हिंदी सिनेमातील अभिनेत्याचा प्रवास

raj dilip.
raj dilip.

अशोक कुमार यांनी आपला एक खास प्रेक्षक वर्ग तयार केला होता. तिथूनच खरा बॉलिवूडचा हिरो हा प्रेक्षकांमध्ये वेगळे स्थान निर्माण करू लागला. त्यानंतर जमाना आला तो दिलीप कुमार यांचा. १९४४ ला त्यांचा पहिला चित्रपट आला ज्वारभाटा. त्यानंतर त्यांनी स्वत:ची एक वेगळी छाप सोडली. त्यांच्या अभिनयाची उंची ही खूपच मोठी. सहज अभिनय हा प्रकार त्यांनी पडद्यावर आणला, असे म्हणायला हरकत नाही. कारण, तोपर्यंत चित्रपट कलावंतांवर नाटकाचा प्रभाव जास्त होता. भारतात नाटक हा प्रकार खूप आधीपासूनच अस्तित्वात आहे. त्यामुळे नाटकांचा अभिनय हाच सगळ्यांचा आधार होता. त्या काळात समाज हा खूप संथ होता. कारण, विज्ञानाची एवढी प्रगती नव्‍हती. त्यामुळे समाजाचे रूपसुद्धा तसे शांत आणि संथ चालीचे होते. फॅशन जास्त नव्‍हती. रोजगाराच्या संधी तेवढ्या नव्‍हत्या. शेती हाच व्‍यवसाय होता. शेती नसेल तर सरकारी नोकरी किंवा गावाकडे तरी नोकरी एवढेच पर्याय होते. त्यामुळे एकूण समाजच संथ होता.

नाटकाचा एक प्रयोग तीन ते चार तास चालायचा. त्यांच्या स्‍टेजवरच्या हालचालीसुद्धा संथ असायच्या. तीच सवय कॅमेरापुढे काम करणाऱ्या कलाकारांना होती. कारण, चित्रपट क्षेत्राचा श्रीगणेशा झाला, तेव्‍हा चित्रपटात काम करणारे कलाकार नाटकाचाच अभिनय बघून, करून कॅमेरापुढे आले होते. त्यांना कॅमेराची ताकद तेव्‍हा कळली नाही किंवा त्याचा अंदाज यायला काही वर्षे जावी लागली. चित्रपट कॅमेरा आणि इतर तंत्र जसजसे विकसित होत गेले, तसा अभियनात पण फरक पडत गेला. कॅमेरा आपल्या चेहऱ्याची प्रत्येक हालचाल भव्‍य पडद्यावर सहज दाखवू शकतो, याचा अंदाज आला आणि मग चित्रपटात काम करणारे कलाकार पण या तंत्रज्ञानाला सरावले आणि बदल घडत गेला. त्या बदलाचा पहिला आविष्कार म्हणजे दिलीप कुमार यांचा सहज अभिनय. आजही त्यांना याबद्दल गुरूच मानतात.

दिलीप कुमारांनी खूप वास्तववादी अभिनय केला आणि स्वत:ची एक अशी वेगळी छाप सोडली. त्या काळात गुरुदत्त होते. राज कपूर झाले. देवानंद साहेब होते. प्रत्येकाची एक वेगळी शैली आणि प्रत्येकाचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग होता. गुरुदत्त हे उत्तम दिग्दर्शक पण होते. ‘प्यासा’ चित्रपट तर ऑल टाइम फेव्हरिटमध्ये होता. राजकपूर यांची स्वत:ची एक वेगळीच शैली होती. त्यांनी साधा, भोळा हिरो रंगवला आणि तो लोकांना खूप आवडला. राजकपूर यांनी एक अभिनेता म्हणून मोठा पडदा गाजवलाच, पण दिग्दर्शक म्हणून त्यांचं योगदान खूप मोठं म्हणता येईल.

त्‍यावेळचा समाज हा वेगवेगळ्या समस्‍यांनी गांजला होता, पिडला होता. त्‍याचे वर्णन त्‍यांनी त्‍यांच्‍या चित्रपटात मांडले. पण, त्‍यांनी त्‍यास चित्रपटाचे ग्‍लॅमर देऊन कथेची मांडणी केली. तसे चित्रीकरण केले. वेगळे कॅमेरा अँगल वापरले. चित्रपटातल्‍या हिरोइनला ग्‍लॅमर त्‍यांनी आणले, असे म्‍हणायला हरकत नाही. जे राजकपूर पडद्यावर एक साध्‍या, भाबड्या नायकाची भूमिका वठवायचे, तेच राजकपूर दिग्‍दर्शक म्‍हणून खूप वेगळे होते. त्‍यांच्‍या प्रत्‍येक चित्रपटात स्‍वीमिंग सूटमध्‍ये नायिका असायची आणि स्‍त्रीचे मादक रूप ते खूप लॉजिक लावून पडद्यावर चित्रित करायचे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या हिरोइनवर किंवा त्‍यांच्‍यावर कधी अश्लिलतेचा शिक्‍का बसला नाही. कथेची गरजही तेव्‍हा खरंच होती. आता सेक्‍स ही मुख्‍य कथा आणि मग त्‍याच्‍या भोवती कथा, असे पण व्‍हायला लागले.

चित्रपटाला ग्‍लॅमर आणले ते राजकपूर यांनी, तर चित्रपटात विदेशी स्‍टाइल आणली देवआनंद यांनी. हे एक वेगळेच रसायन होते. शेवटच्या श्‍वासापर्यंत उत्साहाचा धबधबा असलेले व्‍यक्तिमत्त्व. मला त्यांना भेटायचा योग आला. काही दिवस सोबत काम पण केले. तेव्‍हा त्यांचा उत्साह जवळून बघितला. देवआनंद म्हणजे भारतीय चित्रपटांचा जेम्स बॉण्ड म्हणता येईल. त्यांची ती हॅट, तो ड्रेस, केसांचा मोठा फुगा, सगळंच वेगळे. त्यांनी स्वत: एक निर्माता म्हणून खूप चांगले चित्रपट दिले.
‘गाइड’ वगैरे चित्रपट तर मैलाचा दगड ठरले. पण, त्यांची इमेज ही ग्लॅमरस बॉय अशीच होती. त्यांचे सगळे चित्रपट बघा एक आनंद मिळतो. त्यांना खरं तर चिरतरुण असा आशीर्वाद मिळाला असावा. माणसाने कसे जगावे आणि या चित्रपट क्षेत्रात आपले अस्तित्व कसे टिकवावे हे त्यांच्याकडूनच शिकायला हवे. केवढी मोठी इनिंग ते खेळून गेले. त्यांच्यावर बरंच काही आहे लिहिण्यासारखं, ते पुढच्या वेळी..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com