घर... काळोखातल्या कंदिलासारखं!

file photo
file photo


घर सोडावंच लागतं, प्रत्येकालाच कधीतरी. घर, इवलंसं, टुमदार अगदी बाहूंत सामावू शकणारं.. घर, खूप खूप उबदार, कायेला आणि मनाला ताजं ठेवणारं. घर ज्याच्या भिंतींवर असंख्य हिरव्याकंच वेली तरारून फुललेल्या असतात. घर जिथे असतो खूप खूप प्रकाश आणि काळजी, आणि आईच्या शरीराचा, कुठल्याच अत्तराच्या कुपीत एकवटता येणार नाही असा, अगम्य सुंदर गंध, तिची ओली साद..
घर म्हणजे त्या चार भिंती, ज्या भिंतींच्या खिडक्‍यांमधून तुम्ही आकाश पाहायला शिकता. घर म्हणजे ती एक विशेष गल्ली, तुमच्या आवारातली जी तुमची सगळी गुपितं राखते. घर म्हणजे तुमचं ते शहर ज्याच्या क्षितिजावर तुम्ही उगवताना आणि मावळताना पाहिलाय सूर्य रोज. घर म्हणजे तो प्रत्येक कोपरा जिथं सापडतात तुम्हाला तुमच्या अस्तित्वखुणा विनासायास. पण घर एकतर सुटतं, नाहीतर सोडावंच लागतं प्रत्येकालाच कधीतरी.
एक दिवस असा येतो जेव्हा अचानक जाणवतं आपण उंच झालोत. इतके, की आपल्याच घराचं छत आपल्याला उणं पडू लागलं आहे. शरीर भरतं, मिसरूड फुटतं. आपण उंच होत जातो, मोठे होत जातो, इतके की आपल्याच घराचं छत छेदून आपण पलीकडचं पाहायला लागतो आपल्याही नकळत. आपल्या घराहूनही मोठं काही असू शकतं हे जाणवलेलं असतं पहिल्यांदाच.. ते पलीकडचं काहीतरी साद देऊ लागतं, हाकारू लागतं, आपण झेपावू लागतो घराचं छत भेदल्यावर दिसणाऱ्या त्या मृगजळाकडे. त्या मृगजळाकडे टक लावून बघता बघता जर आलीच ग्लानी तर मायेनं तुमच्यावर पांघरूण घालायला, घर मात्र खाली तसंच उभं असतं दक्ष, स्थितप्रज्ञ.
जाणवतं मग आपल्यालाही इथलं अन्न संपलं आता. कितीही नाकारलं, डोळेझाक केली तरी थंडीतल्या बोचऱ्या वाऱ्यासारखी, किंवा तुळशीजवळच्या मंद दिव्याचा अचानक चटका लागावा तशी, किंवा अगदी अरिजीतच्या आवाजातल्या करुण गाण्यासारखी ती जाणीव पोखरत राहते. जगात कुठला असा तरुण आहे ज्याला एका point of time ला घर सोडावं लागलं नाही? मी घरासाठी रडत बसलो तर शिकणं राहून जाईल, growth खुंटेल. जाणार मी, करून दाखवणार असं काहीतरी की याच घराला कितीतरी जास्त अभिमान वाटेल माझा. होईल हळूहळू सवय घर नसण्याची.. तोडावेच लागतील पाश.. होईल सगळं manage घराशिवायही. आपण स्वतःचीच अशी फोल समजूत काढत असताना घर शांत उभं असतं आज्जीने शिवलेल्या गोधडीसारखं, कायेचा सौंधा सुगंध ल्यालेलं, उबदार..
मग येतोच शेवटी तो निरोपाचा क्षण. आई जुन्या स्टीलच्या डब्यांमध्ये, कापडी पिशव्यांमध्ये, भरभरून देते शिदोरी, लागलीच बाहेर भूक आणि नाहीच मिळालं अन्न तर.. ते दोघे आपल्या खिशांमध्ये, account ओतत राहणार असतात दर महिन्याला त्यांच्या नसण्याचा अनुशेष भरून काढण्याचा लाचार प्रयत्न. आता नाही निघालो तर गाडी सुटेल, म्हणत करावीच लागते पाठ घराच्या उंबऱ्याकडे. आईला आवरत नाहीच हुंदका, आई रडतेच.. बाबांनी खूप प्रयासाने रोखून धरलेला असतो आवंढा. उंबरा ओलांडण्याआधी जेव्हा एकदा पाऊल अडखळतं, तेव्हा आपणही रोखून धरलेले अश्रू ओघळत छातीपाशी आलेलेही असतात.
उंबरा ओलांडण्याआधी नकळत पाऊल मागे वळतं, आपण जातो आपल्या खोलीतल्या आटाळ्यावरच्या त्या एका धूळभरल्या कोपऱ्यापाशी, आणि घेतो सोबत ती एक लहानपणीची बाहुली, किंवा ती एक toy car.. आपण खूप हट्ट करून मिळवलेली, लहानपणापासून जिवापाड जपलेली, आजवर जशीच्या तशी राहिलेली. गाडी सुटते, घर सुटतं आपण दूरच्या प्रवासाला निघतोच अखेर..
महिने जातात, वर्ष जातं, आपण त्या दूरच्या मातीतही रुळू लागतो अखेर. मनातला घर नावाचा हळवा कोपरा आपण सजवलेला असतो दोन वेळचे फोन कॉल्स, आणि व्हिडिओ कॉल्सच्या पडद्याआड.. अचानक असेच धावपळीत असताना एक दिवस दिसतं, की आपण घरून आणलेल्या, जिवापाड जपलेल्या त्या लहानपणच्या बाहुलीचा डोळा निखळून पडलाय, त्या toy car चं चाक तुटलंय.. नेमकं काय होतं माहीत नाही, पण आपण धाय मोकलून रडू लागतो. लहानपणी गर्दीत आई दिसली नाही की रडायचो तसे, किंवा घर सोडताना गिळलेला आवंढा ऊर फाडून बाहेर यावा तसे.
त्या दिवशी रात्री मग स्वप्नात येतं घर.. आणि सांगतं की तुझ्या बाहुलीचा डोळा, toy car चं चाक.. निखळून घरंगळत आलं अखेर माझ्यापाशीच. तो डोळा, ते चाक आता आहे तिथेच, तुझ्या खोलीतल्या आटाळ्यावरच्या त्या धूळभरल्या कोपऱ्यात. लाडक्‍या बाहुलीचे असे अनेक डोळे, toy cars ची अशी अनेक चाकं त्या एका धूळभरल्या कोपऱ्यात सामावून घेत, जळत राहतात कितीतरी घरं, मिट्ट काळसर निळ्या अंधारात दूरवर तेवताना दिसणाऱ्या कंदिलासारखी...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com