‘अष्ट’पैलू महानायक

‘स्टार ऑफ मिलेनियम’, ‘शहेनशहा’, ‘अँग्री यंग मॅन’, ‘बिग बी’ अशा किती तरी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांचे आजवर अनेक चित्रपट आले आणि गेले.
Amitabh Bachchan
Amitabh BachchanSakal
Summary

‘स्टार ऑफ मिलेनियम’, ‘शहेनशहा’, ‘अँग्री यंग मॅन’, ‘बिग बी’ अशा किती तरी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांचे आजवर अनेक चित्रपट आले आणि गेले.

- गिरीश वानखेडे girishwankhede101@gmail.com

‘स्टार ऑफ मिलेनियम’, ‘शहेनशहा’, ‘अँग्री यंग मॅन’, ‘बिग बी’ अशा किती तरी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांचे आजवर अनेक चित्रपट आले आणि गेले. त्यातले काही सुपरहिट, तर काही सुपरफ्लॉप ठरले; मात्र त्यांचे प्रेक्षकांच्या मनावरचे गारूड कायम राहिले. वयाची ऐंशी वर्षे पूर्ण केल्यानंतरही एखाद्या चिरतरुण नटाच्या तोडीस तोड भूमिका करणाऱ्या या ‘सुपरस्टार’च्या काही रंजक आठवणी, खास त्यांच्या जन्मदिनानिमित्त...

मी ९-१० वर्षांचा असेन तेव्हाची गोष्ट! आमच्या कॉलनीत आमचा आठ-दहा मुलांचा एक ग्रुप होता. त्यात लहान-मोठ्या सगळ्याच वयोगटातील मुले होती. संध्याकाळी आम्ही एकत्र जमायचो आणि वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायचो. आमच्यातील एक जण मात्र नेहमी अमिताभ बच्चनबद्दलच बोलत असायचा. मी त्या गटात वयाने सर्वांत लहान होतो. त्यामुळे सर्वांच्या गप्पा मन लावून ऐकायचो. अमिताभबद्दल बोलणाऱ्या मित्राची गोष्ट सांगण्याच्या शैलीमुळे तो सांगत असलेल्या गोष्टी मी विस्मयचकित होऊन ऐकत असे. तेव्हा दूरदर्शनवर दाखवण्यात आलेले अमिताभचे एकदोन चित्रपट मी पाहिले होते. त्या काळात गणेशोत्सवादरम्यान रात्री रस्त्यावर पडदा लावून चित्रपट दाखवले जायचे. तिथेही मी या महान कलाकाराचे अनेक चित्रपट पाहिले होते. तेव्हा ‘अमर अकबर अँथनी’ आणि इतर चित्रपटांची गाणी आम्हाला तोंडपाठ झाली होती; तर अशा आमच्या बच्चनप्रेमी ग्रुपने अमिताभचा ‘गिरफ्तार’ हा चित्रपट ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ पाहण्याचे ठरवले. गावभरात लागलेले पोस्टर्स पाहून आमची उत्सुकता कमालीची वाढली होती. उत्तर नागपुरातील ज्या चित्रपट गृहात आम्ही जाणार होतो, त्याचे नावही होते ‘कमाल’! आम्हीही कमाल करत गुरुवारी रात्रीपासूनच सिनेमाला जायची तयारी सुरू केली होती.

दुसऱ्या दिवशी आम्ही आठ जण भारी कपडे घालून ‘बडे शान के साथ’ चित्रपटगृहाच्या आवारात दाखल झालो. मैदानाच्या एका टोकाला असलेल्या तिकीट बारी अर्थात बॉक्स ऑफिससमोर बांबू बांधून तिकीट रांग तयार केलेली होती. आम्ही तिथे पोचलो तेव्हा चित्रपटगृहाबाहेरील मैदान तुडूंब भरलेले होते. सगळीकडे माणसेच माणसे दिसत होती. शो सुरू होण्यास अर्धा तासच शिल्लक होता. त्यामुळे आम्ही तिकीट कसे मिळणार या विवंचनेत होतो. तेव्हा आमच्यापैकी एकामध्ये अमिताभ संचारला. तो पुढे होऊन म्हणाला, ‘थांबा, मी अशा बाका प्रसंगांना अनेकदा तोंड दिले आहे. तेव्हा तिकीट मिळवण्याची जबाबदारी माझी...’ मग त्याने आपल्या हातातले घड्याळ, पायातल्या चपला काढून आमच्याकडे दिल्या. नंतर त्याने आपल्या शर्टच्या बाह्या सरसावल्या आणि वरची दोनतीन बटने काढली. आम्ही तिकिटाचे पैसे त्याच्या हवाली केले आणि आमच्या शूर शिपायाने तिकीट मिळवण्यासाठी गर्दीत मुसंडी मारली.

तिकीट खिडकीसमोर खूप लोकं दाटीवाटीने उभी होती आणि काही लोक या लोकांच्या वर किंवा तिथे बांधलेल्या बांबूवर उभे होते. हे सगळे लोक तिकिटाचे पैसे आत देण्यासाठी छोट्याशा खिडकीत हात घालत होते. अशा ‘हाय तौबा’ गर्दीत आम्हाला तिकीट मिळण्याची शक्यता फारच कमी वाटत होती; पण साधारण पंधरा-वीस मिनिटांनी आमचा हिरो या गर्दीतून बाहेर येताना दिसला. त्याचा अवतार पाहण्यासारखा झाला होता. केस विस्कटलेले, बटने तुटल्याने शेवटच्या एका बटनामुळे अंगावर तगलेला शर्ट असे ध्यान भेलकांडत आमच्या समोर उभा राहिले; पण त्याच्या चेहऱ्यावरून विजयाचा आनंद ओसंडून वाहत होता. अतिउत्साहात त्याने आमच्यासमोर आपली गच्च आवळलेली मूठ उघडली. त्याक्षणी ती मूठ आमच्यासाठी लाखमोलाची होती. त्यात चोळामोळा झालेली गुलाबी रंगाची आठ तिकिटे आम्हाला खुणावत होती. आता आम्ही नक्कीच अमिताभच्या जादूत ‘गिरफ्तार’ होऊ शकणार होतो; मग त्याच गर्दीचा भाग होऊन आम्ही आत शिरलो. त्याचा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना स्फूरण चढणारच! चित्रपटात पडद्यावर त्याची एन्ट्री होताच माझ्यासकट सर्वांनी खुर्चीवर उभे राहून आरोळ्या ठोकल्या. त्या दिवशी जो खुमार आम्ही अनुभवला, तो माझ्या महाविद्यालयीन जीवनात आणि नंतरही कायम राहिला. पुढे मी अमिताभचे ‘गंगा जमुना सरस्वती’, ‘अकेला’, ‘मैं आझाद हूँ’, ‘मर्द’ असे अनेक चित्रपट पाहिले. ‘हम’ चित्रपटातलं केवळ ‘चुम्मा चुम्मा’ गाणं पाहायला प्रेक्षक परत परत चित्रपटगृहात जायचे आणि गाणं संपलं की परतायचे, अशी जादू होती अमिताभ नावाची.

अमिताभचे अनेक चित्रपट आले आणि गेले. त्यातले काही सुपरहिट; तर काही सुपरफ्लॉप ठरले; मात्र त्याचे प्रेक्षकांच्या मनावरचे गारूड कायम राहिले. कॉलेज जीवनात आम्ही दर आठवड्याला व्हीसीआर आणून एकाच वेळी चार सिनेमे बघायचो. या चारपैकी एक सिनेमा हा अमिताभचाच असायचा. त्याने अभिनय केलेला प्रत्येक चित्रपट मी किमान पन्नास वेळा पाहिला असावा. आमच्या पिढीला हाच आपला हिरो आहे असे वाटत असे. त्याच्या ‘शराबी’, ‘अंधा कानून’ यासारख्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर आम्ही प्रेम केले.

अमिताभ यांनी नुकतीच वयाची ऐंशी वर्षे पार केली. आजही ‘कौन बनेगा करोडपती’, ‘गुडबाय’द्वारे पडद्यावर त्यांचे दर्शन होत आहे. हा जादूगार आपली किमया साधण्यात पूर्वीइतकाच आजही यशस्वी ठरला आहे. दिग्गज दिग्दर्शक गोदार्क हे तर अमिताभ यांना ‘वन मॅन इंडस्ट्री’ म्हणायचे. याप्रकारे अमिताभला ओळखण्याचा प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन आहे. त्यांच्या यशाची प्रत्येकाची वेगळी व्याख्या आहे. आजवर त्यांना अनेक पदव्या देण्यात आल्या. ‘स्टार ऑफ मिलेनियम’, ‘शहेनशहा’, ‘अँग्री यंग मॅन’, ‘बिग बी’ म्हणूनही अमिताभ ओळखले जातात. दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलेल्या अमिताभ बच्चन यांना अनेक जीवनगौरव पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार आणि १६ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. म्हणूनच अशा अमिताभची महानता आपण निवडक आठवणींतून उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत.

  • अमिताभ यांनी आपल्या करिअरची सुरुवातच मुळी नकार पचवत केली. वडील हरिवंशराय यांचा पृथ्वीराज कपूर यांच्याशी परिचय होता. म्हणूनच त्यांनी अमिताभची शिफारस केली होती; मात्र कपूर यांनी अमिताभ यांना चित्रपटात काम देण्यास नकार दिला होता, तरीही अमिताभ डगमगले नाहीत. पुढे त्यांनी ऑल इंडिया रेडिओवर वृत्तनिवेदक पदासाठी अर्ज केला होता. तिथेही नकाराचा सामना करावा लागला.

  • अमिताभचा पहिला चित्रपट होता ‘सात हिंदुस्तानी’. के. ए. अब्बास दिग्दर्शित हा चित्रपट चांगलाच फ्लॉप ठरला. कारकिर्दीची केवळ सुरुवातच नव्हे, तर सुरुवातीच्या काळात सलग १०-१२ चित्रपट फ्लॉप झाले, पण अमिताभ खचले नाहीत.

  • अमिताभ यांचा पहिला मोठा चित्रपट होता ‘आनंद’. यात त्यांनी डॉक्टरची भूमिका साकारली आणि यासाठी पहिला ‘बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर’चा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यावेळी राजेश खन्नाने नवा सुपरस्टार जन्माला आल्याचे भाकित केले होते.

  • पुढे त्यांनी ‘परवाना’ चित्रपटात खलनायक साकारला. सुनील दत्त यांनी ‘रेश्मा शेरा’ चित्रपटात अमिताभचा आवाज चांगला नसल्याचे सांगत मुक्याचा रोल दिला. त्याच अमिताभने ‘मेरे आँगने में’ गाण्यासाठी ‘प्लॅटिनम डिस्क’ जिंकली होती.

  • त्यांचा अँग्री यंग मॅन रूपातला पहिला मेजर ब्रेक होता ‘जंजीर’. जो सलीम जावेद यांनी प्रकाश मेहराला केलेल्या शिफारशीतून मिळाला होता.

  • जंजीरमधल्या भूमिकेसाठी त्याला पहिले फिल्मफेअर मिळाले आणि त्याची सलीम जावेदबरोबरची मैत्री आणखी दृढ झाली. या तिघांनी मिळून पुढे ‘दिवार’, ‘जंजीर’सारखे हिट चित्रपट दिले. सलीम खानने मनमोहन देसाई आणि यश चोप्रा यांच्याशी बच्चन यांचा परिचय करून दिला.

  • त्या काळातील गरिबी, भूकमारी, बेरोजगारी, भ्रष्टाचार, सामाजिक विषमता, देशात लागू झालेली आणीबाणी या प्रश्नांमुळे हतबल झालेल्या युवा वर्गाचा अमिताभ नायक झाले. कारण त्यांनी ‘जंजिरा’, ‘काला पत्थर’, ‘दिवार’ यांसारख्या चित्रपटांत व्यवस्थेविरोधात बंड करणाऱ्या युवकाची भूमिका साकारली. त्यामुळे हा युवावर्ग त्यांच्याशी समरूप होऊन कनेक्ट झाला.

  • त्यांनी नेहमीच विविध भावना दर्शवणारे चित्रपट केले. ‘चुपके चुटके’, ‘मिली’, ‘बॉम्बे टू गोवा’, ‘फरार’, ‘त्रिशुल’ ही काही हटके चित्रपटांची उदाहरणे. हा नट सगळ्याच भूमिका अगदी सहजपणे निभवायचा.

  • ‘कभी कभी’ चित्रपटात त्यांनी रोमॅंटिक भूमिका केली. त्याच वर्षी त्यांनी ‘अदालत’ चित्रपटात बाप आणि मुलगा अशी दुहेरी भूमिका केली. ‘अमर अकबर अँथनी’ही केला याच वर्षात. अशी मुशाफिरी त्यांनी लीलया पार केली.

  • १९७८ हे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे वर्ष होते. या वर्षात त्यांनी ‘कस्मे वाले’, ‘डॉन’ या चित्रपटांत डबल रोल केला. ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘गंगा की सौगंध’, ‘त्रिशुल’, ‘बेशरम’ असे एकूण सहा चित्रपट त्यांनी या वर्षात केले. विशेष म्हणजे या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

  • १९७९ हे वर्ष ‘सुहाग’, ‘मि. नटवरलाल’, ‘काला पत्थर’, ‘द ग्रेट गॅंबलर’ आणि ‘मंजिल’ या चित्रपटांचे होते. मंजिल वगळता इतर चित्रपट चांगले चालले होते.

  • १९८१ साली ‘लावारिस’, ‘कालिया’, ‘याराना’, ‘बरसात की एक रात’ या चित्रपटांनी धडाकेबाज कामगिरी केली; तर १९८२ मध्ये ‘सत्ते पे सत्ता’, ‘देशप्रेमी’, ‘नमक हलाल’, ‘खुद्दार’, ‘बेमिसाल’ आणि दिलीपकुमारसोबत ‘शक्ती’ हे चित्रपट केले.

  • १९८४ ते ८७ या काळात अमिताभ यांनी राजकारणात हात आजमावला. हा त्यांचा खडतर काळ म्हटला तरी चालेल. याच काळात त्यांनी ‘मर्द’, ‘आखरी रास्ता’ हे सुपरहीट चित्रपट दिले; तर ‘कौन जिता कौन हारा’मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका केली.

  • १९८२ मध्येच ‘कूली’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अमिताभ गंभीर जखमी झाले होते. तेव्हा जगभरातील चाहत्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली, नवस केले. जवळपास वर्षभर अमिताभ अंथरुणाला खिळून होते. ते जखमी झालेला शॉट एका कॅप्शनसह चित्रपटात तसाच कॅरी करण्यात आला होता. हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला.

  • १९८८ मध्ये राजकारणातून परतल्यानंतर त्यांनी शहेनशहा चित्रपट केला. त्यालाही प्रेक्षकांनी उचलून धरले. त्याच्या पुढील वर्षी आलेले ‘जादूगर’, ‘तुफान’ आणि ‘मैं आझाद हूँ’ या चित्रपटांना मात्र म्हणावे तसे यश आले नाही.

  • १९९० मध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती ‘अग्निपथ’ची. हा चित्रपट समीक्षकांनाही आवडला होता; पण बॉक्स ऑफिसवर मात्र हा चित्रपट कमाल दाखवू शकला नाही. पुढे १९९२ मध्ये ‘खुदा गवाह’ प्रदर्शित झाला आणि अमिताभला निवृत्तीचे वेध लागले.

  • अमिताभने १९९६ मध्ये ‘एबीसीएल’ ही प्रॉडक्शन कंपनी स्थापन केली.

  • त्याद्वारे चित्रपटांचे वितरण, निर्मिती, मार्केटिंग सुरू केले. एका टॅलेंट हंटद्वारे शोधलेल्या अर्शद वारसी आणि सिमरनला घेऊन ‘तेरे मेरे सपने’ हा चित्रपट काढला.

  • १९९७ मध्ये त्यांनी ‘मृत्युदाता’द्वारे कमबॅक करण्याचा प्रयत्न केला; पण पुन्हा यशाने त्यांना हुलकावणी दिली. तत्पूर्वी १९९६ मध्ये बेगळूरु येथे मिस इंडिया स्पर्धा आयोजनाचे काम केले; पण त्यांच्या कंपनीला कोट्यवधींचे नुकसान झाले. त्यामुळे त्यांच्या कंपनीचे दिवाळे निघाले.

  • कर्जबाजारी झालेल्या अमिताभ यांचे व्याजाखातर दोन फ्लॅट जप्त करण्यात आले. ही त्यांच्यासाठी मानहानीकारक गोष्ट होती. याच काळात मात्र ‘बडे मियां, छोटे मियां’ आणि ‘मेजरसाब’ या चित्रपट गाजले.

  • १९९९ हे वर्ष अमिताभ यांच्यासाठी ‘सूर्यवंशम’, ‘लाल बादशहा’ आणि ‘हिंदुस्तान की कसम’ या चित्रपटांनी बरे ठरले. याचदरम्यान त्यांनी ‘मोहब्बतें’द्वारे आपल्या कारकिर्दीला नवे वळण दिले. ‘एक रिश्ता’, ‘बागबान’, ‘कभी खुशी कभी गम’ असे नव्या धाटणीचे चित्रपट त्यांनी केले. याशिवाय ‘अक्स’, ‘आँखे’, ‘काँटे’ हेही याच काळात आले.

  • यानंतरचा मोठा ब्रेक म्हणजे संजय लिला भन्साळींचा ‘ब्लॅक’. या चित्रपटाने बच्चन यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्म फेअर मिळवून दिला. यासोबत ‘बंटी और बबली’, ‘सरकार’ हे यशस्वी चित्रपट केले.

  • ‘निःशब्द’ आणि ‘एकलव्य’ या चित्रपटांसाठी त्यांना भयंकर टीकेचा सामना करावा लागला; मात्र ‘चिनी कम’ चित्रपटाने परत एकदा ते कौतुकास पात्र ठरले. ‘शोले’चा रिमेक बनवण्याची घोडचूकही त्यांच्या हातून झाली.

  • ‘पा’ या चित्रपटाचा उल्लेख केल्याशिवाय हा आढावा पूर्ण होणार नाही. ‘पा’साठी त्यांना आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. काही आंतरराष्ट्रीय चित्रपटांतही त्यांनी काम केले. ‘द ग्रेट गॅटस्बी’ हा त्यापैकी एक.

  • ‘पिकू’, ‘पिंक’ या चित्रपटांनी त्यांचा मान वाढवला. त्यांचा हा प्रवास आजच्या रणबीरसारख्या युवा नटाबरोबरही तितक्याच जोशाने सुरू आहे. ‘ब्रह्मास्त्र’ हे त्याचेच उदाहरण आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ने त्यांच्या कारकिर्दीत मोठी साथ दिली. या शोमुळे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि यापुढेही मिळत राहील.

  • भारतीय चित्रपट सृष्टीत लेखकांना आपल्यासाठी खास भूमिका लिहायला भाग पाडले ते अमिताभ यांनीच. ज्या वयात लोक आपण काय करत होतो हेही विसरून जातात, त्या वयात हा चिरतरुण नट वेगवेगळ्या भूमिका साकारत आहे. आजही ते ८ वाजताचा कॉल टाईम, असेल तर १५ मिनिटे आधी सेटवर उपस्थित असतात. हे यश त्यांना सहज मिळाले नाही. त्यांनी आजवर अनेक आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक, शारीरिक संकटांचा सामना केला आहे. या नटाकडून भविष्यातही आपल्याला कलेचे खास नमुने पाहायला मिळोत ही सदिच्छा...

(लेखक प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com