चित्रपटातील हिरोला देव्हाऱ्यात बसवू नका

आशीष उबाळे
Monday, 6 July 2020

चित्रपटातल्या हिरोने सामान्यपणे जीवन जगायचेच नाही हे ठरवून टाकलं असतं. त्याने नेहमी गॉसिप, रोमान्स, अफेअर, प्रसिद्धीतच राहायचे, हे पण ठरवूनच टाकलेल असतं. कलाकार असेच आयुष्य जगत असतात आणि जेव्हा त्याचे करिअर उतरणीला लागत तेव्हा त्याला डोक्‍यावर घेणारा प्रेक्षक वाळीत टाकल्यासारखी वागणूक देतो. मग त्या कलाकारांचे काय होते, हे त्यांच्या आसपास असणाऱ्यांनाच कळते.

सध्या सुशांतसिंहच्या दुर्दैवी घटनेमुळे चित्रपटातील कामकार, हिरो, हिरोइन, निर्माते आणि त्यांच्यातील राजकारणावर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. म्हणजे भारतीय समाजाने आपल्या चित्रपटातल्या कलाकारांना एक दर्जा देऊन ठेवलाय आणि त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा एक चष्मा आपण स्वत:च तयार करून घेतला आहे. या चष्म्यातून आपण पडद्यावरच्या हिरोंना वास्तवात पण तसेच मानतो.

इथेच मोठी गफलत होते. चित्रपट, नाट्यकलावंतांना आपल्या चष्म्यातून बघत मोठे करतो आणि त्याने वास्तविक जीवनात कसे वागायचे, हे पण आपणच ठरवतो. कळत-नकळत आपण आपल्या पडद्यावर हिरो असणाऱ्यांना त्यांनी कसे जगावे हेच सांगत असतो. चित्रपटातला हिरो सगळ्या अडचणींवर मात करतो. आपल्या दुश्‍मनांचा नायनाट करतो. सोबत रोमान्स पण करतो. हे सगळे आपण करू शकत नाही म्हणून आपण हिरोला देव मानतो. हा माझा आदर्श आहे, असे समजतो आणि आदर्श हिरोने वैयक्तिक आयुष्य कसे जगायचे हेही आपणच ठरवतो. इथेच गफलत होते.

खरे तर हिरो या शब्दाचा अर्थ ग्रीक भाषेत "प्रोटेक्‍टर' म्हणजे संरक्षण करणारा. हा शब्द तिथून आला, असा एक प्रवाह आहे. अवघड किंवा चांगली गोष्ट केल्यामुळे लोकांच्या कौतुकास पात्र ठरणारी व्यक्ती मग ती स्त्री असो की पुरुष, अशी त्याची व्याख्या आहे. तर हिरो शब्दाचा खरा अर्थ हाच आहे जो सगळ्या परिस्थितीवर मात करून विजयी होतो. चित्रपटात काम करणारा नायक हा त्या कथेत असलेल्या सगळ्या अडचणींवर मात करून विजयी होतो. आपल्याला जीवन कसे जगायचे, अडचणींवर मात कशी करायची, त्यातून नेहमी चांगलेच कसे निवडायचे आणि सगळ्या परिस्थितीवर विजय कसा मिळवायचा, हे सांगतो... पण, तो हे चित्रपटात कलाकृतीच्या माध्यमातून सांगतो. ही कलाकृती लिहिणारा वेगळा असतो.

आपला नायक ती भूमिका वठवत असतो. तो फक्त कला सादर करत असतो आणि त्या कथेतला विचार पडद्यावर व्यक्त करतो. आपण त्याकडे दूर्लक्ष करतो आणि त्यातल्या कलाकारांना, नायकांना वास्तविक आयुष्यात हिरो समजून मग त्याच्या आयुष्यावर अधिकार गाजवतो.

मग तो कलाकार स्वत:ला देवानंतर मीच, असे समजू लागतो. त्यांची वैचारिक पातळी किती आहे, हे आपण आणि ते स्वत: कधीच बघत नाहीत. कारण आपल्याला वास्तवापासून दूर राहायचं असतं. पडद्यावर नायकाचे काम करणारा हा माणूस आहे आणि त्याचे वैयक्तिक आयुष्य आहे,

हा विचार जसा समाजाला नाही तसा बहुतांश कलाकारांना पण नसतो. त्यांना पण हा खोटा झगमगाट म्हणजेच आयुष्य असे वाटू लागते. मग हिरो, त्याचे चाहते आणि प्रत्यक्ष आयुष्य यांच्यात एक सुप्त संघर्ष सुरू असतो. सामान्य माणसाला चित्रपटातल्या हिरोने सामान्यपणे जीवन जगायचेच नाही हे ठरवून टाकलं असतं. त्याने नेहमी गॉसिप, रोमान्स, अफेअर, प्रसिद्धीतच राहायचे, हे पण ठरवूनच टाकलेल असतं. कलाकार असेच आयुष्य जगत असतात आणि जेव्हा त्याचे करिअर उतरणीला लागत तेव्हा त्याला डोक्‍यावर घेणारा प्रेक्षक वाळीत टाकल्यासारखी वागणूक देतो. मग त्या कलाकारांचे काय होते, हे त्यांच्या आसपास असणाऱ्यांनाच कळते.

सगळी प्रसिद्धी, सगळा मानसन्मान नवीन हिरोकडे वळला असतो. त्याची जागा दुसऱ्या हिरोने घेतली असते. नवीन हिरो पण तसेच जगत वास्तविकेपासून दूर गेला असतो. खरे तर ही एक शोकांतिका आहे. हिरो हा शब्द या कलाकारांना लावायला नको. कारण ते प्रत्यक्ष जीवनात तसे नसतात. ते एक पात्र आपल्या कलेने पडद्यावर उभे करतात. आपण आपल्या समाजात यांनाच हिरो म्हणून संबोधतो. खरे हिरो हे प्रत्यक्ष जीवनात जगणारे असतात. ज्यांच्यामुळे समाज, देश बदलत असतो. विचारांनी आणि कृतीने. आमचे हिरो महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, अब्दुल कलाम, भारतीय सीमेचे रक्षण करणारा प्रत्येक जवान, ऑफिसर असायला हवे.

मला गर्भात नऊ महिने ठेवून संपूर्ण आयुष्य वेचणारी आई माझी हिरो असावी. मला आयुष्यात स्वत:च्या पायावर उभे करणारे वडील माझे हिरो असावेत. माझ्या जन्मापासून मृत्यूपर्यंत मला माझ्या अडचणींमध्ये नि:स्वार्थ मदतीचा हात देणारी प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी हिरो असावी. पण, आपण चित्रपटाला असलेले ग्लॅमर कलाकारांना जोडले आणि सगळा गोंधळ होतो. कलाकारांना त्यांच्या कलेचा मानसन्मान मिळायचा हवा; पण त्यांना हिरो म्हणून देव्हाऱ्यात बसवू नका. कारण ते पण एक सामान्य माणसातूनच आलेले व्यक्ती असतात. आपण त्यांना ग्लॅमरच्या दुनियेत देवत्व देतो आणि त्यांच्या खासगी आयुष्याचा अंत करतो. त्यांना सामान्य जीवनच जगता येत नाही. कलाकारांच्या कलेची प्रशंसा करा; पण त्या कलाकाराची पूजा करू नका. कारण ती पण सामान्य माणसंच आहेत. त्यांना सामान्य माणसाप्रमाणेच व्यक्त होण्याचा अधिकार आहे. जो आपण समाज म्हणून नकळत त्यांच्याकडून हिरावून घेतो आणि मग त्यांचे मूल्य मापण समाजसुधारकांसोबत करतो. ते त्या तराजूत बसत नाही तेव्हा त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करतो. त्यांचे आयुष्य संपवतो.

खरं तर मी याच क्षेत्रातला; पण माझी ही खंत आहे की, आपण समाज म्हणून चित्रपट कलाकारांना देव समजतो आणि त्याचे परिणाम खूप ठिकाणी दिसतात. एक उदाहरण देतो. एक नवीन मुलगा हिरो होतो. त्याचे दिसणे, असणे चित्रपट प्रेक्षकांना आवडते. तो हळूहळू हिरो म्हणून मोठा होतो. त्याचा चित्रपट मानधनाचा आकडा वाढतो. चित्रपट हिट झाले की, त्याला बरं वाटतं. मग दुसरा कुणीतरी आला, तर याला स्वत:च्या करिअरची भीती वाटते; मग बाकीचे राजकारण तो खेळतो आणि तो हळूहळू संपतो किंवा संपवतो. मग बातम्या बाहेर येतात आणि मग सामान्य माणूस त्याला आपल्या मनातून बाहेर काढतो. असे दुष्टचक्र सुरू असतं. माझं तर एक ठाम मत आहे की, आपण त्यांना आदर्श मानतो त्यांच्या खासगी आयुष्यात डोकावू नये... आपला भ्रमनिरास होतो.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heros are not god