व्यसन...फक्त कामांचंच

व्यसन
व्यसनsakal

एका व्यक्तीनं एकाच वेळी किती कामं करावीत? त्या ‘नशाबंदी मंडळा’च्या सरचिटणीस आहेत...त्यांनी आंदोलन करून डान्सबार बंद केले...तंबाखूमुक्त शाळांसाठी त्या प्रयत्न करतात...तृतीयपंथीयांच्या पुनर्वसनासाठी त्या कार्यरत आहेत...त्यांनी बालकामगारांसाठी शाळा चालवली...गरिबांच्या आरोग्याच्या प्रश्नावर त्यांचं काम सुरूच आहे...शेतकऱ्यांच्या आंदोलनातही त्या होत्या आणि सध्या ७४ व्या घटनादुरुस्तीच्या निमित्तानं क्षेत्रसभा मजबूत करण्यासाठी त्या मुंबई आणि महाराष्ट्रात काम करतात...असं सतत कामाचं व्यसन असलेल्या व्यसनमुक्ती-कार्यकर्त्या आहेत वर्षा विद्या विलास (९८६९२८९४५३)

लहानपणी राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत त्या जात असत. सानेगुरुजींच्या कामानं त्यांना प्रेरणा दिली व त्यानंतर ‘सर्वोदय’ परिवाराशी त्या जोडल्या गेल्या. गांधीवादी विचारांनी त्या प्रभावित झाल्या व महात्मा गांधीजींनी हाती घेतलेल्या व्यसनमुक्ती, जनस्वराज्य अशा विविध विषयांवर त्यांनी काम सुरू केलं. सन १९९३ मध्ये मुंबईच्या दंगलीत तुलसीवाडा हा भाग उद्ध्वस्त झाला होता. वर्षा यांनी सतत दीड वर्ष पुनर्वसनाचं काम केलं. नंतर महिलांची ‘दिशा फाउंडेशन’ ही संस्था त्यांनी स्थापन केली. घरेलू कामगारांना त्यांनी त्या संस्थेच्या अंतर्गत संघटित केलं. महिलांच्या प्रश्नांवर काम करत असताना २००५ मध्ये महाराष्ट्रात डान्स बारचा प्रश्न गाजला. स्त्रीशोषणाचा तो नवाच प्रकार होता. वर्षा यांनी मुंबईतील सामाजिक संस्था संघटित करून त्याला तीव्र विरोध केला व राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी डान्सबारवर बंदी घातली. सामाजिक संस्थांची ही मोठी कामगिरी ठरली.

‘नशाबंदी मंडळ’ ही महाराष्ट्रातील महत्त्वाची संस्था आहे. तुकडोजीमहाराजांनी व विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी हे मंडळ स्थापन केलं. बाळासाहेब भारदे यांच्यासारखे गांधीवादी कार्यकर्ते पाठीशी राहिले. वर्षा या संस्थेच्या अनेक वर्षांपासून सरचिटणीस आहेत. व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन करणं हे मंडळाचं प्रमुख काम असलं तरी शासनाच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणं, व्यसनमुक्तीसाठी विविध कायद्यांची निर्मिती व अंमलबजावणी यासाठी आग्रही राहणं, व्यसनमुक्तीबाबत शासकीय अधिकाऱ्यांबरोबर काम करणं व साहित्यिक, कलावंत, पत्रकार, युवक, महिला यांतील विविध व्यक्ती जोडून व्यसनमुक्तीसाठी सतत प्रयत्न करणं अशी विविध कामं ‘नशाबंदी मंडळ’ करतं.

व्यसनाच्या सामग्रीचा पुरवठा कमी व्हावा आणि मागणी कमी व्हावी या दोन्ही मुद्द्यांवरही त्या काम करतात. व्यसनविरोधी समाजमन तयार करणं व व्यसनाला प्रतिष्ठा मिळू नये म्हणून प्रयत्न करणं, तरुणांमधील व्यसनाधीनता वाढू नये म्हणून नाटक, पथनाट्य, गाणी, परिषदा अशा माध्यमांतून तरुणांमध्ये जागृती केली जाते.

मुंबई शहरात ड्रग्जचं प्रमाण खूपच वाढलं होतं. त्याविषयी सतत पाठपुरावा करून वर्षा यांनी अनेक धाडी टाकायला संबंधितांना भाग पाडलं व त्यातून ड्रग्जविक्री खूपच आटोक्यात आली; पण केवळ त्यावर न थांबता प्रत्येक नशेचे दुष्परिणाम शास्त्रीय रीतीनं तरुणांना सांगण्यावरही त्यांनी भर दिला, त्यासाठी फिल्म्स व विविध साहित्य निर्माण केलं. सोशल मीडियाचाही प्रभावी वापर त्यासाठी केला जातो.

‘हृदयपरिवर्तनातून व्यसनमुक्ती’ यावर संस्थेचा भर आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मंडळाचा एक व्यसनमुक्ती संघटक आहे. हे संघटक व्यसनमुक्तीचा प्रचार व प्रसार करतात, घरोघरी भेट देतात व त्या कुटुंबातील व्यक्तींना व्यसनमुक्ती-केंद्रात दाखल करतात.

सन २०११ मध्ये राज्य सरकारनं देशातील पहिलं व्यसनमुक्ती-धोरण तयार केलं. या प्रक्रियेत अण्णा हजारे, अभय बंग, नरेंद्र दाभोलकर, अनिल अवचट या मान्यवरांबरोबरच वर्षा विद्या विलास व अमोल मडामे यांना काम करता आलं. त्या धोरणातील महत्त्वाचे मुद्दे ‘नशाबंदी मंडळा’नं सरकारला दिले होते.

आरोग्याच्या योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. लोकांना आरोग्याच्या योजना माहीत नसतात. त्यासाठी मुंबईतल्या गरीब वस्तीत आरोग्याच्या योजना पोहोचवण्याचा प्रयत्न वर्षा करतात. खासगी रुग्णालयात गरिबांसाठी असलेल्या राखीव खाटा गरीब रुग्णांना त्या मिळवून देतात. शिक्षणातही गरीब वस्तीतील मुलांना RTE अंतर्गत आरक्षण असलेले प्रवेश त्या मिळवून देतात. फीद्वारे लूट करणाऱ्या शाळांच्या विरोधात त्या आवाज उठवतात.

ग्रामीण भागात ग्रामसभा प्रभावी काम करतात; पण शहरी भागात अजूनही लोकांचा महापालिकेच्या-नगरपालिकेच्या कामात सहभाग नसतो...त्यातून भ्रष्टाचार होतो. यावर ‘लोकसहभाग वाढवणं’ हे एक उत्तर आहे. ७४ वी घटनादुरुस्ती झाली व शहरी भागातही नगरपालिकेच्या व महापालिकेच्या अधिकारांचं विकेंद्रीकरण झालं. त्यात खऱ्या अर्थानं लोकसहभाग व्हावा, लोकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव व्हावी, लोकांनी बजेट तयार करण्यात सहभागी व्हावं, यासाठी क्षेत्रसभा ही रचना त्या बळकट करत आहेत.

‘सद्भावना संघ’ या संस्थेच्या वतीनं इतर संस्थांना जोडून घेत मुंबईतील २६ वार्डांत नागरिकांच्या बैठका त्यांनी घेतल्या. त्यातून अनेक प्रश्न पुढं आले. दोन किंवा तीन बूथ एकत्र करून त्या सभा घेतात. त्या सभेतून नागरिकांची समिती स्थापन झाली. त्या नागरिकांच्या समितीनं नगरसेवकांसमवेत बैठका घेतल्या व त्या प्रश्नाची तड लावली. बजेट कोणत्या बाबींवर खर्च करायचं याबाबत आग्रही भूमिका त्यांनी घेतली. भारतातील इतर राज्यांनी लोकसहभागाचं जे काम केलेलं आहे त्याचा अभ्यास करून, महाराष्ट्रातही ते व्हावं, यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. धुळे जिल्हा हा त्याचं प्रारूप व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत.

तृतीयपंथी नागरिकांसाठी वर्षा यांचं काम महत्त्वाचं आहे. एकट्या मुंबई शहरात पाच हजार तृतीयपंथी आहेत व हीच संख्या महाराष्ट्रात पन्नास हजार असू शकते. या गटाला वर्षा यांनी ‘नशाबंदी मंडळा’शी जोडून घेतलं. त्यांना व्यसनमुक्तीचे प्रचारक करण्यात आलं. हे काम करताना त्यांच्याही समस्या लक्षात आल्या. कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करून तृतीयपंथीयांसाठी २०१८ मध्ये ‘कल्याण मंडळ’ स्थापन केलं. या मंडळात वर्षा यांना अशासकीय सदस्य म्हणून घेण्यात आलं आहे. या मंडळाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांची जनगणना करण्याचं काम सध्या सुरू आहे. आवश्यक असणारी विविध कागदपत्रं त्यांना मिळवून देणं, ओळखपत्र मिळवून देणं अशी कामं त्यातून सुरू आहेत. तृतीयपंथी जेव्हा भिक्षा मागतात तेव्हा पोलिस त्यांना त्रास देतात, असं निरीक्षण आहे, त्यामुळे पोलिसांचं प्रशिक्षण करून त्यांचा दृष्टिकोन बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या एका दुर्लक्षित समूहाच्या कल्याणासाठी वर्षा सतत काम करत आहेत.

व्यसनाच्या विरोधात ‘नशाबंदी मंडळ’ इतके प्रयत्न करत असताना सरकार मात्र दारूचा खप वाढवण्याचा व त्यातून महसूल गोळा करण्याचा प्रयत्न करताना दिसतं. याविषयी वर्षा म्हणतात : ‘‘ ‘सरकार चालवण्यासाठी आम्हाला दारू विकून पैसा लागतो’ हा जो युक्तिवाद केला जातो तोच राज्यघटनेशी विसंगत आहे. कारण, समाज व्यसनमुक्त करण्याचं उद्दिष्ट कलम ४७ अन्वये सरकारला घालून देण्यात आलेलं आहे. दारूची उपलब्धता वाढवणं व व्यसनाला प्रतिष्ठा देणं हे सभ्य, सुसंस्कृत व प्रगतशील समाजासाठी योग्य नाही. राज्य सरकारचं २०११ मधलं व्यसनमुक्तीचं धोरण प्रभावीपणे राबवलं जायला हवं.’’

सन २०१८ मध्ये केंद्र सरकारचा राष्ट्रीय व्यसनमुक्ती सेवाक्षेत्रासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार वर्षा यांना मिळाला. एकाच वेळी व्यसनमुक्ती, शिक्षणक्षेत्र, आरोग्यक्षेत्र, तृतीयपंथीयांसाठी काम...अशी विविध स्वरूपाची कामं करत वर्षा यांनी, अष्टपैलू कार्यकर्ता कसा असावा, याचा वस्तुपाठच घालून दिला आहे.

(सदराचे लेखक हे शिक्षण व सामाजिक चळवळींत कार्यरत असून विविध विषयांवर लेखन करतात.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com