#MokaleVha : खरंच रियल लव होत माझं...

नितीन थोरात
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

‘‘मी तिच्यावर मनापासून प्रेम करतो. रियल लव करतो. त्यामुळं दुनियाकी कोईभी ताकद मुझे उससे जुदा नही करत सकती.’’ असं मनातल्या मनात म्हणत मी गुलाबाचं फुलं तोडलं आणि उद्या काहीही झालं तरी तिला प्रपोज करायचचं अशी शप्पथ घेतली. आठवीत होतो तेव्हा. म्हणजे नुकतचं वयात आलेलं म्हणतात ना, तसचं काहीतरी. पहिलं प्रेम. त्यामुळं भावना जरा जास्तच तीव्र. गुलाबी शर्टाला कडक इस्त्री केली. जीन्स धुवून तारेवर टाकली आणि उद्याचा दिवस उजाडायची वाट पाहू लागलो. रात्रभर झोप येईना.

‘‘मी तिच्यावर मनापासून प्रेम करतो. रियल लव करतो. त्यामुळं दुनियाकी कोईभी ताकद मुझे उससे जुदा नही करत सकती.’’ असं मनातल्या मनात म्हणत मी गुलाबाचं फुलं तोडलं आणि उद्या काहीही झालं तरी तिला प्रपोज करायचचं अशी शप्पथ घेतली. आठवीत होतो तेव्हा. म्हणजे नुकतचं वयात आलेलं म्हणतात ना, तसचं काहीतरी. पहिलं प्रेम. त्यामुळं भावना जरा जास्तच तीव्र. गुलाबी शर्टाला कडक इस्त्री केली. जीन्स धुवून तारेवर टाकली आणि उद्याचा दिवस उजाडायची वाट पाहू लागलो. रात्रभर झोप येईना. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अख्खी रात्र कुस बदलत, स्वप्न रंगवत निघून गेली. भल्या पहाटे झोप लागली; पण सकाळी बरोबर सातला धडपडून उठलो. घरातले सगळे रानात गेलते. त्यामुळं राज्य आपलच होतं. पटकन टपरीवर पळत जाऊन शॅम्पूची पुडी आणली. मस्त अंघोळ करून तयार झालो. आरशासमोर थांबत क्रिम, पावडर, वासाचे तेल लावले आणि कोंबडा दिसेल असा भांगही पाडला. कडक गुलाबी शर्ट घातला आणि अलगद जीन्सही घातली. टकाटक इन केली. एवढा देखणा दिसू लागलो की प्रपोज केल्यावर ती गळ्यातच पडलं की काय, असंच वाटू लागलं.

खाटेवर बसून स्पोर्टशूज घातला. तोच मोठ्या भावाचा गॉगल दिसला. पटकन डोळ्यावर लावून आरशासमोर आलो. सेम अजय देवगणच. म्हणजे आता बहुतेक गावाताल्या साऱ्या पोरी आपल्यालाच प्रपोज करत्यान, असंच वाटू लागलो. राहून राहून अंगात गुदगुल्या होत होत्या. गॉगल डोळ्यावर ठेऊनच शूज घातला आणि घराबाहेर आलो. ती बरोबर नऊ वाजता देवळामागच्या बांदानी शेताला जाती, मला माहिती होतं.

आजही ती येणार याची खात्री होतीच आणि बरोबर ती आलीच. मला पाहताच गालातल्या गालात हसत हातातली पिशवी खाली ठेवून चिंचा पाडू लागली. ही आपल्यासाठीत थांबली, याची खात्री पटली. तसा तिच्याजवळ गेलो, ‘‘लय सकाळ सकाळ निघाला रं रानात?’’ तिच्या या प्रश्‍नावर मी स्टाईल मारत गॉगल काढला आणि स्मित करत म्हणालो, ‘‘सकाळ सकाळ सूर्य पाहायचा होता; पण चंद्रच दिसला.’’ माझ्या या डायलॉगवर ती खुश झाली की घाबरली माहिती नाही; पण तिने पिशवी उचलली.

तसं मी तिला म्हणालो, ‘‘ऐक ना मला तुझ्याशी बोलायचं होतं.’’ ‘‘मगं बोल की.’’ ‘‘जरा खासगी बोलायचं होतं.’’ माझ्या या वाक्‍यावर ती म्हणाली, ‘‘आयवं मी नाय येणार कुठं, काय असलं ते हितच बोल.’ ‘‘तसा धीर एकवटत देवाचं नाव घेतलं. गुडघ्यावर बसत खिशातून गुलाबाचं फुलं काढलं आणि म्हणालो, ‘‘माझं तुझ्यावर लय प्रेमहे. मी आयुष्यभर तुला साथ देईल. तू फक्त हो म्हण.’’ माझ्या या वाक्‍यावर तिने भुवयांचा आकडा करत गुलाबाचं फुलं घेतलं आणि फुलाकडं निरखून पाहत म्हणाली, ‘‘अय तुला दुसऱ्या कुणाच्या रानातलं फुलं नाय सापडलं का? आमच्याच रानातलं फुल तोडून मला प्रपोज करतोय व्हय, चल निघ.’’ असं तुसड्यागत बोलून ती तडातडा निघून गेली.

तिच्या प्रत्येक पावलागणिक माझं काळीज चिरडलं जात होतं; पण रियल लव असल्यानं मी स्वत:ला सावरलं. स्वत:च्या मनाची समजूत घातली. आजही मी तिचा आदर करतो. कारण त्यानंतर तिच्या शेतातले गुलाब चोरून कितीतरी मुलींच्या चेहऱ्यावर मी स्मित फुलंवलं होतं. प्रपोज केलं होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I really love being real