'व्यायामामुळं सकारात्मक ऊर्जा' (हार्दिक जोशी)

hardik joshi
hardik joshi

तुम्ही कितीही खाल्लं, तरी जेवढं खाता तितका वर्कआऊट कराल, तेव्हा तुमचं शरीर जास्त सुदृढ राहील आणि प्रत्येकानं स्वतःच्या चयापचय क्रियेनुसार वर्कआऊट करावं. व्यायाम केल्यानं आपण तंदुरस्त राहतो, शिवाय प्रत्येक दिवस कसा आपल्याला फ्रेश वाटतो. त्यामुळं दिवसातून एक-दीड तास तरी प्रत्येकानं व्यायामाला देणं आवश्‍यक आहे.

आज आपलं जीवन खूपच धावपळीचं आणि धकाधकीचं झालं आहे. माणसाला दररोज कसलं ना कसलं तरी टेन्शन आणि विवंचना आहेत. अशा धावपळीच्या जीवनात व्यायाम खूप आवश्‍यक आहे. व्यायाम केल्यानं आपण तंदुरस्त राहतो, शिवाय प्रत्येक दिवस कसा आपल्याला फ्रेश वाटतो. त्यामुळं दिवसातून एक-दीड तास तरी प्रत्येकानं व्यायामाला देणं आवश्‍यक आहे. आज ती खूप गरज झाली आहे. मग सकाळी लवकर उठून व्यायाम करा किंवा संध्याकाळी करा. ज्याला जसा वेळ मिळेल, तसा व्यायाम करणं आवश्‍यक आहे. कुणी सकाळी चालतो किंवा योगासनं करतो, तर कुणी जीममध्ये जाऊन वर्कआऊट करतो. अर्थात ज्याला जमेल तसं त्यानं आपलं शरीर "फिट अँड फाइन' ठेवलं पाहिजे. मी वयाच्या नवव्या वर्षांपासून व्यायाम करतो आहे. मला पहिल्यापासूनच व्यायामाची आवड आहे. पहिल्यांदा मी छोट्या- मोठ्या भूमिका करीत होतो; परंतु "तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत राणादाची भूमिका मला ऑफर झाली आणि माझी व्यायामाची गती आणखी वाढली. त्यामुळं मी नियमित व्यायाम करायला लागलो.

व्यायाम कधीही चुकवत नाही
एक ते दोन तास माझी व्यायामासाठीची वेळ ठरलेली असते. मी व्यायाम कधीही चुकवत नाही. माझ्यासाठी व्यायाम फारच महत्त्वाचा आहे. मालिकेत मी एका पैलवानाची भूमिका करतो आहे. या भूमिकेसाठी मला वजन कमी-जास्त करावं लागलं. सुरवातीला मला या भूमिकेसाठी 23 किलो वजन वाढवावं लागलं होतं. यासाठी विनोद चन्ना यांनी मला ट्रेनिंग दिलं. वांद्रे इथल्या जिममध्ये विनोद सरांनी मला ट्रेन केलं. या भूमिकेसाठी मी तयार होत असताना जवळजवळ पाच तास तरी व्यायाम करायचो. हेवी वेट ट्रेनिंग, फंक्‍शनल ट्रेनिंग असायचं, त्याचबरोबर मी योगा देखील करायचो. सकाळी दहा वाजता मी जिममध्ये जायचो. त्यानंतर दहा ते अकरापर्यंत मी वर्कआऊट करायचो. नंतर एखाद प्रोटिन मिल घेतल्यानंतर थोडा आराम करून परत एकदा योगासनाकडं मी जास्त लक्ष द्यायचो. योगासनानंतर दुपारचं जेवण करायचो. दुपारच्या जेवणात सहसा प्रोटिन डाएट असायचं. वरण-भात असं जेवण काही दिवस बंदच होतं. केळी, रताळी, सफरचंद हे सगळं माझ्या डाएटमध्ये समाविष्ट असायचं. त्यानंतर संध्याकाळी चिकन सूप घ्यायचो. रात्रीचं जेवणही मी बंद केलं होतं. रात्री फक्‍त सलाड आणि प्रोटिन मिल घ्यायचो. आताही मी रात्री जेवत नाही. जेवढं जास्त पाणी पिता येईल तेवढं पाणी प्यायचो. तीन ते चार लिटर तरी पाणी शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे. वजन वाढवण्याबरोबरच मी वजन कमीही केलं. वजन कमी करताना शरीरावर जास्त फरक पडत नाही. जेवढं आपण खातो, तेवढं वर्कआऊट केलं तर मला नाही वाटत शरीरावर त्यांचा परिणाम होतो. कारण वजन कमी करताना शरीरयष्टी तशीच असते आणि फक्‍त वजन कमी होत असतं आणि शरीरातील फॅट्‌स फक्त कमी होत असतात. या सगळ्या गोष्टींसाठी कोणी तरी चांगला ट्रेनर असेल, तर आपल्या शरीराराला काही फरक पडत नाही.

जिममुळं सकारात्मक ऊर्जा
आताही माझा व्यायाम तेवढाच असतो. दिवसातून दीड-दोन तास व्यायाम करतो. मी व्यायामाच्या बाबतीत कोणतीही तडजोड करत नाही. मला आता ही वजन आणि शरिरयष्टी तशीत ठेवायची आहे त्यामुळे मी त्यासाठी जे वर्कआऊट असतील तेच करतो आहे. मी कितीही थकलेला असलेला असलो, तरी जिममध्ये जातो आणि जिममध्ये गेल्यानंतर मला फ्रेश वाटतं. माझा थकवा सगळा निघून जातो. माझ्यात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. कार्डिओ मी जास्त करत नाही. व्यायामाची माझी वेळ अशी काही ठरलेली नाही. जस चित्रीकरण संपेल तसं मी व्यायाम करतो. चित्रीकरण केव्हाही संपलं, तरी वर्कआऊटसाठी ट्रेनर मला ट्रेन करायला हजर असतात. कोल्हापुरात चित्रीकरण सुरू असताना जवळच्याच जिममध्ये मी जातो. "मसल जेनेट' आणि "मसल ट्री' अशा दोन जिममध्ये मी वर्कआऊट करतो. तिथं मला सुनील मकदूम हे माझे पर्सनल ट्रेनर मला ट्रेन करतात. मला अभिजीत ठोंबरे आणि प्रशांत सर या दोघांची या सगळ्यात मला खूप मदत होते.

एक डझन उकडलेली अंडी
मी चित्रीकरण सुरू असताना दररोज सकाळी अर्धा लिटर दूध पितो. दिवसभरात एक डझन उकडलेली अंडी खातो. भात मी अजिबातच खात नाही. भात खावासा वाटला, तर मी ब्राऊन राईस खातो. त्याबरोबर दिवसातून दोन ते तीन वेळा चिकन खातो. तेलकट पदार्थ जास्त करून टाळतो. मी अर्धा ते पाऊण लिटर ताक पितो. रात्री प्रोटिन शेक पितो आणि फळं खातो. असा माझा आत्ताचा दिनकर्म आहे. घरी गेल्यावर मात्र मी सगळं खातो. डाळ, भात, तूर, लोणचं असं सगळं खातो. घरी सगळा सकस आहार घेतो. पुरणपोळ्या मला खूप आवडतात. एकाच वेळी मी कितीही खाऊ शकतो. तुम्ही कितीही खाल्लं तरी हरकत नाही. मात्र, जेवढं खाता तेवढा जास्त वर्कआऊट केलात, तर तुमचं शरीर जास्त सुदृढ राहील. प्रत्येकानं स्वतःच्या चयापचय क्रियेनुसार वर्कआऊट करावं एवढंच मी प्रेक्षकांना सांगेन. आता मी "तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतला राणा म्हणून मला प्रेक्षक ओळखतात. त्यामुळं या भूमिकेत प्रेक्षक मला एक कुस्तीपटू म्हणून बघतात. त्यामुळं मी माझी भूमिकेतली खरी शरीरयष्टी प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.
(शब्दांकन ः स्नेहल सांबरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com