esakal | सूर हरवलेला अहंकारी आलाप
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh Bachchan

सूर हरवलेला अहंकारी आलाप

sakal_logo
By
जी. बी. देशमुख gbdeshmukh21@rediffmail.com

अमिताभसाठी १९७७ हे वर्ष खास होतं. १९७३ पासून त्यानं धारण केलेला ‘अँग्री यंग मॅन’ चा अवतार लोकांनी हृदयात बसवला होता. पण मनमोहन देसाई नावाच्या जादूगारानं ‘अमर अकबर अँथनी’ या चित्रपटात अमिताभमधील अँक्शनसोबतच कॉमेडी, रोमान्स, ड्रामा आणि गाणी अशा सर्व कलागुणांना पडद्यावर आणलं आणि कहर झाला. एक मेगास्टार उदयास आला. अमिताभ नावाचं मनोरंजनाचं अभूतपूर्व पॅकेज भरात असताना, हृषीकेश मुखर्जी या मनस्वी दिग्दर्शकानं पुन्हा एकदा अमिताभवर प्रयोग करण्याचं मनात आणलं. अमिताभच्या सुपर स्टारडमच्या कल्लोळात त्यांनी मोठीच जोखीम घेतली. ‘आलाप’ नावाचा एक भावनात्मक कादंबरीस्वरूप कथानक असलेला चित्रपट त्यांनी पडद्यावर आणला. आपल्या सहज सुंदर शैलीतून क्लिष्ट विषय मनोरंजनात्मक पद्धतीनं हाताळणाऱ्या हृषीदांच्या शैलीत ‘पुढं काय’ अशी उत्कंठा निर्माण करण्याची क्षमता होती, जी प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवत असे.

‘आलाप’ टीकाकारांच्या कौतुकास पात्र ठरला; पण तिकीट खिडकीवर तो अपयशी ठरला. कारण, ‘पुढं काय?’ ह्या उत्कंठेच्या ऐवजी हे एक सपक, नीरस कथा-कथन झाल होतं. अमिताभच्या सुपर स्टारडमचा आनंद घ्यायला आलेल्या प्रेक्षकांना पायजमा, शर्ट, आणि नेहरू जाकीट असा अमोल पालेकरच्या अवतारातील अमिताभ बघायला मिळाला. शिवाय, येसुदासचा आवाज सुमधुर असला तरी अमिताभला न शोभणारा होता. शास्त्रीय संगीत गायकाच्या साध्या - सरळ भूमिकेतील हा नायक अमिताभच्या ‘अँग्री यंग मॅन’च्या लोकप्रियतेच्या वावटळीत उडून गेला होता. पण या सगळ्या गुंतागुंतीमध्ये दोघा कलाकारांचा अत्युच्च कोटीचा अभिनय मात्र दुर्लक्षिला गेला होता.

‘आलाप’मधील ओमप्रकाशनं रंगविलेला, खानदानी इज्जतीचा अतिरेकी अहंकार असलेला श्रीमंत बॅरिस्टर आणि एक कठोर बाप हा त्याच्या त्यावेळच्या मिश्कील प्रतिमेच्या विपरीत होता. त्याकाळातील बेदरकार बापांचं प्रतिनिधित्व करणारी ही भूमिका ओमप्रकाशनं प्रभावीपणे सांभाळली होती. ‘आलाप’ चित्रपट एका अहंकारी पिता-पुत्राच्या जोडीची कहाणी होती. शास्त्रीय संगीताचे धडे घेऊन गावी परतलेला अमिताभ गरीब वस्तीतील हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या एका उच्च दर्जाच्या गायिकेला आईच्या जागी मानून आपली संगीत साधना सुरू ठेवण्याच्या प्रयत्नात असतो. संगीताचं वावडं असलेले त्याचे वडील मुलानं हलक्या लोकांमध्ये वावरू नये म्हणून वकिली डावपेच लढवून गरिबांची ती वस्ती कारखानदारांच्या घशात घालतात. ह्यामुळं त्या बुजुर्ग गायिकेवर बेघर होण्याची वेळ येते. संतापलेला मुलगा बापाच्या बेगडी प्रतिष्ठेचे धिंडवडे निघावेत म्हणून त्याच गावात बस-स्टँडवर टांगा चालविण्याचा उद्योग सुरू करतो. बापाचं नाक कटविण्याच्या नादात मुलगा अधिकाधिक खोलात जातो.

गरिबी, नैराश्य आणि शारीरिक व्याधींनी ग्रस्त होतो. इकडं बापालासुद्धा सद्बुद्धी येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. एक निराश, नकारात्मक विचारसरणी असलेला मुलगा रंगवताना अमिताभनं कमाल केली होती. नैराश्याचे इतके रंग असू शकतात, हे अमिताभच्या अदाकारीतून आपल्याला नव्यानं कळत जातं. सुरुवातीला संगीत हा या चित्रपटाचा विषय असेल असा भास होतो; परंतु नंतर गरीब-श्रीमंत संघर्षाकडं कथानक भरकटतं. ‘कोई गाता मै सो जाता’ हे अंगाई गीत आणि ‘माता सरस्वती शारदा’ ही सरस्वती वंदना श्रवणीय होती. विशेष म्हणजे सरस्वती वंदना आणि इतरही गाणी डॉ. राही मासूम रजा यांनी लिहिली होती. संगीतकार जयदेव यांचं संगीत चांगलं होतं; पण संगीत हा विषय असलेल्या सिनेमाची गाणी अधिक श्रवणीय असायला हवी होती.

चित्रपटाच्या शेवटी पुत्राच्या टांग्यात प्रवास करून उतरणाऱ्या पित्याला भाडं देतेवेळी कळतं, की आपण दुरावलेल्या पुत्राच्या टांग्यात बसून आलो आहोत. त्या दृश्यातील ओमप्रकाश आणि अमिताभचा अभिनय अविस्मरणीय. अहंकाराच्या भट्टीत पोळलेल्या बाप-लेकाचा संघर्ष उद्देशहीन ठरल्यामुळं ह्या दोघांनी केलेल्या अभिनयाच्या पराकाष्ठेचं चीज झालं नव्हतं.

(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे अभ्यासक आहेत. )

loading image