

The Boredom Paradox: Why Gen Z Replaces Stillness with Endless Scrolling
Sakal
प्रणव सखदेव, sakhadeopranav@gmail.com
नव्या पिढीला वेग त्यांच्या संवेदनाशील मेंदूच्या सवयीचा होतो. मग प्रत्यक्ष जगातली गती फार मंद वाटून सारखं बोअर झालंय, बोअर झालंय याचं पालूपद सुरू होतं. आणि या बोअरनेसवर पुन्हा अतिवेगवान, हायपर रिअल स्क्रीनचाच उतारा दिला जातो. मुलांना कंटाळू दिलं पाहिजे, म्हणजे मग ती तो जाण्यासाठी वेगवेगळे उपाय म्हणजेच खेळ शोधतात. नाहीतर सतत हायपर राहतात. कंटाळा ही माणसाच्या आयुष्यातली फार म्हणजे फार निकडीची गोष्ट आहे.
ऑफिसमध्ये शेजारच्या क्यूबिकलमधून मोठ्ठी जांभई दिल्याचा आवाज आला आणि त्यामागोमाग ‘ज्याम बोअर झालंय यार आज!’ ही कमेंट.
मी हळूच बाजूला डोकावून पाहिलं. तिने काही सेकंद खिडकीबाहेर पाहिलं आणि मग पटकन डेस्कवरचा मोबाइल उचलला. तो अनलॉक केला आणि अंगठा लागला कामाला – स्क्रोल, स्क्रोल, स्क्रोल! तिचं वय पंचविशीच्या आसपास. माझ्यापेक्षा जवळपास एक पिढी पुढे किंवा पाच वर्षांची एक पिढी असं नवं गणित केलं तर दोन पिढ्या पुढे. उगाच मला मी म्हातारा झालोय असं फीलिंग आलं!