १९६०चा दिवस... ‘मुघल ए आझम’ चित्रपटाच्या भव्य प्रीमियर शोचे आयोजन करण्यात आले होते. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटाच्या तिकिटासाठी हजारोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती आणि तितक्याच शाही पद्धतीने चित्रपटाच्या रीळ हत्तीच्या पाठीवरून चित्रपटगृहाकडे आणण्यात आल्या.

एकीकडे चित्रपटातील दिग्गज कलाकारांना पाहायला गर्दी; तर दुसरीकडे चित्रपट पाहायला मिळावा किंवा दुसऱ्या दिवशीचे तरी तिकीट मिळावे म्हणून तिकीट खिडकीवर प्रेक्षकांची भली मोठी रांग. पोलिसांचा धाक आणि परिसराला छावणीचे स्वरूप आलेले. अर्थात हे ठिकाण होते मुंबईतील गाजलेले चित्रपटगृह ‘मराठा मंदिर’मधील!

अशा कित्येक चित्रपटांचे भव्य प्रीमियर शो या चित्रपटगृहात झाले. रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या कित्येक कलाकारांचे एका रात्रीत आयुष्य बदलले, त्याचा साक्षीदार असणारी ही वास्तू.

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटाने जागतिक विक्रम याच चित्रपटगृहातून रचला. १९५८मध्ये ‘मराठा मंदिर’ ही वैभवशाली वास्तू उभारणाऱ्या संस्थेचा अमृतमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा २४ जून रोजी साजरा होत आहे.

मराठा मंदिराचे आद्य संस्थापक गंगाराम गोविंद ऊर्फ बाबासाहेब गावडे यांनी ३० मार्च १९४५ रोजी मराठा मंदिर संस्थेची स्थापना करण्याचे ठरले. बाबासाहेब गावडे हे इंग्रज सरकारमध्ये पोलिस खात्यात इंपिरियल पोलिस अधिकारी होते.

यादरम्यान त्यांचा समाजातील विविध घटकांशी संपर्क होता. बाबासाहेबांनी देशाला स्वातंत्र्य मिळताच सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले. १९४६ मध्ये मराठा मंदिराचे पहिले अध्यक्ष हिज हायनेस सर जिवाजीराव महाराज शिंदे झाले.

पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते असल्याने त्यांनी १९६१पर्यंत म्हणजेच आजीवन अध्यक्षपद भूषविले. त्या काळी जिवाजीराव महाराज शिंदे यांनी मंदिरास दोन लाखांची देणगी दिली. तसेच, त्यांच्या कार्यकाळात मंदिराला राज्याबाहेरील अनेक धनिकांनी अर्थसहाय्य्य केले. ज्यामुळे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य अधिक गतीने करणे संस्थेला शक्य झाले.

‘मराठा मंदिर’ हे चित्रपटगृह १९६० ते ७०च्या दशकात किरकोळ रकमेवर भाडेतत्त्वावर एका कंपनीस चालविण्यास देण्यात आले. त्या काळात एखाद्या संस्थेचे स्वतःचे चित्रपटगृह असणे ही अत्यंत अभिमानाची बाब होती.

मुंबई सेंट्रल, सात रस्ता, आग्रीपाडा, ग्रँट रोड अशा मराठीबहुल भागातील रसिकांसाठी जवळचे चित्रपटगृह होते. हिंदी चित्रपटांच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार असणाऱ्या या चित्रपटगृहाची मॅटिनी शोची परंपरादेखील वेगळीच.

एखादा नवीन चित्रपट आला, की त्याचा प्रीमियर शो म्हणजे या ठिकाणी सोहळाच असे. चित्रपटांची भव्य होर्डिंग, आकर्षक रंगसंगती आणि विद्युत रोषणाई वापरून तयार करण्यात आलेले चित्रपटांचे केवळ पोस्टर पाहण्यासाठी मराठा मंदिर परिसरात फेरफटका मारायला येणाऱ्यांची संख्याही तेवढीच होती.

त्या काळी ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटाच्या प्रीमियरला आलेल्या प्रेक्षकांना एक पत्त्यांचा कॅट वाटण्यात आला. ज्यात राजा, राणी गुलाम या पत्त्यांवर दिलीप कुमार, पृथ्वीराज कपूर या कलाकारांचे चित्रपटातील पात्र असणारे फोटो लावण्यात आले होते. अशा अनेक नवनवीन संकल्पनांमुळेही प्रेक्षकांची ओढ चित्रपटगृहाकडे कायम असायची.

‘शहेनशाह’ चित्रपटदेखील त्यावेळचा बहुचर्चित सिनेमा होता. कारण अमिताभ यांचा एका प्रकरणात सहभाग असल्याच्या बातम्यांना ऊत आला होता. यामुळे चित्रपटगृहाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात येत होती. काही दिवसांनी हा वाद निवळला आणि अमिताभ बच्चन यांच्या रसिकांनी चित्रपटगृह हाऊसफुल झाले.

यशराज फिल्मचा आदित्य चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाने इतिहास घडविला आणि मराठा मंदिरचे नाव जगभरात पोहोचले. १९९५मध्ये हा सिनेमा मॅटिनी शोला मराठा मंदिरमध्ये लावण्यात आला.

एक-दोन नाही, तर तब्बल २५ वर्षे हा सिनेमा चित्रपटगृहात दाखविण्यात येत होता. कोरोनाकाळात याला ब्रेक लागला; मात्र आजही मुंबईकरांच्या मनात या चित्रपटाच्या आणि मराठा मंदिराच्या आठवणी ताज्या आहेत.

ओटीटी प्लॅटफॉर्म, मल्टिप्लेक्स सिनेमाच्या गर्दीत हे ग्लॅमर हरवत असताना आजच्या तरुणाईला या तिकिटासाठीच्या रांगांचा आणि प्रेक्षकांच्या ओढीचा अंदाज येणार नाही; मात्र आजही मुंबईतील सर्व जुन्या चित्रपटगृहांमध्ये मराठा मंदिर आपले मानाचे स्थान कायम राखून आहे.

वर्षभरापूर्वीच संस्थेने या चित्रपटगृहाच्या दुरुस्तीचे आणि सुशोभीकरणाचे काम पूर्ण केले. पूर्वी मराठा मंदिरालाच लागून मिनर्वा, अप्सरा, इम्पेरिकल यांसारखी मोठी चित्रपटगृहे होती. जी कालांतराने बंद पडली, तर काही चित्रपटगृहे मल्टिप्लेक्समध्ये रूपांतरित झाली. मात्र अशा जुन्या चित्रपटांच्या रांगेत केवळ मराठा मंदिर आपले वेगळेपण राखून आहे.

आज मराठा मंदिर चित्रपटगृहच नव्हे, तर शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातही आपल्या बहुमोल कार्याचा ठसा उमटवते आहे. मराठा मंदिरच्या साहित्य शाखेने तीन ग्रंथ प्रकशित करून संशोधनात्मक वाङ्‍मयात बहुमूल्य भर घातली आहे.

प्रसिद्ध इतिहासकार कै. त्र्यंबक शंकर शेजवलकर लिखित पहिला ग्रंथ १९६४ मध्ये प्रकाशित झाला. १९७१मध्ये ‘महाराष्ट्राची अस्मिता’ हा दुसरा ग्रंथ प्रकशित करण्यात आला, ज्या ग्रंथात पु. ल. देशपांडे यांची प्रदीर्घ १५ पानांची प्रस्तावना आहे.

मराठी संस्कृतीचा सांगोपांग अभ्यास असणाऱ्या या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाने त्या काळी १० हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले होते. मराठा मंदिरच्या तिसऱ्या आणि महत्त्वाच्या ग्रंथाच्या कामाची मुहूर्तमेढ १९९४ मध्ये रोवली गेली.

‘शिवछत्रपती इतिहास व चरित्र- खंड १’ (शिवपूर्वकाल- राजकीय व सांस्कृतिक) या ग्रंथाचे काम मराठा मंदिराचे आजचे अध्यक्ष आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने य. दि. फडके यांच्यावर सोपविण्यात आले. ५ नोव्हेंबर २००१ रोजी हे शिवचरित्र प्रकाशित करण्यात आले.

आज हा ग्रंथ शिवप्रेमींसाठी आणि इतिहासप्रेमींसाठी संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त आहे. याचसोबत साहित्य शाखेच्या वतीने नामवंत साहित्यिकांना गौरविण्यात येते. नवोदित साहित्यकारांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी प्रथम प्रकाशित साहित्याला पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

तसेच महाविद्यालयीन मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांमध्ये सहभाग आणि स्पर्धांचे आयोजन केले जाते. म. मं. कलाकेंद्राच्या माध्यमातून उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ प्रदान केले जाते. कथक, भरतनाट्यम आणि एकपात्री नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.

मराठा मंदिर शैक्षणिक संस्थेच्या अनेक शाळा प्रामुख्याने दुष्काळग्रस्त भागात बांधण्यात आल्या आहेत. त्याकाळी ग्रामीण भागातील नागरिकांचा शाळांकडे कल नव्हता; तर शहरी भागात अनेक मोठमोठ्या शाळा होत्या; मात्र तिकडे जाण्यासाठी साधने उपलब्ध नसते.

अशा वेळी ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तालुकास्तरावर या शाळांची उभारणी करण्यात आली. संस्थेच्या सोलापूरमधील अक्कलकोट, सांगलीतील जत, रत्नागिरी शहर आणि पाली, मुंबई या ठिकाणी प्राथमिक, माध्यमिक, रात्र शाळा आणि इंग्रजी माध्यम शाळा आहेत.

याव्यतिरिक्त संस्थेचे रत्नागिरी येथे अध्यापक विद्यालय आहे. मुंबईत मराठा मंदिर संस्थेच्या आवारातच ‘बाबासाहेब गावडे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’ ही शाखा चालविली जाते. दरवर्षी येथून सुमारे १४५ विद्यार्थी एमएमएससोबतच पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण घेत आहेत.

विलेपार्ले येथील अद्ययावत ‘मराठा मंदिर बाबासाहेब गावडे रुग्णालया’च्या माध्यमातून संस्था रुग्णसेवेचे व्रत जोपासते आहे. संस्थेमार्फत एक लीगल सेलदेखील चालविला जातो. या माध्यमातून गरजूंना मोफत कायदेविषयक सल्ला दिला जातो. यासाठी तज्ज्ञ वकिलांची एक टीम कार्यरत आहे. बाबासाहेब गावडे यांच्या काळापासून ही लीगल सेल काम करते आहे. आठवड्यातील दोन दिवस या ठिकाणी कायदेविषयक सल्ला दिला जातो.

सन १९४६ ते २०२३ हा ७५ वर्षांचा मोठा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक बदलाचा काळ संस्थेने पाहिला. काळानुरूप होत असणारे बदल स्वीकारत संस्थेने कार्यरत असलेल्या प्रत्येकच क्षेत्रात अद्ययावत होत संस्थेची समाजातील ओळख कायम ठेवली.

यासोबतच ‘मऱ्हाठा’ म्हणजे महाराष्ट्र या भूभागावरील प्रत्येक जाती, धर्म, वंश या मर्यादा ओलांडून एकत्र येणारा व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पाया होता, तोच ‘मऱ्हाठा’ माणूस डोळ्यासमोर ठेवत या संस्थेची सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील वाटचाल सुरू झाली.

मराठा मंदिर म्हटलं की डोळ्यासमोर चित्रपटगृह आधी येते. मात्र संस्थेचा आवाका मोठा आहे. असे असतानाही संस्थेतील प्रत्येक पदाधिकारी, कर्मचारी हा स्व. बाबासाहेब गावडे यांच्या उदात्त हेतूला डोळ्यासमोर ठेवून न्याय देण्याचे कार्य संस्थेच्या या ७५ वर्षांच्या यशोगाथेतून अधोरेखित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com