
‘बेनाम’ या चित्रपटानंतर दिग्दर्शक नरेंद्र बेदी आणि अमिताभ बच्चन पुन्हा एकदा १९७६ मध्ये ‘अदालत’ च्या निमित्याने एकत्र आले. ह्या दरम्यान मजबूर, दीवार, शोले सारख्या दणदणीत कलाकृत्यांच्या प्रचंड लोकप्रियतेतून अमिताभ मेगास्टार झालेला होता. ‘जंजीर’, दीवार मधून अमिताभला मिळालेली ‘अँग्री यंग मॅन’ ची उपाधी ‘अदालत’ ने अधिकच व्यापक केली. पूर्वार्धात पूर्णवेळ ‘अँग्री यंग मॅन’ च्या रूपातील अमिताभ, उत्तरार्धात ‘कुल ओल्ड मॅन’ आणि त्याचा वयात आलेला ‘कुल रोमँटिक बॉय’ असे दुहेरी भूमिकेतील दोन अमिताभ अशी पर्वणी प्रेक्षकांना लाभली होती.
चित्रपटाच्या सुरुवातीला उत्तर भारतातील मागास खेड्यातील एक साधा भोळा तरुण, त्यानंतर मुंबईला येऊन येथील खलपुरुषांच्या हातून आलेल्या वाईट अनुभवांमुळे हृदयात सुडाग्नी घेउन वावरणारा खतरनाक तरूण, मध्यंतरानंतर मुंबईच्या अंडरवर्ल्डवर राज्य करणारा शांत डोक्याचा वयस्कर डॉन आणि नीतू सिंग सोबत मोहम्मद रफीच्या आवाजातील ‘तुमसे दूर रहके, हमने जाना प्यार क्या है’ सारखे कर्णमधूर गाणे गात बागेत फिरणारा, नाईट क्लब मध्ये हुंदडणारा तरुण शहरी युवक इतकी रूप अमिताभने दाखविली होती. सुरुवातीपासून साथ देणाऱ्या पत्नीच्या भूमिकेतील वहिदा रेहमानसारख्या ज्येष्ठ आणि उच्च दर्जाच्या अभिनेत्रीचा चांगला अभिनय सुद्धा झाकोळून जावा, असा अमिताभच्या अस्तित्वाचा त्या काळातील झंझावात होता.
एकट्याने वाघाशी झुंज घेण्याची ताकद असलेला खेडूत तरुण धर्मा गावात आलेले शहरी पाहुणे अन्वर हुसेन, सुजीतकुमार आणि अंबरीश यांचे प्राण वाचवत असताना एकट्याने वाघाला ठार करतो, मुकेशच्या आवाजात ‘हमका ऐसा वैसा ना समझो हम बडे काम की चीज’ हे गाण गातो. नंतर आर्थिक संकट आल्यावर त्याच शहरी मंडळींच्या आश्रयाला मुंबईत दाखल होतो. ही सगळी सुटा-बुटातील माणसं बेईमान अशी तस्कर असतात. ‘बेहना ओ बेहना तेरी डोली मै सजाऊंगा’ असे मुकेशच्या आवाजातील दुसरे गाणे म्हणणारा साधा भोळा धर्मा ह्या पाताळयंत्री लोकांच्या जाळ्यात अडकतो. न केलेल्या गुन्ह्यासाठी दोन वर्षे तुरूंगात काढतो. दरम्यान त्याच लोकांकरवी त्याच्या बहिणीवरील अत्याचाराच्या घटनेमुळे त्याच साधंभोळ मन उध्वस्त होत. कुठलाच दोष नसताना अशा प्रकारची अवहेलना, अत्याचार, ससेहोलपट सहन करून धर्मा दगड झाला असतो आणि तिथून बघावी अमिताभची अदाकारी. साध्या भोळ्या व्यक्तिमत्वाचं एका सुडाने पेटलेल्या सुप्त ज्वालामुखीत झालेलं रुपांतर केवळ अद् भूत. बायको वहिदा रहमानशी बोलणं नाही, त्याच्यासोबत सहानुभूती बाळगणाऱ्या इन्स्पेक्टर कादर खान सोबत संवाद नाही की जगण्यात रस नाही. केवळ डोळ्यात सुडाचा अंगार. विशेष म्हणजे त्याचा संताप, उद्वेग आणि सुडाग्नी प्रेक्षकांपर्यंत कुठल्याही संवादाविना थेट पोहोचत असतो. ही जादू डोळ्यांची. ‘अंधा कानून’, ‘आखरी रास्ता’ सारख्या नंतरच्या काही सिनेमात पूर्वार्धात वाईट वागलेल्या तीन खलनायकांचा एक-एक करून सूड घेण्याची पद्धत बघायला मिळाली होती पण ‘अदालत’ हा त्या अर्थाने ट्रेंड सेटर ठरला होता. तरुण नायकाला बाप आणि मुलगा अशा दुहेरी भूमिकेत दाखविण्याची अजून एक टूम ‘अदालत’ने आणली होती. तसले प्रयोग नंतर जितेंद्र सारख्यांनी करून बघितले तेव्हा हे येऱ्यागबाळ्याचे काम नोहे हे ठळकपणे लक्षात आलं होतं. वहिदा, कादर खान, अन्वर हुसेन यांचं अस्तित्व पडद्यावर बराच वेळ असूनही नगण्य वाटावं असा दमदार अमिताभ बघायला मिळाला होता. उत्तरार्धात पांढऱ्या केसांचा मिशी राखून असलेला, घनगंभीर आवाजात मोजकच बोलणारा ‘धरमचंद’ त्या दिवसात चर्चेचा विषय झाला होता. सिनेमातील त्याच्या तीन अवतारांपैकी पूर्वार्धातील तुरुंगातून सुटून आल्यानंतरचा सुडाग्नीने पेटलेला अवतार मात्र अजोड होता. तीनही खलपुरुषांना विविध क्लृप्त्या वापरून यमसदनी धाडणाऱ्या अमिताभच्या या अवताराने अभिनयाची आगळीच झलक दाखविली होती. गावातून शहरात आल्यानंतर वेगवेगळ्या संकटातून पार होउन अंडरवर्ल्डचा राजा बनल्यानंतरही पत्नीसोबत बोलताना आपली मुळ बोलीभाषा वापरणारा हा हिरो सामान्य प्रेक्षकांच्या हृदयात जाऊन बसला होता.
क्लायमॅक्सला कादर खानच्या पिस्तुलातून निघालेली गोळी पाठीत शिरते त्यावेळी म्हाताऱ्या अवतारातील अमिताभने दिलेली प्रतिक्रिया आणि तशाच परिस्थितीत तरुण अमिताभच्या पाठीत ‘शक्ती’ सिनेमात बाप झालेल्या दिलीपकुमारच्या पिस्तुलातून पाठीत गोळी शिरल्यावर तरुण अमिताभने दिलेली प्रतिक्रिया बघितली की अभिनयातील वैविध्य कशाला म्हणतात ते कळून येते.
(सदराचे लेखक अमिताभच्या चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.