बेशरम रंग; विवादी तरंग! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girish Wankhede writes about controversy over Besharam Rang deepika padukone shah rukh khan

आक्षेप घेणारे लोक हे कलेपेक्षा धर्माला जास्त महत्त्व देतात...

बेशरम रंग; विवादी तरंग!

- गिरीश वानखेडे

शाहरुख खान, दीपिका पादुकोण अभिनित ‘पठाण’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘बेशरम रंग’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. या गाण्यावरून अनेक विवाद सुरू झाले आहेत. आक्षेप घेणारे लोक हे कलेपेक्षा धर्माला जास्त महत्त्व देतात. धर्म मानणे हे चुकीचे नाही; पण कला हाच कलाकाराचा धर्म असतो, हे आक्षेप घेणाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे. कलाकारही आपल्या धर्माशी प्रामाणिक राहत असेल, तर ती चूक कशी असेल? माणूस धर्माच्या चष्म्यातून कलेकडे पाहू लागला की कलाकार अपराधी भासू लागतो. कलाकारासाठी कला हीच पूजा असते आणि तो तितक्याच भाविकतेने ती करत असतो. त्यामुळे कलाकाराला कलात्मक स्वातंत्र्य मिळणे हा त्याचा हक्क आहे.

‘बेशरम रंग’ हे शाहरुख खान, दीपिका आणि यशराज फिल्म्सच्या ‘पठाण’ चित्रपटातील गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आणि ‘नेमेची येतो’ म्हणतात त्याप्रमाणे विवाद सुरू झाला. ‘पठाण’ चित्रपट येत्या वर्षांत २५ जानेवारीला सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. अलिकडच्या काळात शाहरुख आणि यशराज फिल्म्स दोघांनाही आपले चित्रपट फ्लॉप झाल्याचे दुःख पचवावे लागले आहे. त्यामुळे शाहरुखच्या बिग बजेट चित्रपटाची सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘बेशरम रंग’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते.

या गाण्यावरून अनेक विवाद सुरू झाले आहेत. कोणी म्हणतात या गाण्याचे बीटस् चोरलेले आहेत, कोणाचा दीपिकाच्या वेशभूषेवर आक्षेप आहे, तर कोणाची तिच्या बिकिनीच्या रंगाला हरकत आहे. कारण काय तर तिच्या बिकिनीचा केशरी रंग धार्मिक भावनांना दुखावणारा वाटतो. यावर सामान्य माणसासोबतच राजकीय नेत्यांच्यादेखील विवादाच्या बाजूने आणि विरोधात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या गाण्यामध्ये हिंदू धर्माचे प्रतीक असलेल्या भगव्या रंगाचा अपमान करण्यात आला आहे, तसेच दीपिका पादुकोण ही तुकडे गॅंगची समर्थक आहे, म्हणूनच तिने मागे जेएनयू विद्यापीठाला भेट दिली होती. त्यामुळे या गाण्यासह हा चित्रपट बॅन करा, अशी प्रतिक्रिया मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी दिली आहे.

‘बॅन पठाण’ची हाक आता सगळीकडे ऐकू येऊ लागली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील बॅनचे समर्थन करत आहेत. या उलट छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी भगवा रंग हा कोणत्याही एका समाजाचा, जातीचा किंवा समुदायाचा नाही, असे सांगत चित्रपटाचे समर्थन केले आहे. काही लोक या चित्रपटाच्या बाजूने, तर काही लोक चित्रपटाच्या विरोधात प्रतिक्रिया देत आहेत. लोकांना मुख्यत्वाने दीपिकाने चित्रपटात घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवर आक्षेप असल्याचे म्हटले जात आहे; पण हा आक्षेप अगदी निरर्थक आहे.

कारण यापूर्वीही चित्रपटात अनेक मादक गाण्यात नायिकेने भगवे कपडे घालून उत्तान नृत्य केलेले आहेतच. (रवीना टंडनचे ‘मोहरा’ चित्रपटातले ‘टीप टीप बरसा पानी’ हे गाणं आठवा) तेव्हा असे कसलेही विवाद झाले नव्हते. मग आताच का? बॉलीवूड चित्रपटात असे मादक गाणे असण्याची ही काही पहिली वेळ नव्हे. तसे पाहता बॉलीवूडमध्ये त्या त्या काळानुसार मादक वाटतील अशा गाण्यांची परंपराच आहे. अशा गाण्यांवर पूर्वीही आक्षेप घेतले गेले आहेत; पण त्याला धार्मिक रंग चढण्याची ही पहिलीच वेळ आहे.

‘बेशरम रंग’ हे गाणे जेव्हा प्रदर्शित झाले तेव्हा ते सेन्सॉर होऊनच प्रदर्शित झाले असेल ना! काय चांगले, काय वाईट हे ठरवण्याचे काम सेन्सॉर बोर्डाचे आहे. सेन्सॉरने परवानगी दिली तेव्हा सर्व बाजूंनी विचार केला असेलच. मग समाजातले हे ‘स्व’घोषित ‘मॉरल पोलिस’ चांगले काय, वाईट काय हे कसे ठरवू शकतात किंवा या गाण्यावर आक्षेप कसा घेऊ शकतात? बॉलीवूड चित्रपटातील गाणी आणि आक्षेप यांचा जुनाच परस्पर संबंध आहे. १९७८च्या ‘सत्यम शिवम सुंदरम्’मधली गाणी, १९८० च्या ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटातील गाण्यात नायिकेने कसे अत्यंत तोकडे कपडे घातले याबाबत आक्षेप नोंदवला गेला होता. अजून मागे जाऊन पाहिले तर ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटातील ‘अंग लग जा बालमा’ या गाण्याबाबत आरडाओरडा झाला होता. ‘मर्डर’मधली गाणी, ‘सबसे बडा खिलाडी’मधील ‘मांग मेरी भरो’ अशी गाणी त्यावरच्या आक्षेपामुळेच जास्त स्मरणीय ठरली. ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील ‘काटे नही कटते’ हे गाणेदेखील वादात सापडले होते. आजवरच्या कैक हिंदी चित्रपटांत अंगप्रदर्शन करणारे कपडे घालून नायिकांवर अनेक गाणी चित्रित करण्यात आली आहेत.

यापूर्वी आमिर खानच्या बाबतीतदेखील असे घडलेले आहे. त्याच्या अनेक चित्रपटांना वेगवेगळ्या संघटनांनी वेगवेगळ्या कारणांवरून बंदी घाला, अशी मोहीम चालवली होती. आमिरच्या काही दिवसांपूर्वीच येऊन गेलेल्या ‘लालसिंग चढ्ढा’ चित्रपटाबाबत असेच घडले होते. राजकुमार हिरानी दिग्दर्शित आणि आमिर खान मुख्य भूमिकेत असलेल्या ‘पिके’ या चित्रपटात आमिर खानने देवाचा शोध घेणाऱ्या परग्रहवासी व्यक्तीची भूमिका केली होती. लोक व्यक्तिगत स्वार्थासाठी धर्माचा कसा गैरवापर करतात, यावर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला होता. त्या वेळी काही कट्टर संघटनांनी सिनेमाचा मूळ हेतू लक्षात न घेता या चित्रपटात हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचे कारण पुढे करून चित्रपटावर आक्षेप घेतला होता. सलमान खानच्या चित्रपटांना बॅन करण्यासाठीदेखील अशीच वेगवेगळी कारणे शोधली जातात. अक्षय कुमारच्या ‘ओ माय गॉड’ या चित्रपटातदेखील धर्माच्या गैरवापराचा भांडाफोड करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीदेखील कर्मठ धर्मरक्षकांनी यावर आक्षेप घेतला होता.

आताच्या ‘बेशरम रंग’ या गाण्याच्या विवादासाठी दीपिका कारणीभूत नसून खरे कारण शाहरुख खान असल्याचे बोलले जात आहे. शाहरुख खानचा चित्रपट पाडणे हा काही लोकांचा मुख्य उद्देश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दीपिकाच्या आडून शाहरुख खानवर शरसंधान करणारे लोक कलाकाराच्या कलेकडे लक्ष न देता त्याच्या धर्माकडे किंवा कलाकारांचे धार्मिक कनेक्शन याकडे लक्ष देत असतील, तर ते चिंताजनक आहे. शाहरुख खानला ‘माय नेम इज खान’ या चित्रपटाच्या वेळीदेखील अशाच विवादाला तोंड द्यावे लागले होते. या चित्रपटात त्याने एका चांगल्या, पण मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या व्यक्तीची भूमिका रेखाटली होती; पण हे कथानक मुस्लिम दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर गुंफलेले असल्यामुळे या चित्रपटाबाबतीत आक्षेप घेण्यात आला होता.

आपल्याकडे इतक्या जात, धर्म आणि संघटना आहेत की जेव्हा जेव्हा कुठलाही चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा कुठल्या तरी धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे कुठल्या तरी गटाला नक्कीच वाटत राहते. भारतातला सर्वात पहिला कलात्मक चित्रपट म्हणून ज्याची ओळख आहे तो ‘गरम हवा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून ही आक्षेप संस्कृती उदयास आली, असे म्हणायला हरकत नाही. हा चित्रपट आजही एक ‘कल्ट’ सिनेमा म्हणून ओळखला जातो. देशाच्या फाळणीवर आधारित कथानक असलेल्या या चित्रपटात एका मुस्लिम कुटुंबाचे चित्रण करण्यात आले होते. हा चित्रपट सेन्सॉरमध्येदेखील अडकून पडला होता. संजीव कुमारचा ‘आंधी’ (१९७५) देखील असाच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. हा चित्रपट देशात आणीबाणी लागू झाली होती, त्या सुमारास आला होता. या चित्रपटातील नायिकेची व्यक्तिरेखा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर बेतलेली आहे, असे कारण देत या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. ‘

किस्सा कुर्सी का’ हा चित्रपट देशातील आणीबाणीवर आधारलेले विडंबन होते. त्यालाही संजय गांधींच्या समर्थकांनी आक्षेप घेत या चित्रपटावर बंदी घालण्यासाठी सेन्सॉरवर दबाव आणला होता. ‘फायर’ चित्रपटावर समलैंगिक संबंधासाठी; तर अनुराग कश्यपच्या ‘पांच’ आणि ‘ब्लॅक फ्रायडे’ या चित्रपटांवर हिंसक चित्रपट म्हणून आक्षेप घेण्यात आला होता. असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांच्यावर विविध कारणांमुळे आक्षेप घेण्यात येऊन बॅन करण्याची लोकांनी मागणी केली होती. ‘मोहल्ला अस्सी’ या चित्रपटात खूप जास्त शिवीगाळ असल्याचे सांगत बॅनचे वादळ उठले होते. ‘वॉटर’ चित्रपटाच्या वेळीदेखील काही संघटनांनी गदारोळ केला होता. ‘पद्मावत’वेळीदेखील हाच प्रकार घडला. म्हणजेच आक्षेप घेत चित्रपट बॅन करण्याची मागणी करणे ही भारतातील जुनी परंपरा आहे. पण, क्षुल्लक कारणावरून एखाद्या चित्रपटातला बॅन करण्याची मागणी करण्याचा ट्रेंड नक्कीच चिंताजनक आहे.

इतकेच काय, आपण भारतीयांनी हॉलीवूडचे चित्रपट इथे प्रदर्शित झाल्यावर तेदेखील अशाच कारणावरून बॅन करण्याचा पराक्रम केला आहे. स्टीवन स्पीलबर्ग यांच्या इंडियाना जोन्स अँड टेम्पल ऑफ डूम (१९८४) चित्रपटात एका दृश्यात काही जण वानराच्या मेंदूचे भक्षण करताना दाखवण्यात आले होते. भारतात वानराला पूजनीय समजले जाते हे कारण देत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी भारतीयांनी केली होती. ‘द गर्ल विथ ड्रॅगन टॅटू’ या चित्रपटाबाबतदेखील असाच आक्षेप घेण्यात आला होता. या चित्रपटातील बलात्काराचे दृश्य वगळले तर भारतात प्रदर्शनाला परवानगी देऊ, असा पर्याय दिग्दर्शकाला देण्यात आला होता; पण त्या डेव्हिड फिंचर यांनी भारतीय सेन्सॉर बोर्डाची मागणी अमान्य करत आपल्या कलाकृतींमध्ये फेरफार करायला नकार दिला होता. त्यामुळे हा चित्रपट भारतीय चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकला नाही. काही चित्रपट निर्माते अशा दबावाला बळी पडतात, तर काही आपल्या चित्रकृतीमधील फेरफार अमान्य करतात.

खरे तर बॉलीवूड बॅन करण्याच्या मोहिमेमागे एक असा गट आहे ज्याला बॉलीवूड यशस्वी झालेले पाहणे रुचत नाही. त्यासाठी हा गट कधी नेपोटिझम, कधी बॉलीवूडमधील ड्रग्सचा वापर, कधी धार्मिक भावना दुखावण्याचा कांगावा, कधी चित्रपटात मुस्लिम नायक आणि हिंदू खलनायक दाखवण्याचा मुद्दा अशी कारणे उचलून धरतो. अशा सगळ्या अडचणींना चिवटपणे तोंड देत बॉलीवूड दिमाखाने मार्गक्रमण करत आहे. आक्षेप घेणारे लोक हे कलेपेक्षा धर्माला जास्त महत्त्व देतात. धर्म मानणे हे चुकीचे नाही; पण मग कला हाच कलाकाराचा धर्म हे त्यांच्या लक्षात कसे येत नाही? कलाकारही आपल्या धर्माशी प्रामाणिक राहत असेल, तर ती चूक कशी असेल? माणूस धर्माच्या चष्म्यातून कलेकडे पाहू लागला, की कलाकार अपराधी भासू लागतो. कलाकारासाठी कला हीच पूजा असते आणि तो तितक्याच भाविकतेने ती करत असतो. त्यामुळे कलाकाराला कलात्मक स्वातंत्र्य मिळणे हा त्याचा हक्क आहे.

आक्षेप संस्कृतीमुळे संपूर्ण चित्रपट उद्योगाचे नुकसान होत आहे. कोरोनानंतर इतर उद्योगांप्रमाणेच चित्रपट उद्योगदेखील प्रगती करू पाहत आहे. ‘दृश्यम २’च्या यशामुळे चित्रपट उद्योगाच्या यशाच्या आशा पल्लवीत झालेल्या असून, बॉक्स ऑफिसमध्ये जिवंतपणा आला आहे. अशा वेळी आपण चित्रपट उद्योगाला पाठिंबा दिला पाहिजे. लोकांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिले तरच हा उद्योग आणि या उद्योगावर अवलंबून असलेली लाखो कुटुंब आपला उदरनिर्वाह करू शकतील. आपण मात्र याकडे दुर्लक्ष करत छोट्या-मोठ्या कारणांवरून या उद्योगाला बदनाम करणे, बॅन करणे हे रिकामे उद्योग करत आहोत. यामुळे जगभरात खुल्या विचारांचा देश अशी प्रतिमा पुसली जात आहे. आक्षेप संस्कृती भारतीयांच्या खुल्या विचारांचे नव्हे, तर संकुचित वृत्तीचे दर्शन घडवते. म्हणूनच सर्वांचा कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणखी सकारात्मक होईल, सर्वांचे उत्तम मनोरंजन करत राहण्यासाठी चित्रपट उद्योगाची भरभराट होत राहील, यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत.