नदीपात्रांचं अस्वस्थ वर्तमान (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

नदीपात्रांचं अस्वस्थ वर्तमान (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

नदीपात्रातल्या खोल घळी, धबधबे, नागमोडी वळणं, वाळूची बेटं, पूरमैदानं हे नदीच्या नैसर्गिक उत्क्रांतीतले महत्त्वाचे टप्पे असतात. ते अबाधित राहणं नदीच्या स्वास्थ्याच्या दृष्टीनं गरजेचं असतं. येत्या आठवड्यात (२२ मार्च) जागतिक जलदिन आहे. त्यानिमित्तानं नदीपात्रांच्या सद्यःस्थितीविषयी...

आज जगातल्या कुठल्याही नदीच्या उगमापासून ते मुखापर्यंतचा मार्ग पूर्णपणे नैसर्गिक आणि अबाधित असल्याची स्थिती नाही. सगळ्याच नदीपात्रांचं (रिव्हर चॅनल) पर्यावरण उद्‌ध्वस्त झाल्याची चिन्हं प्रकर्षानं समोर येऊ लागली आहेत. माणसाचा नदीखोऱ्यात आणि पात्रांत अनिर्बंध हस्तक्षेप हे याचं  मुख्य कारण आहे.   

नदीच्या वाहत्या पाण्यांत तयार होणारं प्रवाहचक्र, गाळ वाहून नेण्याची तिची क्षमता, नदीपात्राचा आकार, दोन्ही किनारे, नदीकाठावरच्या आणि नदीपात्रातल्या वनस्पती, किनाऱ्यालगतचे सपाट प्रदेश (टेरेस), पूरमैदाने (फ्लड प्लेन) या सगळ्या गोष्टी गेल्या काही दशकांत अनेक नद्यांच्या बाबतीत पूर्णपणे बदलून गेल्या आहेत. या सगळ्या नैसर्गिक प्रक्रिया त्यांच्या मूळ स्थितीत पुन्हा निर्माण करणं याला ‘नदीपात्रांची पुनर्निर्मिती’ (रिव्हर रिस्टोरेशन) असं म्हटलं जातं. ‘नदीपुनरुज्जीवन’ (रिव्हर रिज्युविनेशन) किंवा ‘नदीसुधारणा’ असेही दोन शब्द या क्रियेला समानार्थी म्हणून वापरले जात असले तरी ‘नदीसुधारणा’ या कल्पनेत नदीपात्रातला अपेक्षेपेक्षा वाढलेला गाळ काढणं किंवा कोरड्या झालेल्या नद्या पुन्हा प्रवाहित  करणं यावर भर दिला जातो. बिघडलेल्या नदीपात्रांची पुनर्निर्मिती करण्याचे प्रयत्न अनेक देशांत सुरू असले तरी त्यांत अजूनही पूर्णपणे यश मिळालेलं नाही. एका अभ्यासानुसार, आत्तापर्यंत अशा प्रयत्नांत केवळ ६० टक्केच यश आपण मिळवू शकलो आहोत. सगळ्याच लहान-मोठ्या नदीपात्रांत आणि नदीकिनारी मोठी जैवविविधता (बायोडायव्हर्सिटी) आणि आवासविविधता (हॅबिटॅट डायव्हर्सिटी) आढळून येते. वस्तीतून, विशेषतः नागरी वस्तीतून, वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याचा आणि नदीकिनाऱ्यांचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी, कचरा आणि राडारोडा टाकण्यासाठी, पर्यटनस्थळ म्हणून, वाहतुकीसाठी आणि घरं बांधून राहण्यासाठी केला जातो तेव्हा ही विविधता हळूहळू  नष्ट होऊ लागते. असं झाल्यामुळेच आज अनेक नद्यांचं मूळ नैसर्गिक स्वरूप आणि पर्यावरण शोधणंही दुरापास्त होऊन बसलं आहे.   

पृथ्वीवर पडलेल्या पावसाच्या पाण्याचं वितरण नद्या-उपनद्या आश्‍चर्य वाटावं इतक्‍या समर्थपणानं करत असतात. निसर्गाची ही स्वनियंत्रित अशी यंत्रणा असते. आपण आपल्या निसर्गदत्त नदीपात्रांची आज जी अवस्था करून ठेवली आहे त्यावर विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. माणसाच्या समृद्ध अस्तित्वासाठी नद्यांचा विचार हा प्राधान्यानं होणं आता नक्कीच आवश्‍यक झालं आहे. प्रत्येक नदीचं  एक बंदिस्त असं खोरं असतं, या खोऱ्यात मुख्य नदी व तिच्या अनेक उपनद्यांचं जाळं असतं. नैसर्गिक जलोत्सारणाचा तो एक परिणामकारक असा आकृतिबंध असतो. नद्या-उपनद्यांच्या या जाळ्यातली प्रत्येक उपनदी ही त्या खोऱ्यातून होणाऱ्या जलोत्सारणातली एक आवश्‍यक अशी शृंखला असते. नाले, ओढे, प्रवाह अशा नावांनी नदीखोऱ्यातले हे नदीप्रवाह ओळखले जात असले तरी त्या प्रत्येकाचं जलोत्सारण आकृतिबंधात विशिष्ट असं स्थान असतं. प्रदेशातल्या खडकांचा प्रकार, त्यांचा कठीण असा सच्छिद्रपणा अथवा त्यांची पार्यता, त्या प्रदेशात पडणाऱ्या पावसाचं प्रमाण, प्रदेशाचा उतार यानुसार मुख्य नदीच्या खोऱ्यातल्या जलोत्सारणजाळीचा विकास झालेला असतो. ही एक निश्‍चित अशी नैसर्गिक विकासप्रक्रिया आहे. प्रदेशाच्या उंच-सखलपणानुसार, पडणाऱ्या पावसाचे प्रवाहमार्ग तयार होतात व जास्त उंचीकडून कमी उंचीकडं पाणी उतारानुसार वाहू लागते. ज्या डोंगरमाथ्यावर हे प्रवाहमार्ग तयार होतात त्याला जलविभाजक असं म्हटलं जातं. इथूनच जवळजवळच्या दोन नदीखोऱ्यांकडं जाणाऱ्या पाण्याचं विभाजन होतं. 

डोंगरमाथ्याजवळ, माथ्यापासून काही अंतरावर जे अस्थायी व हंगामी प्रवाहमार्ग तयार होतात त्यांना ‘प्रथम श्रेणीचे प्रवाह’ असं म्हटलं जातं. ते इतक्‍या तीव्र उतारावर तयार होतात की त्यात केवळ पावसाळ्यातच पाणी असू शकतं. जवळजवळचे दोन प्रथम श्रेणीचे प्रवाह मिळून एक द्वितीय श्रेणीचा प्रवाह तयार होतो. दोन द्वितीय श्रेणीच्या प्रवाहांच्या एकत्रीकरणानंतर तृतीय श्रेणीचा प्रवाह तयार होतो. अशा रीतीनं अनेक कनिष्ठ श्रेणींचे प्रवाह एकत्र येऊन, वरच्या व अधिक वरच्या श्रेणीचे प्रवाह तयार होतात. यातूनच शेवटी मुख्य नदी व तिचं पात्र तयार होतं. जसजशी प्रवाहाची श्रेणी वाढते तसतसा त्या प्रवाहातल्या पाण्याचा साठाही पावसाळ्यात वाढतो. मुख्य नदीची श्रेणी जेवढी मोठी तेवढा तिच्या निर्मितीसाठी आवश्‍यक असलेल्या उपनद्यांचा पसाराही मोठा. नदीतून पाण्याचा जो सहज निचरा होतो त्यासाठी या प्रत्येक श्रेणीतल्या प्रत्येक प्रवाहाचं योगदान सुनिश्‍चित असतं.  

देशाच्या सर्वेक्षण विभागानं तयार केलेल्या स्थलनिर्देशक नकाशावर नदीप्रवाहांचं हे सर्व जाळं अगदी नेमकेपणानं दाखवलेलं असतं. आज हवाई छायाचित्रांवरून आणि उपग्रहप्रतिमांवरून हे जाळं पाहून ते किती बदललं आहे किंवा बाधित झालं आहे ते सहजपणे पाहता येतं आणि अगदी लहानशा ओढ्यावर (प्रथम किंवा द्वितीय श्रेणीच्या प्रवाहावर) जर बांधकाम केलं तर, तो अडवला किंवा बुजवला तर त्याचा किती मोठ्या प्रदेशावर कसा परिणाम झाला आहे, याचीही कल्पना येऊ शकते.  

जलविभाजकाजवळ म्हणजे डोंगरमाथ्याजवळ असलेले हंगामी व द्वितीय श्रेणीचे प्रवाह तर फारच महत्त्वाचे असतात. नागरीकरणप्रक्रियेत नेमका याच प्रवाहांचा बळी बांधकाम व्यवसायात दिला जातो. शहर वस्तीतून जाणारे नदी-नाले, ओढे हे पाण्याचा निचरा करण्यासाठी सक्षम असलेच पाहिजेत. त्यांची नैसर्गिक लांबी, रुंदी आणि खोली अबाधित राहिली तर अतिवृष्टीच्या काळात ते पाणी सहज वाहून नेऊ शकतात. यासाठी या नाल्यांच्या आणि ओढ्यांच्या मागील प्रवाहही निचरा करण्यायोग्य असावे लागतात. वस्तुतः नदीखोऱ्यातल्या प्रत्येक लहान मोठ्या प्रवाहमार्गाची नैसर्गिक रचना अबाधित राहणं गरजेचं असतं. 

कोणत्याही प्रदेशाचा सर्वेक्षण विभागानं तयार केलेला नकाशा पहिला तर व त्यावर आजची बांधकामं, बंधारे, पूल, रस्ते यांची स्थानं अध्यारोपित (सुपरइम्पोज) केली तर नैसर्गिक जलोत्सारणात किती हस्तक्षेप झाला आहे ते सहजपणे कळून येतं. अमर्यादित, अनिर्बंध व बेशिस्त पद्धतीनं, निसर्गनियम डावलून केलेल्या बांधकामप्रक्रियेचा तो अटळ परिणाम असतो. दरवर्षी पावसाळ्यात येणारी पुराची आपत्ती मुख्यतः यामुळेच असते. मुसळधार आणि अतिरिक्त पावसाला त्यासाठी दोष देण्यात काहीच अर्थ नसतो. नद्यांच्या पाणलोटक्षेत्राची, नदीपात्रांची आणि मार्गांची व नैसर्गिक जलोत्सारणप्रक्रियेची काळजी घेतली तर पृष्ठजल आणि भूजल विपुलतेनं उपलब्ध होऊ शकतं. आज अनेक नद्या मृतप्राय होऊ लागल्या आहेत. नद्यांच्या परिसरात मानवजन्य घटकांमुळे होत असलेल्या बदलांचा परिणाम अधिकच क्‍लिष्ट स्वरूप धारण करू लागला आहे . या सर्वांचे परिणाम आता सर्वत्र दिसून येऊ लागले आहेत. पृष्ठजल व भूजल यातलं कमी झालेलं आदानप्रदान, नदीपात्र व पूरमैदान यातलं गाळाचं वहन व स्थानबदल, नदी व किनारे यातल्या बिघडलेल्या जैविक क्रिया-प्रक्रिया असे अनेक परिणाम आता डोकं वर काढू लागले आहेत.  नदी-नाल्यांच्या पुनर्निर्मितीकडं खरंतर आपण कधीच लक्ष देत नाही. बिघडलेल्या नदीपात्रांचं पाऊस पडून गेल्यावर आपोआपच पुनरुज्जीवन होतं यावर आपला सर्वांचा ठाम विश्वास आहे! मात्र, त्यासाठी अनेक वेगळे प्रयत्न करावे लागत असतात; पण तसे प्रयत्नही होताना दिसत नाहीत! नद्यांच्या परिणामकारक पुनर्निर्मितीसाठी - नदीपात्रात येऊन पडणारा गाळ, त्याचं बदलते प्रमाण, नद्यांचा बदलतता वेग, पाणी साठून राहण्याची ठिकाणं, पूरप्रवण जागा, किनारे ढासळण्याची ठिकाणं, बंधारे, नदीपात्रातल्या व किनाऱ्यावरच्या वनस्पती, त्यात होणारी वाढ या सगळ्याबद्दलची सांख्यिकी आपल्या कडे इतकी अपुरी आहे, की तिचा काहीही उपयोग करता येत नाही, अशी आजची स्थिती आहे. यासाठी  नदी तिचं भूशास्त्रीय कार्य कशा प्रकारे करते तेही समजून घेणं आवश्‍यक असतं. नदीच्या वरच्या, मधल्या आणि खालच्या टप्प्यात चालू असलेलं झीजेचं, गाळवहनाचं आणि संचयनाचं कार्य नदीमार्गात शिस्तबद्ध पद्धतीनं सुरू असतं. पाणलोटक्षेत्रांतल्या असंख्य जलप्रवाहांचा त्यात निश्‍चित असा सहभाग असतो आणि ही यंत्रणा अबाधित राहिली तर आजूबाजूच्या विस्तीर्ण प्रदेशावर  भूपृष्ठजलाची आणि जमिनीत मुरणाऱ्या भूजलाची कमतरता जाणवू नये याची निसर्गच काळजी घेत असतो! नदीपात्रातल्या खोल घळी, धबधबे, नागमोडी वळणं, वाळूची बेटं, पूरमैदानं हे  नदीच्या नैसर्गिक उत्क्रांतीतले महत्त्वाचे टप्पे असतात. ते अबाधित राहणं नदीच्या स्वास्थ्याच्या दृष्टीनं गरजेचं असतं. आज नदीची ही गरज पूर्णपणे उपेक्षून माणसानं आपल्या स्वार्थासाठी तिचा वेडावाकडा वापर सुरू केला आहे. निसर्गाचं हे सुंदर लेणं उद्‌ध्वस्त करण्याची जगभरात सगळीकडे जणू चढाओढच सुरू आहे’ नद्यांचं हे अस्वस्थ वर्तमान आपण जितक्‍या लवकर बदलू तितकं बरं. तसं झालं तर नद्यांना त्यांचं पूर्ववैभव नक्कीच प्राप्त होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com