जर्मनीत सत्ताबदल: कौल मध्यम डाव्या विचारसरणीला!

Angela Merkel
Angela Merkelsakal media

कौल मध्यम डाव्या विचारसरणीला!

मालिनी नायर

(लेखिका या नेदरलँड स्थित, ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांना ‘सीएनएन’सह अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी आणि वर्तमानपत्रासाठी जगभरात वार्ताकंन करण्याचा अनूभव आहे)

जर्मनीतील सध्याचे संख्याबळ बघता संसदेत एसपीडी आणि सीडीयू या दोन्ही पक्षापैकी एक पक्ष बहुमत सिद्ध करू शकतो; मात्र अँजेला मर्केल यांच्या यशस्वी कार्यकाळानंतर जनता आता मध्यम उजव्या विचारसरणीवरून मध्यम डाव्या विचारसरणीकडे झुकल्याचे स्पष्ट झाले आहे. मर्केल यांच्या पक्षाला मिळालेल्या मतदानाची टक्केवारी बघता, निष्ठावंतांचा अपवाद वगळता जवळपास ७६ टक्के जर्मन मतदारांनी मर्केल यांच्या पक्षाला नाकारले आहे.

अँजेला मर्केल यांच्या सोळा वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीनंतर आता जर्मनीचे नेतृत्व कोण करणार, या प्रश्नाचे उत्तर अद्याप स्पष्ट झाले नाही. यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल धक्कादायक नसले तरी यावेळी अनेक बदल झालेत. डाव्या विचारसरणीच्या सोशल डेमोक्रॅटिक पक्षाने अँजेला मर्केल यांच्या ख्रिश्चन डेमोक्रेटिक युनियनवर निसटती का होईना आघाडी मिळवली आहे. त्यामुळे जर्मनी प्रथमच मध्यम उजव्या विचारधारेकडून मध्यम डाव्या विचारसरणीकडे झुकल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

मर्केल यांच्या ख्रिश्चन डेमोक्रेटिक युनियन (सीडीयू) या पक्षाची यंदाच्या निवडणुकीत मोठी घसरण झाली. या पक्षाने २४.१ टक्के मते मिळवत ७३५ पैकी १९६ जागा जिंकल्यात. १९४५ नंतर ‘सीडीयू’ पक्षाची आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी ठरली आहे. अँजेला मर्केल यांच्या १६ वर्षांच्या कारकिर्दीनंतर पक्षाच्या झालेल्या या घसरणीला पक्षाअंतर्गत वाद, राजकीय असंतोषाची किनार आहे. सोशल डेमॉक्रेटिक पक्षाने (एसपीडी) त्याचा फायदा उठवत २५.८ टक्के मते खेचत २१६ जागा पदरात पाडल्या. अँजेला मर्केल यांच्या पक्षावर अवघ्या दोन टक्क्यांची आघाडी मिळवत एसपीडी पक्ष चान्सलर पदाचा प्रबळ दावेदार ठरला आहे.

या निवडणुकीत पर्यावरणवादी अनेलीना बरबॉक यांच्या ग्रीन पक्षाला युवकांचा भरघोस पाठिंब्यामुळे १४.६ टक्के मते मिळाली. ११८ जागा जिंकत ग्रीन पक्ष हा तिसरा मोठा पक्ष म्हणून उदयास आला, तर मुक्त व्यापाराचा समर्थक असलेल्या फ्री डेमोक्रॅटिक पक्षाने (एफडीपी) ११.५ टक्के मते मिळवली. परंपरावादी आणि निर्वासितांना कडवा विरोध असलेल्या ‘अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी’(एएफडी) या पक्षाला १०.५ टक्के मते मिळाली.

जर्मनीतील या राजकीय बदलाचे परिणाम केवळ जर्मनीतच नव्हे, तर युरोपच्या राजकीय पटलावरदेखील उमटू शकतात. या वेळच्या निवडणुकीत हवामान बदल, स्थलांतर आणि शिक्षण हे मुद्दे प्रभावी ठरले. निकालाची परिस्थिती लक्षात घेता एका पक्षाला अन्य छोट्या पक्षांशी आघाडी केल्याशिवाय कुणालाही बहुमत सिद्ध करता येणार नाही. म्हणजेच यावेळी सरकार चालवण्यासाठी छोट्या पक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. पुढच्या काही दिवसांत दोन्ही प्रमुख पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी इतर छोट्या पक्षांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतील. या परिस्थितीत ग्रीन पक्षाचे महत्त्व वाढले आहे; मात्र स्पष्ट बहुमतासाठी इतर पक्षांनाही सोबत घ्यावे लागणार आहे.

जर्मनीच्या इतिहासाकडे नजर टाकल्याल फ्री डेमोक्रॅटिक पक्षाने (एफडीपी) अँजेला मर्केल यांच्या ‘सीडीयू’ पक्षाला नेहमी झुकते माप दिले आहे. उजव्या विचारसरणीच्या अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी (एएफडी) या पक्षाने यापूर्वी एक प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावली आहे. या पक्षाला सोबत घेणे कठीण असले तरी अलिकडे ‘सीडीयू’च्या आर्मिन लॉशेट यांची बदललेली भूमिका बघता ते या पक्षालाही सोबत घेऊ शकतात. चान्सलर पदासाठी मर्केल समर्थक आर्मिन लॉशेट आणि सोशल डेमोक्रॅटिक पक्षाकडून ओलाफ शॉज हे दोन मुख्य दावेदार आहेत. यापैकी आर्मिन लॉशेट हे जनतेत फारसे लोकप्रिय नाहीत.

कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यात ते अपयशी ठरल्याचे अनेकांना वाटते. जुलै महिन्यात भीषण पुराचा तडाखा बसलेल्या ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर असताना ते असंवेदनशीलपणे हसताना दिसले. उमेदवार म्हणून प्रचारात, वादविवादात ते आपली छाप पाडू शकले नाहीत. अगदी शेवटच्या क्षणाला भूमिका बदलत मध्यम उजव्या विचारधारेवरून ते कडवट उजवीकडे घसरले. त्यांची बदललेली ही भूमिका मतदारांना रुचली नाही.

दुसरीकडे एसपीडी पक्षाचे चान्सलर पदाचे उमेदवार ओलाफ शॉझ यांनी प्रभावीपणे प्रचार यंत्रणा राबवली. मर्केल यांच्या सरकारमध्ये उपचान्सलर म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. शिवाय ते अर्थमंत्रिपदावर कार्यरत होते. निवडणुकीत रंगलेल्या वाद-विवादादरम्यान शॉझ हे जनतेला अधिक विश्वासार्ह आणि निर्णायक वाटले. कोरोना संकटाच्या उत्तम व्यवस्थापनाबद्दल त्यांचे कौतुक झाले. त्यामुळे मर्केल यांच्यानंतर चान्सलर पदासाठी योग्य चेहरा म्हणून जनतेने त्यांच्याकडे पाहिले. कोविड काळात अँजेला मर्केल विलगीकरणात असताना ओलाफ शॉझ यांनी जबाबदारी सांभाळली.

त्यामुळे त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर जनतेचा विश्वास बसला. कोरोनाचा फटका बसलेल्या व्यावसायिकांसाठी ७५० अब्ज डॉलर्सच्या आर्थिक पॅकेज आणि त्याच्या अंमलबजावणीमुळे शॉझ यांची लोकप्रियता आणखीच वाढली. आंतरराष्ट्रीय संबंध नीट हाताळण्याबद्दलची त्यांची प्रशंसा झाली; मात्र स्थलांतरित नागरिकांना सीमेवरून परत पाठवण्याबाबत ओलाफ यांनी कठोर भूमिका घेतली होती. त्याशिवाय जर्मन नागरिकांसाठी किमान वेतनवाढ, भाडे नियंत्रण कायदा अधिक कडक करणे आणि निवासी घरे बांधण्याच्या आश्वासनामुळे लोकप्रियता वाढली. यासोबत महापौरपदाच्या कारकिर्दीत झालेल्या भ्रष्टाचारामुळे जर्मनीला लाखो युरोचा फटका बसला.

नाटोमधून जर्मनीने बाहेर पडावे या अति डाव्या पक्षाच्या वादग्रस्त मागणीवर कुठलीही भूमिका न घेण्याचा आरोपही ओलाफ यांच्यावर लावला गेला; तरीही त्यांची लोकप्रियता कमी झाली नाही. अनेक जण याचे श्रेय त्यांचे प्रतिस्पर्धी आर्मिन लाशेट यांच्या निराशाजनक कामगिरीला देतात. जर्मनीतील सध्याचे संख्याबळ बघता संसदेत एसपीडी आणि सीडीयू या दोन्ही पक्षापैकी एक पक्ष बहुमत सिद्ध करू शकतो; मात्र अँजेला मर्केल यांच्या यशस्वी कार्यकाळानंतर जनता आता मध्यम उजव्या विचारसरणीवरून मध्यम डाव्या विचारसरणीकडे झुकली आहे.

मर्केल यांच्या पक्षाची घटलेली मतदानाची टक्केवारी बघता निष्ठावंतांचा अपवाद वगळता जवळपास ७६ टक्के लोकसंख्येने मर्केल यांच्या पक्षाला नाकारले आहे. हवामान बदलाकडे गंभीरतेने बघणाऱ्या, समाज कल्याणाच्या योजनांसाठी आग्रही असलेल्या युवकांनी जर्मनीत हा बदल घडवला आहे. पुढील काही आठवडे जर्मनी, युरोप तसेच युरोपियन संघाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. अँजेला मर्केल यांच्या यशस्वी आणि सर्वसमावेशक नेतृत्वानंतर चान्सलरच्या खुर्चीत बसणाऱ्या व्यक्तीला त्यांची पोकळी भरून काढणे आणि स्वतःला सिद्ध करण्याचे मोठे आव्हान आहे.

ग्रीन पक्ष ठरला किंगमेकर

आता जर्मनीतील संभाव्य आघाडीकडे नजर टाकूयात. जर्मन पक्ष त्यांच्या रंगछटेवरून ओळखले जातात. डावे म्हणजे लाल, हिरवा रंग म्हणजे पर्यावरणवादी, तर पुराणमतवादी पक्षाचा रंग काळा आहे. काळा व लाल रंगात युती होण्याची शक्यता तशी कमी आहे. एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर आर्मीन आणि शॉझ या दोघांनीही आघाडीची शक्यता फेटाळून लावली. त्यामुळे या दोन्ही पक्षांना इतर पक्षांचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करण्याचा पर्याय खुला आहे. चान्सलरपदी आपला उमेदवार विराजमान होईल, असा विश्वास दोन्ही पक्षांना आहे. त्यामुळे एकमेकांशी भांडण्यापेक्षा आघाडी करून स्पष्ट जनादेश घेणे त्यांनी पसंत केले आहे. यापूर्वी एसपीडी आणि सीडीयू या दोन्ही पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केल्यामुळे यंदा ही शक्यता नाकारता येत नाही. यावेळी १४.६ टक्के मते मिळवलेला ग्रीन पक्ष किंगमेकर ठरला आहे. या पक्षाने पाठिंबा दिलेला पक्ष सत्तेत बसण्याची शक्यता अधिक आहे. या शिवाय अन्य समीकरणेही पुढ येण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com