विराट लोकप्रियतेची प्रचिती

अमिताभला कोरोनाची लागण झाल्याची बातमी मागील वर्षी सगळ्यांनीच ऐकली, त्या वेळी त्याच्यावरचं चाहत्यांचं प्रेमही आपण सगळ्यांनीच अनुभवलं.
Coolie
CoolieSakal

अमिताभला कोरोनाची लागण झाल्याची बातमी मागील वर्षी सगळ्यांनीच ऐकली, त्या वेळी त्याच्यावरचं चाहत्यांचं प्रेमही आपण सगळ्यांनीच अनुभवलं. आता जुलै महिना जवळ आल्यावर आजपासून अडतीस वर्षांपूर्वीचा, म्हणजे १९८२ मधला २२ जुलैचा दिवस आठवला. ज्या दिवशी मनमोहन देसाईंच्या ‘कुली’ चित्रपटाच्या सेटवर बंगलोर येथे चित्रीकरण करत असताना अमिताभ घायाळ झाला आहे अशी बातमी आली होती. पुनीत इस्सार नावाच्या कलाकारासोबत हाणामारीचं दृश्य करत असताना एका लोखंडी टेबलाचा कोपरा ओटीपोटावर लागल्यानं त्याचं आतडं दुखावलं होतं. तीन-चार दिवसांत प्रकृती अधिक ढासळल्याची बातमी आली. अमिताभला बंगलोरच्या फिनोमिना हॉस्पिटलमधून मुंबईच्या बीच कँडी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं. त्या वेळी समाज माध्यमांचा जन्मही झालेला नसताना बातमी देशाच्या कानाकोपऱ्यांत झपाट्यानं पसरली.

काही काळ कोमात गेलेला अमिताभ दोन ऑगस्ट रोजी शुद्धीवर आला. एका क्षणी तर त्याचं ‘ब्रेन डेड’ झाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. बीच कँडी हॉस्पिटलच्या बाहेर रात्रंदिवस उभी असलेली चाहत्यांची गर्दी नियंत्रणात आणता आणता मुंबई पोलिसांच्या नाकी नऊ येत होते. पुढील आठ दिवस मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा... सर्वत्र अमिताभच्या प्रकृतीसाठी प्रार्थना सुरू होत्या. नवस, यज्ञ, लोटांगण घालत टेकड्या चढणं अशा अस्सल भारतीय प्रकारांची तर मोजदादच नव्हती. चिंतेच्या एका सूत्रात राष्ट्र असं बांधलं जाण्याचा हा अनुभव अभूतपूर्व होता. दस्तुरखुद्द पंतप्रधान इंदिरा गांधी मुंबईला अमिताभच्या प्रकृतीची चौकशी करण्यास आल्या. न भूतो न भविष्यती असा हा चिंतेचा अजब रेटा होता. अमिताभ पूर्णत: बरा झाल्यानंतर जानेवारी १९८३ मध्ये मनमोहन देसाईंनी त्याच दृश्यापासून चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात केली.

ही घटना घडल्यानंतर सुमारे दीड वर्षानं एक डिसेंबर १९८३ ला ‘कुली’ सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमा मनमोहन देसाईंच्या नेहमीच्याच लॉस्ट एँड फाउंड पठडीतील होता. लक्ष्मिकांत प्यारेलाल ह्यांच संगीत, हाणामारीची दमदार दृश्यं आणि साक्षात हृषीकेश मुखर्जींचं एडिटिंग ही जमेची बाजू होती. रेल्वे प्लॅटफॉर्मवरील बिल्लाधारी कुली ‘ईक्बाल’च्या भूमिकेत असलेला अमिताभ म्हणजेच गरीब कुलींचा तारणहार बनलेला असतो. ‘ सारी दुनिया का बोझ हम उठाते है’ ह्या एकाच गाण्यात गणेशोत्सव, ईद, हमालांच्या समस्या, गरिबांप्रती करुणाभाव, हिरोईन रती अग्निहोत्रीच्या पात्राचा परिचय, गरिबांना परिस्थितीशी कसं जुळवून घ्यावं लागतं त्याचा पाठ इतकं सगळं दाखवण्याचं कौशल्य देसाईंच्या निर्देशनात होतं.

‘एक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा’, ‘जवानी की रेल कही छूट न जाये’, ‘हमका इसक हुवा है लोगो’ यांसारख्या उडत्या चालीच्या गाण्यांवर रती-अमिताभचे जोरदार डान्स, लक्ष्मीकांत-प्यारेलालची खास ठेक्यातील गाणी, निळू फुले यांची महत्त्वाची भूमिका आणि अल्ला रख्खा नावाचा गरुड पक्षी हातावर घेऊन होणारी अमिताभची एन्ट्री... “हमारी तारीफ जरा लंबी है. बचपन से सर पे है अल्लाह का हाथ और अल्लारख्खा है अपने साथ. बाजू पे ७८६ का है बिल्ला, बीस नंबर की बिडी पिता हूँ. काम करता हूँ कुली का और नाम है इक्बाल.” देसाईंना सामान्य जनांची नाडी अचूक गवसली होती. ह्याशिवाय ऋषी कपूर आणि अमिताभचे चित्रविचित्र गेट अपमधील ‘लम्बूजी लम्बूजी, बोलो टिंगूजी’ हे गाणं मजेदार झालं होतं. नायक मुस्लिम असल्यामुळं ‘मुबारक हो तुम सब को हजका महिना’ सारखे धार्मिक गाणे होते. मनोरंजनाचा एक जबरदस्त मसाला तयार झाला होता. पण १९८० मध्ये मोहम्मद रफींच्या देवाघरी जाण्यानं रसिकांचं किती मोठं नुकसान केलं होतं त्याची प्रचिती शब्बीर कुमारनं गायलेल्या सगळ्या गाण्यांतून आली. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी अमिताभ घायाळ झाला होता, या एकमेव कारणानं चित्रपटगृहांवर प्रेक्षकांच्या उड्या पडल्या आणि भारतातील सिनेमाच्या आठही विभागांत एक करोडच्या वर व्यवसाय करणारा हा पहिला चित्रपट ठरला.

अमिताभच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर कथेत बदल करून सिनेमाच्या शेवटी अमिताभला गंभीररीत्या घायाळ करून मग वाचविण्यात आलं. सर्वांत कळस म्हणजे, जी दुर्घटना घडली तो क्षण येताक्षणीच चित्रपट स्थिर करून तिथं ''इसी शॉट में अमिताभ बच्चन को चोट लगी थी’ अशी सूचना टाकण्यात आली होती. अमिताभच्या लोकप्रियतेच्या विराट रूपाची प्रचिती येण्यास तो अपघात कारणीभूत ठरला, हे मात्र खरं.

(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com