‘सर्व महिलांसाठी समान कायदे हवेत’

स्वत:च्या वैवाहिक नात्यात असे अत्यंत अपमानास्पद, क्रूर अनुभव घेतल्यावर त्यांनी अनेकदा प्रतिकार केला.
Rubina Patel
Rubina PatelSakal
Summary

स्वत:च्या वैवाहिक नात्यात असे अत्यंत अपमानास्पद, क्रूर अनुभव घेतल्यावर त्यांनी अनेकदा प्रतिकार केला.

लहानपणी व्यसनी वडील झोपेतून उठवून मारायचे... शाळेची पुस्तकं फाडायचे... केलेला स्वयंपाक फेकून द्यायचे... वडिलांनी बालविवाह करून दिल्यानंतर तरी आयुष्य बदलेल असं वाटलं, तर कलाशिक्षक असलेला नवराही व्यसनी निघाला...तोही सतत मारहाण करू लागला... या सगळ्याला वैतागून त्यांनी आत्महत्येचाही प्रयत्न केला... एकदा मध्य प्रदेशात पळून जावं लागलं... बाबा आमटे व साधना आमटे यांच्याकडे जाऊन नवऱ्याची कैफियत मांडली... बाबांनी त्याला बोलावून घेतलं...समजावून सांगितलं... तरीही तो सुधारला नाही... त्यानं दुसरं लग्न केलं... त्यानंतर मुलाचा ताबा मागायला त्या गेल्या तर त्यानं त्यांना मारहाण करून विहिरीत ढकलून देण्याचा प्रयत्न केला...

स्वत:च्या वैवाहिक नात्यात असे अत्यंत अपमानास्पद, क्रूर अनुभव घेतल्यावर त्यांनी अनेकदा प्रतिकार केला. मात्र, एवढ्यावरच न थांबता आपल्यासारखंच दु:ख वाट्याला आलेल्या इतर महिलांचं दु:ख दूर करण्यासाठी आणि तरुणींना स्वत:च्या पायावर उभं करताना धर्म आणि पुरुषी गुलामीविरुद्ध त्यांच्यात जागरूकता आणण्यासाठी गेली १७ वर्षं त्या प्रयत्न करत आहेत...त्यांचं नाव आहे रुबिना पटेल (९९२३१६२३३७). त्या आहेत नागपूरच्या कार्यकर्त्या.

इतके अनन्वित अत्याचार सहन करून त्यांविरुद्ध त्या न्यायालयीन लढाई लढल्या. न्यायालयात आपली बाजू स्वत: मांडली. न्यायालयात इतर अनेक त्यांच्यासारख्या पीडित महिला तिथं भेटायच्या. त्यांना कायदेशीर व इतर मदत करायला सुरुवात केली. या पीडित महिलांसाठी त्यांनी काम करायचं ठरवलं आणि २००४ मध्ये ‘रुबी सोशल वेलफेअर सोसायटी’ची स्थापना केली. नागपूरमधल्या प्रमुख सात गरीब वस्त्यांत रुबिना यांची संघटना काम करते. या वस्त्यांची एकत्रित लोकसंख्या ७० हजारांच्या आसपास आहे. या वस्त्यांमधील महिलांचे प्रश्न ही संस्था सोडवण्याचा प्रयत्न करते.

सुरुवातीला महिलांसाठी समुपदेशन करण्याचं काम त्यांनी सुरू केलं. समुपदेशनकेंद्रात शेकडो महिला येऊ लागल्या. नागपूर, कुही व उमरेड या ठिकाणीही समुपदेशनकेंद्रं सुरू केली. मुस्लिम महिलांशिवाय इतर धर्मीय महिलाही येऊ लागल्या. पतीनं घराबाहेर काढलं...पतीकडून सतत मारहाण... व्यसनी नवरे... मुलांना डांबून ठेवणं... घराबाहेर काढल्यावर पतीनं काहीच पोटगी न देणं अशा अनेक प्रकारच्या तक्रारी येतात. रुबिना त्या महिलांना धीर देतात आणि कायदेशीर मार्गदर्शन करतात. त्या महिलांना कायदेशीर मदत उपलब्ध करून देतात. पोलिसही आता त्यांच्याकडे अशा पीडित महिलांना पाठवतात.

शाळेतून गळती झालेल्या मुलींना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणं हे रुबिना यांचं एक लक्षणीय काम आहे. कधी लवकर लग्न झाल्यामुळे, तर कधी घरच्या गरीब परिस्थितीमुळे, कधी लेखन-वाचन ही कौशल्ये प्राप्त न झाल्यानं मुलींचं शिक्षण सुटलेलं असतं. कमी शिक्षण घेतलेल्या मुली अनेकदा अत्याचाराला बळी पडतात. शिक्षण असेल तर त्यांची फसवणूक होत नाही व स्वत:च्या पायावर त्या उभ्या राहतात.

त्यामुळे रुबिना यांनी अशा मध्येच शाळा सोडलेल्या मुलींना एकत्र करून त्यांच्यासाठी मार्गदर्शनवर्ग सुरू केले व त्यांना पुन्हा परीक्षेला बसवलं.

यातून या मुली परीक्षा पास होऊन उच्च शिक्षण घेऊ लागल्या. आजपर्यंत १०० पेक्षा जास्त शाळा सोडलेल्या मुलींनी पुन्हा परीक्षा दिल्या आहेत. त्यातील काही मुली अंगणवाडी सेविका झाल्या.

रुबिना सांगतात : ‘‘या प्रयोगातून या मुलींना आम्ही स्वप्नं दिली. या मुलींमध्ये आत्मविश्वास आला हे जास्त महत्त्वाचं आहे.’’

मुस्लिमांमधील बालविवाह हा गंभीर प्रश्न आहे. ‘जी सामुदायिक लग्नं होतात त्यांत अल्पवयीन मुली असतात,’ असं रुबिना सांगतात. एका सामुदायिक लग्नात ५१ पैकी १९ मुली अल्पवयीन होत्या. अशा अनेक सामुदायिक लग्नांच्या तक्रारी त्यांनी केल्या. त्यातून सामुदायिक लग्न आणि बालविवाह हा प्रश्न पुढं आणला. एकदा त्यांनी लग्न थांबवून नंतर दर्ग्यासमोर सभा घेतली तेव्हा तिथल्या चिडलेल्या जमावानं रुबिना यांच्यावर हल्ला केला व त्यांना खुनाची धमकी दिली. त्या हल्ल्याचा निषेधही मोठ्या प्रमाणावर झाला; पण तरीही बालविवाहविरोधी मोहीम सुरूच आहे. रुबिना यांनी आजपर्यंत १०० पेक्षा जास्त बालविवाह थांबवले आहेत. मुलींच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी युवतींचे गट तयार केले. त्या गटाचं प्रशिक्षण आयोजित केलं जातं. सतत बैठका आयोजिल्या जातात. आई व मुली यांची एकत्र कार्यशाळा घेतली जाते. विविध उपक्रमांमुळे मुलींचं व्यक्तिमत्त्व विकसित होतं

मुस्लिम महिलांच्या प्रश्नासाठी रुबिना यांनी ‘मुस्लिम महिला मंच’ही स्थापन केला आहे. नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनावर त्यांनी मुस्लिम महिलांचा मोर्चा काढला. विविध वस्त्यांमधील प्रश्न, विषमता, महिलांचे समान अधिकार, आरक्षण या विषयांवर मागण्या मांडल्या. दिल्लीत झालेल्या ‘मुस्लिम महिला राष्ट्रीय परिषदे’साठी रुबिना यांनी ३५ महिलांना सोबत नेलं होतं. तिहेरी तलाकबाबत देशभर झालेल्या परिषदांमध्ये रुबिना सहभागी झाल्या व एकत्रित याचिकाही त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. तलाकपीडित महिलांना त्या सतत कायदेशीर मदत करतात व त्यांच्या पुनर्वसनासाठी आंदोलनंही करत राहतात.

‘धर्मानुसार वेगळे कायदे नकोत, तर राज्यघटनेनुसार सर्व महिलांना समान कायदे हवेत,’ अशी ‘महिला मंच’ची आग्रही मागणी आहे.

‘रुबी सोसायटी’च्या वतीनं मुलींना व महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण, संगणकप्रशिक्षण दिलं जातं. फॅशन डिझायनिंग, ब्यूटी पार्लरचं प्रशिक्षण दिलं जातं. इंग्लिश बोलण्याचे वर्ग चालवले जातात. त्यातून तरुण महिलांना बाहेर रोजगार मिळतो. तलाकनंतर त्यांच्यात आलेली भीती व एकटेपणा निघून जातो, आत्मविश्वास वाढतो. रुबिना यांनी आता वृद्धाश्रमही सुरू केला आहे.

या सर्व अनुभवांतून रुबिना सांगतात : ‘‘तलाक झाल्यावर मुस्लिम महिलांचे प्रश्न अधिक गंभीर होतात. कारण, शिक्षण व कोणतीच कौशल्यं हातात नसतात. धार्मिक-सामाजिक-आर्थिक गुलामीतून मुक्त होण्यासाठी व मुस्लिम महिला सक्षम होण्यासाठी मुस्लिम मुलींच्या शिक्षणाकडे सरकारनं सर्वाधिक लक्ष द्यावं. मुस्लिम मुलींना शिष्यवृत्ती द्यावी, उच्च शिक्षणासाठी वसतिगृह उभारावं व शिक्षणातून गळती झालेल्या मुलींनी पुन्हा शिक्षण घेण्याचे प्रयत्न व्हावेत. मुस्लिम तरुण व तरुणींसाठी व्यावसायिक शिक्षण द्यावं. मुस्लिम वस्तीत आरोग्यविषयक व इतर सुविधा वाढवाव्यात.’’

‘१७ वर्षांनंतर वस्तीत काय बदल जाणवतो?’’ असं विचारता रुबिना सांगतात : ‘‘आम्ही पुरुषांविरुद्ध आहोत हा समज दूर झाला. अनेक मुस्लिम पुरुष आमच्याकडे पीडित महिलांना घेऊन येतात. आमच्याबरोबर काम करतात. पूर्वी फक्त चांगली आर्थिक स्थिती असणारे मुस्लिमच मुलींना शिकवायचे. आता गरीब कुटुंबांत मुलींना शिकवण्याचं प्रमाण वाढत आहे आणि महिलाही आता अन्यायाविरुद्ध बोलू लागल्यात हे नक्कीच समाधानाचं आहे.’’

(सदराचे लेखक हे शिक्षण व सामाजिक चळवळींत कार्यरत असून विविध विषयांवर लेखन करतात.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com