esakal | धंदयावर आमचं पोट अन धंदाच राहिला नाही तर .....
sakal

बोलून बातमी शोधा

Veshya

पुण्यातील बुधवार पेठ ही आशिया खंडातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी वेश्या वस्ती म्हणून ओळखली जाते. सध्या या परिसरात नेपाळ, पश्‍चिम बंगाल आणि कर्नाकट राज्यातील मुलींची मोठी संख्या असून सध्या या ठिकाणी ४४० पेक्षा जास्त कुंटणखाने आणि ७ हजाराहून जास्त वेश्या आहेत.

धंदयावर आमचं पोट अन धंदाच राहिला नाही तर .....

sakal_logo
By
योगेश कानगुडे

पुणे : सध्या 'कोरोना' या व्हायरस जगात थैमान घालत आहे. अनेक देश यावर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून भारताने एकवीस दिवसांचे लॉकडाउन घोषित केले आहे. देश लॉकडाउन झाल्यानंतर छोट्या -छोट्या व्यवसायांवर याचा मोठा परिणाम झालेला दिसून येतो. 'कोरोना' व्हायरसमुळे वेश्या व्यवसायावर देखील परिणाम होऊन व्यवसाय करणाऱ्या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. भारतात वेश्या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय आहे. 'कोरोना'मुळे व्यवसायावर किती परिणाम झाला याचा आम्ही धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला असता भीषण वास्तव समोर आले. 

पुण्यातील बुधवार पेठ ही आशिया खंडातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी वेश्या वस्ती म्हणून ओळखली जाते. सध्या या परिसरात नेपाळ, पश्‍चिम बंगाल आणि कर्नाकट राज्यातील मुलींची मोठी संख्या असून सध्या या ठिकाणी ४४० पेक्षा जास्त कुंटणखाने आणि ७ हजाराहून जास्त वेश्या आहेत. बुधवारपेठमधील देहव्यापार करणाऱ्या विद्यानं (नाव बदलेलं) सांगितलं, की गेल्या महिन्यापासून या आजारामुळे व्यवसायावर परिणाम होण्यास सुरुवात झाली. अचानक ग्राहकांची संख्या कमी होत गेली. ग्राहकांची संख्या कमी झाल्यामुळे दररोजच्या खर्चासाठी लागणारे पैसेदेखील मिळत नाही. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल, असं विद्या सांगत होती. विद्याशेजारी असणारी मानसी (नाव बदलेलं) बोलू लागली, "अशी परिस्थिती आम्ही यापूर्वी कधीही पाहिली नाही. या व्यवसायावर आमचे गावाकडील घर चालते. माझ्या मुलांच्या भवितव्यासाठी मी हा मार्ग स्वीकारला आहे. घरी पैसे पाठवले नाही तर त्यांची उपासमार सुरु होणार आहे." या आजारांच्या संसर्गापासून कसा बचाव करायचा माहिती आहे का, हा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले, की या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आमच्याकडे मास्क नाहीत. सुरक्षित राहण्यासाठी दुसरे काही उपाय नाहीत, असं सांगायला त्या विसरल्या नाहीत.      

हीच परिस्थिती आसपासच्या जिल्ह्यात देखील आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सीमेवर सोलापूर जिल्हा आहे. येथील देहविक्री व्यवसायालादेखील कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोनाच्या भितीने ग्राहक नसल्याचे वारांगना सांगत आहेत. सोलापुरात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधक उपाय म्हणून राज्य सरकारने शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह, सार्वजनिक कार्यक्रम, यात्रा, उत्सवावर बंदी घातली आहे. देहविक्री करणाऱ्या वारांगनांकडे कोठूनही आलेले ग्राहक असतात. एका देहविक्री करणाऱ्या महिलेने सांगितले की, आमचा उदनिर्वाह यावरच अवलंबून आहे. कोणाला कसला आजार आहे, हे आम्हाला माहित नसते. आम्ही त्याच्याकडे कधी विचारणाही करत नाही. जो कोण असेल तो आमचा ग्राहकच. मात्र, याचा काही दिवसांपासून परिणाम जाणवत आहे. शरीराची भूक भागण्यासाठी येणाऱ्यांना कधी वेळ नसतो. कोण कधी येईल याचे काही सांगता येत नाही. मात्र, कोरोना व्हायरसची जेव्हापासून तीव्रता वाढली आहे. तेव्हापासून येणाऱ्यांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. येथे येणारे कोठून येतात हे सांगता येत नाही. देहविक्री करणाऱ्या महिलेशी अनेकांची जवळीक आलेली असते. त्या भितीतून ग्राहक येत नसेल असं वाटतं, असं एका महिलेने सांगितले. 

याच भागातील सपना (नाव बदलेलं) म्हणाली, की आम्ही किती दिवस अजून उपाशी राहू शकतो? माझ्यासारख्या अनेकजणी बाहेरच्या राज्यातून आपल्या आहेत. आम्हाला आमचं कुटुंब चालवायचं आहे. आमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करायचं आहे. जर कामधंदा बंद राहिला तर या सगळ्यावर पाणी पडणार आहे. हे बोलत असताना तिच्या डोळ्यातून पाणी गळायला सुरुवात झाली आणि हे संकट किती मोठं आहे याची जाणीव झाली.  यादरम्यान येथील अनेक महिलांशी बोलत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती ती म्हणजे या संकटामुळे त्या सैरभैर झालेल्या दिसल्या. आता आपलं काही खरं नाही आणि यात आपला निभाव लागेल कि नाही याची चिंता. शेवटी सगळ्यांची एकच भावना होती ती म्हणजे धंदयावर आमचं पोट आहे आणि धंदाच राहिला नाही तर. 

‘लॉकडाउन’मुळे गावी जाणार कसं?

एक तर कोरोनामुळे येथे ग्राहक येत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. याशिवाय आम्हाला दुसरा पैशाचा मार्ग नाही. मात्र सध्या तोच बंद झाला आहे. येथे राहणेही अवघड झाले आहे. आता गावी जायचे आहे, पण रेल्वे बंद आहे. एसट्या, ट्रॅव्हलसही बंद आहेत. त्यामुळे कसं जगायचं, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  

सरकारने यांच्या समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे
सामाजिक काम करणाऱ्या लोकांच्या मते, सरकारने यांच्या समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे. 'कोरोना' या जीवघेण्या आजारापासून संरक्षण करण्यासाठी मास्क वगैरे पुरवले पाहिजेत. तसेच येथील महिलांची उपासमार होणार नाही याकडे देखील लक्ष द्यावे. कारण अशी वेळ यापूर्वी या महिलांवर कधीही आलेली नाही. अपेक्षा करूया, की सरकार यात लक्ष घालेल आणि आलेलं हे संकट लवकर दूर होईल.