
अ-अमिताभचा...
‘मुकद्दर का सिकंदर’ मधला सिकंदर आणि जोहराबाईंच्या गारुडातून प्रेक्षक बाहेर आलेच नव्हते आणि या जादूमधून बाहेर येण्याची त्यांची मनःस्थिती नव्हती. त्याचवेळी १९८१ मध्ये प्रकाश मेहरा अमिताभ बच्चन यांच्यासोबत अजून एक यशस्वी चित्रपट ‘लावारिस’ घेऊन आले.
‘मुकद्दर का सिकंदर’ मधला सिकंदर आणि जोहराबाईंच्या गारुडातून प्रेक्षक बाहेर आलेच नव्हते आणि या जादूमधून बाहेर येण्याची त्यांची मनःस्थिती नव्हती. त्याचवेळी १९८१ मध्ये प्रकाश मेहरा अमिताभ बच्चन यांच्यासोबत अजून एक यशस्वी चित्रपट ‘लावारिस’ घेऊन आले. १९७३ ते ८० पर्यंतच्या झंझावातात सर्व सामान्याचा नायक ठरलेल्या अमिताभला प्रकाश मेहरांनी ‘लावारिस’ मधून समाजवादाच्या नेहमीच्या फूटपट्टीपेक्षा वरती नेउन ठेवलं.
गरिबांनी, वंचितांनी आपला आवाज, आपली दुःख दबल्या आवाजात का व्यक्त करायची? विषमतेने भरलेल्या या समाजात गरिबांची पिडा, दु:खितांचे क्लेश ‘डंके की चोट’ पर सांगण्याचं दमदार आवाहन ‘लावारिस’मधल्या अमिताभनं रंगवलेल्या ‘हिरा’ ह्या अनौरस तरुणाच्या भूमिकेत होते. शिष्ट मंडळींच्या पापावर परंपरेनं पांघरूण घालणारा ‘लावारिस’मधल्या अनपेक्षित हल्ल्यानं गांगरून गेला. “अपनी तो जैसे तैसे, थोडी ऐसे या वैसे, कट जायेगी...आपका क्या होगा जनाबे आली..’ असं खुल्या मंचावरून आव्हान देणारा हिरा, ज्यांच्याकडं गमावण्यासारख काहीच नाही अशांच्या उपद्रवमूल्याची जाणीव करून देत होता.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
दारिद्र्यातील जीवन जगताना लोकगीतांसारख्या विनामूल्य मनोरंजनाचा आधार ज्याप्रमाणे ग्रामीण अथवा शहरातला श्रमिक समाज घेतो त्या मनोरंजनाला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या ‘मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है’ सारखे गाणे सर्वकालीन बेस्ट सेलरपैकी एक ठरलं होत. या गाण्यामध्ये अमिताभनं केलेल्या बीभत्स, ओंगळवाण्या स्त्री पात्रांच्या वेशभूषेवर टिकाही झाली होती. दिवाळीचा पाडवा किंवा धुलीवंदनाला भारतातील ग्रामीण परंपरेत अशा ओंगळवाण्या स्त्री-वेशात पुरुष नाचतात, मजा करतात. या प्रथा ज्यांना आपल्याशा वाटतात तो गरीब आणि वंचित समाज मात्र अमिताभच्या ‘मेरे अंगने मे’ च्या अवतारावर बेहद्द फिदा झाला होता. अमिताभने खुद्द गायलेले ते गाणे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय गीतांपैकी एक ठरले होते.
सप्तरंगमधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा.
गरीबांनी आपला हक्क विनम्रतेनं आणि दबकत मागू नये तर मुजोरी वाटेल इतक्या जोरदारपणानं मागावा, असा संदेश ‘लावारिस’चा नायक ठळकपणे देऊन गेला. “जिसका कोई नही, उसका तो खुदा है यारो” असा दैववाद, जो भारतीयांच्या नसानसांत भिनला आहे, त्याचंही उदात्तीकरण खूप मोठ्या प्रेक्षकवर्गाला डोळ्यासमोर ठेवून केलं गेलं होत. गरीब-श्रीमंतांच्या या वर्ग संघर्षात श्रीमंत बापाची मुलगी असलेली त्याची प्रेयसी अर्थातच ती साकारणाऱ्या झीनत अमानला सुद्धा ‘हिरा’ तीच ओबडधोबड वागणूक देतो. “पैसेसे क्या, क्या तुम यहा खरीदोगे” असे म्हणत पुन्हा गरीब-श्रीमंतां मधली दरी नजरेस आणून देण्यात अमिताभ यशस्वी झाला होता.
अलीकडे कोरोना लॉकडाऊन च्या काळात जो वर्ग अख्खं बिऱ्हाड पाठीवर घेऊन शेकडो किलोमीटर पायी चालला होता, त्या वर्गाचा उद्वेग चाळीस वर्षांपूर्वीच ‘लावारिस’ या चित्रपटात अमिताभनं मांडला होता.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
“तू अपुनको मार, मार के लोखंडका बना दिया, अभी अपुन एक हात मारेगा लोखंड का पत्रा बना देगा.” किंवा “अपुन कुत्ते की वो दुम है जो बारा बरस नल्ली मे डालके रखो...नल्ली तेढा हो जायेगा...अपुन सिधा नही होगा,” जीवनातील विदारक अनुभवातून तावून सुलाखून निघालेल्या नायकाचे हे संवाद लक्ष वेधून घेतात.
गरिबी, दु:ख, अपमान, उपेक्षा हेच ज्यांचं प्रारब्ध, अशा दारिद्र्यात जगलेल्या तरुणानं बेदरकारपणानं व्यक्त होणं, हीच मुळात एक सामाजिक क्रांती होती. परंतु अमिताभ सारख्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या स्टार-कलाकारानं ही भूमिका साकारलेली असल्यामुळं त्या भूमिकेमागचा आक्रोश दुर्लक्षून केवळ मनोरंजनात्मक मूल्यांवरच प्रेक्षकाचं लक्ष केंद्रित झालं होतं. ज्या वंचित वर्गाची ही समस्या होती त्यांच्यापर्यंत मात्र हा संदेश अचूक पोहोचला होता.
कॅमेऱ्यासमोर टिकून राहण्याच्या अमिताभच्या विशेष क्षमतेचा वापर करत प्रकाश मेहरा यांनी त्यांच्या ‘हेरा-फेरी’ या चित्रपटापासूनच अमिताभवर लांबलचक दृश्य चित्रित करण्याची पद्धत सुरू केली होती. दहा-बारा मिनिटांचं एकच गाणे किंवा तसंच लांबलचक दृश्य ही त्यांची खासियत त्यांनी ‘लावारिस’ मध्येही सढळहस्ते वापरली होती. पडद्यावर केवळ अमिताभला पाहण्याची इच्छा राखणाऱ्या सर्व वर्गातील प्रेक्षकांना ही मेजवानीच असायची. ‘लावारिस’ मधून ‘गरिबोंका मसीहा’ अशी अमिताभची प्रतिमा अधिक ठळकपणे चितारण्यात प्रकाश मेहरा यशस्वी झाले होते, शिवाय तिकीट खिडकीवरची गर्दी कायम राखणंही त्यांना जमलं होतं. (क्रमश: )
(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)
Edited By - Prashant Patil