बनारसी पान आणि ‘त्या’ नृत्याची अवीट झिंग ! Amitabh Bachchan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh Bachchan
बनारसी पान आणि ‘त्या’ नृत्याची अवीट झिंग !

बनारसी पान आणि ‘त्या’ नृत्याची अवीट झिंग !

अमिताभच्या १९७७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अमर अकबर अँथनी’ या चित्रपटात अमिताभचा एक संवाद होता. “अपुन तुमको सिर्फ दो मारा, पर सॉलीड मारा की नही ! है की नही..!” अगदी त्याच सुरात चंद्रा बारोट हा दिग्दर्शक १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘डॉन’ चित्रपटाबाबत म्हणू शकतो की “हमने अमिताभ के साथ एक ही एन्ट्री मारा पर सॉलीड मारा की नही..!” प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर नरीमन इराणी हे आर्थिक अडचणीत होते. ‘डॉन’ चित्रपट त्यांनी निर्माता म्हणून सुरू केला आणि त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. सलीम-जावेद, अमिताभ, प्राण या सगळ्यांनी नरीमन इराणीच्या कुटुंबीयांना मदत म्हणून हा चित्रपट पूर्ण करायचं ठरवलं. १९७४ ला सुरू झालेला हा चित्रपट १९७८ (१२ मे रोजी प्रदर्शित ) मध्ये पडद्यावर आला आणि इतिहास घडवून गेला.

सुपरस्टार म्हणून मान्यता मिळण्याआधी मेहमूदच्या ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटापासून अमिताभचं नाचणं सुरू झालं होत. ‘देखा ना, हाय रे सोचा ना’ या गाण्यात अमिताभचे नृत्य नवखे होते, अननुभवी होते. नंतरची काही वर्ष अमिताभ पडद्यावर आत्मविश्वासाने नाचला आणि १९७८ हे वर्ष आले ते ‘डॉन’ला लक्षात ठेवणारे ठरले! तोपर्यंत अमिताभ चित्रपटसृष्टीचा डॉन झाला होता.

चित्रपटाच्या सुरवातीलाच ‘डॉन जख्मी है तो क्या, फिर भी डॉन है’ असं म्हणत थिएटर डोक्यावर घ्यायला लावणारा डॉन उत्तरार्धात ‘खई के पान’ सारखं देशी नृत्य करेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.

सुरवातीचा अमिताभ अंडरवर्ल्डचा खराखुरा डॉन असतो. लक्झरी कार, स्विमिंग पूल, मद्य, मदिरा यांच्या सान्निध्यात सुटा-बुटातील जबरदस्त डॉनचा अवतार सुमारे चाळीस मिनिटात संपतो आणि मग अवतरतो तो मुंबईच्या गल्ल्यांमधे नाच-गाणी करत उदरनिर्वाह करणारा हुबेहूब डॉनसारखा दिसणारा उत्तर प्रदेशी भैय्या – विजय ! आधीचा गंभीर व्यक्तिमत्त्वाचा डॉन जितक्या सहजतेने, ‘‘डॉन का इंतजार तो ग्यारा मुल्कोंकी पुलिस कर रही है, लेकीन सोनिया, डॉन को पकडना मुश्कील ही नही, नामुमकीन है’’ असा संवाद फेकतो तितक्याच सहजतेने नंतर सामान्य गरीब व्यक्तीच्या भूमिकेतील विजयसुद्धा, ‘‘ क्या कहाँ, डान पान नही खाता था, ये बहुत बूरा करता था,’’ असे म्हणतो. अमिताभशिवाय डॉनची कल्पना म्हणजे आमच्या पिढीसाठी निव्वळ पाप. हे पाप फरहान अख्तरने दोन वेळा करायचा प्रयत्न केला होता, पण आमच्या ह्रदयातील पहिल्या डॉनची छबी तसूभरही हलली नाही. नंतरचे दोन डॉन अमिताभच्या असली डॉन वर एकही ओरखडा उमटवू शकले नाही. ‘डॉन को पकडना मुश्कील ही नही, नामुमकीन है’ हेच सिद्ध झालं.

पोलिस कारवाईत खऱ्या डॉनला ठार मारल्यानंतर डि.एस.पी. इफ्तेखार हुबेहूब डॉनसारख्या दिसणार्‍या ‘विजय’ (पुन्हा अमिताभ) या यु.पी.च्या मुंबईतील नमुन्याला तोतया डॉन बनवून त्याच्या टोळीत घुसवतो. हे रहस्य केवळ इफ्तेखार आणि अमिताभ ह्या दोघांनाच माहित असते. एका कारवाईत इफ्तेखार ठार मारला जातो. विजयच्या शब्दात आता त्याची स्थिती ‘बुढऊ मर गये, औलाद छोड गये’ अशी होऊन जाते. पोलिस त्याला ‘डॉन’ समजून त्याचं जगणं कठीण करून ठेवतात, तर खऱ्या डॉनच्या टोळीतील माणसं त्याच्या जिवाचे शत्रू बनून जातात. अशा तणावाच्या अवस्थेत पोलिसांचा ससेमिरा चुकवत प्रेयसी झीनत अमान सोबत तो जाऊन पोहोचतो, ते थेट मुंबईच्या प्रसिद्ध धोबीघाटावरील उत्तर प्रदेशी परिटांच्या वस्तीत.

कष्टाचा दिवस संपवून त्या मंडळींचा तिथे भांग घोटण्याचा कार्यक्रम सुरू असतो. गंगाकिनारेवाल्या त्या ‘माहेर’च्या वातावरणात पोहोचताक्षणी विजय सगळ्या चिंता भांगयुक्त दुधाच्या प्याल्यात कशा बुडवतो, ती मजा केवळ पडद्यावर अनुभवावी. जी भाषा या प्रसंगात बोलली गेली तशी भाषा आमच्या कॉलनीच्या कोपऱ्यावरील ‘बनारस हेअर कटिंग सलून’ वाला उत्तर भारतीय खलील न्हावी बोलत असे. लाकडी खुर्चीच्या हातावर टाकलेल्या आडव्या फळीवर बसून लहानपणी आम्ही खलीलभाईच्या हातून केस कापून घेत असू. प्रत्येक वेळी खलीलभाई पान थुंकून येत असे आणि आमच्या बालमानेवर कटाकटा मशीन चालवत असे. व्यवसायाला साजेशा गावभरच्या गप्पा साप्ताहिक मायापुरी फुकटात चाळायला आलेल्या रिकामटवळ्यांना तो ऐकवीत असे. ही तीच भाषा होती - गंगाकिनारेवाली. खलीलभाईकडून त्या भाषेत गाव गप्पा ऐकायचा अनुभव असल्यामुळे ‘इन कारी, कारी नैनन से तू घुर हमे ना ऐ गोरी’ अस अमिताभ जेव्हा मादक झीनत अमानला म्हणतो तेव्हा आम्हाला भाषेचा अडथळा वाटला नव्हता. थँक्स टू खलीलभाई. ‘डॉन’च्या नकली रूपातून बाहेर आल्यासरशी विजय भांगयुक्त दुधापाठोपाठ अनेक दिवसांपासून पारख्या झालेल्या प्राणप्रिय बनारसी पानाचा अंत:करणापासून स्वाद घेतो.

आता मागे लागलेले पोलिस, गुंड, भूतकाळाच दु:ख आणि भविष्याची चिंता हे सगळं विजयनं पानाच्या पिंकेसोबत थुंकून दिलेलं असतं आणि ‘ पहले पान, बादमे गान’ अशी घोषणा करीत बनारसी पानाने रंगलेल्या तोंडाने ‘भंग का रंग जमा हो चकाचक, फिर लो पान चबाए’ ची तान तो आळवतो. नंतर जे चारही कोंट्यात (हा ‘कोपऱ्यात’चा वऱ्हाडी प्रतिशब्द) अमिताभ नाचला आहे, त्याने हिंदी चित्रपट इतिहासात घातलेला धुमाकुळ कधी थांबलाच नाही. चंद्रा बारोट दिग्दर्शित या चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शक होते पी.एल.राज. ‘खईके पान’ वरील नृत्याने हिंदी चित्रपटातील नृत्याचा ढंग बदलवून टाकला. उत्तर भारतीय गाण्यांवर हिंदी चित्रपटात दिलीपकुमारने सुद्धा काही नृत्य केली होती पण ‘छोरा गंगा किनारेवाला’त जे दिलखुलास नृत्य अमिताभने केले, त्याने कळस गाठला. सलीम-जावेदची कथा-पटकथा-संवाद, कल्याणजी आनंदजींच संगीत, अंजानचे शब्द आणि किशोरकुमार. सगळं काही अव्वल दर्जाचं होत आणि डॉन अमिताभ होता. अमिताभची देहबोली आणि मुद्राभिनय यामुळे ‘खईके पान’च्या धांगडधिंग्याची मिठास आजही कायम आहे. गेल्या त्रेचाळीस वर्षात ‘खईके पान’ बँडवर वाजल्याशिवाय एकाही नवरदेवाला मांडवात प्रवेश मिळाला नाही असं म्हणावं इतकी या गाण्याची मोहिनी आहे. या पानाची किक भारतीय जनमानसावरून कधीच उतरणार नाही.

(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)

loading image
go to top