
महाराष्ट्रात जमिनीचे जे गंभीर प्रश्न आहेत, त्यांत दलित व रामोशी यांच्या वतनी जमिनीचा प्रश्नही मोडतो.
महाराष्ट्रात जमिनीचे जे गंभीर प्रश्न आहेत, त्यांत दलित व रामोशी यांच्या वतनी जमिनीचा प्रश्नही मोडतो. अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या या जमिनी सोडवणं आणि शेतकरी म्हणून दलित शेतकऱ्यांना मदत करणं हेच मोठं आव्हान असतं. दलित शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची वतनाची शेती मिळवून देत प्रयोगशील पद्धतीनं शेतीचे प्रयोग करत गरीब कुटुंबांचं स्थलांतर थांबवण्याचा महत्त्वाचा प्रयोग ललित बाबर यांनी सोलापूर जिल्ह्यात सांगोला इथं ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेतीविकास व संशोधन संस्थे’च्या माध्यमातून केला आहे.
ललित बाबर (९८६९४४१५०७) हे विद्यार्थिदशेपासून चळवळीच्या संपर्कात आले. बाबा आढाव यांची ‘एक गाव, एक पाणवठा’ चळवळ आणि ‘दलित पँथर’ या माध्यमांतून त्यांची जडणघडण झाली. शिक्षण झाल्यावर ते मुंबईला गेले. तिथं मृणाल गोरे यांच्या ‘नागरी निवारा परिषदे’च्या कामात ते सहभागी झाले. स्टेट बँकेत नोकरी लागली. नोकरी करत असतानाच, मोकळा वेळ मिळेल तेव्हा, गावाकडे दलित वस्त्यांमध्येही त्यांनी काम सुरू केलं व पुढं नोकरी सोडून पूर्ण वेळ दलित वस्त्यांमध्येच ते काम करू लागले. रोजगार हमीच्या कामासाठी सुरुवातीला मोर्चे काढून त्यांनी लोकांना कामं मिळवून दिली.
महाराष्ट्रात महार वतनाची व रामोशी वतनाची खूप मोठी जमीन आहे. पैकी रामोशी वतनाची बहुसंख्य जमीन अतिक्रमणात गेली. महार वतनाची पाच लाख २८ हजार एकर जमीन होती. त्यातील एक लाख एकर वनखात्याकडे वर्ग करण्यात आली आहे व काही जमिनीवर अतिक्रमण झालं आहे.
सांगोला तालुक्यातील व परिसरातील एक हजार एकर महार वतनाच्या जमिनीवर दलितांना शेती करण्यास बाबर यांनी प्रोत्साहन दिलं. ‘समस्त महार’ असा शब्द उताऱ्यावर असल्यानं त्या शेतकऱ्यांना शासकीय योजना मिळत नसत. बाबर यांनी पाठपुरावा करून तो शब्द वगळला, त्यामुळे राज्यभर हजारो कुटुंबांचा लाभ झाला.
सांगोल्यातील डोंगरगावच्या ९० एकर जमिनीच्या कडेला नालाबंडिंगची कामं त्यांनी सुरू केली. राळेगणसिद्धीतील काम, तसंच विलासराव साळुंके यांचं काम बाबर यांनी गावकऱ्यांना दाखवून आणलं. ते काम बघून गावकऱ्यांना कामाची प्रेरणा मिळाली. १६ बंधारे बांधले. गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झालं. पूर्वी गावात टॅंकरनं पाणी पुरवावं लागायचं; पण या पाणलोटाच्या कामानं टॅंकरची गरज थांबली. त्याच वेळी जवळपास २५० विहिरी वापरात नव्हत्या. काही ढासळल्या होत्या, तर काही शेतीतल्या भाऊबंदकीमुळे वापरात नव्हत्या. बाबर यांनी १५० पेक्षा जास्त विहिरी दुरुस्त करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आणि त्यातील अनेक विहिरी वापरात आल्या.
या सर्व शेतकऱ्यांना शेतीची अवजारं, सामुदायिक विहिरी, सामुदायिक मोटारी बाबर यांनी मिळवून दिल्या. सामुदायिक पाइपलाईन केली. पंप मिळवून दिले. ज्यांच्या नावावर जमिनी होत्या त्यांना विशेष घटकयोजनेचे लाभ मिळवून दिले. यातून शेतीचा विकास व्हायला मदत झाली. काही शेतकरी शेवगा व डाळिंबशेती करू लागले. त्या जोडीला शेळीपालन सुरू केल्यानं शेतीला मदत होऊ लागली. दलितांच्या या शेतीचं क्षेत्र खूप थोडं असल्यानं कमी जमिनीत जास्तीत जास्त उत्पादक-शेती कशी करता येईल याचं प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्याची व्यवस्था बाबर यांनी केली.
या संस्थेनं केलेला एक प्रयोग शासनाच्या धोरणाचा भाग झाला. एका दुष्काळात त्यांनी जनावरांची छावणी उभारली. केंद्रीय नियोजन आयोगाचे तत्कालीन उपाध्यक्ष मधू दंडवते ती बघायला आले. त्या छावणीचा प्रयोग बघून केंद्र सरकारनं राज्य सरकारला गुरांच्या छावणीला पैसे दिले व तेव्हापासून जेव्हा जेव्हा दृष्काळ पडतो तेव्हा तेव्हा दुष्काळात गुरांच्या छावणीला राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारही मदत करतं. एक छोटा उपक्रम अशा प्रकारे धोरणाचा भाग झाला.
मोठ्या गाई-म्हशींच्या छावण्या नेहमीच सुरू होतात; पण छोट्या शेळ्या-मेंढ्यांचे दुष्काळात खूप हाल होतात. एका दुष्काळात बाबर यांनी शेळ्या-मेंढ्यांची छावणी उभारली. सांगोल्याचे तत्कालीन आमदार व ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी या छोट्या जनावरांच्या छावणीची गरज तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. तेव्हा शासनानं प्रत्येक शेळीसाठी किंवा मेंढीसाठी दररोज २५ रुपये अनुदान मंजूर केलं. यातून या जनावरांना दुष्काळात राज्यभर मदत होत राहील. या दोन्ही निर्णयाविषयी समाधान वाटतं, अशी भावना बाबर व्यक्त करतात.
एसटीचा आणि रेल्वेचा पाठपुरावा केल्यानं शेकडो विद्यार्थी, विशेषतः मुली, शिकू लागल्या हे त्यांच्या कामाचं वेगळेपण. सहा-सात एसटी बसेस सकाळच्या वेळी सुरू करायला बाबर यांनी भाग पाडलं. गावाजवळून रेल्वे जाते; पण थांबा नसल्यानं मुला-मुलींना सकाळच्या वेळी महाविद्यालयात जाण्याची सुविधा नसते. तत्कालीन केंद्रीय मंत्री मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडे बाबर यांनी याबाबत पाठपुरावा करून रेल्वे स्टेशन करून घेतलं.
बाबर म्हणाले : ‘‘आज रोज सकाळी १५० विद्यार्थी-विद्यार्थिनी स्टेशनवर बघून मन भरून येतं. मुली शिकू लागल्या. त्यांचे बालविवाह होणं टळलं.’’
या इनामी जमिनी असलेल्या कुटुंबांतील १२० महिलांची ‘शेळीपालन सोसायटी’ बाबर यांनी अलीकडेच सुरू केली आहे. या कुटुंबातील महिलांनी २५०० रुपयांचा शेअर काढला असून त्या रकमेतून शेळीपालन व विक्री सुरू केली आहे. महिलांनी एकत्रित सुरू केलेला हा प्रयोग वेगळा ठरतो आहे.
भटक्या-विमुक्तांचे प्रश्न हाही बाबर यांच्या विशेष आस्थेचा विषय आहे. ज्या भटक्यांच्या नावावर जमिनी आहेत त्यांना बाबर यांनी विहिरी मिळवून दिल्या. त्यांना शेतीची अवजारं, बियाणी दिली. घरकुलं मिळवून द्यायला मदत केली. राईनपाडा इथल्या जमावाकडून मारल्या गेलेल्या भटक्या-विमुक्त कुटुंबांना शासनाकडून मदत मिळवून दिली.
भटक्यांविषयी सांगताना बाबर म्हणाले : ‘आदिवासीविकासासाठी ज्याप्रमाणे उपयोजना तयार करण्यात आली आहे, त्याप्रमाणे भटक्यांसाठी स्वतंत्र उपयोजना तयार व्हायला हवी, तरच भटक्यांना न्याय मिळू शकेल.’
बाबर यांनी या सर्व उपक्रमांत महिलांना प्रामुख्यानं सहभागी करून घेतलं हे त्यांच्या कामाचं वैशिष्ट्य. प्रत्येक आंदोलनात महिलांचा लक्षणीय सहभाग राहिला असून, त्यातून अनेक गावांत सरपंचपदी महिला आल्या. जिल्हा परिषद पंचायत समितीत महिला लोकप्रतिनिधी निवडून आल्या. हे सक्षमीकरण या प्रयत्नातून होऊ शकलं. गणपतराव देशमुख यांच्याबरोबर बाबर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर काम केलं.
महार वतनाची वनखात्याकडे गेलेली जमीन दलितांना पुन्हा मिळवून देण्यासाठी सध्या संस्थेच्या वतीनं संघर्ष सुरू आहे.
‘या इनामी जमिनीच्या विकासासाठी कृषी विभागानं स्वतंत्र कार्यक्रम आखला तर हे दलित शेतकरी समृद्ध होतील,’ असं बाबर सांगतात. एकल महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठीही बाबर प्रयत्न करत आहेत. हजार एकर जमिनी उत्पादकतेच्या स्थितीत आणून दलितांच्या व भटक्यांच्या कुटुंबांना पाठबळ देणारा सक्षमीकरणाचा हा प्रयोग नक्कीच दिशादर्शक व अनुकरणीय आहे.
(सदराचे लेखक हे शिक्षण व सामाजिक चळवळींत कार्यरत असून विविध विषयांवर लेखन करतात.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.