- स्मिता देव, saptrang@esakal.com
माझी आजी अन्नपूर्णा होतीच, पण स्वयंपाकाच्या रितीभातींबद्दल तिचे ठाम नियमही होते. त्या वेळी उगाच रागावते असं वाटायचं; पण आता माझ्या स्वयंपाकघरात काम करताना तिची त्यामागची भावना मला कळते. तिचं कर्नाटकी वळण अजूनही माझ्या हाताला आहे. त्यातले अनेक चविष्ट पदार्थ माझ्या खाद्यविश्वात अढळ स्थान मिळवून बसलेत!
माझी ‘अम्मा’ अगदी ‘टिपिकल’ प्रेमळ आजी होती. इतर कुणाच्याही आजीसारखी! अंगानं थोडी स्थूलच. नऊवारी नेसणारी. फावल्या वेळात आमच्यासाठी जुन्या साड्यांच्या गोधड्या शिवणारी. मला त्यानंतर तितकं मऊ पांघरूण दुसरं मिळालेलं नाही. का कोण जाणे, पण तिच्या त्या गोधड्यांना तिच्या फेस पावडरचा मंद वास येई. ‘क्युटिक्युरा’ नावाची पावडर ती वापरत असे.