जगावेगळ्या मुलाखतीमधलं रहस्य!

अमिताभच्या वयाच्या ७८ व्या वर्षी, म्हणजे २०१९ मध्ये सुजोय घोष दिग्दर्शित ‘बदला’ चित्रपट प्रदर्शित झाला.
Amitabh Bachchan and Tapsi Pannu
Amitabh Bachchan and Tapsi PannuSakal
Summary

अमिताभच्या वयाच्या ७८ व्या वर्षी, म्हणजे २०१९ मध्ये सुजोय घोष दिग्दर्शित ‘बदला’ चित्रपट प्रदर्शित झाला.

अमिताभच्या वयाच्या ७८ व्या वर्षी, म्हणजे २०१९ मध्ये सुजोय घोष दिग्दर्शित ‘बदला’ चित्रपट प्रदर्शित झाला. पूर्ण चित्रपटात अमिताभ बादल गुप्ता नावाच्या, एका अशा वकिलाच्या भूमिकेत होता, जो नयना (तापसी पन्नू) या खुनाचा आरोप असलेल्या एका उद्योजिकेची बाजू न्यायालयात मांडण्याच्या दृष्टीने मुलाखत घेत असतो. बस्स. चित्रपटात पूर्ण वेळ ही मुलाखत सुरू असते. या मुलाखतीपेक्षा वेगळं असं अमिताभने या चित्रपटात काहीच केलं नव्हतं. ज्या गुन्ह्याकरिता तापसी पन्नूवर आरोप ठेवला गेलेला असतो, त्या गुन्ह्याच्या आणि त्याला जोडून घडलेल्या दुसऱ्या एका गुन्ह्याच्या बाबतीत एक त्रयस्थ वकील म्हणून अमिताभची भूमिका असते. मूळ कथेत अमिताभ नसल्यामुळे जेव्हा कथानक फ्लॅश बॅकमध्ये जातं तेव्हा त्यात त्याचं काम नसतं. पण या क्राइम थ्रीलरचं गहिरं रहस्य हा अनुभवी वकील तापसी पन्नूकडून व्यावसायिक कौशल्य पणाला लावून वदवून घेतो. चित्रपटाच्या शेवटी रहस्यभेद झाल्यावर आपण दंग होऊन जातो, असा हा जबरदस्त ड्रामा होता. ‘एन इन्व्हिजिबल गेस्ट’ या इंग्रजी चित्रपटावर आधारित हा हिंदी चित्रपट होता.

आपल्या सॉलिसीटर फर्मने सांगितलेल्या वेळेपेक्षा तीन तास आधी तो तापसी पन्नूच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश करतो. ठरलेल्या वेळेपेक्षा आधी हे महाशय आल्याचं बघून तापसी पन्नूला थोडं आश्चर्य वाटतं; पण डोक्यावर पोलिसांकडून अटक होण्याची टांगती तलवार असल्यामुळे ती हा मुद्दा सोडून देते.

महाभारतातील संजय आणि धृतराष्ट्रामधील संवादाच्या संदर्भाने सुरुवात करत अमिताभ ‘हमे जो सच लगता है, ये जरुरी नही, वो सबको सच लगे. सब का सच अलग अलग होता है’ असे सांगत तिला सत्य सांगण्याचा आग्रह करू लागतो. अमिताभ आणि तापसी पन्नू असे दोघेच त्या अपार्टमेंटमध्ये असतात आणि तिच्याकडून घडलेल्या घटनेचा तपशील ऐकताना आपण वारंवार फ्लॅश बॅकमध्ये जातो.

तापसी पन्नू एक तरुण यशस्वी उद्योजक असते, जिच्या त्रिकोणी परिवारात एक पाचवर्षीय मुलगी आणि नवरा असतो. एका तरुणासोबत तापसीचं विवाहबाह्य प्रकरण सुरू असतं आणि आपल्या त्या प्रियकरासोबत घरी खोटं सांगून बाहेरगावी मुक्कामी गेलेल्या त्या दोघांचा परतीच्या प्रवासात रस्त्यावर एक अपघात होतो. या अपघातात समोरून येणाऱ्या एका कारला तापसी पन्नू चालवत असलेल्या कारची धडक लागते. समोरील कार एका झाडावर जाऊन आदळते. हे दोघे गाडीवाल्याची चौकशी करायला खाली उतरतात तेव्हा त्यांना लक्षात येतं की, त्या कारमधील एकमेव व्यक्ती मरून पडली आहे. निर्जन रस्त्यावरील ह्या अपघातास कुणीही साक्षीदार नसल्यामुळे आणि पोलिसांना कळविल्यास आपलं प्रकरण चव्हाट्यावर येईल या भीतीने, दोघेही त्या मृतदेहासहित कार एका तलावात बुडवून देतात आणि सगळे पुरावे नष्ट करून त्या कटकटीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात. पण, ही कटकट सुटत नाही. त्यातूनच तिच्या प्रियकराचादेखील खून होतो आणि खुनाचा आरोप तिच्यावर येतो. ती जामिनावर बाहेर आल्यानंतर एका सॉलिसीटर कंपनीशी संपर्क करून तिची केस लढायला सांगते. इथून अमिताभचा कथेत प्रवेश होतो.

तापसी पन्नूकडून सत्य जाणून घेण्यासाठीची ही मुलाखत अमिताभ आणि तापसी पन्नूने अविस्मरणीय करून ठेवली आहे. तापसी त्याला सांगते की, तिने पोलिसांकडे जे सांगितलं तेवढंच सत्य आहे; पण तिच्याकडून सत्य वदवून घेण्याच्या अथक प्रयत्नात अमिताभ तिला म्हणतो, ‘‘वो मूर्ख होता है, जो सिर्फ सच जानता है और सच और झूठ के फर्क को नही जानता.’ या दीर्घ मुलाखतीत गुन्हेगारी घटनेसंदर्भात एक-एक शक्यता, परिस्थिती, दृष्टिकोन पुढं येत जातात आणि सांगण्यात येणारी प्रत्येक घटना आणि प्रसंग यावर आपण विश्वास ठेवू लागतो, त्यात गुंतत जातो.

पण, गवताच्या ढिगाऱ्यातून सुई शोधण्याइतक्या कौशल्याने अमिताभ तापसी पन्नूकडून खरं काय ते वदवून घेतो आणि पाश्चिमात्य पार्श्वभूमीवर स्कॉटलंडमध्ये चित्रित केल्या गेलेल्या या चित्रपटाचा दर्जा आपल्याला स्तिमित करून सोडतो. अमिताभ आणि तापसीशिवाय या चित्रपटात मानव कौल आणि अमृता सिंग यांच्याही भूमिका होत्या; पण अमिताभ आणि तापसीच्या अदाकारीसमोर इतरांची आठवण येत नाही.

‘बदला लेना हर बार सही नही होता. माफ कर देना भी हर बार सही नही होता,’ अशी अमिताभच्या धीरगंभीर आवाजातील टॅग लाइन असलेला ‘बदला’ बघावा अमिताभचं भारदस्तपण डोळ्यांत भरून घेण्यासाठी. एका मर्डर मिस्ट्रीमध्ये अमिताभच्या भारदस्त आवाजात दमदार संवाद ऐकणं, ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच होती. संवाद लेखक राज वसंतचे संवाद जितके रोचक होते, त्यापेक्षा कितीतरी अधिक ते अमिताभच्या संवादफेकीमुळे आकर्षक ठरले होते.

‘कानून अंधा होता है और उसी सच को मानता है, जो साबित किया जा सके’, ‘क्या मै वही छह देख रहा हू, जो तुमने मुझे दिखाया, या वह नौ जो मुझे देखना चाहिये था’, ‘ठीक वैसे, जैसे हम किसी चीज को पाने के लिये ना जाने कहाँ, कहाँ घुमते है और मिलती हमे वही है, जहाँ से हम चले थे’... अशी वजनदार वाक्यं यात आहेत.

एका व्यावसायिक सॉलिसीटर फर्मतर्फे काम करणारा आणि चाळीस वर्षांत एकही केस न हरलेला हा वकील आपल्याला ना कोर्टात दिसतो, ना वकिलाच्या गणवेशात दिसतो, तरीही हा माणूस पक्का व्यावसायिक वकील वाटतो. हलके फुलके विनोद करत, वजनदार आवाजात संवाद फेकत, आपल्या कामावरील लक्ष न ढळू देता एका यशस्वी, स्मार्ट, तरुण उद्योजिकेकडून निव्वळ सत्य ते बाहेर आणणारा भारदस्त अमिताभ इथं बघायला मिळतो आणि वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षीही त्याच्यातील ऊर्जेची दाद द्यावी लागते. अमिताभचा भारदस्त बाज नेमकेपणाने दाखवणारी ही आगळीवेगळी भूमिका खिळवून ठेवते, यात कुठलीही शंका किंवा वाद नाही.

(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे जाणकार अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com