book review bhartiy nyay sanhita
Esakal
ॲड. नितीन देशपांडे
saptarang@esakal.com
सर्वसामान्य माणसाला कायद्याची नको इतकी भीती बसलेली आहे. याचं मूलभूत कारण कायद्याविषयी असलेली अपुरी माहिती. कायद्याची कलमे इंग्रजीत व क्लिष्ट भाषेत असतात, हाही एक महत्त्वाचा भाग आहेच. ती कलमे वाचून सहसा सामान्य माणसांना पचकन काही अर्थबोध होत नाही. म्हणूनच त्यावर भाष्य करणाऱ्या, ते सोप्या भाषेत समजून सांगणाऱ्या पुस्तकांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
कायद्याच्या भाषेला न्यायालये एक प्रकारे अर्थ, अधिष्ठान प्राप्त करून देतात आणि त्यामुळे न्यायप्रक्रिया सोपी होते. त्यावेळी योग्य तसा अर्थ लावण्यासाठी आवश्यक ती सामग्री वकील पुरवतात. यासाठी वकिलांकडे फारच कमी वेळ असतो. कायद्यावरचे भाष्य वकील व न्यायाधीश यांना न्यायदानासाठी आवश्यक ती सामग्री मिळवण्यासाठी दिशा देतात. त्या दृष्टीने डॅा. नितीश नवसागरे यांनी सोप्या इंग्रजीत लिहिलेल्या भारतीय न्यायसंहितेवरील भाष्याला महत्त्व आहे. ही संहिता कालपर्यंत अंमलात असलेल्या भारतीय दंडसंहितेच्या जागी आली आहे. अशा नव्याने अंमलात आलेल्या कायद्यावर टीका लिहिणे तसे सोपे काम नाही. कारण, जुन्या कायद्याच्या तरतुदींना लागू असलेले भाष्य नव्या तरतुदींना लागू पडेल का, यावर खोलवर विचार करावा लागतो. तो विचार खोलवर करून मगच लेखकाने लिखाण केल्याचे प्रकर्षाने जाणवते.