डोळे दिपवणारा अभिनय !

काळोख…! . पाळण्यात असताना अंधत्व आणि बहिरेपण आलेली मुलगी मिशेल (राणी मुखर्जी) हिच्या जीवनातील काळोखाची ही कथा.
amitabh bachchan
amitabh bachchansakal
Summary

काळोख…! . पाळण्यात असताना अंधत्व आणि बहिरेपण आलेली मुलगी मिशेल (राणी मुखर्जी) हिच्या जीवनातील काळोखाची ही कथा.

काळोख…! . पाळण्यात असताना अंधत्व आणि बहिरेपण आलेली मुलगी मिशेल (राणी मुखर्जी) हिच्या जीवनातील काळोखाची ही कथा. तिच्या आयुष्यातल्या काळोख्या विवरात ज्ञानाच्या प्रकाशाची उधळण करणाऱ्या देवराज सहाय या शिक्षकाचे अथक प्रयत्न म्हणजे हा ‘ब्लॅक’ चित्रपट. २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘ब्लॅक’ चित्रपटात हा शिक्षक दिसतो. बोटातील स्पर्शाच्या अद्‍भुत जादूचं आकलन असलेल्या देवराजला ‘उंगलिया याने अंधो की आंखे, गुंगो की आवाज, और बहरो की कविता’ हे तंत्र गवसलेलं असत. तीस वर्षे एका शाळेत शिक्षक म्हणून काम केल्यानंतर देवराजच्या क्षमतेला मिशेल नावाचं आव्हान मिळतं आणि तो पेटून उठतो. ‘एक बची-खुची मिट्टी से बनी मुरत और एक गुमनाम घायल योद्धा’ असा हा अपूर्णत्वाचा खेळ असतो. ‘शब्देविण संवादू’ ची ही प्रक्रिया सुलभ होण्याआधी आणि नंतर, असे दोन हृदय हेलावून टाकणारे संघर्ष आपण ‘ब्लॅक’ चित्रपटात बघतो.

सिमल्यातील एका खानदानी, श्रीमंत ख्रिश्चन कुटुंबात जन्माला आलेल्या या पहिल्याचं अपत्याची आठ महिन्यांची असताना वाचा आणि दृष्टी गेल्याचं लक्षात येतं आणि त्यांचं जीवनच बदलून जातं. तिच्या पाठीवर एक धाकटी मुलगी येते पण हिच्या अशा अपंगत्वामुळं आई मात्र मिशेलच्या वाट्यालाच अधिक येते. बोटांच्या स्पर्शाची भाषा शिकविण्यापूर्वी मिशेलच्या अंगी बाणलेली आधीच्या आठ वर्षांची बेशिस्त घालविण्यासाठी अमिताभला कठोर व्हावं लागतं. एका आठ वर्षांच्या मुलीसोबत कठोर होण्याचे हिंदी चित्रपटात त्यापूर्वी कधीही पाहण्यात न आलेले प्रसंग अमिताभनं ज्या कौशल्यानं हाताळले आहेत, त्याचे वर्णन करताच येत नाही. तिच्या वडिलांना तो प्रकार बघवत नाही आणि स्वत: तीन आठवड्यांकरीता परगावी जाण्यापूर्वी ते या नवीन शिक्षकाच्या हाती हकालपट्टीचं पत्र ठेवतात. पण हा वेडा माणूस पगारासाठी तिथं आलेलाच नसतो.

मिशेलला जगाच्या संपर्कात आणण्याचं आव्हान स्वीकारून त्याला स्वत:च्या नजरेत सिद्ध व्हायचं असतं. मिशेलच्या शिस्तप्रिय वडिलांकडून वारंवार होणारा अपमान देवराजच्या गणतीतच नसल्याचं झपाटलेपण अमिताभने लीलया प्रदर्शित केलंय. वडिलांच्या अनुपस्थितीत मिशेलचं प्रशिक्षण सुरू होत. दिलेल्या वीस दिवसात केलेल्या अथक परिश्रमातून एक शब्द काही मिशेलच्या तोंडून फुटत नाही. तिचे वडील परत येतात आणि शिक्षक महोदयांवर ‘बडे बेआबरू होके तेरे कुचे से हम निकले’ ची वेळ येते. तिथून चंबूगबाळं उचलून निघालेल्या देवराजला शेवटच्या क्षणी देव पावतो आणि वीस दिवसांच्या काळात बोटांच्या भाषेतून देवराजचे शब्द आत्मसात केलेली मिशेल अचानक ‘वॉ’ (वॉटर), ग्रा(ग्रास), ‘फॉ’(फ्लॉवर), आणि ‘मॉ’(मॉम) असे शब्द उच्चारते. अनेक दिवस सायकल शिकता शिकता अचानक एके दिवशी सगळं काही जमून याव तसा हा आनंद असतो. अगम्य चराचराच्या आकलनासाठी आपसूकच तिचे हात ‘टीचर’ च्या हाताकडे झेपावतात.

तिच्यासाठी हा साठीतला टीचर बंधू आणि सखा होऊन बसतो. आता त्याच्यातील टीचरच्या आकांक्षाना नवीन पंख फुटतात आणि मिशेलला विशेष मुलांसाठी असलेल्या महाविद्यालयात न घालता नियमित स्वरूपाच्या महाविद्यालयात घालण्याचे तो योजतो. “इन्सान को अच्छा काम करने का मौका बार, बार नाही मिलता” असे कॉलेजच्या प्राचार्याच्या मनावर ठसवत तिचा कॉलेज प्रवेश निश्चित करून घेतो. तिची काठी बनून तो तिच्यासोबत सावली सारखा राहतो. वर्गात तिचा हात हातात घेउन शिकविल्या जाणाऱ्या प्रत्येक विषयाचे ज्ञान बोटांच्या स्पर्शातून तिच्या मेंदूपर्यंत पोहोचवतो. तिला ब्रेल लिपी शिकवून त्या लिपीच्या टंकलेखनाच्या मदतीने परीक्षेला बसायला मदत करतो. सलग तीन वर्षे मिशेल सगळ्या विषयांमध्ये नापास होत जाते. सुरुवातीला दोघेही ते अपयश हसत हसत घेतात, नंतर मात्र मिशेलची पदवी हे त्यांच्यासाठी एक नवीन आव्हान बनून जात.

मिशेलच्या तरूण होण्यासोबतच देवराज सत्तरीला पोहोचला असतो आणि त्याच्यात अल्झायमरची लक्षण दिसू लागतात. “मै गीरू उससे पहले वह उडना सिख जाये” अशी भावना असलेला टीचर आणि जिच्यासाठी शिक्षक म्हणजे आत्मा, सद्‍ विवेक, धैर्य, प्रकाश, आवाज, बायबल, हृदय... अशी विद्यार्थिनी. सगळंच अद्‍भुत. मिशेलची आई, बाबा, धाकटी बहिण ह्या सगळ्यांसोबत तिच्या संबंधांचं महत्त्व आणि वैशिष्ट्ये वेगवेगळ्या प्रसंगातून समोर येत राहतात. पण सगळ्यात महत्त्वाचं असतं ते देवराज आणि मिशेल या गुरुशिष्यांच नातं. तरुण वयात आलेल्या नव्या शारीर जाणिवांमुळे मिशेलच्या भावविश्वात खळबळ उडते. वयोवृध्द देवराज तिच्या अगतिक अवस्थेची कीव करून तिचा हट्ट पुरविण्यासाठी एकदा तिला ओठांचे चुंबन घेऊ देतो आणि मनात निर्माण झालेल्या अपराधी भावनेतून त्याच क्षणी मिशेलचा त्याग करतो. या प्रसंगात एका प्रामाणिक, कर्तव्यतत्पर वृद्धाच्या मनाची चलबिचल व्यक्त करण्यात अमिताभ यशस्वी ठरला होता.

तब्बल बारा वर्षे झटत शेवटी वयाच्या चाळिसाव्या वर्षी एकदाची मिशेल पदवी प्राप्त करते. परागंदा होऊन अल्झायमरच्या कह्यात गेलेला टीचर देवराज मिशेलला पुन्हा गवसतो. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आपल्या टीचरला अल्झायमरच्या अंधारातून बाहेर काढण्याची मिशेल यशस्वी सुरुवात करते. हा चित्रपट मानवाच्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आशावादाचे सशक्त उदाहरण ठरला आहे. राणी मुखर्जीने मिशेलच्या भूमिकेत कमाल केली होती. तिच्या आईच्या भूमिकेतील शहनाज पटेल आणि लहानपणची मिशेल रंगवताना आयेशा कपूरने उत्कृष्ट अभिनय केला होता. हा चित्रपट संजय लीला भन्सालीच्या दिग्दर्शन कौशल्याचा नमुना होता. कुठल्याही साच्यात न बसणारी भूमिका अनेक वर्षांचे स्टारडम डोक्यावर असलेल्या अमिताभने कशी निभावली असेल त्याचे अजूनही आकलन होत नाही. लहानग्या मिशेलच्या तोंडून अथक परिश्रमानंतर बोबडे बोल फुटण्याचा प्रसंग, तिच्या बहिणीच्या लग्नाचे वेळी डायनिंग टेबलावरील भावभूत पत्रवाचन, अल्झायमरच्या प्राथमिक लक्षणांचा प्रसंग किंवा गुरू-शिष्य नात्याच्या पावित्र्यावर प्रश्न उभा करणारा प्रसंग, कुठला एक प्रसंग वेगळा काढून अमिताभच्या अदाकारीचे रसग्रहण करता येत नाही कारण या चित्रपटात प्रत्येक प्रसंग कसोटीचा असतो आणि प्रत्येक वेळी अमिताभसमोर या कसोटीने नांगी टाकलेली दिसते. त्यावर्षीचे राष्ट्रीय तसेच इतर सगळे पुरस्कार अमिताभनं खिशात घातले होते. अमिताभच्या क्षमतांचा आवाका दाखविणारा हा चित्रपट त्यावर्षी ऑस्कर साठी पाठवला गेला असता तर.....भारतातील ऑस्करचा काळोख संपुष्टात आणण्या इतका ‘ब्लॅक’ प्रखर होता.

(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे जाणकार अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com