स्मरण निसर्ग आणि पंचमहाभूतांचे !

पुण्यातील शनिवार पेठेत ‘साधना’ कार्यालय आहे. कवी वसंत बापट हे साधना साप्ताहिकाचे १९८३ ते १९८८ संपादक होते.
vasant bapat
vasant bapatsakal
Updated on

- दिलीप कुंभोजकर, kumbhojkar.dilip@gmail.com

पुण्यातील शनिवार पेठेत ‘साधना’ कार्यालय आहे. कवी वसंत बापट हे साधना साप्ताहिकाचे १९८३ ते १९८८ संपादक होते. १९४२ च्या ‘चले जाव’ स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी तुरुंगवास भोगला होता. मराठी आणि संस्कृतचे प्राध्यापक म्हणून त्यांनी मुंबईमध्ये नॅशनल कॉलेज, वांद्रे आणि रामनारायण रुईया कॉलेज येथे काम केले.

मुंबई विद्यापीठातील गुरुदेव रवींद्रनाथ टागोर अध्यासनाचे ते प्राध्यापक झाले. ते दिल्लीच्या साहित्य अकादमीचे सदस्यही होते. १९९९ मध्ये मुंबईत झालेल्या बहात्तराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

कवी विंदा करंदीकर, वसंत बापट आणि मंगेश पाडगांवकर हा कवींचा त्रिकोण काव्याच्या वर्तुळात आनंदाने फिरत होता. तिघांची कविता वेगळी होती पण नाळ एक होती. कवी वसंत बापट यांच्यावर राष्ट्रसेवा दल आणि सानेगुरुजींचे संस्कार होते. विचारसरणी समाजवादी असल्याने सर्व समाजाचा उद्धार हे एकच ध्येय होते.

ह्या विचारांची छाया त्यांच्या अनेक कवितेत जाणवत आहे. त्यांच्या काव्याची मुख्य ताकद त्यांच्या समाजाभिमुख स्वभावात आहे. देशातील राजकीय आणि सामाजिक घटनांसंबधी भावनात्मक प्रतिक्रिया म्हणजे वसंत बापट यांची कविता. ‘बिजली’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर ह्या संस्कारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो.

‘अकरावी दिशा’, ‘सकीना’ आणि ‘मानसी’ हे त्यांचे ‘बिजली’नंतरचे काव्यसंग्रह होते. त्यांनी लहान मुलांसाठीही कविता लिहिल्या. केवळ ‘माझा सह्यकडा’ ही त्यांची कविता सर्वतोमुखी झाली असे नाही तर ‘दख्खनची राणी’ ही कविता खूप लोकप्रिय झाली. कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी मेघहृदयाच्या रूपाने मराठीत आणली.

त्यांची ‘सकीना’ उर्दूचा खास लहेजा घेऊन प्रकटली. ‘गगन सदन तेजोमय’ सारखे अप्रतिम प्रार्थनागीत त्यांनी लिहिले आहे. ‘उंबरठा’ (१९८२) चित्रपटात ही प्रार्थना लतादीदींच्या आवाजात आहे तर संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचे आहे. स्मिता पाटील याचा धीरगंभीर अभिनय ह्या गीताला संपूर्ण न्याय देतो.

गगन, सदन तेजोमय,

तिमिर हरून करुणाकर

दे प्रकाश, देई अभय,

गगन, सदन तेजोमय

गगन, सदन तेजोमय॥ १॥

हे गगन, आकाश ज्याचे सदन आहे, घर आहे अशा तेजोमय देवा, जो स्वयंप्रकाशी आहे, जो अंधाराचा नाश करतो, तू आम्हाला शक्ती दे, आम्हाला दृष्टी दे, आम्हाला अभय दे ! संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या ''पसायदान'' मध्ये ‘दुरितांचे तिमिर जावो’ हेच मागणे मागत आहेत. देवा तू कसा आहेस? तर करुणाकर आहेस, तेजोमय आहेस, तू आम्हास प्रकाश देतो, जो ''अज्ञाना''च्या अंधाराचा नाश करतो, मनातील भय नाहीसे करतो.

छाया तव, माया तव हेच परम पुण्यधाम

वाऱ्यातून, ता ऱ्यातून वाचले तुझेच नाम

जगजीवन, जनन-मरण हे तुझेच रूप सदय

गगन, सदन तेजोमय ॥२॥

तुझी छाया, तुझी सावली, तुझा आशीर्वाद हीच आमची शक्ती. तुझी माया, तुझे प्रेम हीच आमची प्रेरणा, ऊर्जा आहे. हे जिथे मिळते तेच आमचे 'पुण्यधाम!'

येथे कवी आपल्या पाप-पुण्य, स्वर्ग-नरक या संकल्पनेला स्पर्श करतात. पुण्यधाम म्हणजे सर्व आनंदी असलेले गाव, सुखाचे गाव, समाधानाचे गाव, ''पुण्य''चा साठा असलेले गाव. धाम म्हणजे गाव. आपण चार धाम मानतो कारण ती तीर्थक्षेत्र आहेत, पवित्र आहेत.

शक्तिकेंद्र आहेत. सूर्य-चंद्राला आपल्याकडे असलेले देवाचे स्थान बालपणापासून, पाटी पूजनातून मनावर बिंबवले जाते. कवी हेच म्हणत आहे, परमेश्वराचे स्थान निसर्गाच्या छायेत, मायेत आहे. मातृभूमी हीच स्वर्गरूप आहे. आकाश (Space), वायु (Force), अग्नी (Energy), आप, जल (Watter), पृथ्वी (Matter) या पंचमहा तत्त्वांचा उल्लेख करीत कवी म्हणतो,

‘वाऱ्यातून, ताऱ्यातून, वाचले तुझेच नाम,

जगजीवन, जनन-मरण, हे तुझेच रूप सदय ’

वारा ज्याप्रमाणे वस्तूतून, फुलातून सुवास घेऊन स्वतः बरोबर नेतो तसेच देहदिकांचा स्वामी, जीवात्मा ज्या शरीराचा त्याग करतो, त्या शरीरातून मनासह इंद्रिये बरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो. थोडक्यात वाऱ्यातून, ताऱ्यातून किंवा आकाशातून, वायुतून, चराचरातून तुझेच नाव घेतले जाते, आमच्या जीवनात, अंत:करणात तूच आहेस, जीवन-मरण ही तुझीच कृपा आहे. तू सहृदय, सदय आहेस. तुझ्या तेजोमय रूपात आमचे जीवन सामावलेले आहे.

वासंतिक कुसुमांतून तूच मधुर हासतोस

मेघांच्या धारांतुन प्रेमरूप भासतोस

कधि येशील चपलचरण

वाहिले तुलाच हृदय

गगन, सदन तेजोमय ॥३॥

हे तेजोमय देवा, निसर्गदेवा, ऋतुचक्राच्या वसंतोत्सवात, झाडांना आलेल्या मोहरात, फुलांनी बहरलेल्या सुवासातील तुझे हास्य आम्हाला आनंदित करते. मेघोत्सवात तुझ्या आनंदाश्रूमधील प्रेम आम्हाला प्रफुल्लित करते, उल्हसित करते. वाऱ्याच्या वेगाने धावणारे तुझे चपळ चरण, पाय आमच्याकडे वळू देत, आम्ही वाट पाहत आहोत कारण आमचे अंतःकरण तुलाच वाहिलेले आहे. ही निसर्गाची शब्दपूजा आहे. कवी आपणास निसर्गसौंदर्याचा आस्वाद देत आहे. निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी देत आहे. हाच खरा ज्ञानयोग आहे.

भवमोचन हे लोचन, तुजसाठी दोन दिवे

कंठातील स्वर मंजुळ, भावमधुर गीत नवे

सकलशरण, मनमोहन, सृजन तूच, तूच विलय

गगन, सदन तेजोमय,

तेजोमय तेजोमय तेजोमय तेजोमय ॥४॥

अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दांत कवी या अद्भुत शक्तीला, तेजाला वंदन करीत आहे, शरण जात आहे. ही तेजाची प्रार्थना आहे, ही तेजाची आरती आहे. जीवनातील संकटांना थोपविणारा संकटमोचन हनुमान सर्वांना माहीत आहे. पण आमचे लोचन, ज्ञान देणारे डोळे कसे आहेत ? 'भवमोचन' आहेत.

भावनांचा सागर या डोळ्यात सामावलेला आहे. यात दु:खाश्रू आहेत आणि आनंदाश्रू आहेत. समई : जी आईसम आहे ती समई ! अंधाराचा नाश करणारी समई. आमचे दोन डोळे हे ज्ञानाचा शोध घेणारे दिवे आहेत, ज्ञानचक्षू आहेत, जे तुझ्या तेजाचा शोध घेत आहेत.

आमच्या कंठातून बाहेर पडणारे हे गीत, हे मंजूळ स्वर ही तुझी ''स्तुती'' आहे. (आपल्याकडे देवाची आराधना करणारी शिवस्तुती, रामस्तुती, सूर्यस्तुती इत्यादी आहेत.) हे गीत कसे आहे तर भावमधुर आहे, कानाला गोड लागणारे आहे. यात भक्ती सामावलेली आहे. हे मनमोहना...! तुला सगळेच शरण आलेले आहेत. याचे ज्ञान आज करून देत सांगतात तूच कर्ता करविता आहेस.

आज सर्वत्र इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी हा शब्द रुजलेला आहे. आय टी म्हणजेच ज्ञान आणि विज्ञान!

गणपती अथर्वशीर्षमध्ये आपण म्हणतोच, की

‘त्वम् ज्ञानमयो विज्ञानमयोसि !'

भगवद्गीतेत नवव्या अध्यायात श्रीकृष्ण म्हणतात,

‘यथा आकाशस्थित: नित्यम् वायु सर्वत्रग:

महान् तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानि इति उपधाराय ॥ ९ - ६॥

ज्या प्रमाणे आकाशातून उत्पन्न होऊन सर्वत्र संचार करणारा महान वायू हा आकाशातच राहतो. त्याप्रमाणे माझ्या संकल्पनेतून उत्पन्न झालेली पंचभूते माझ्यात राहतात. थोडक्यात सर्व सृष्टीत मी आहे. सृजन तूच आणि विलय करणारा ही तूच! GOD : Generator, Operator, Destroyer म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश तूच! म्हणून हे तेजोमय आम्ही तुला शरण येत आहोत. तूच आम्हाला मार्ग दाखव, आमचे डोळे हे तुझेच दोन दिवे आहेत.

कवी वसंत बापट यांची ही कविता, प्रार्थना वाचताना सोपी वाटते पण शांतपणे संदर्भ शोधायचा प्रयत्न केला तर कवीवरील संस्कार, विचारसरणी आणि प्रतिभेची प्रगल्भता आपल्या मनात घर करून बसते. पंडित हृदयनाथ आणि लतादीदींनी तर या प्रार्थनेचे सोने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com