esakal | नृत्य-संगीतमय मनोरंजनाचा कळस
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh and Rekha

नृत्य-संगीतमय मनोरंजनाचा कळस

sakal_logo
By
जी. बी. देशमुख gbdeshmukh21@rediffmail.com

भागीदारी मनमोहन देसाई यांच्याबरोबरची : ३

आम्ही १९७९ मध्ये बारावीत होतो. अठराव्या वर्षात प्रवेश केला होता, म्हणजे थोडक्यात प्रौढांसाठीचे चित्रपट बघण्यास पात्र झालो होतो. नेमका त्याचवेळी निर्माते मनमोहन देसाईंचा ‘सुहाग’ चित्रपट चित्रपटगृहांमध्ये झळकला. आधीच्या ‘अमर अकबर अँथनी’ आणि ‘परवरीश’प्रमाणेच सर्व तर्क बासनात गुंडाळून तयार केलेला लॉस्ट अँड फाउंड फॉर्म्युला होता ‘सुहाग’चा. कॅमेऱ्याच्या मागं मनमोहन देसाई आणि पुढं अमिताभ. बाकी सगळं गौण. संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल ह्या जोडीनं दिलेल्या उडत्या चालीच्या ठसकेबाज गाण्यांवर अमिताभ आणि रेखाच्या बिनधास्त अदाकारीनं नटलेली नृत्यं, ही या मनोरंजनात्मक मसाल्याची प्रमुख सामग्री होती.

परवीन बाबीचं लग्न शशी कपूरसोबत व्हावं यासाठी शशी कपूरचं मन वळविण्यासाठी अमिताभ आणि रेखा सरदार आणि सरदारनीचा वेश धारण करून जातात आणि एका बागेत ‘तेरी रबने बना दी जोडी’ या गाण्याची धमाल उडते. सिनेमात आणि सिनेमाबाहेरही अनेकदा भांगडा नृत्य पाहण्याचे प्रसंग आले; पण या गाण्यातील दमदार भांगडा बघावा असा आहे तो अमिताभचा. शिडशिडीत अंगकाठी असूनदेखील अमिताभ अस्सल सरदार वाटतो. नम्र विनवणीतून जेव्हा शशी कपूर मानत नाही, तेव्हा मोहम्मद रफींच्या खणखणीत आवाजात ‘इस जट यमले से डरना’ अशी धमकी त्याला अमिताभ देऊन पाहतो. तरी शशी मानायला तयार होत नाही तेव्हा, ‘चल छोड इसे दिवानी, मत कर बरबाद जवानी’ असं म्हणत वेगळ्या पद्धतीनं दबाव आणायचा प्रयत्न करतो. मोठ्ठी लठ हातात घेऊन अमिताभनं ठसक्यात सादर केलेला हा भांगडा अद्वितीय आहे.

अशाच एका नाट्यमय प्रसंगात नंतर दुर्गादेवीच्या मंदिरात अमिताभ-रेखानं ‘ओ नाम रे, सबसे बडा तेरा नाम, ओ शेरो वाली’ ह्या गाण्यात गरबा सादर केला आहे. हिंदी सिनेमांतील सादर झालेल्या गरब्यांमधील हा सगळ्यात जास्त मनोरंजक गरबा होता, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. दुर्गादेवीच्या मंदिरासाठी टपोरी स्टाइलमध्ये वर्गणी गोळा करणारा अमिताभ बघून मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात गणपती उत्सवानंतर लगेच सार्वजनिक दुर्गोत्सव करण्याचं पेव फुटलं, ते नंतरच्या काळात बळावतच गेलं. या गरब्यातील रेखा आणि अमिताभनं टिपऱ्यांचा केलेला तालबद्ध खेळ रसिकांच्या हृदयात घर करून गेला होता.

रेखाची दिलखेचक अदाकारी आणि अमिताभच्या अभिनयाची भुरळ पाडणारं ''इम्तिहान है, आज इम्तिहान है'' हे गाणंपण प्रेक्षणीय होतं; पण कळस गाठला होता तो, ‘अठरा बरस की तू होने को आई रे’ या गाण्यानं.

‘अठरा बरस की तू’ या गाण्यात मादक नृत्य करणाऱ्या रेखाकडंही लक्ष जाऊ नये इतकं करंटेपण आमच्यात अमिताभच्या वेडानं भिनलं होत. अठरा वर्षांच्या आम्हाला भव्य पडद्यावर तारुण्यानं ओसंडून वाहणारी रेखा आणि दमदार अमिताभचं हे गाणं बघायला मिळालं आणि आम्ही कावरं-बावरं झालो. त्या दोघांचा ‘जोडा फिट्ट’ होता. अंगाला चापून-चोपून बसविलेली सुती पाचवारी नेसून ह्या गाण्यात नाचलेली रेखा डोळ्यांत मावत नव्हती. लक्ष्मीकांत-प्यारेलालची दणकेबाज ठेक्यातील चाल, मोहम्मद रफी-लता मंगेशकरचे खणखणीत स्वर, आनंद बक्षी यांचे उडते तरी अर्थपूर्ण बोल, आणि अमिताभ-रेखाच्या लाजवाब अदाकारीनं युक्त असं धमाल नृत्य. आधीच्याच वर्षी ‘मुकद्दर का सिकंदर’मध्ये जोहराजान रेखानं कोठ्यावर केलेल्या ‘सलाम-ए-इश्क’ ह्या मुजऱ्याला अमिताभनं ''इस के आगेकी अब दास्ताँ मुझसे सून'' अशा प्रतिसादानं दिलेल्या उत्तराचा नशा उतरायच्या आतच ‘अठरा बरस की तू’नं पुन्हा प्रेक्षक घायाळ झाला होता. महाविद्यालयीन जीवनातील भीषण कडकीवर मात करत या गाण्यासाठी अनेकवेळा हा सिनेमा पाहूनही अतृप्तीची हुरहुर मनात राहूनच जात असे.

एकाच सिनेमात भांगडा, गरबा, कोठ्यावरील नृत्य असे नृत्याचे विविध प्रकार लीलया साकारणाऱ्या अमिताभच्या नृत्य निपुणतेविषयी एकदा नृत्य निर्देशिका सरोज खान बोलल्या होत्या, की ज्या अभिनेत्यांमध्ये नृत्याचा सहज भाव आहे, त्यांत अमिताभ सगळ्यात वरच्या क्रमांकावर आहे. ‘सुहाग’च्या कथेत सांगण्यासारखं काही नव्हतंच. विचार करायला वेळ न देता अॅक्शन, इमोशन्स, ड्रामा, म्युझिक आणि प्रसंगांची गर्दी करणाऱ्या देसाईंच्या सिनेमांत या सगळ्या घटकांना दुसऱ्या स्थानावर ढकलून उभा राहायचा अमिताभ. अशात ‘सुहाग’ सुपरहिट न होता तरच नवल. मनोरंजक सिनेमा काढण्याची शपथ घेतलेल्या मनमोहन देसाईंनी लगेच पुढील वर्षी ‘नसीब’ आणला होता.

(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)