'डिप्रेशन'वर असा करूया इलाज

Depression
Depression

मा नसिक आजार या विषयाकडे अजूनही गंभीरपणे आणि तो इतर कुठल्याही शारीरिक आजाराप्रमाणेच एक आजार आहे या दृष्टीकोनातून बघण्याची तयारी आपल्याकडे नाही. दुर्लक्ष करणे, लपवून ठेवणे, अंधश्रद्धांशी, भुताखेताची जोडलेले असणे या मानसिक आजारातल्या महत्वाच्या समस्या आहेत. मानसिक आजाराने त्रस्त झालेल्या व्यक्तिला योग्य वेळी, योग्य उपचार मिळत नाहीत. आजार वाढत जाऊन गंभीर स्वरुप घेतो. मानसोपचार वेळीच मिळाले तर व्यक्तीला त्यातून बाहेर पडायला, निदान त्या आजाराशी दोन हात करायला बळ मिळू शकते हा विचार समाजात रुजविण्याची आज फार गरज आहे. डिप्रेशन किंवा नैराश्य हा आजार असणाऱ्यांची संख्या भारतात लोकसंख्येच्या ३६ टक्के इतकी प्रचंड आहे असं जागतिक आरोग्य संघटनेने २०१५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

नैराश्य कधीही आणि कुणालाही, कुठल्याही वयोगटात येऊ शकते हे गृहीत धरले पाहिजे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला नैराश्य आले असेल आणि वेळीच उपचार झाले नाहीत तर आत्मघातापर्यंत ती व्यक्ती जाऊ शकते. अशावेळी नैराश्याबद्द्ल पुरेशी जागरुकता निर्माण करण्याची आज नितांत गरज आहे. आपल्याला किंवा आजूबाजूचा कुणाही नैराश्याने त्रस्त असेल तर त्याची टिंगल टवाळी न करता, त्याच्यावर न हसता किंवा त्याचा आजार न लपवता त्याला उपचार कसे मिळतील हे बघण्याची आज गरज आहे. 

जागतिक आरोग्य संस्थेने यंदाचे वर्ष नैराश्याबद्दल जनजागृतीसाठी जाहीर केले आहे. ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन जगभर साजरा केला जातो. त्या अनुषंगाने नैराश्याबद्द्ल जनजागृती करण्याच्या हेतूने पुण्यामध्ये प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा आणि चैतन्य मेंटल हेल्थ केअर सेंटर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ७, ८, ९ एप्रिल असा तीन दिवसांचा जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा आणि चैतन्य मेंटल हेल्थ केअर सेंटर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या उपक्रमाचे बोधवाक्य आहे “नैराश्य - चला बोलूया !” तीन दिवसांच्या या उपक्रमात पहिल्या दिवशी नैराश्य या विषयावर कार्यशाळा घेतली जाणार आहे. दुसऱ्या दिवशी डॉ. मोहन आगाशे निर्मित ‘कासव’ या चित्रपट दाखवण्यात येणार असून तिसऱ्या दिवशी नैराश्याबद्द्ल जनजागृतीसाठी रैली काढण्यात येणार आहे. 

पहिल्या दिवशी नैराश्य या विषयावर चर्चासत्र व कार्यशाळा घेतली जाणार आहे. यात प्रामुख्याने विविध वयोगटातील नैराश्याच्या समस्यांबद्द्ल चर्चा केली जाणार आहे. तसेच त्यावर काय उपाय असू शकतात, समाजाचा दृष्टीकोन अधिक सकस करण्यासाठी काय करता येऊ शकते यावर चर्चा होणार आहे. पुण्यातील मानसोपचारतज्ज्ञ आणि मनोविकारतज्ञ या चर्चासत्रात सहभागी होणार आहे. तसेच मानसशास्त्राचे विद्यार्थी, समुपदेशकही या चर्चासत्राला उपस्थित असतील. कार्यशाळा सकाळी ९ ते २ या वेळात प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा येथे आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेच्या सहभागासाठी नोंदणी आवश्यक असून, ती मोफत आहे.

उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी डॉ. मोहन आगाशे निर्मित आणि सुमित्रा भावे-सुनील सुखटणकर दिग्दर्शित ‘कासव’ हा चित्रपटाच्या स्क्रीनिंगचे आयोजन केलेले आहे. समाजातील वाढत्या नैराश्याच्या समस्येकडे हा चित्रपट लक्ष वेधतो. चित्रपटानंतर डॉ. मोहन आगाशे, सुमित्रा भावे, सुनील सुखटणकर आणि चित्रपटातील कलाकार यांच्याबरोबर मुक्त संवादाचे आयोजन केलेले आहे. चित्रपट दुपारी १२ वाजता मंगला चित्रपटगृह, शिवाजीनगर येथे दाखवण्यात येणार आहे. 

नैराश्यबद्दल समाजात आजही अनेक गैरसमज आहेत. इतर कुठल्याही आजाराप्रमाणेच मानसिक आजारांकडे बघितले पाहिजे हा विचार जनमानसात पोचवण्यासाठी पदयात्रेचे आयोजन केलेले आहे. ही पदयात्रा बालगंधर्व चौक शिवाजी नगर पासून कमला नेहरू पार्क पर्यंत काढण्यात येणार असून पदयात्रेची सुरुवात सकाळी ८ वाजता होईल. पुण्याच्या महापौर मा. सौ. मुक्ता टिळक यांच्या हस्ते या जनजागृती पदयात्रेचा शुभारंभ होणार आहे.

समाजाने संघटीत होऊन नैराश्याशी लढा देण्याची आज गरज आहे. नैराश्य येणे यात लाजिरवाणे असे काहीही नाही हे समाजात रुजवणे गरजेचे आहे. त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची आज गरज आहे. नैराश्याबद्द्ल मोकळेपणाने बोलण्याची, निराशा आली आहे हे मान्य करण्याची आणि त्यातून मार्ग काढून सुखी आयुष्य जगण्यासाठी योग्य उपचार घेण्याची तयारी दर्शवण्याची आज गरज आहे.  

अधिक माहितीसाठी संपर्क : 
सुषुप्ती साठे, चैतन्य मेंटल हेल्थ केअर सेंटर, क्र. ८, शिवरंजनी कॉम्प्लेक्स, सर्वे क्र. १२, सिटीएस क्र.५३९, हॉटेल ग्रीन पार्क जवळ, पावना सहकारी बँकेसमोर, सोमेश्वर वाडी, बाणेर, पुणे ४११०२१
फोन नंबर : ९८२२८९५५९७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com