‘सत्य’मेव जयते! (डॉ. वैशाली देशमुख)

डॉ. वैशाली देशमुख
रविवार, 8 जुलै 2018

मुलं अनेकदा खोटं बोलतात. खूप लहान मुलं तर त्यांची कल्पनाशक्तीच त्या खोटं बोलण्यातून फुलवून दाखवत असतात. खोटं बोलल्यावर भरायला लागणारी किंमत आणि खरं बोलल्यामुळं मिळणारे फायदे मुलांना स्वत:हून जेव्हा समजतात, तेव्हा ती प्रामाणिक बनायचा मनापासून प्रयत्न करतात असं दिसून आलंय आणि इतर गोष्टींप्रमाणं यातही पालकांच्या वागण्याचं निरीक्षण मुलं करत असतात! खोटं बोलण्याच्या सवयीचं काय करायचं, खरं बोलण्याचं महत्त्व कसं पटवून द्यायचं, खरं-खोटं यांतली सीमा तारतम्यानं कशी ठरवायची आदी गोष्टींबाबत ऊहापोह. 

‘‘तू  खोटारडी आहेस!...’’
आयुष चांगलाच संतापला होता आईवर. झालं असं, की आयुषचा दुधाचा ग्लास इतका पटकन रिकामा झालेला पाहून आईला शंका आली. ती त्याला म्हणाली ः ‘‘खरं खरं सांगितलंस, तर मी काही म्हणणार नाही तुला.’’ म्हणून आयुषनं सांगून टाकलं, की त्यानं दूध बेसिनमध्ये ओतून दिलं. झालं, आई अन्नाच्या नासाडीपासून ते आयतं मिळालं म्हणून माज करण्यापर्यंत खूप बोलली. त्यावरची आयुषची ही प्रतिक्रिया होती.     
व्हर्जिनिया विद्यापीठात विद्यार्थी म्हणून तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल, तर त्यांच्या काही अटी मान्य करायला लागतात. या अटी म्हणजे तिथं असलेल्या ऑनर कमिटीनं बनवलेले वर्तनासंबंधीचे नियम. इसवीसन १८४० पासून हे नियम आहेत आणि ते विद्यार्थीच बनवतात, असं मी वाचलं. त्यानुसार इथं खोटं बोलायला, फसवणूक करायला आणि चोरी करायला मनाई आहे. कॉलेजच्या परिसरात त्यामुळं एक फार छान विश्वासाचं, जबाबदारीचं, आदराचं आणि आशेचं वातावरण असतं. तिथं बनलेली नाती आणि दोस्ती एका मजबूत पायावर उभी असतात. शिवाय या मुलांना इतरही बरेच फायदे मिळतात. उदाहरणार्थ, रात्री-बेरात्री आवारात नि:शंकपणे फिरता येतं. आपल्या गाडीच्या काचा कुणी फोडेल, कुठली वस्तू चोरीला जाईल याची भीती नसल्यामुळं मनाला शांतता असते. मुलांवर विश्वास असल्यामुळं शिक्षक त्यांना सुटीतच असाइनमेंट्‌स पुऱ्या करायला देतात, त्यामुळं वर्षभर इतर गोष्टींसाठी त्यांना भरपूर वेळ मिळतो. जे हे नियम पळणार नाहीत, त्यांना कॉलेजमधून काढून टाकण्याची शिक्षा मिळते. पण गंमत अशी, की जर कुणी तक्रार करण्याआधीच तुम्ही आपणहून तुमची चूक कबूल केलीत, तर ती चूक माफ होते. म्हणजे भर चुकीवर नसतो, तर प्रामाणिकपणावर असतो.

या विद्यापीठासारखी परिस्थिती जगातही असती तर? पण दुर्दैवानं तसं नसतं. लहानपणी ‘अरे लब्बाडा!’ म्हणून कौतुकानं स्वीकारलेल्या बाता हळूहळू गंभीर स्वरूप धारण करतात. ‘‘रिझल्ट लागला; पण मुलीनं तो सांगितलाच नाही’’, किंवा ‘‘क्‍लास बुडवून मुलगा न सांगता पिक्‍चरला गेला,’’ अशा तक्रारी किशोरवयीन मुलांचे पालक घेऊन येतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत असते फसवलं गेल्याची वेदना आणि मुलांच्या भविष्याविषयी प्रचंड काळजी. कधी बरं सुरवात होते या खोटारडेपणाची? 

तसं बघायला गेलं, तर खोटं बोलणं हा बालविकासातला एक महत्त्वाचा टप्पा असतो. मुलं वयाच्या दुसऱ्या ते चौथ्या वर्षापासूनच बाता मारायला सुरू करतात. एखादी न घडलेली घटनाही साग्रसंगीत वर्णन करून सांगतात. तो काही खोटारडेपणा नसतो. त्यांना समजलेल्या नवनवीन गोष्टी, नव्यानं शोध लागलेले शब्द यांचा ते प्रत्यक्ष व्यवहारात वापर करून बघत असतात. त्यांच्या कल्पनाशक्तीला मुक्त वाव देत असतात. उलट संशोधन सांगतं, की जास्त बुद्धिमत्ता असलेली मुलं अधिक लवकर आणि अधिक सफाईनं खोटं बोलू शकतात. कारण खोटं बोलण्यासाठी दोन गोष्टींवर प्रभुत्व असायला लागतं. एक म्हणजे मनकवडेपणा-  दुसऱ्याच्या मनात काय आहे, त्यांना आपल्याकडून काय उत्तर अपेक्षित आहे, काय सांगितलं तर ते पटेल याचा अचूक अंदाज त्यातून बांधता येतो. दुसरं म्हणजे खोटं कधी, काय आणि कसं बोलावं याच्या आकलनाची वैचारिक क्षमता. 

खोटं बोलण्याला अनेक पदर असतात, वेगवेगळ्या प्रकारे त्याचं समर्थनही केलं जातं. काही जण गप्प राहणं पसंत करतात, तर काही जण युधिष्ठिरासारखे अर्धसत्याचा आधार घेतात. महाभारतातल्या निर्वाणीच्या युद्धात अतिशय युद्धकुशल असलेल्या द्रोणाचार्यांना खच्ची केल्याशिवाय विजय मिळवणं अवघड आहे, हे लक्षात आल्यावर एक आवई उठवली गेली, द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा याचं निधन झाल्याची. खरं तर अश्वत्थामा नावाच्या हत्तीचा मृत्यू झाला होता. काय खरं, काय खोटं याची त्या गोंधळात शहानिशा करणं मुश्‍कील असल्यामुळे द्रोणाचार्यांनी सत्यप्रिय युधिष्ठिराला विचारायचं ठरवलं. धर्मराजा दबावाखाली का होईना, तोंडातल्या तोंडात पुटपुटला ः ‘‘असं ऐकलंय खरं; पण हत्ती की माणूस, माहिती नाही. नरो वा कुंजरो वा!’’ ते शेवटचे शब्द शंखाच्या गजरात बुडून गेले आणि पांडवांच्या अपेक्षेप्रमाणं द्रोणाचार्यांनी शस्त्रं खाली ठेवली. आयुष्यात कधीही तोंडातून असत्य न काढलेल्या धर्मराजाची ही कथा, तर आपल्यासारख्या पामरांचं काय!

मग काय बोलू द्यायचं मुलांना खोटं? नक्कीच नाही. त्यांची प्रयोगशीलता खोड बनण्याआधी मुळात खुडून टाकायला हवी आणि त्याची सुरवात हे प्रत्यक्ष घडण्याआधीपासूनच व्हायला हवी. गोष्टी, गाणी, आपले लहानपणाचे अनुभव यांचा आधार घेऊन खरं-खोटं बोलण्याविषयी नेहमी मुलांशी बोलायला हवं. हे असे काही मुद्दे मांडता येतील ः जेव्हा आपण खोटं बोलतो, तेव्हा आपण इतरांना फसवत असतोच; पण स्वत:लाही फसवत असतो. कारण आपण कितीही बेमालूमपणे खोटं बोललो, तरी आपल्या स्वत:ला याची जाणीव असते. त्यामुळं आपणच आपल्या मनातून उतरतो. खरं बोललं, की डोक्‍यावरचं केवढं ओझं उतरतं! मनाला किती शांत वाटतं! आनंद आणि यश हवं असेल, तर प्रामाणिकपणाला पर्याय नाही. खरेपणातून एखाद्याची लायकी कळते, त्याची जातकुळी कळते, पत ठरते. प्रामाणिकपणातून विश्वास जन्माला येतो आणि विश्वासाच्या खतपाण्यातून नाती बहरतात. शिवाय खोटं बोलणं सोपं नाही. ते खरं बोलण्यापेक्षा अधिक गुंतागुंतीचं असतं, मेंदूला त्यासाठी खूप जास्त काम करायला लागतं.

तीन-चार वर्षांची मुलं कधी खरं बोलतात? जेव्हा त्यांना कळतं, की आपण खरं बोललं, की आई-बाबा खूष होतात तेव्हा. आणि असं वागण्याचा इतरांना कौतुक किंवा बक्षिसाच्या स्वरूपात फायदा झालेला दिसला असेल तेव्हा. जराशी मोठी मुलं, खरं बोलायला हवं हे त्यांना स्वत:ला पटल्यावर तसं करतात. ‘लांडगा आला रे’पासून ‘पिनोकिओ’पर्यंतच्या गोष्टींनी लहानपणापासून आपल्याला खोटं बोलण्याचे दुष्परिणाम सांगितलेले असतात; पण नुसतं खोटं बोलण्याचे तोटे सांगून फारसा फायदा होत नाही, त्याबरोबर खरं बोलण्याचे फायदे सांगितले, तर ते जास्त चांगलं समजतं. उदाहरणार्थ, अमेरिकेचे माजी अध्यक्ष अब्राहम लिंकन यांची गोष्ट! ते ‘ऑनेस्ट एब’ या नावानं परिचित होते. त्यांच्या त्या प्रामाणिकपणामुळं ते शेवटी अध्यक्ष झाले. महात्मा गांधी यांनी सत्याच्या मार्गानं जाऊन स्वराज्य मिळवलं.

जेव्हा सत्य ढळढळीत समोर दिसत असतं, तेव्हा मुलांकडून ते वदवून घेण्यात, कबुलीजबाब घेण्यात अर्थ नाही. म्हणजे आपल्या मुलीनं बिस्किटं खाल्लीयेत हे स्पष्ट दिसत असताना ‘‘कुणी घेतली बिस्किटं? मला खरं उत्तर हवंय!’’ असा आरडओरडा करून काय साधणार? मोठी माणसंसुद्धा खरं सांगायला कचरतात. शिवाय ओरडण्याचा, रागीट पवित्रा पहिला, की कुणीही बिचकणारच. शिक्षा होण्याची भीती असेल, तर खरं बोलण्यापेक्षाही ती शिक्षा टाळायची कशी यावरच मुलं भर देतात, त्यांचा सगळं लक्ष, सगळी एनर्जी त्यावरच केंद्रित होते. उलट मुलं खोटं बोलण्याचे, अधिकाधिक गुंतागुंतीचे आणि हमखास यशस्वी होऊ शकणारे नवनवीन मार्ग शोधायला लागतात, त्यात वाकबगार होतात. बरं, चूक कबूल केली तर नेहमी उपयोग होतो का? सुरवातीच्या उदाहरणात आईच्या प्रॉमिसवर विश्वासून आयुषनं चूक कबूल केली, तर त्या धाडसाचं कौतुक व्हायला हवं; पण आईची तीव्र प्रतिक्रिया पाहता पुढच्या वेळी सांगेल का तो खरं? शक्‍यता कमी आहे. अर्थात चूक कबूल केली, म्हणून त्याची कृती क्षम्य ठरत नाही. ‘‘तू खरं बोललास हे खूप बरं झालं. दुधाचं काय करूया आता?’’ असं आईनं विचारलं, तर त्यातून काहीतरी सकारात्मक परिणाम साधू शकेल.

आणि जर कुणी ठरवलंच सतत सडेतोड बोलायचं, तर केवढा गोंधळ होईल! ‘‘मी कशी दिसतेय? फार जाड नाही ना दिसत?’’ या प्रश्नाला खरं उत्तर द्यायलाच हवं का? मुलानं उत्साहानं चित्र काढून आणून दाखवलं, की थेट ‘‘डोकं जरा मोठं झालंय, आणि पाण्याचा रंग चुकलाय’’ असं म्हणायचं? आपल्या टीकाटिप्पणीनं कुणाला तरी वाईट वाटणार असेल आणि शब्दांना थोडी मुरड घातल्यामुळं कुणाचं फारसं बिघडणार नसेल, तर थोडीशी रंगसफेदी जातायेता करावी लागते. मुलं हे फार लवकर शिकतात आणि जसजशी मोठी होत जातील, तसतशी ती हे सामाजिक कौशल्य म्हणून सहजपणे स्वीकारतातही. पण खऱ्या-खोट्यातला हा फरक फार सूक्ष्म आणि व्यक्तिसापेक्ष असतो.

खोटं बोलल्यावर भरायला लागणारी किंमत आणि खरं बोलल्यामुळं मिळणारे फायदे मुलांना स्वत:हून जेव्हा समजतात, तेव्हा ती प्रामाणिक बनायचा मनापासून प्रयत्न करतात असं दिसून आलंय आणि इतर गोष्टींप्रमाणं यातही पालकांच्या वागण्याचं निरीक्षण मुलं करत असतात हे विसरून चालणार नाही!

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: How to handle children tips by Dr Vaishali Deshmukh