
जगभरातील तब्बल ४,७७,२८७ खाद्यप्रेमींनी केलेल्या १५,४७८ पदार्थांच्या नोंदींमधून स्वत:ची मक्तेदारी सिद्ध करणे म्हणजे काही ‘खायची’ गोष्ट नाही; मात्र जगप्रसिद्ध फूड ॲण्ड ट्रॅव्हल गाईड ‘टेस्ट ॲटलस’ पुरस्कारांमध्ये शंभर शहरांच्या यादीत मुंबईच्या वडापावने पाचवे स्थान पटकावल्याची बातमी अभिमानास्पद अशीच आहे.
खिशाला परवडणारा वडापाव फक्त जिभेचे चोचले पुरवत नाही तर पोटाची भूकही भागवतो. सकाळच्या न्याहरीपासून रात्रीच्या जेवणापर्यंत मन अन् पोट तृप्त करतो. परदेशी पर्यटकही अनेकदा मुंबईतील रस्त्यांवर मिळणाऱ्या वडापावचा आस्वाद घेताना दिसतात. म्हणूनच मुंबई आणि वडापाव चवीच्या जागतिक नकाशावर येणे साधी गोष्ट नाही.