बॅंकरच; पण मानवी नातेसंबंधांचाही... | Banker | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॅंकरच; पण मानवी नातेसंबंधांचाही...
बॅंकरच; पण मानवी नातेसंबंधांचाही...

बॅंकरच; पण मानवी नातेसंबंधांचाही...

sakal_logo
By
हेमंत देसाई hemant.desai001@gmail.com

बँकिंग हे असे क्षेत्र आहे, ज्यात पैशाला खूप महत्त्व असते. लहान-मोठ्या रकमांची देवघेव आणि व्याजाची आकारणी यावर बँकांचे व्यवहार चालतात. पण शेवटी हा सारा पैसा कुठेतरी मानवी संबंधांशी जोडलेला असतो, हे आपण विसरता कामा नये. माणूस राहिला, त्याची नाती, त्याच्या इच्छा-आकांक्षा टिकतील आणि त्याचे जीवन बहरले, तर या पैशाला महत्त्व राहणार. मात्र बरेचदा पैसा ही गोष्ट केवळ व्यवहाराची दृष्टी घेऊनच जीवनात स्थिरावते. मग मानवी नात्यांकडे डोळेझाक होणारच. त्यात स्वार्थ, लोभ, वितुष्ट हे सर्व येणारच. अशावेळी मग कधी जवळची कौटुंबिक नातीही पैशामुळे दुरावतात. मग या नात्यांना पुन्हा जोडण्याचे काम कुणाला तरी करावे लागते. एखादी ज्येष्ठ व्यक्ती किंवा दोन्ही बाजू समजून घेणारी आणि काय बिनसले ते नेमके ओळखणारा मित्र किंवा असेच कुणीतरी जे या प्रश्नाचा अचूक ठाव घेऊ शकेल...अन् अशी व्यक्ती जर बँकिंग क्षेत्रातलीच असेल, तर फारच चांगले. कारण तिला मानवी नात्याइतकाच आर्थिक मुद्दा आणि समस्याही नक्कीच माहीत असते...‘नात्याचे सर्व्हिसिंग’ हे विश्वास जयदेव ठाकूर यांचे पुस्तक वाचताना असे सारे विचार मनात आले...

विश्वास ठाकूर हे विश्वास सहकारी बँकेमुळे अनेकांना परिचयाचे आहेतच. अगदी तरुण वयात त्यांनी ही बँक स्थापन केली आणि ते पन्नाशीत शिरताना तिचा रौप्यमहोत्सव साजरा झाला. नावाप्रमाणेच ‘मन में है विश्वास’ अशा भूमिकेतून ठाकूर यांनी सचोटीने बँकेचा कारभार आजवर सचोटीने सांभाळला आहे आणि पुढेही ते याच मार्गावरून चालत राहतील, याबद्दल मला खात्री आहे.

काय आहे हे पुस्तक? तर, यात आहेत विविध माणसांच्या आयुष्यांच्या कथा. प्रत्येक कथेत असे काही आहे, जे वाचकाला खिळवून ठेवते, त्याची उत्सुकता वाढवते. अगदी छोटेखानी स्वरूपात या कथांचे लेखन झाले आहे. बरेच मोठे व्यवहार, त्यातील व्यवहारांचा आणि तांत्रिक तपशील आवश्यक तेवढा समोर ठेवत, कळीचा भाग खुलवत या कथा ठाकूर यांनी सांगितल्या आहेत. इतक्या वर्षांच्या बँकिंग क्षेत्राच्या वाटचालीत ठाकूर यांना बरेच अनुभव आले. वेगवेगळ्या स्वभावाची आणि नमुन्याची माणसे त्यांनी बघितली. बँकेचा व्यवहार यात मुख्य असला, तरी अखेरीस संबंध जित्याजागत्या माणसांशी होता. त्यात ठाकूर यांना बँकेचे हित साधतानाच, या माणसांच्या जगण्यातले प्रश्नही हाताळायचे होते. कधी थकित कर्जे, कधी कौटुंबिक तेढीतून आलेले आणि व्यावहारिक पातळीवर गुंता करणारे वितुष्ट, तर कधी कायद्यामुळे होणारी गुंतागुंत अशा विविध कारणांनी समस्या ठाकूर यांच्यापुढे येत गेल्या. त्यातून मार्ग काढण्याची भूमिका त्यांना पार पाडावी लागली. यात कधी नाती सावरली, जुळली, तर कधी व्यवहार सुकर होऊनही नाती मात्र दुरावलीच, हे त्यांनी अनुभवले.

नमुन्यादाखल काही प्रकरणांचा उल्लेख करत आहे. एका प्रकरणात त्यांच्या बँकेतलाच अनिरुद्ध नावाचा कर्मचारी अचानक वारला. त्याच्या वडिलांनी त्याचे व त्याच्या अविवाहित धाकट्या बहिणीचे संयुक्त नावाने नामांकन असलेले एफडी केले होते. ते मॅच्युअर झाल्यानंतर त्याने ते फक्त स्वतःच्या नावावर करून घेतले होते. एफडीवर त्याची पत्नी हक्क सांगत होती. पण मुळातच अनिरुद्धने बहिणीला डावलून एकट्याच्या नावावर एफडी करणे, हे या केसमध्ये चुकीचे होते आणि तसे केले, तर या बहिणीवर अन्याय होणार होता. म्हणून ठाकूर यांनी यात लक्ष घालून अनिरुद्धची पत्नी व वडील यांना निक्षून तसे सांगितले. तरी त्यांनी कायद्याची भाषा केली व तशी नोटीस पाठवली. त्यावर मग या केसमध्ये निकाल लागायलाच बरीच वर्षे जातील, याची जाणीव त्यांना करून देण्यात आली. तेव्हा कुठे धाकट्या बहिणीचा अर्धा वाटा तिला द्यायला तिची वहिनी कबूल झाली. मात्र तिने यापुढे आमच्याशी कोणताही संबंध ठेवता कामा नये अशी अट घातली. अनिरुद्धच्या मुलाचा तिला लळा होता, तरी त्याला शेवटचे भेटू द्यावे, ही तिची विनंतीही अमान्य करण्यात आली. व्यवहाराची समस्या सुटली, पण नाते तर तुटलेच, असा अनुभव आला. पैशापायी नात्यावर पाणी सोडणे, खोटेपणा करणे, लाबडी करणे अशा विविध तऱ्हांचे मनाला भिडणारे प्रसंग या पुस्तकातून ठाकूर यांनी समोर ठेवले आहेत.

दुसऱ्या एका केसमध्ये सांस्कृतिक-सामाजिक क्षेत्रातील विठ्ठलराव या मान्यवर व्यक्तीच्या आग्रहाखातर बँकेने भगवानदास गोठी या गरजू माणसाला कर्ज दिले. ते मंजूर करण्याआधी त्या माणसाची माहिती काढली, तर ती समाधानकारक नव्हती. तरी ‘माझ्या जबाबदारीवर हे कर्ज दे’, असे सांगितले गेले, तेव्हा कर्ज मंजूर झाले. काही महिन्यांनी कर्जाचे हप्ते येणे बंद झाले. कर्जाचा हप्ताच पन्नास हजारांच्या आसपासचा. कर्जदार आपल्याकडे पैसे नाहीत म्हणू लागला. बँकेच्या कर्मचाऱ्यांना हा माणूस चांगली वागणूक देत नसे. मग त्याची शिफारस करणाऱ्या विठ्ठलरावांकडे ठाकूर बोलले, तेव्हा ‘मी त्याच्याशी बोलतो, तो देईल पैसे’ असे त्यांनी सांगितले. अखेरीस तेही काही बोलेनात आणि शेवटी त्यांनी ठाकूर यांना फोनवर सांगून टाकले की, तू तुझ्या पद्धतीने पुढली कारवाई कर. तरीही ठाकूर विठ्ठलरावांना भेटायला गेले आणि आपण आता कारवाई करणार याची कल्पना त्यांना दिली. अखेरीस गोठीकडे बँकेचे लोक गेले, तेव्हा ठाकूर यांना काय ते सांगतो म्हणून तो दुसऱ्या दिवशी त्यांना भेटला. तेव्हा धक्कादायक असे सत्य समोर आले. त्याने विठ्ठलरावांकडून काही रक्कम तीन टक्के व्याजाने घेतली होती व तिची परतफेड तो करू शकला नव्हता. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांच्याच आग्रहाने आपण विश्वास बँकेकडून कर्ज घेतले असे त्याने सांगितले. हे कर्ज घेऊन त्यांचे पैसे त्याने फेडले होते. विश्वास बँक कर्जवसुलीबाबत चालढकल खपवून घेत नाही हे माहीत असल्याने आपण हे कर्ज घेणार नव्हतो, पण विठ्ठलरावांनी ते घेण्यास भाग पाडले, असे गोठीने सांगितले. कालांतराने हे कर्ज वसूल करून घेतले गेले. पण या फसवणुकीमुळे एक मानसिक धक्काच ठाकूर यांना बसला...

अशा अनेक कथा आणि प्रकरणे ठाकूर यांनी सांगितली आहेत. हे सारे लेखन अगदी बोलक्या शैलीत झाले आहे. बँकिंगसारख्या आकडेवारीच्या रुक्ष विषयात आयुष्य गेले असूनही, माणुसकी, विश्वास आणि ठेवीदारांशी असलेले उत्तरदायित्व, सचोटी या मूल्यांना महत्त्व देणारे असे हे ठाकूर आहेत. कायदा, बँकेचे नियम या बरोबरच नात्यातले धागे आणि स्वार्थाचा व्यवहाराला असलेला स्पर्श यांची गुतागुंत खूप जवळून पाहायला मिळाल्याने, वास्तवाचे खरे रूप काय असते याचे दर्शन ठाकूर यांना घडले. मानवी स्वभावाचेही निरनिराळे नमुने त्यांना बघायला मिळाले. या साऱ्या कथा वाचताना, एखादा प्रश्न सोडवण्यासाठी ठाकूर यांनी घेतलेल्या धडपडीची जाणीव होते. थकित कर्जांची विविध प्रकरणे बँकेकडे आली. ठाकूर यांनी मनापासून त्यात रस घेऊन स्वार्थ व परमार्थ यांचा मेळ घालत, संबंधित प्रश्न सलोख्याने मिटवण्याचे, सोडवण्याचे प्रय़त्न केले. पुस्तक वाचताना, ठाकूर हे मला एखादा फॅमिली डॉक्टर असतो, तसे फॅमिली बँकर आहेत, असे वाटून गेले...

पुस्तकाचं नावं :

नात्यांचे सर्व्हिसिंग

प्रकाशक :

शब्दमल्हार प्रकाशन, नाशिक (०२५३-२५००१११, ९८५०७६७६५४)

पृष्ठं : १५०

मूल्य : ९९ रुपये.

loading image
go to top