esakal | तीन पिढ्यांच्या पसंतीचा नायक!
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh Bachchan

तीन पिढ्यांच्या पसंतीचा नायक!

sakal_logo
By
जी. बी. देशमुख gbdeshmukh21@rediffmail.com

राकेशकुमार या दिग्दर्शकानं १९७९ मध्ये एक नवीन प्रयोग केला. ‘मिस्टर नटवरलाल’ या चित्रपटात अमिताभकडून गाणं गाऊन घेतलं. त्याआधी अमिताभनं  ‘कभी-कभी’, ‘आनंद’ आदी चित्रपटात म्हटलेल्या कविता लोकांनी डोक्यावर घेतल्या होत्या, पण पार्श्वगायनाचा हा त्याचा पहिलाच प्रयत्न होता. राजेश रोशन या गुणी संगीतकाराने आनंद बक्षींच्या बालगीताला संगीताचा साज चढवला होता. 

बालगीतांबाबत हिंदी चित्रपटाचा इतिहास फारसा उज्ज्वल नाही. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या नटाने केवळ बालकांसाठी काही करणे हीच मोठी गोष्ट होती. फसवेगिरी करण्यात वाकबगार असलेला देशातला आंतरराष्ट्रीय ठग ‘नटवरलाल’च्या जीवनावर आधारीत हा एक विनोदी ॲक्शन चित्रपट होता.

तीन तास अमिताभच्या अचाट स्टारडमचे प्रयोग, शिवाय लोकांना आवडेल अशी त्याची एकट्याचीच कॉमेडीसुद्धा होती. यातली हाणामारीची दृश्ये बच्चे कंपनीला खिळवून ठेवतील अशा विनोदी ढंगाने अमिताभने केली होती.

अमजदखाननं पाठविलेला एक दांडगट पहिलवान ज्याला अमिताभ हसत खेळत जंगलातल्या दलदलीत पाडतो आणि ‘पहेलवानजी, पहेलवानजी’ करत पुन्हा वाचवायचा प्रयत्न सुद्धा करतो. ते दहा मिनिटांचे दृश्य बालकांसाठी खास होते. नटवरलाल हा नरभक्षक वाघ मारण्यासाठी आलेला एक शिकारी आहे, अशी भोळ्या भाबड्या गावकऱ्यांची समजूत असते. मूळचा घाबरट असलेला नट्टू हे कळल्यावर कसा प्रतिसाद देतो ते पाहण्यासारखे आहे.

विमानात जायला मिळालं तर तिथे आपल्या शेळ्या-मेंढ्या घेऊन जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भोळ्या खेडेगावातल्या मुलीच्या भूमिकेत रेखा गोड दिसली होती. तेव्हा अमिताभ -रेखा ही जोडी पूर्ण जोमात होती. त्यामुळे दोघांवर चित्रित झालेलं ‘परदेसिया ये सच है पिया’ हे गाणं सार्वकालिक हिट गाण्यांच्या यादीत जाऊन बसलं होतं. या चित्रपटात अमिताभने केलेल्या कारवाया आणि त्याचा खलनायक अमजद खानसोबत चाललेला उंदरा-मांजरांचा खेळ बालिश पण मजेशीर होता.

शेतात काम करणाऱ्या गावकरी महिलांची मुलं एका जागी खेळत असताना अमिताभ तिथे येतो आणि ‘आओ बच्चो तुम्हे एक कहानी सुनाता हूँ मै’ अस म्हणत त्यांच्याशी गट्टी जमवतो. एक अत्यंत हलकी-फुलकी, संगीताचा जास्त कोलाहल नसलेली सुमधुर धून राजेश रोशनने वापरली होती. गिटारचे नाजूक तरंग उठवणाऱ्या हलक्या ठेक्यातील ‘मेरे पास आओ मेरे दोस्तो एक किस्सा सुनो’ ह्या गाण्यावर आपण नकळत डोलू लागतो. हळुवार धून आणि मध्येच बालसुलभ मस्ती. लहानांसोबत मोठ्यांनाही भावलं होत हे गाण. या गाण्यात अमिताभ बऱ्यापैकी सुरात होता पण कितीही पक्षपात केला तरी स्वर भसाडा होता हे तथ्य नाकारता येत नाही. पण लोकांपुढे कोणाचे चालते...! अमिताभच्या स्वरातील भसाडेपण तर चाहत्यांच्या हिशेबातही नव्हते.

अमिताभची गाण्याची पद्धत इतकी डोक्यावर घेतली गेली की त्याने आजपर्यंत गायलेल्या पस्तीसच्या वर गाण्यांपैकी कमीत कमी पंधरा गाणी टॉपलिस्ट मध्ये जाऊन बसली आहेत. ‘शिव-हरी’ सारख्या शास्त्रीय संगीतातील पंडितांच्या मार्गदर्शनाखाली त्याने गायलेले ‘सिलसिला’ चित्रपटातील ‘रंग बरसे भिगे चुनरवाली’ हे गाणे होळी-गीतातील सर्वोत्कृष्ट गीत आहे. ‘चल मेरे भाई तेरे हात जोडता हू’ या ‘नसीब’ मधील गाण्यात तर साक्षात महंमद रफी सोबत तो जोडीने गायला होता. आनंद बक्षी यांनी बालकांचं निरागस मनोविश्व ध्यानात ठेऊन हे गाणं लिहिलं होतं.

नही भुलती उफ्फ वो जंगल की रात

मुझे याद है वो थी मंगल की रात

चला जा रहा था मै डरता हुवा

हनुमान चालिसा पढता हुवा

हनुमानाची गदा आणि आधुनिक शिकाऱ्याची बंदूक या दोन्हीचं प्रतीक म्हणून अमिताभ जंगलातील एकच काटकी वापरतो, पण दृश्यात समरस झालेले आपण सगळं स्वीकारत जातो. लाजवाब बालसुलभ हावभाव, पायात तेव्हा नवखे वाटणारे गम बूट, शिकारीला निघालेल्या माणसाचा पेहराव आणि उंचच उंच वाटावा अशा कोनातून घेतलेला अमिताभ. मुलांसाठी सुपरमॅनची प्रतिमा सामोरे उभी ठाकली होती. कुणीही ‘नटवरलाल’ मधील अमिताभला आजपर्यंत सुपरमॅन म्हणून बिरुद लावलं नाही. पण बाल-प्रेक्षकानी मात्र नटवरलालला सुपरमॅनचा दर्जा देऊन ठेवला होता. एकाच वेळी आजोबा, वडील आणि नातवंडे अशा तीन पिढ्यांची या चित्रपटातील भूमिकेसाठी पसंती मिळवलेला अमिताभ हा एकमेव अभिनेता असावा.

(सदराचे लेखक अमिताभच्या चित्रपटांचे अभ्यासक आहेत)

loading image
go to top