esakal | एकाचवेळी सारं काही करणारा ‘अद्‌भूत नायक’...
sakal

बोलून बातमी शोधा

Mard Movie

एकाचवेळी सारं काही करणारा ‘अद्‌भूत नायक’...

sakal_logo
By
जी. बी. देशमुख gbdeshmukh21@rediffmail.com

कुली’ चित्रपटानं कमाईचे उच्चांक नोंदवल्यानंतर १९८५ मध्ये मनमोहन देसाई आणि अमिताभ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्यासमोर आले ते ‘मर्द’ चित्रपट घेऊन. दरवेळी मल्टी-स्टार कास्ट चित्रपट घेऊन येणाऱ्या देसाईनी यावेळी अमिताभ या एक खांबी तंबूच्या भरवशावर ‘मर्द ’ आणला. स्वातंत्र्यपूर्व काळातील कचकड्याची कथा घेऊन आपली नेहमीचीच पठडी देसाईंनी राबवली. अमिताभच्या बाबतीतला त्यांचा आत्मविश्वास आता एव्हरेस्टची उंची गाठण्याच्या पातळीवर कधीच गेलेला होता. ‘मर्द’ चा नायक राजू टांगेवाला, त्याचा ‘बादल’ नावाचा घोडा आणि मोती नावाचा लॅब्रॅडॉर कुत्रा हे सोबती. त्याकाळी कॉमिक्स चे चलन भरपूर होते. कॉमिक्समधील नायकाप्रमाणे प्राण्यांच्या सोबतीने मोहीम फत्ते करणारा हा नायक ‘सुपरमॅन’च होता पण देसाईंच्या फॉर्म्युल्यातील गरीब असणे ही त्याची अतिरिक्त अर्हता होती. ‘क्यू भाई बादल, क्यू भाई मोती, मै सच कहता हुँ...’ असा प्राण्यांशी गाण्यातून संवाद साधणारा अमिताभ प्रेक्षकांना भावला होता. कुठल्याही सीक्स पॅक अॅप्स शिवाय अमिताभ ‘मर्द’ वाटला होता, तो त्याच्या चतुरस्त्र अभिनय क्षमतेमुळे.

ब्रिटीश धार्जिण्या श्रीमंत भारतीय लोकांविरुद्ध वंचितांचा आवाज झालेला राजू टांगेवाला, ‘मर्द को दर्द नही होता’ असले संवाद फेकत सामान्य प्रेक्षकांची नाडी ताब्यात घेतो. त्याच्या मर्दुमकीवर महालातल्या कन्येचं (अमृता सिंग) भाळणं, त्याचं गोऱ्यांच्या क्लब मध्ये जाऊन धिंगाणा घालणं, दुर्गामातेची ‘ओ माँ शेरोवाली’ अशी आराधना करणं, असे सगळे लोकप्रिय कारनामे करणारा ‘अमिताभ’ असतो त्यामुळे प्रेक्षकांचं कुठेच अडत नाही. तीन तासाचं हे मनोरंजनाच्या हमीचं ‘देसाई ब्रॅन्ड’ प्रेक्षकांची दाद घेण्यात यशस्वी होतं. मोहम्मद रफीच्या जाण्याची कळ या चित्रपटातल्या शब्बीरकुमार आणि मोहम्मद अजीज यांच्या गायकीनं अधिकच तीव्र झाली होती. देसाईनी प्रथमच संधी दिलेल्या संगीतकार अन्नू मलिकनं छान चाली दिल्या होत्या. ‘मर्द टांगेवाला’, ‘बुरी नजरवाले तेरा’, ‘विल यु मॅरी मी’, ‘लंबू तंबू मे बंबू’ सारखी गाणी मनोरंजक होती. पण ‘सुन रुबिया, तुमसे प्यार हो गया’ मधील अमिताभचे इंग्रजी ढंगाचे नृत्य प्रेक्षणीय होते. एकच व्यक्ती एकाच वेळी गरीब असतो, धार्मिक वृत्तीचा असतो, लढाऊ असतो, प्रेयसीवर जीव टाकणारा असतो, प्राण्यांवर प्रेम करणारा असतो, खलांचा विनाश करणारा असतो, हे सगळ आपण तर्काला जागा न देता स्वीकारत जातो तसं तसे देसाईंच्या या चित्रपटासाठी बाल्कनीच्या तिकिटाला दिलेले आपले पैशे वसूल होत जातात. ‘हा काय मूर्खपणा’ असे म्हणत चित्रपटगृहातून बाहेर येणारा प्रेक्षक लगेच अमुक एक गाणे, अमुक एक दृश्य बघण्यासाठी पुन्हा एकदा तोच चित्रपट बघायचे मनात ठरवत असतात. “उपरवाला भुखा जगाता जरूर है...लेकीन भुका सुलाता नही..”, “नौकर कितना भी बडा क्यू न हो जाये, उसका सर मालिक के जूतो से उपर नही उठ सकता.” असे ‘मासेस’ साठी खास लिहिले गेलेले संवाद चित्रपटाच्या यशाची खात्री देऊन जातात.

१९७७ मध्ये ‘अमर, अकबर, अँथोनी’ पासून सुरु झालेल्या अमिताभ-मनमोहन देसाईच्या भागीदारीतील यशाचा १९८५ मध्ये आलेला ‘मर्द’ हा शेवटचा टप्पा. १९८५ या वर्षात अमिताभ राजकारणात गेला, अलाहाबादचा खासदार झाला. राजकारण हे आपलं क्षेत्र नाही हा धडा घेउन तो परत मूळ स्थानी म्हणजे १९८८ मध्ये परत आला आणि त्याच वर्षी देसाईंच्या दिग्दर्शनातील त्याचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला तो म्हणजे ‘गंगा, जमुना, सरस्वती’. त्याबद्दल बच्चनच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्कंठा निर्माण झाली होती. मला आठवतंय अमरावतीसारख्या शहरात हा चित्रपट रात्री बारा आणि पहाटे तीन वाजताचे दोन शो धरून एकून आठ खेळात रुजू झाला होता आणि ते दोन खेळ सुद्धा हाउसफुल्ल होते. पण अमिताभचे वय आणि देसाईचा खात्रीचा लॉस्ट अँड फाऊंड फॉर्म्युला आता निप्प्रभ ठरायला सुरवात झाली होती. सहा फुटी अमिताभ सापाचा उपयोग वडाच्या पारंबी सारखा झोके घेण्याकरिता करत असल्याचे दाखविण्याचा आचरटपणा प्रेक्षकाना रुचला नाही. अमिताभ सोबत अपयशाचा पहिला अनुभव घेत देसाईनी आपली दिग्दर्शक म्हणून कारकीर्द संपवली. पण अमिताभ देसाई या जोडीने १९७७ ते १९८५ या ९ वर्षात ज्या सात ब्लॉक बस्टर चित्रपटांची मेजवानी चित्रपटप्रेमींना दिली तिला तोड नाही.