एकेकाळी चिखल, मातीपासून संरक्षण करणारा डॅशबोर्ड हा एआय तंत्रज्ञानाने व्यापला जाईल, याची कल्पनाही केली नसेल. घोडागाडीपासून ते टचस्क्रीनपर्यंतचा डॅशबोर्डचा प्रवास हा आश्चर्यकारक आहेच, त्याचवेळी तो एक स्मार्ट सोबती ठरत आहे..डॅशबोर्डच्या पोटात अनेक गोष्टी सामावलेल्या असून, त्याचा गरजेनुसार चालक वापर करत असतो. मग हवामानाचा अंदाज असो किंवा इंधनाची स्थिती जाणून घ्यायची असो. रस्ता कसा असेल हे सांगणे डॅशबोर्डचे काम नाही; पण तो त्या मार्गावरून जाण्यासाठी तुमच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम करतो..तांत्रिक आघाडीवर मोटारीतील आतल्या रचनेतील बदल हा अधिकाधिक ग्राहकाभिमुख ठरत आहे. यापैकीच डॅशबोर्डचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. हायब्रीड, सीएनजी, इंधन, ईव्ही यांसारख्या विविध श्रेणीतील मोटारीतील डिजिटल डॅशबोर्डमुळे वेगळा, समृद्ध आणि संस्मरणीय प्रवासाचा अनुभव चालकाच्या गाठीशी राहत आहे.पूर्वी इंजिनची कार्यक्षमता आणि वेगावर चर्चा होत असे, पण आता वाहनप्रेमी मायलेज, यूजर इंटरफेस आणि डिजिटल डॅशबोर्डच्या वैशिष्ट्यांवर उत्सुकतेने बोलताना दिसतात. डिजिटल डॅशबोर्डचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बदलाची संधी आणि कस्टमायजेशन. ॲनालॉग डॅशबोर्डमध्ये ठरावीक वेळापत्रकाप्रमाणे काम पार पाडली जातात, तर डिजिटल पॅनेल्स थीम, रंग, बाहेरील हवामान यानुसार बदलू शकतात..नेव्हिगेशन, फ्युएल इकॉनॉमी, बॅटरी रेंज, वाहनाचे डायग्नॉस्टिक्स यासारखी रीअल-टाइम माहिती आता एका क्षणात पाहावयास मिळते. काही डॅशबोडॅ टचस्क्रीनचे असून, व्हॉइस कमांडद्वारे ते नियंत्रित करता येतात. साहजिकच गाडी चालवताना चालकाला बटणांशी खेळण्याची गरज राहिलेली नाही. प्रत्येक इन्फोटेनमेंट सिस्टमची कार्यशैली वेगळी आहे. एकूणात स्मार्ट डिस्प्ले हा ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक सुरक्षित आणि सुलभ करताना दिसत आहे.गाडी चालकाला एकाचवेळी अनेक फंक्शन्स हाताळता येतात. डॅशबोर्डमधील इनबिल्ट सेन्सर्स आणि प्रोसेसर चालकाला अचूक आणि विश्वासार्ह माहिती देतात. उच्च-प्रतीचे पॅनेल्स हे कोणत्याही वेळेत अगदी ठळकपणे दिसतात आणि त्याचा डोळ्याला त्रासही होत नाही. चालकाला हवे असल्यास एका स्क्रीनवर अनेक फंक्शन्स पाहता येणेदेखील शक्य असते. आता तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहभागामुळे डॅशबोर्ड क्षेत्रात नवकल्पनांना उभारी येण्याची शक्यता आहे..नवा अवतार होलोग्राफिक डिस्प्लेवाहनांच्या स्वरूपात बदल होत आहे. मोटारीतील डॅशबोर्डचा पारंपरिक चेहरा बदलत आहे. येत्या काही वर्षांत चालकासमोरची काचच (विंडशील्ड) माहिती दाखवणारा होलोग्राफिक डिस्प्लेचे रूप धारण करणार आहे. काही महिन्यांपूर्वी लास वेगास येथे झालेल्या ‘कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक शो २०२५’मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय वाहन कंपन्यांनी नावीन्यपूर्ण डॅशबोर्ड तंत्रज्ञान सादर केले..हुंदाई मोबिजने संपूर्ण विंडशील्ड व्यापणारी होलोग्राफिक डिस्प्ले प्रणाली सादर केली. यात गाडीचा वेग, दिशा, सुरक्षा इशारा देणारी प्रणाली तसेच मनोरंजनाची माहिती पाहावयास मिळते. ही प्रणाली प्रवाशांना दिसते; पण चालकाला दिसत नाही. साहजिकच चालकाचे लक्ष विचलित होत नाही.बीएमडब्ल्यूने त्यांच्या नवीन आय ड्राईव्ह पॅनोरॅमिक डिस्प्ले सादर केला आणि तो गाडीच्या खालच्या काचेवर माहिती दर्शविणारा होता. यात चालकाला आवश्यक तेवढीच माहिती दिसते, त्यामुळे स्क्रीनवरील गर्दी कमी होते. तज्ज्ञांच्या मते, आधुनिक डिस्प्ले तंत्रज्ञानाने चालकाचे लक्ष विचलित न होणे महत्त्वाचे आहे. ‘इन्शूरन्स इन्स्टिट्यूट फॉर हायवे सेफ्टी’चे संशोधक इयान रेगन यांच्या म्हणण्यानुसार, खूप आकर्षक आणि मोठे डिस्प्ले कधीकधी चालकाचे लक्ष विचलित करू शकतात..त्यामुळे वाहन उत्पादकांनी किमान पण गरजेची माहिती दाखवणाऱ्या डिस्प्लेवर भर द्यायला हवा. होलोग्राफिक डिस्प्ले पुढील काही वर्षांत उच्च दर्जाच्या (लक्झरी) मोटारीत प्रथम उपलब्ध होतील, असा अंदाज आहे. शिवाय एआय ऑगमेंटेड रिॲलिटी आणि वैयक्तिक सॉफ्टवेअर अपडेट्सचा वापर वाढेल. गाडीचा डॅशबोर्ड आता फक्त नियंत्रण साधन राहिलेला नाही, तर तो स्मार्ट लिव्हिंग स्पेसचा भाग बनत आहे. भविष्यात, गाडीच्या आतले बटण आणि स्क्रीन दिसणार नाहीत. कारण डॅशबोर्ड प्रकाश रूपातून थेट काचेतच प्रकट होणार आहे..डॅशबोर्डच्या सॉफ्टवेअरवर नियंत्रण कोणाचे?डॅशबोर्डमध्ये वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरवर नियंत्रण कोणत्या कंपनीचे राहील, यावरून स्पर्धा सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी याविषयीच्या बातम्या माध्यमांत आल्या. त्याचा संदर्भ घेतला असता ॲपल कंपनी ही नवीन कार प्ले अल्ट्रा प्रणाली वापरून डॅशबोर्डवर वर्चस्व मिळवत असल्याचा दावा केला गेला. या प्रयत्नाला जगातील अनेक प्रमुख वाहन कंपन्यांचा विरोध केला.सध्यातरी कार प्ले अल्ट्रा प्रणाली बसवण्याचा कोणताही विचार नसल्याचे या कंपन्यांनी स्पष्ट केले. कार प्ले अल्ट्रा प्रणालीद्वारे आयफोन केवळ संगीत आणि नकाशेच नाही, तर वाहनातील इंधन वापर, गती, तापमान यांसारखी माहितीही थेट डॅशबोर्डवर दिसणार आहे. म्हणजेच ॲपलच्या सॉफ्टवेअरद्वारे चालकाला डॅशबोर्ड नियंत्रित करता येणार आहे; पण काही कंपन्यांना वाटते की या प्रणालीत गरजेपेक्षा अधिक हस्तक्षेप होऊ शकतो..तसेच मर्सिडिझ बेंझ, बीएमडब्लू आणि ऑडीसारख्या कंपन्या स्वतःचे इन्फोटेन्मेंट सिस्टीम विकसित करत आहेत. कारण त्यांना डिजिटल सेवांमधून अतिरिक्त उत्पन्न मिळवायचे आहे. तज्ज्ञांच्या मते, तंत्रज्ञान कंपन्या आणि मोटार उत्पादक यांच्यातील संघर्ष आता चालकाच्या अनुभवावर नियंत्रण कोणाचे राहील, या प्रश्नाभोवती फिरणार आहे.ॲपलने कारप्ले अल्ट्रा प्रणालीद्वारे आयफोनचा अनुभव मोटारीत आणण्याचा प्रयत्न केला असला तरी, अन्य मोठ्या मोटार ब्रँड्सना स्वतंत्र ओळख जपायची आहे. त्यामुळे आगामी वर्षांत मोटारीमधील सॉफ्टवेअर नियंत्रण ही सर्वात मोठी स्पर्धा ठरणार आहे.भविष्यात मोटार कंपन्या स्वतःचे अॅप विकसित करणार असून ते स्मार्टफोनसारखे वाहनावर नियंत्रण ठेवणारे असेल. एकंदरीतच पारंपरिक डॅशबोर्ड इतिहासजमा होत आहे; गाड्यांचा आतला परिसर संपूर्ण डिजिटल आणि इंटरेक्टिव्ह होत आहे. आवाज, जेस्चर, टचस्क्रीन आणि एआय साहायकमुळे गाडी चालविणे अधिक ‘स्मार्ट’ झाले आहे..बदलणारा डॅशबोर्डडॅशबोर्डचा इतिहास घोडागाडीपासून ते आधुनिक डिजिटल डिस्प्लेपर्यंतचा आहे. डॅशबोर्ड हे नाव घोडागाडीतील संरक्षक फळीवरून आले आणि ते चिखल आणि धूळ रोखाण्याचे काम करायचे. कालांतराने हा शब्द वाहनांच्या नियंत्रण पॅनेलसाठी प्रचलित झाला. डॅशबोर्ड हे नाव ‘dash (वेगाने पुढे जाणे) आणि board (फळी किंवा पट्टी) यांच्या संयोजनातून आले.घोड्यांच्या पायांमुळे उडणारा चिखल आणि धूळ रोखण्याचे काम हा डॅशबोर्ड करायचा. म्हणून त्याला डॅशबोर्ड असे नाव पडले. जेव्हा चारचाकी वाहनांचे आगमन झाले, तेव्हा हा शब्द चालकासमोरील नियंत्रण पॅनेलसाठी वापरला जाऊ लागला.जुन्या वाहनांतील डॅशबोर्ड साधा, फक्त गतिमापक, इंधनमापक आणि काही स्विच इतकाच मर्यादित असायचा. आज मात्र बहुतांश गाड्यांमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टचस्क्रीन डिस्प्ले, नेव्हिगेशन सिस्टीम, ब्लूटूथ आणि अँड्रॉइड ऑटो किंवा अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसारख्या सुविधा आहेत..बहुपयोगी डॅशबोर्डडॅशबोर्ड ही संकल्पना संरक्षणासाठी वापरली जात असली तरी पुढे हाच डॅशबोर्ड आधुनिक तंत्रज्ञानाचे केंद्र ठरला. १९७०च्या दशकांतील मोटारीचे डॅशबोर्ड अगदी साधे असायचे; पण १९८०च्या दशकाच्या प्रारंभी काही गाड्यांच्या डॅशबोर्डमध्ये इलेक्ट्रॉनिक मीटर आणि डिजिटल घड्याळ येऊ लागले.काही मॉडेल्समध्ये सेंट्रल लॉक, एसी नियंत्रण आणि रेडिओ सिस्टीम डॅशबोर्डमध्ये बसवली गेली. २०००च्या दशकात डॅशबोर्डमध्ये सीडी किंवा डिव्हीडी प्लेअर, टच बटन्स आणि काही ठिकाणी लहान डिस्प्ले स्क्रीन आले. एअरबॅग सिस्टीम, डिजिटल ओडोमीटर आणि म्युझिक कंट्रोल्स जोडल्याने डॅशबोर्ड अधिक फंक्शनल बनला. २०१०च्या दशकात डॅशबोर्डने डिजिटल रूप घेतले..यात टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, ब्लूटूथ, नेव्हिगेशन आणि रिव्हर्स कॅमेरा डिस्प्ले सामान्य झाले. ॲम्बियंट लाइटिंग आणि सॉफ्ट टच मटेरियलमुळे डॅशबोर्डचा लूक अधिक आकर्षक बनला. आता भविष्यात डॅशबोर्डमध्ये ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर) डिस्प्ले, होलोग्राफिक प्रोजेक्शन आणि एआय आधारित इंटरफेसचा वापर होणे अपेक्षित आहे. ॲपल कार प्ले आणि अँड्रॉईड ऑटोसारख्या फीचर्समुळे हँड्स-फ्री कॉलिंग, मेसेजिंग आणि मीडिया ॲक्सेस शक्य झाले आहे..स्मार्ट डॅशबोर्डमुळे जागेवर परिणामबदलत्या डॅशबोर्डमुळे प्रत्यक्षात वाहनाच्या आतील जागा फारशी मोठी झाली नाही, पण ती अधिक मोकळी, प्रशस्त आणि आरामदायक वाटते. यामागची अनेक कारणे आहेत. कॉम्पॅक्ट डिझाइन आणि इलेक्ट्रॉनिक घटक. कमी बटणं, फ्लोटिंग टचस्क्रीन आणि सरळ रेषेत डिझाइनमुळे केबिन मोकळी दिसते. त्यामुळे चालक आणि प्रवाशांना अधिक जागा असल्याचे वाटते. ईव्हीमध्ये इंजिन नसल्याने डॅशबोर्ड पुढे नेणे शक्य झाले. साहजिकच प्रत्यक्षात काही इंचांनी जागा वाढली आहे..डॅशबोर्डमध्ये काय असते?स्पीडोमीटर : वाहनाचा वेग दाखवतोटॅकोमीटर : इंजिनचे आरपीएम (रिव्हॉल्यूशन प्रति मिनिट) दाखवतो.ओडोमीटर : वाहनाने आजपर्यंत केलेल्या एकूण प्रवासाचे अंतर दाखवणारे उपकरण.ट्रिपमीटर : हे उपकरण वाहनाच्या विशिष्ट प्रवासाचे अंतर मोजण्यासाठी वापरतात.गिअर इंडिकेटर : कोणता गिअर वापरला आहे हे दाखवतो (ऑटोमॅटिकमध्ये जास्त वापरले जाते).फ्युअल गेज : इंधनाची पातळी दाखवतो.इंजिन टेंमरेचर गेज (gauge) : इंजिनचे तापमान दाखवतो.कुलंट किंवा इंजिन वॉर्निंग लाइट : कुलंट किंवा इंजिनमध्ये बिघाड झाल्यास इशारा देतो.सीट बेल्ट इंडिकेटर : सीट बेल्ट न घातल्यास अलर्ट देतो.एअरबॅग वॉर्निंग लाइट : एअरबॅग सिस्टीममध्ये समस्या असल्यास दाखवतो.एबीएस लाइट : ब्रेक सिस्टीममध्ये त्रुटी असल्यास.इंजिन चेक लाइट : इंजिनमध्ये काही बिघाड असल्यास.डोअर किंवा बुट ॲलर्ट : दरवाजा किंवा डिकी उघडी असल्यास.बॅटरी इंडिकेटर : बॅटरी चार्जिंगमध्ये समस्या असल्यास.ऑइल प्रेशर लाइट : इंजिन ऑइल कमी असल्यास किंवा दाब कमी असल्यास.अन्य सुविधा : क्लायमेंट कंट्रोल, एसी डिस्प्ले, हेडलाइट, फॉग लाइट इंडिकेटर्स, वायपर इंडिकेटर्स, ड्राइव्ह मोड सिलेक्शन (इको, स्पोर्ट, नॉर्मल).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.