काही जणांना

एका कवीची कविता दुसऱ्या कवीला आवडते का? होय, नक्कीच आवडत असते! प्रचीतीची वाटत असते...प्रतीतीची वाटत असते. कसं पाहतो एक कवी दुसऱ्या कवीच्या कवितेकडं? तेच उलगडून सांगणारं हे सदर...
db dhamanaskar
db dhamanaskarsakal

- हेमंत गोविंद जोगळेकर, hemantjoglekar@yahoo.co.in

एका कवीची कविता दुसऱ्या कवीला आवडते का? होय, नक्कीच आवडत असते! प्रचीतीची वाटत असते... प्रतीतीची वाटत असते. कसं पाहतो एक कवी दुसऱ्या कवीच्या कवितेकडं? तेच उलगडून सांगणारं हे सदर...

नक्की आठवत नाही; पण सुमारे दहा वर्षांपूर्वी ‘मौज’च्या दिवाळी अंकात ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांची ‘काहीजणांना’ ही कविता वाचली. वाचता क्षणीच ती काळजाला भिडली. अगदी साध्या, नेहमीच्या भाषेत ती एक प्रसंग सांगते. कवितेचा निवेदक झोप लागेल अशी आशा करत पडलेला आहे; पण अर्धी रात्र उलटली तरी झोप लागत नाही म्हणून तो अस्वस्थ झाला आहे.

भगवंताचं नामस्मरण केलं म्हणजे तरी झोप लागेल असं वाटून तो त्याचं नाव घेत पडला आहे. अशात त्याच्या बायकोच्या त्याला हाकावर हाका ऐकू येऊ लागतात. त्यानं तो त्रस्त होतो. हाक मारायला लागावी एवढ्या अंतरावर बायको झोपलेली आहे; म्हणजे, अगदी शेजारी नाही. यावरून त्या दोघांचं वयही आपल्याला समजतं.

ती काहीतरी किरकोळ कारणास्तवच आपल्याला हाका मारत असावी आणि त्यामुळे आपल्या निद्राराधनेत व्यत्यय येतो आहे असं वाटून तो मुळीच ‘ओ’ देत नाही. तो ‘ओ’ देत नाही आहे म्हणजे त्याला आपला राग येतो आहे, हे जाणवून तिचा स्वर रडवेला होतो. क्षमा मागितल्यासारखी ती म्हणते ‘रागावला की काय माझ्यावर? झोप येत नाही मला. तुमचं नाव घेतल्यावर बरं वाटतं. म्हणून या हाका.’

हे ऐकल्यावर लख्खकन् साक्षात्कार व्हावा तसं त्याला भान येतं. अपराधीही वाटतं. आपल्यालाही झोप येत नव्हती तर आपण भगवंताचं नाव घेऊन झोपायचा प्रयत्न करत होतो. त्यालाही यश येत नव्हतं; तर, हिला झोप येत नव्हती तेव्हा हिनं आपलंच नाव घेतलं. आपलं नाव घेतलं की हिला बरं वाटतं एवढी हिची आपल्यावर श्रद्धा आहे.

आणि, ही श्रद्धा आपल्यावरच्या निस्सीम प्रेमामुळे आहे. एवढं सगळं कवी धामणस्कर शेवटच्या चार ओळींतून व्यक्त करतात.

नुसत्या हाका मारून

बरं वाटायला लावणारा देव

काहीजणांना

किती जवळ सापडतो

इतकं प्रेम करणारी बायको आपल्या इतकी जवळ आहे; पण आपल्याला त्याची जाणीव नव्हती. तिचं नाव घेतलं की बरं वाटेल असं आपल्याला कधी वाटलं नाही. तिला मात्र नुसतं आपलं नाव उच्चारलं की बरं वाटतं एवढी तिची आपल्यावर श्रद्धा आहे. प्रेम आहे.

अशा श्रद्धेचा आपल्याजवळ मात्र अभाव आहे, म्हणून की काय, झोप लागावी म्हणून आपण भगवंताचं नाव घेतलं तरी आपल्याला झोप येत नाही. ही अशी श्रद्धा फार थोड्या जणांकडे असावी. आपल्या बायकोजवळ ती श्रद्धा आहे आणि तीही आपल्यावर आहे. इतके सारे भावतरंग निवेदकाच्या मनात उमटले असावेत.

अशा श्रद्धेचं धामणस्करांनाही अप्रूप वाटतं. अशी श्रद्धा ठेवायची शक्ती काही भाग्यवंतांनाच लाभते ही बाब ते कवितेला ‘काही जणांना’ असं शीर्षक देऊन अधोरेखित करतात. ते करताना, अशी श्रद्धा आपल्या जवळही नसावी, असं नम्रपणे सूचित करतात.

या कवितेत धामणस्कर एक साधा प्रसंग साध्या भाषेत सांगतात; पण त्यातून एका मौलिक सत्यापर्यंत पोहोचतात. आणि, ते वाचकांपर्यंत पोहोचवतात. धामणस्कर यांच्या अनेक कविता अशा शेवटच्या ओळीत जीवनसत्यापर्यंत पोहोचतात; पण हे सत्य कधीही मुद्दाम घडवल्यासारखं वाटत नाही. एखादं फूल उमलावं तसं ते उमलतं.

या कवितेत निवेदकाला पत्नीच्या आपल्यावरील निस्सीम प्रेमाचा साक्षात्कार होतो. ते प्रेम वाचकालाही प्रतीत होतं. तोही आपल्या जवळच्या व्यक्तीचं आपल्यावर असलेलं प्रेम जाणून घ्यायला त्यामुळे उद्युक्त होऊ शकतो. म्हणून मला ही कविता मराठीतल्या सर्वोत्कृष्ट प्रेमकवितांमधली एक वाटते.

ही कविता धामणस्कर यांच्या ‘भरून आलेले आकाश’ (मौज प्रकाशन) या संग्रहातली आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्वच कविता वाचनीय वाटाव्यात असा हा संग्रह आहे. धामणस्कर यांच्या कविता गेल्या पन्नासहून अधिक वर्षं प्रकाशित होत आहेत; पण त्या संख्येनं मर्यादित आहेत. एवढ्या वर्षात त्यांचे मोजून तीनच संग्रह प्रकाशित झालेले आहेत. आणि, ते सर्व त्यांच्या प्रतिभेनं उजळलेले आहेत.

प्रस्तुतच्या ‘भरून आलेल्या आकाशा’त ५९ कविता आहेत. त्यांच्या कवितांत तत्त्वज्ञान अनुस्यूत असतं; पण बऱ्याचदा ते निसर्गप्रतिमांमधून व्यक्त होतं. झाडं, झाडांची पानं, फुलं, फळं, मुळं, पक्षी हे त्यांचे आप्तस्वकीय बनून राहतात.

त्यांच्या कवितांत पहिल्यापासून एक प्रौढ, अनेक पावसाळे स्वतःत मुरवून शहाणं झालेलं मन जाणवत आलेलं आहे. या संग्रहातल्या कवितांचा निवेदक वृद्ध झालेला आहे; पण हे वृद्धत्व त्यानं सहजपणे आनंदानं स्वीकारलेलं आहे. त्यांच्या ठायी असलेलं निसर्गाबद्दलचं आणि सर्वच माणसांबद्दलचं प्रेम जराही मंदावलेलं नाही. अशांत भवतालातही त्यांना आपली शांत, संयत, समजूतदार कविता सापडत राहिलेली आहे. त्यांच्या कवितेविषयी आणि त्यांच्याविषयी एवढंच म्हणावंसं वाटतं...

काही जणांना कविता

किती जवळ सापडते

(लेखक हे सुप्रसिद्ध कवी आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com