चांगल्या कवितेत हायपर लिंक्‍स असतात

poem.
poem.

मागच्या भागात आपण मानसशास्त्राच्या मदतीने कवितेची निर्मितीप्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न अजून खोलात जाऊन करायला हवा. त्या दिशेने म. सु. पाटील सरांनी काही काम आधीच करून ठेवलेले आहे पण ते अजून पुढे नेण्याची गरज आहे.

या भागात आपण मानसशास्त्रीय भाग जरा बाजूला ठेवून केवळ उपलब्ध संहितेच्या मदतीने कवितेची निर्मितीप्रक्रिया समजून घेण्यास काही मदत होते काय, हे बघण्याचा प्रयत्न करू. हे करत असताना सामान्यतः मला माझ्या वकुबाप्रमाणे, माझ्या कविता समजून घेण्याच्या क्षमतेप्रमाणे ज्या कविता चांगल्या वाटतात त्यांचाच मी विचार करणार आहे. मग कुणी म्हणेल तुम्हाला कोणत्या कविता चांगल्या वाटतात? तर त्याचे उत्तर आहे की - मला आशयप्रधान, आशयाचे विचलन (deviation), विस्थापन (displacement), करणाऱ्या आणि वक्रोक्तिपूर्ण (indirection) भाषेत लिहिलेल्या वाच्यार्थाच्या पातळीवर न थांबता अर्थाची बहुलता असलेल्या कविता आवडतात.

कवितेची निर्मितीप्रक्रिया समजून घेण्याची गरज सगळ्या रसिकांना जाणवतेच असे नाही परंतु ज्यांना जाणवते त्यांना बहुतेक कवी काहीही मदत करत नाहीत. मी कविता लिहित नाही, कविताच स्वतःला माझ्या मार्फत लिहून घेत असते, यासारखे भोंगळ आणि गोलगोल फिरविणारे उत्तर देऊन बहुतेक कवी या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या जबाबदारीतून स्वतःची सुटका करून घेत असतात. स्वतःच्या कवितांबद्दल, तिच्या निर्मितीप्रक्रियेबद्दल, तिच्या श्रेयसाबद्दल लिहून ठेवणारे कवी फारच थोडे.

खरे म्हणजे प्रत्येक कवीने स्वतःच्या कवितेबद्दल, प्रयोजनाबद्दल, तिच्या निर्मितीप्रक्रियेबद्दल आणि तिच्या श्रेयसाबद्दल काहीतरी लिहून ठेवलेच पाहिजे. ते महत्त्वाच आहे परंतु मराठी वांग्मयविश्वात ज्या अनेक परंपरा दुर्दैवाने अनुपस्थित आहेत त्यात ही पण एक आहे. परंतु काही कवींनी हे काम करून ठेवलेले आहे. अगदी अनपेक्षित उदाहरण द्यायचे झाले तर ग्रेस यांचे देता येईल कारण त्यांनी स्वतःच्या कवितेबद्दल काहीही लिहून ठेवले नाही, असा एक भ्रम पसरवलेला आहे की काय, अशी शंका येते.

त्यांनी मितवा या ललितबंधांच्या संग्रहात भासचक्राचे तोल या चौथ्या भागात एक-दोन नव्हे तर चांगले तेरा ललितबंध लिहिले आहेत ज्यात त्यांनी त्यांच्या कवितेच्या निर्मितीप्रक्रियेबद्दल, तिच्या वैशिष्ट्यांबद्दल, तिच्यातल्या प्रतिमांच्या निर्मितीबद्दल भरपूर लिहून ठेवले आहे. ते मुळातून वाचले पाहिजे. असो.

तर कोणत्याही चांगल्या कवितेत आशयाचे, अर्थाचे विचलन आणि विस्थापन करताना, वक्रोक्तिपूर्ण भाषेत लिहिताना कवीने ज्या प्रतिमांचा, प्रतीकांचा वापर केला असेल त्या कवितेतले शब्द किंवा शब्दसमूह हे रसिकाला संहितेबाहेरचे काहीतरी खुणेने सांगत असतात. जे लोक विकिपीडियाचा वापर करतात त्यांना हे चटकन कळेल की तेथील टेक्‍स्टमध्ये काही शब्द निळ्या रंगात दिसतात. त्या शब्दांवर क्‍लिक केले की त्या शब्दाशी संबंधित नव्या लिंक्‍स उघडत जातात. चांगल्या कवितेचेही तसेच असते. कवितेतील अनेक शब्द, शब्दसमूह यांच्यावर मनातल्या मनात क्‍लिक केले की ते रसिकाला आशयाच्या, अर्थाच्या नव्या प्रदेशात घेऊन जातात. असे शब्द आणि शब्दसमूह हे चांगल्या कवितेतील हायपर लिंक्‍स असतात.

या संदर्भात ज्येष्ठ कवी सलील वाघ यांनी काही वर्षांपूर्वी एक लेख लिहिला होता ज्याचे शीर्षक कवी हा Cryptologist असतो हे असावे. (लेख हाताशी नसल्याने आठवणीतून लिहित आहे.) या लेखात वाघ असे म्हणतात की आपल्या अवतीभवती, अवकाशात, सर्वत्र काही गूढ संदेश उपस्थित असतात. ते क्रिप्टिक (सांकेतिक) भाषेत असतात. ज्याप्रमाणे लष्करात हे सांकेतिक भाषांतील संदेश ओळखून, समजून ते वापरातल्या भाषेत लिहून काढण्याचे काम हे Cryptologist करत असतात तसेच काम हे कवी त्याच्या कवितेतून करत असतो. हे विवेचन पुन्हा एकदा रंजनाच्या आणि प्रबोधनाच्या हेतूने लिहिलेल्या कवितांच्या निर्मितीप्रक्रिया समजून घेण्यासाठी उपयोगाचे नाही कारण त्या कवितांची निर्मितीप्रक्रीयाही तशी सहज समजून घेता येईल, अशी असते.

कवितेतील या हायपर लिंक्‍स रसिकाला वाच्यार्थाच्या पलीकडले अर्थ सूचित करत असल्याने रसिकाला कवीच्या मदतीशिवायच या सूचित केलेल्या अर्थांचे आकलन करून घेण्यासाठी बाध्य करत असतात. हे अर्थ आपल्याला परंपरेतून, सांस्कृतिक वारश्‍यातून, आदिबंधांतून, आपल्या भाषिक समजेतून, आपण वाचलेल्या उत्तम कवितांच्या काव्य्‌-स्मृतींतून प्राप्त होत असतात. ते रसिकालाच प्राप्त करून घ्यावे लागतात.

हे करत असताना अनेकदा कवीला ही कविता कशी सुचली, स्फुरली किंवा कवीचे त्या कवितेमागचे चिंतन काय असेल, याचा रसिकाला काही प्रमाणात अंदाज यायला लागतो. ही त्या कवितेची निर्मितीप्रक्रिया समजून घेण्याची पहिली पायरी असते. अनेकदा एखादी प्रतिमा, एखादा विचार, एखादे विशिष्ट अभिव्यक्तीचे काव्यरूप कवीला एक ट्रिगरसारखे प्रेरित करत असते. एकदा हा ट्रिगर लाभला की नंतरचे लिखाण बरेचदा हे झरझर होत जाते. परंतु प्रत्येकवेळी हे असेच घडेल, असे नाही. अनेकदा स्वप्न, भास, एखाद्या विशिष्ट परिस्थितीतून जन्माला आलेली प्रतिक्रिया, एखाद्या विषयावरचे चिंतन, एखादा विचार अशा अनेक गोष्टींतून कवितेचा उगम कवीच्या हाती लागत असतो. कवितेकडे गांभीर्याने बघणाऱ्या कवीने याबद्दल लिहून ठेवायला हवे.

ग्रेस यांच्याच एका अप्रतिम आणि अद्वितीय कवितेचे उदाहरण यासंदर्भात देता येईल. सांध्यपर्वातील वैष्णवी या कवितासंग्रहातील वेरावळीय समुद्राचे दृष्टांत या कवितेच्या निर्मितीप्रक्रियेबद्दल ग्रेस यांनी काही नोंदी लिहून ठेवल्या होत्या. पुढे त्यांच्या कवितेचा दुर्बोधता उलगडून दाखविण्याच्या दृष्टीने अभ्यास करताना जयंत परांजपे यांनी ग्रेस यांना काही प्रश्न लिहून पाठविले होते. त्यांना उत्तर देताना ग्रेस यांनी त्या नोंदी व अधिकचे काही लिहून परांजपे यांना लिहून पाठविले होते. परांजपे यांनी त्याचा वापर त्यांच्या ग्रेस आणि दुर्बोधता या ग्रंथात वापर केला होता. पण हे ग्रेस हयात असताना शक्‍य होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com