#MokaleVha : ‘त्या’ शोषणातून झालो समलैंगिक

- सुचेता कदम 
रविवार, 8 डिसेंबर 2019

‘त्या’ शोषणातून झालो समलैंगिक
माझे वय २७ असून, मी समलैंगिक आहे. मी अजून शिक्षण घेत आहे. मी समलैंगिक आहे हे समजल्यापासून माझी खूप घुसमट होत आहे. वयाच्या १४ व्या वर्षी एका मुलाने माझे लैंगिक शोषण केले. मी कुणाला सांगू शकलो नाही. त्यानंतर त्याची मला इतकी सवय झाली की, माझा अभ्यास होत नाही. बारावी होऊन माझ्याकडे मोबाईल आला, त्या वेळी मला जाणवायला लागले की मला मुले आवडतात.

‘त्या’ शोषणातून झालो समलैंगिक
माझे वय २७ असून, मी समलैंगिक आहे. मी अजून शिक्षण घेत आहे. मी समलैंगिक आहे हे समजल्यापासून माझी खूप घुसमट होत आहे. वयाच्या १४ व्या वर्षी एका मुलाने माझे लैंगिक शोषण केले. मी कुणाला सांगू शकलो नाही. त्यानंतर त्याची मला इतकी सवय झाली की, माझा अभ्यास होत नाही. बारावी होऊन माझ्याकडे मोबाईल आला, त्या वेळी मला जाणवायला लागले की मला मुले आवडतात. आई-वडील, कुटुंब, नातेवाईक सगळ्यांना डावलून कोणत्या तरी समलैंगिक मुलासोबत एकत्र राहावे असे वाटते. माझे चुकत आहे हे समजते, पण उमजत नाही. मी आजपर्यंत फक्त आणि फक्त वासनेच्या विचारांनी गुरफटून गेलो आहे. त्यामुळे मी अभ्यास करतो, पण मन सतत हाच विचार करत असते की, माझा असा कोणीतरी हवा, जो सगळ्या गोष्टींमध्ये साथ देईल. मला माझे अस्तित्व हवे आहे. मला माझे भविष्यपण चांगले हवे आहे. फक्त क्षणिक सुखासाठी मी घर सोडून जाणे, कोणासोबत राहणे हा विचार सोडून माझ्या अभ्यासाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करू शकेल, असे काहीतरी सुचवावे.

  - लहान वयात लैंगिक शोषणाचा अनुभव आल्यामुळे व त्याबाबत कोणाशीच न बोलल्यामुळे अज्ञान, गैरसमजूत यातून काही चुकीचे विचार तुमच्यात दृढ झालेले दिसून येतात. कोणतीही सवय ही आपल्या इच्छेशिवाय लागू शकत नाही. ज्या सवयीमुळे मोठ्या प्रमाणात शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक त्रास होत असल्याची जाणीव असूनही त्या सवयीत बदल करणे शक्‍य होत नाही. अशा सवयींना व्यसन म्हणतात. व्यसन खूप चटकन लागते. ते सोडविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. व्यसनापासून मुक्त होण्याचा निर्धार टिकून राहण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज असते. सर्वप्रथम आपण व्यसनात अडकलो आहोत व त्यातून बाहेर पडण्यासाठी स्वतःच वेगळे प्रयत्न करावे लागतील हे लक्षात घ्या. चुकीच्या सवयींना खतपाणी घालणारे मोबाईलवरील अॅ्प्स बंद करा. वयाच्या २७ व्या वर्षी स्वतःच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी कुटुंबावर अवलंबून न राहता स्वतःच्या उत्पन्नासाठी काम शोधणे तसेच त्यासोबत शिक्षणही घेऊ शकता. आपला वेळ जास्तीत जास्त चांगल्या कामामध्ये लावण्याचा प्रयत्न केला तर निरर्थक विचार मनात येणार नाहीत. त्यासाठी घराबाहेर पडून कष्ट करण्याची तयारी हवी. समाजातील लोकांमध्ये मिसळून जगण्याची कला शिकावी लागेल.

दारू सोडली; पण कुटुंब अजून दूरच
माझे वय ३५ असून, पुण्यात नोकरी करतो. माझ्या घरात निवृत्त आई, चार वर्षांची मुलगी व पत्नी असे चौघे आहोत. लग्न २०१३ मध्ये झाले. सुरुवातीस किरकोळ कारणांवरून वाद झाले की, पत्नी रागाने माहेरी निघून जायची. आम्ही तिला परत आणायचो. कोणतीच कटुता न बाळगता सामोपचाराने विषय संपवायचो. दोन वर्षे सुरळीत चालले. त्यानंतर पुन्हा तिने माहेरी जाण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातून तिला वाचविले. मी दारू प्यायचो, पण तिला कोणताही त्रास देत नव्हतो. काही दिवसांनी पत्नी कोणासही न सांगता माहेरी निघून गेली. मी तिला शिक्षण घेत असलेल्या ठिकाणी भेटायला गेलो तर तिने माझी पोलिस तक्रार केली. आता सासू-सासरे व पत्नी मला एक वर्षे थांबा, मग बघू, असे बोलत आहेत. मी व्यसनमुक्ती केंद्र मुक्तांगणमध्ये जाऊन उपचार घेतले आहेत. दारू पूर्णपणे बंद केली आहे. मी बायको, मुलीसाठी काहीही करण्यास तयार आहे. मला घटस्फोट नको आहे. माझी पत्नी समुपदेशन घेण्यास तयार नाही. मला कुटुंब तुटण्याची खूप भीती वाटते. पत्नीला भेटण्याची खूप इच्छा आहे. पण भेटू शकत नाही. 
 -  तुम्ही व्यसनमुक्ती केंद्र मुक्तांगण येथे उपचार घेताना एक प्रार्थना नक्कीच ऐकली असेल, ‘हे परमेश्‍वरा, जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे सामर्थ्य मला दे. जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्याचे धैर्य मला दे, आणि या दोन्हीतील फरक जाणण्याचे शहाणपण मला दे!’ ही प्रार्थना खऱ्या अर्थाने जगण्याचा भाग म्हणून स्वीकारल्यास अनेक अडचणी‍ योग्य पद्धतीने सोडविण्यास मदत होईल. दारूपासून दूर राहिलो म्हणजे व्यसनमुक्त झालो, असे न म्हणता सातत्याने प्रयत्नशील राहून आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर झालेले दुष्परिणाम, मानसिकतेवरील दुष्परिणाम दूर करण्यासाठी वेगळे प्रयत्न वारंवार करावे लागतात. तुम्ही व्यसनापासून दूर राहिलात हा महत्त्वाचा पहिला टप्पा पार केला आहे, याबद्दल अभिनंदन. परंतू दुसऱ्या टप्प्यातील यशासाठी नियमित व्यायाम, योगा, मेडिटेशन यांचा सराव केला पाहिजे. म्हणजे तुमच्या मानसिकतेत बदल घडून येऊ शकतो. पत्नी नाराज असल्याने अबोला धरून माहेरी गेली ही मनातील भीती प्रथम दूर करा. मनस्वास्थ्य चांगले राहण्यासाठी स्वतःचा रोजचा दिनक्रम- नियमित कामाला जाणे, व्यायाम व मेडिटेशन हा असावा. मी बायको, मुलीसाठी काहीही करायला तयार आहे, असे तुमचेच शब्द आहेत. मग पत्नी एक वर्ष थांबा, असे म्हणते आहे, तर तो वेळ तिला देण्यास काहीच हरकत नाही. तुम्हाला त्यांची आठवण येणे, भेटावेसे वाटणे साहजिकच आहे. परंतू तुमचे प्रयत्न योग्य दिशेने व्हायला हवेत. तुमच्या लहान मुलीला सांभाळणे, तिच्या शाळेसंबंधीची कामे याची जबाबदारी स्वीकारा. मुलीला भेटू दिले नाही तर कोर्टाकडूनही परवानगी मिळवता येते. परंतू अर्थातच मुलगी वयाने लहान असल्याने तुमची मानसिकता, तुमची वर्तणूक, जबाबदारीने वागणे हे सिद्ध व्हावे लागते, तरच परवानगी मिळू शकते. परंतु तुम्ही स्वतःला बदलण्याचा प्रयत्न चालू ठेवून बायको व मुलीला पुन्हा तुमच्यासोबत घेऊन याल, अशी आशा वाटते. 

पत्नी निघाली मानसिक रुग्ण
माझे वय ३० वर्षे असून, लग्नाला एक वर्ष झाले. लग्नात मुलीकडून आमची फसवणूक झाली आहे. मुलीवर मानसिक रुग्ण असल्याचे उपचार चालू आहेत. मी प्रथम वर आहे, तर मुलगी घटस्फोटित आहे. मुलीच्या वडिलांनी पूर्ण माहिती न देता आमची फसवणूक केली. लग्नानंतरचे ३/४ महिने व्यवस्थित गेले. तिचे वडील कधीतरी येऊन तिला दवाखान्यात घेऊन जात व पुन्हा आणून सोडत. आम्हाला वाटले, तब्येतीबाबत काही तक्रारी असू शकतील. एक दिवस मी स्वतः त्यांच्यासोबत गेलो. दवाखान्यात गेल्यानंतर मला धक्का बसला की, मानसोपचार तज्ज्ञांकडून गोळ्या चालू आहेत. तिला आमच्या घरातील कोणतेही काम करण्याची इच्छा नसते. तिच्या डॉक्‍टरांनी मूल होऊ देऊ नका, असा सल्ला दिला आहे. लग्नानंतर ‘आई-बापाच्या जिवावर जगतो’, असेही मला म्हणाली. माझ्या वडिलांना कॅन्सर आहे. त्यामुळे मी आईची काळजी घेतो. याचाही तिला राग येतो. मला घटस्फोट हवा आहे. 
- व्यावहारिक जगात आसपासचे लोक थोड्याशा फायद्यासाठी खोटेपणा करतात. त्या वेळी फसविले गेलो, ही भावना निर्माण होते व नातेसंबंध संपतात. परंतू लग्नाअगोदर जोडप्यांनी एकमेकांची माहिती लपवून ठेवल्यास लग्नानंतर ती कधीतरी उघड होणार, हे कळूनही खोटेपणा केला की वाद होणारच. ३० वर्षांपर्यंत तुमचे लग्न न करण्याचे किंवा न होण्याची काय कारणे आहेत याचा प्रामाणिकपणे विचार करा. अर्थातच मुलीच्या वडिलांनी मुलीच्या मानसिक आजाराबाबत लपवून ठेवायला नको होते. परंतु गोळ्या नियमित घेत असताना सुरवातीचे ४-५ महिने अगदी व्यवस्थित होते, असे तुम्ही सांगितले आहे. आजाराचे नेमके स्वरूप समजावून घेतले व त्यांची कशी काळजी घ्यावी याबाबत जबाबदारीपूर्वक वागलात तर बायकोला समजून घेणे शक्‍य होईल. सर्वच आजारांतील मानसिक रुग्ण त्रासदायक असतातच असे नव्हे. तुमच्या घरातील वडिलांचे आजारपण, आईचे वय व तुमची आर्थिक स्थिती या सर्व बाबींचा तुमच्या पत्नीवरही ताण येऊ शकतो. सद्यस्थितीत स्त्रीने कमावणे ही काळाची गरज झाली आहे. म्हणजे घरातील कामे करायची व बाहेर पडून कमवायचे, असा दुहेरी ताण. मग पुरुषाने घरातील कामे केली तर तिच्यावरील ताण कमी होऊ शकतो. परंतू अजूनही घरातील व्यक्तींची मानसिकता पैसे मिळविण्याचा फायदा हवा, परंतू स्त्रीने घरातील काम नाकारले तर ती वाईट, संसार करायचा नाही, अशी दुषणे मिळतात. घराबाहेर पडून उत्पन्न मिळवता येत नसेल तर अशा व्यक्तीने घरातील सर्व कामांची जबाबदारी घेतली तरी त्याचे मूल्य होऊ शकते. तुम्ही दोघे नवरा बायको म्हणून एकत्रित राहिलात त्या काळातील सर्व घटनांकडे तटस्थपणे पाहा. घटस्फोट झालेल्या मुलीशी लग्न करून तिच्यावर उपकार केले आहेत, या भ्रामक विचारातून बाहेर पडा. परस्परपूरक आयुष्य जगता येणे शक्‍य आहे का? याचा विचार करा. घटस्फोट घ्यायचा असेल तर तो कोर्टात अर्ज करून मागता येऊ शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He Became Homosexual after That exploitation