मध्यरात्री बारा वाजता मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी 'हा' नेता जाणार वर्षावर

मृणालिनी नानिवडेकर
रविवार, 21 जुलै 2019

- मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला जागवल्या जुन्या आठवणी
- मध्यरात्री बारा वाजता गिरीश महाजन धडकणार वर्षावर 

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत साधे, भपंकपणाचा त्यांना तिटकारा. वाढदिवस साजरा केलेला त्यांना आवडत नाही. पत्नी अमृताच्या इच्छेचा मान राखत ते ओवाळून घेतात, मुलगी दिवीजा समवेत आवडते ब्लॅक चॉकलेट चघळतात. परवा सिध्दीविनायक मंदिरात त्यांनी आई सरिताताईंच्या उपस्थितीत श्रीगणेशाची पूजा केली. ती वाढदिवसानिमित्त होती का माहित नाही. वाढदिवसाच्या उत्सवी आयोजनांना फाटा देण्याचा त्यांचा आग्रह न जुमानता आज रात्री बारा वाजता त्यांचे विश्‍वासू सहकारी संकटमोचक गिरीश महाजन वर्षा गाठणार आहेत.

मला मुख्यमंत्र्यांची भूमिका मान्य आहे, ती योग्यही आहे, त्यामुळे मी नुसताच जाणार आहे त्या वेळी, ते सांगत होते. गेल्या पन्नास वर्षात राज्याचे जे प्रश्‍न मार्गी लागले नाहीत ते सोडवण्याचा विक्रम त्यांनी केला. मराठा आरक्षणाचा अत्यंत किचकट प्रश्‍न मार्गी लावला, धनगरांच्या विकासाला गती देणारे निर्णय घेतले, ओबीसींच्या अभ्यासासाठी मंडळ स्थापन केले. कर्जमाफी योग्य त्याच वर्गाला मिळेल असेनिर्णय घेतले, शेतीला शाश्‍वत पाणीपुरवठा करण्याचा चंग बांधला, तो यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. मला सहकारी या नात्याने आमच्या या नायकाचा अभिमान आहे. वयाची पन्नासवर्षेही पूर्ण न झालेल्या या नेत्याने जे साध्य केले आहे ते महान आहे.

नवनव्या संधी त्यांच्या आयुष्यात येतील अन् ते त्या आव्हानांचे संधीच्या सोन्यात रूपांतर करतील असे सांगत महाजन म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस माझ्यापेक्षा पाच वर्षांनी छोटे. त्यांची वाटचाल पहायला मिळाली, पाच वर्षात त्यांनी एकेक प्रश्‍न मार्गी लावला. आजही मला आमदार या नात्याने ते करत असलेली मेहनत आठवते. आम्ही समवेत असायचो. मी, ते, सुधीर मुनगंटीवार हेही आमचे जवळचे मित्र. एखादया प्रश्‍नाचा ते ध्यास घेवून अभ्यास करायचे. झोकून देवून काम करताना त्यांना बाकी काही सुचायचे नाही. त्या वेळीही त्यांनी कधी वाढदिवस केला नाही, आताही ते वाढदिवस करत नाहीत. पण, मी मात्र आज बारा वाजता 22 जुलै उजाडत असताना त्यांच्याकडे जाणार, अभिष्टचिंतन करणार, नव्या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन या त्यांच्या कटीबध्दतेला शुभेच्छा देणार...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girish mahajan going to varsha for Wishing Biirthday to CM