मुलांना द्या सकारात्मक प्रेरणा

शिवराज गोर्ले
सोमवार, 10 जून 2019

मुलांमध्ये नकारात्मक प्रेरणा निर्माण झाल्या तर या प्रेरणेचे मानसिक परिणाम नकारात्मक असतात. मुलांच्या हातून चांगल्या गोष्टी व्हाव्यात असं वाटत असेल तर त्यांना सकारात्मक प्रेरणाच द्यायला हव्यात. त्यातून नक्कीच सकारात्मक घडेल, हा विश्‍वास बाळगायला हवा.’

बालक-पालक
मुलं लहान असतात, हे जितकं खरं, तितकं ती सतत मोठी होत असतात हेही खरं. अशा मोठ्या होणाऱ्या लहान मुलांशी पालक कसे वागत असतात? डॉ. आरती व डॉ. अतुल अभ्यंकर या संदर्भात हे निदर्शनास आणतात की, ‘मुलांना ती लहान (आणि त्यामुळे अकार्यक्षम) आहेत याची सतत आठवण करून दिली जाते. ‘तू नको करू ते, तुला नाही येणार’ अशा वाक्‍यातून ‘आपली क्षमता कमी आहे. आपण मोठ्यांवरच अवलंबून आहोत’ याच गोष्टी मूल शिकतं. ही भावना त्यांच्या मनात साधारण सहा वर्षांपर्यंत पक्की रुजत असतानाच अचानक सर्व बाजूंनी अपेक्षांचा भडिमार सुरू होतो. मुलांची प्रतिक्रिया ‘मला नाही जमणार’ अशी येऊ लागते. 

वास्तविक मुलांची ऊर्जा आणि तिचं व्यक्त होण्याचं स्वरूप पाहता पहिल्या सहा वर्षात मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची मुळं खोल रुजण्याच्या दृष्टीनं जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करायचे. त्यानंतर मुलं रोज करणाऱ्या अद्‌भुत किमया पाहत बसायचं, यातच पालकत्वाचा आनंद दडला आहे. अर्थात हे भान पुढेही ठेवावं लागतंच. कारण पुढे मग अभ्यास, परीक्षा, निकाल... हे सारं सुरू होतं. परीक्षेच्या काळात मुलांच्या मनावर दडपण असतं. त्या काळात मुलांना पालकांकडून धीर हवा असतो. प्रत्यक्षात मात्र पालक सतत टोकत राहतात. चांगले मार्क्‍स मिळाले नाहीत तर काय उपयोग!’ असं अधिकच दडपण देत राहतात. यातून मुलांचा आत्मविश्‍वास अधिकच डळमळीत होतो. 

‘मुलांना द्या सकारात्मक प्रेरणा’ असं आवाहन करताना डॉ. श्रुती पानसे यांनी म्हटलं आहे, ‘दहावीच्या वयापर्यंत आली तरी मुलं लहानच असतात. आपले आई-बाबा जसे आपल्याला समजतात, तसेच आपण आहोत अशी समजूत जी लहान वयापासून सुरू झालेली असते, ती अजूनही चालू असते. छोटी मुलं पालकांवर विश्‍वास ठेवतात. त्यातून त्यांचं मन घडत असतं. मोठं होण्याच्या काळात जर ‘किती मठ्ठ आहेस तू’ अशी बोलणी ऐकावी लागली तर मुलं संभ्रमात पडतात. मुलांची स्व-प्रतिमा दृढ होण्याचा हा काळ असतो. अशा वेळी मुलांच्या व्यक्तिमत्त्वातले दोष वास्तविक पद्धतीनं योग्य शब्दांत सांगण्याची गरज असते. मुलांमध्ये नकारात्मक प्रेरणा निर्माण झाल्या तर या प्रेरणेचे मानसिक परिणाम नकारात्मक असतात. मुलांच्या हातून चांगल्या गोष्टी व्हाव्यात असं वाटत असेल तर त्यांना सकारात्मक प्रेरणाच द्यायला हव्यात. त्यातून नक्कीच सकारात्मक घडेल, हा विश्‍वास बाळगायला हवा.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give children positive motivation