
मयूरेश पाटणकर, गुहागर - guhagarsakal@gmail.com
एके काळचे शृंगारतळी पूर्णपणे बदलले असून, येथील रस्त्यावरून पहाटेपासूनच वाहनांची ये-जा सुरू होते. हे खेडेगाव गेल्या ३० वर्षांत गुहागर तालुक्याचे मुख्य आर्थिक केंद्र बनले आहे; मात्र या बदलाचे मूळ आहे ते दाभोळ येथील वीज कंपनी.
एके काळी म्हणजे ९० च्या दशकातील शृंगारतळी कोकणातील सामान्य खेडे होते. या कालखंडातील शृंगारतळीमध्ये बस थांब्याशेजारी एक हॉटेल होते. सकाळच्या वेळी चहा-नाश्त्याची सोय आणि सोबत करणारे हे हॉटेल होते. जोडीला वृत्तपत्राचा स्टॉल. येथील लगबगीने शृंगारतळीतील व्यवहाराला सुरुवात व्हायची. बाजारपेठत एक-दोन पानवाले, किराणा दुकाने, कापडवाला, त्याच्यासमोर टेलर, पानस्टॉल, मटणविक्रेते, औषधांचे एक दुकान आणि दोन डॉक्टर अशी बाजारपेठ होती. मोहनशेठ संसारे यांचा कौलाचा व्यापार आणि संसारेबंधूंचे किराणा मालाचे दुकान ही गर्दीची ठिकाणे. शृंगारीमोहल्ला आणि आजूबाजूला असलेल्या दोन-चार वाड्यांमधून असलेली वस्ती सोडली तर शृंगारतळी गावाची लोकसंख्याही खूप कमी होती. या गावाशेजारी असलेल्या जानवळे गावाची लोकसंख्या शृंगारतळीहून अधिक होती. केवळ गुहागर-चिपळूण या मुख्य रस्त्यावर असलेले गाव अशी ओळख होती.