भारतीय आदिवासींची इंग्लंडमधील स्मृतिस्थळं

लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये भारतीय इतिहासातील अनेक गोष्टी पडून आहेत. वास्तूच्या एका कोपऱ्यात मात्र दुर्लक्षिला जाणारा आदिवासींचा मोठा वारसा खितपत पडून आहे.
Indian Aboriginal Memorials in England
Indian Aboriginal Memorials in Englandsakal

- वैभव वाळुंज

लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये भारतीय इतिहासातील अनेक गोष्टी पडून आहेत. वास्तूच्या एका कोपऱ्यात मात्र दुर्लक्षिला जाणारा आदिवासींचा मोठा वारसा खितपत पडून आहे. अनेक भारतीयही त्याला अनोळखी नजरेने पाहताना दिसतात. भारतीयांनी असा इतिहास स्वतःच्या ओळखीचा सन्माननीय भाग बनवत मिरवण्याची गरज आहे.

परकीय देशात राहत असताना फक्त भारतीय हीच आपली सपाट ओळख असते, असं म्हटलं जातं. मात्र अनेकदा, एकूण भारतीयांच्या परस्पर व्यवहारात असणारे भेद कायम असतानाही भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृतीचा पसारा या सपाटीकरणाच्या नावाखाली दुर्लक्षिला जातो. भारतीय संस्कृती म्हणून उत्तरेतील एक-दोन शहरांच्या उथळ वैशिष्ट्यांना दाखवलं जातं. मात्र, इंग्लंडमध्ये असणाऱ्या भारतीयांच्या प्रचंड संख्येतून आदिवासींची तुरळक; पण इतिहासाचा आरसा दाखवणारी स्थळं तयार झाली आहेत.

लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये भारतीय इतिहासाच्या कित्येक गोष्टी पडून आहेत. भारतीयांना त्यातील काहीएक गोष्टींचं अफाट अप्रूप असतं. शक्यतो तलवारी, ढाली आणि रत्ने असल्या गोष्टी पाहण्यासाठी व मागण्यासाठी काही नेतेही येत असतात. मात्र, त्यांच्या मांदियाळीत वास्तूच्या एका कोपऱ्यात दुर्लक्षिला जाणारा आदिवासींचा मोठा वारसा खितपत पडून आहे. अनेक भारतीयही त्याला अनोळखी नजरेने पाहताना दिसतात.

लाकडाच्या अशा मूर्ती घडवण्याच्या कलेला निकोबार बेटांवर ‘करेआऊ’ असं म्हटलं जातं. शक्यतो एखाद्या आजारी व्यक्तीवर उपचार करण्यासाठी, त्याला वाईट शक्तींपासून वाचवण्यासाठी आणि परदेशी लोकांच्या दुष्प्रभावापासून वाचवण्यासाठी या पद्धतीची मूर्ती लाकडांपासून बनवली जाते.

ब्रिटिश म्युझियममध्ये ठेवण्यात आलेल्या मूर्तीला मेनलूआना प्रकारात गणले जाते. आपले पूर्वज, मृत कुटुंबप्रमुखांच्या स्मृतीत अशा मूर्ती बनवल्या जातात. निकोबारी समूहांमध्ये इतर आदिवासी समाजांप्रमाणेच स्मृतींना महत्त्व दिलं जातं.

अंदमान-निकोबार बेटांवर राहणाऱ्या स्थानिक आदिवासींच्या संस्कृतीचा आणि बेटांच्या बाहेरील संस्कृतीशी आलेल्या संबंधांतून तयार झालेल्या एका कला आणि राज्यव्यवहाराची उकल त्यांनी घडवलेल्या या कलाकृतीतून दिसून येते. पहिल्यांदा डच व्यापाऱ्यांनी ही बेटे काबीज केल्यानंतर इंग्रजांनी त्यावर आपला ताबा मिळवला. तेव्हापासून इथल्या समूहांमध्ये युरोपीय पद्धतीचे कपडे प्रसिद्ध झाले.

त्यातूनच, युरोपीय कपड्यांचा वापर आपल्या सामाजिक आणि राजकीय व्यवहारात करण्यास सुरुवात झाली. इंग्रजांशी व्यवहार करताना आपणही समान पातळीवर असावं आणि इंग्रजांच्या तोडीस तोड मसलती व्यवहार करावेत, या प्रेरणेतून घडवलेल्या या मूर्तीतून बेटांवरील आदिवासींचा प्रखर स्वाभिमान, नवी व्यवस्था घडवण्याची आणि आपल्या परंपरा स्वतःच ओलांडून पुढे जात नवनव्या कलाकृती घडवत पायंडे पाडण्याची वृत्ती दिसून येते.

त्यासोबतच लंडनपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या एल्फर्ड या गावात राजेशाही थाटाचं एक मोठं घर आहे. त्या काळी भारतात सनदी सेवेसाठी असणारी आयसीएस ही परीक्षा उत्तीर्ण करून मणिपूर भागात काम करण्यासाठी गेलेल्या जॉन हिगिंस या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या घराचं रूपांतर आता वस्तुसंग्रहालयामध्ये करण्यात आलं आहे.

त्याने लिहिलेल्या आठवणींमधून तसेच जमा केलेल्या काही वस्तूंमधून भारताच्या उत्तर-पूर्वेकडील आदिवासींचा इतिहास जपला गेला आहे. काळाच्या ओघात येथील परंपरांमधून अस्तंगत झालेल्या अनेक खाद्यपदार्थांची तसेच चालीरीती व पोशाखांची माहिती या संग्रहातून मिळते.

पहिल्या महायुद्धाच्या काळात उत्तर पूर्वेमधून ब्रिटिश सैन्यामध्ये दाखल झालेल्या व त्याचबरोबर फ्रान्ससाठी लढलेल्या आदिवासी सैनिकांविषयी, झु या भातापासून बनणाऱ्या पेयाविषयीची इत्यंभूत माहिती या संग्रहात नमूद केलेली आहे. त्यातील काही सैनिकांनी तेव्हा इंग्रजांच्या बाजूने लढायला नकार दिला व त्यातूनच आदिवासी आणि इंग्रज यांच्यातील संघर्षाची ठिणगी पडली.

भारताच्या आदिवासी वसाहतविरोधी अस्मितेचा इतिहास त्यातून नमूद केला गेला आहे. मात्र, लंडनपासून दूर असल्याने म्हणा किंवा उत्तर पूर्वेकडील राज्यांविषयी असणाऱ्या दृष्टिकोनातून म्हणा, फारच कमी भारतीयांना त्याविषयी माहिती आहे.

लंडनमध्ये अनेकदा भारतातून विविध कलाकार आपली कलाकृती सादर करण्यासाठी येत असतात. महाराष्ट्राच्या गडचिरोली आणि शेजारच्या छत्तीसगड तसेच तेलंगण राज्यात राहणाऱ्या गोंड समुदायातील प्रसिद्ध गोंड चित्रकलेचे कलाकार भज्जू श्याम यांनी आपल्या लंडनमधील भेटीदरम्यान इथल्या रोजच्या जीवनाचं चित्र पाहिलं.

त्यातूनच त्यांना नवीन कलाकृती बनवण्याची प्रेरणा सुचली आणि त्यांनी आदिवासी गोंड चित्रकलेच्या माध्यमातून एका आदिवासी कलाकाराला लंडन शहर कसं दिसतं, याविषयी प्रदर्शन भरवलं. लंडनला एका जंगलाच्या पार्श्वभूमीवर पाहत असताना त्या ठिकाणी काढलेल्या चित्रांमधून जागतिकीकरणाच्या जाणिवा आदिवासी अस्मितेत कशा मिसळून चालल्या आहेत, याचा प्रत्यय येतो.

शक्यतो देवी-देवतांच्या किंवा निसर्गचित्रांसाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या ठळक ठिपक्यांच्या या कलेच्या माध्यमातून गोंड परंपरेत हातावर व शरीरावर ठिपक्यांनी गोंदवली जाणारी कला आता पाश्चात्त्य संस्कृतीच्या खुणांना देशीय अर्थाने कसे समजून घेता येईल आणि या सर्वांचा मागोवा एकत्रितपणे कसा घेता येईल, याचा प्रयत्न करताना दिसते. इतरत्र खचितच मिळणारा हा अनुभव लंडनच्या माध्यमातून आदिवासी कलाकारांना प्राप्त झाला आहे.

पंधराव्या शतकाच्या सुरुवातीपासून विविध देशांमध्ये जाणाऱ्या जहाजांमध्ये ज्याप्रमाणे माल घेऊन विकला जात होता त्याचप्रमाणे परत येताना तिथून स्थानिक संसाधनांबरोबर अनेकदा आदिवासी व्यक्तींना सोबत घेऊन येण्याची क्रूर पद्धत इंग्रजांमध्ये प्रचलित होती.

आपण खरोखरच एखाद्या नव्या भूमिकेचा शोध लावला आहे आणि तेथील व्यक्तींची व समूहांशी देवाण-घेवाण सुरू केली आहे, याचा पुरावा म्हणून त्या समूहातील काही व्यक्तींना मर्जीने व बळजबरीने जहाजावर चढवून लंडनमध्ये आणले जाई.

याप्रकारे जगाच्या कुठल्याही भागात गेल्यानंतर तेथील माणसांना पुरावा किंवा भविष्यातील कामांसाठी भाषांतरकार म्हणून आपल्या ताब्यात घेण्याची ही पद्धत अनेक आदिवासींना अनायसे जगाच्या विविध कोपऱ्यांमधून लंडनमध्ये घेऊन आली. त्यांच्या आठवणी गोळा करून त्याच्याविषयीचे दस्तावेज दक्षिण अमेरिकन व आफ्रिकन लेखकांनी आपल्या कामामधून जतन केले आहेत.

मात्र या पद्धतीचे संशोधन भारतातील आदिवासींच्या बाबतीत झालेले दिसत नाही. अशा लहान-मोठ्या स्मृतींच्या माध्यमातून भारताच्या इतिहासातील, काही अंशी भारतीयांच्या विस्मृतीत व दुर्लक्षित जाणिवेत असलेल्या वारशाचं जतन केलं गेलं आहे. भारतीयांनी अशा इतिहासाला स्वतःच्या ओळखीचा सन्माननीय भाग बनवत मिरवण्याची गरज आहे.

vaiwalunj@gmail.com

(लेखक इंग्लंडमध्ये यूके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत ‘नीती व धोरण’ या विषयावर संशोधन करत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com