हे दुःख विसरता येणे नाही...

दु:ख...! पोखरून टाकणारं, डोक्याला मुंग्या आणणारं... आणि या दु:खापलीकडं काही आशा असण्याची शक्यता संपवून टाकणारं कथानक होतं हृषीकेश मुखर्जींच्या १९७५ मध्ये प्रदर्शित ‘मिली’ चित्रपटाचं.
Amitabh Bachchan
Amitabh BachchanSakal

दु:ख...! पोखरून टाकणारं, डोक्याला मुंग्या आणणारं... आणि या दु:खापलीकडं काही आशा असण्याची शक्यता संपवून टाकणारं कथानक होतं हृषीकेश मुखर्जींच्या १९७५ मध्ये प्रदर्शित ‘मिली’ चित्रपटाचं. अशोककुमार, अमिताभ बच्चन, जया भादुरी आणि अरुणा इराणी या चार कलाकारांनी प्रेक्षकांना दु:खसागरात नेऊन सोडलं होतं. त्या आधी मुखर्जींच्याच ‘आनंद’नं प्रेक्षकांना हसवत- हसवत रडवलं होतं, त्या दु:खाचं आपण एक प्रकारे कौतुकच केलं होतं; पण ‘मिली’तील प्रत्येक पात्राच्या मनातील दु:खाची सल तुम्हाला विदीर्ण करून सोडते, सैरभैर करून सोडते.

एका मध्यमवर्गीय अपार्टमेंटच्या पहिल्या आणि सगळ्यात वरच्या अशा दोन फ्लॅट्सध्ये घडणारी ही कथा रंगमंचासारखं नेटकं नेपथ्य घेऊन घडते. खालच्या मजल्यावर मिली (जया भादुरी) ही महाविद्यालयात शिकणारी नवतरुणी आपले वडील अशोककुमार आणि आत्या (उषाकिरण) यांच्याबरोबर राहत असते. तिची आई लहानपणीच देवाघरी गेलेली असते. तिचा एक भाऊ सैन्यात अधिकारी असतो. अत्यंत सकारात्मक, खिलाडू वृत्तीची असते मिली. सोसायटीतील सगळ्या लहान मुलांची ही दीदी मुलांचे खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम वरच्या मजल्यावरील फ्लॅटच्या गच्चीत घेत असते. वरच्या मजल्यावर शेखर (अमिताभ बच्चन) नावाचा तरुण राहायला येतो आणि मुलांचे खेळ बंद पडतात, कारण ह्या रागीट माणसाला गोंधळ आवडत नसतो. लहानपणीच या माणसाच्या वडिलांनी त्याच्या आईचा खून केल्याची कुजबूज असते. सुरुवातीला उडालेल्या खटक्यांनंतर मिलीच्या बच्चे कंपनीची त्याच्याशी गट्टी जमते.

शेखरला आई-वडिलांविषयी छेडल्यास त्याचा राग उफाळून येत असतो. मिलीशी त्याची भेट होते आणि तिच्या खिलाडू वृत्तीमुळं तो काही काळ आपलं औदासीन्य विसरतो. मिलीचे वडील अशोककुमार मात्र मिलीला असलेल्या कर्करोगासारख्या असाध्य रोगाविषयी चिंतित असतात. चौथं महत्त्वाचं पात्र असतं अरुणा इराणीचं, जी प्रेमभंगानंतर भरकटलेली, सोसायटीची सेक्रेटरी असते. या चारही पात्रांचं दु:ख अपरिमित असतं. अल्लड वयात प्रेमाची चाहूल लागली असतानाच स्वत:च्या मरणाची कल्पना यावी, हे मिलीच्या बाबतीत घडतं. ‘मैने कहाँ फुलों से हँसो, तो वो खिलखिलाकर हँस दिये’ असं फुलांशी गुजगोष्टी करणाऱ्या, आईविना वाढलेल्या फुलासारख्या मुलीला अमिताभच्या रूपात प्रेम मिळतं आणि त्याचवेळी केवळ महिन्याभराचं आयुष्य शिल्लक असल्याची वैद्यकीय सूचनाही मिळते.

लहानपणीच्या घटनांच्या परिणामातून एकटा, उदास, एकांगी, चिडचिडा झालेला आणि जीवनापासून दूर पळण्याच्या प्रयत्नात असलेला एका श्रीमंत बापाचा मद्यपी मुलगा शेखर साकारला होता अमिताभनं. कुठलंही आक्रस्ताळेपण नाही, की आदळआपट नाही. शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळं आपल्याला अस्वस्थ, उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं. मोबाईल, टी.व्ही. आदी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारपणामुळं घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघांमध्ये नोकराच्या माध्यमातून जो पत्रव्यवहार होतो, तो आजच्या मोबाईल चॅटिंगपेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठविणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो, ‘जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखूँ.’ हा रोमन्टिसिझम खूप वरच्या स्तरावरचा होता. अमर्याद दु:खाची विण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात ‘बडी सुनी सुनी है, जिंदगी ये जिंदगी’ आणि ‘आये तुम याद मुझे, गाने लगी हर धडकन’ ही दोन गाणी वातावरण औदासीन्यानं भारून टाकतात. मनाचा चांगला; पण लहानपणी आई-वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेनं आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभनं लाजवाब रंगवला होता. गीतकार योगेश आणि संगीतकार एस. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली गाणी अप्रतिम होती.

...आणि क्लायमॅक्स. ‘मिली’च्या अल्लड स्वप्नांपैकी एक स्वप्न तरी पूर्ण व्हावं याकरिता पंधरा दिवसांचं आयुष्य गाठीशी उरलेल्या मिलीसोबत अमिताभ लग्न लावतो आणि तिला आल्प्स पर्वत दाखविण्यासाठी स्वित्झर्लंडच्या विमानात बसवून घेऊन जातो. प्रेक्षकांना आंतर्बाह्य घुसळवून टाकण्याची क्षमता या शेवटात होती. चित्रपटाच्या शेवटी प्रमुख पात्रांच्या दु:खाची सल तुम्हाला विदीर्ण करून सोडते. खूप काळ पुरेल असं दु:ख आणि औदासीन्य घेऊनच आपण चित्रपटगृहातून बाहेर पडतो. जया भादुरी, अशोक कुमार आणि अमिताभ बच्चन यांनी जे दु:ख या चित्रपटातून दिलं, ते विसरता म्हणून येत नाही, ते दुःख काळजाला घरं पाडतं, त्याचं कुणीच सांत्वन करू शकत नाही. या भळभळत्या जखमेवर अमिताभकडून औषध नाही....

(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com